You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
थांबा! बीबीसीनं जगाच्या अंताची बातमी दिलेली नाही
व्हॉट्सअॅपवर एक काल्पनिक व्हीडिओ शेअर होत आहे, त्यात बीबीसी न्यूजच्या ब्रॅण्डिंगसह जगात थर्मोन्युक्लियर युद्ध म्हणजेच अण्वस्त्रांचा वापर सुरू झाल्याचं दाखवलं जात आहे.
हा व्हीडिओ फेक आहे. परंतु काही प्रेक्षकांनी बीबीसीशी संपर्क साधून याविषयी चिंता व्यक्त केली आहे. काही लोकांना ही बातमी खरी वाटली, त्यामुळे त्यांनी पडताळणी करण्यासाठी बीबीसीशी संपर्क साधला.
हा व्हीडिओ मुळात यूट्यूबवर शेअर करण्यात आला होता. तो पोस्ट करणाऱ्या मीडिया कंपनीनं हा व्हीडिओ काल्पनिक असल्याचं स्पष्ट केलं होतं. शिवाय आता ते अकाउंट बंदही करण्यात आलं आहे.
व्हॉट्सअपवर मात्र तो व्हीडिओ या स्पष्टीकरणाशिवाय शेअर होत असून बहुतेकांना खरा वाटतो आहे.
व्हीडिओमध्ये काय आहे?
हा व्हीडिओ बीबीसी न्यूजरूमच्या परिचित दृश्यानं सुरू होतो. त्यात वृत्त निवेदक गंभीर चेहऱ्यानं 'रशिया आणि नाटो यांच्यातल्या गंभीर घडामोडींची' बातमी देतो.
"या घडामोडीविषयी अधिक माहिती स्पष्टपणे मिळू शकलेली नाही. परंतु, प्राथमिक माहितीनुसार, रशियाच्या टेहळणी करणाऱ्या विमानावर नाटोच्या नौदलातल्या जहाजावरून हल्ला करण्यात आला आहे, " असं वृत्त निवेदक सांगतो.
तसंच, 'परिस्थिती एवढी गंभीर झाली आहे की, रशियाच्या जहाजांनी नाटोतल्या देशांवर हल्ला सुरू केला आहे. त्यामुळे ब्रिटिश राजघराण्यातल्या सदस्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. तातडीचं प्रसारण करुन लोकांनी घराबाहेर पडू नये, अशा सूचना देण्यात आल्यात. थर्मोन्यूक्लियर युद्ध सुरू झाल्याचं नागरिकांना सांगण्यात आलं आहे. जर्मनीतल्या मेंझ आणि फ्रॅंकफर्ट या दोन शहरांचं मोठं नुकसान झालं आहे', असं या वृत्तात पुढे सांगण्यात आलं आहे.
ही काल्पनिक बातमी करताना बऱ्यापैकी काळजी घेण्यात आली असली तरी त्यात अनेक त्रुटीही आहेत. त्यामुळे ती फेक न्यूज असल्याचं ओळखता येऊ शकतं.
फेक व्हीडिओ कसा ओळखायचा?
बीबीसीचं ब्रॅण्डिंग यात वापरण्यात आलं असलं तरी अक्षरांचा फॉण्ट, स्टाइल, लेआउट पूर्णत: वेगळं आहे. जर आपल्याला कोणत्याही मोठ्या माध्यमाचं नाव असलेला असा व्हीडिओ आला आणि तो बनावट वाटत असेल तर त्या माध्यमाच्या वेबसाईटचं होमपेज पहावं.
जर ती थर्मोन्यूक्लियर युद्धाएवढी मोठी घटना असेल तर बीबीसीच्या वेबसाईटवर ती बातमी असेलच!
कोणी तयार केला हा व्हीडिओ?
हा व्हीडिओ एका आयरिश कंपनीनं 2016मध्ये तयार केला होता आणि त्यात मार्क राइस हा अभिनेत्यानं काम केलं आहे.
मार्क राइसनं यांनी बीबीसीला सांगितलं की, "बेंचमार्किंग असेसमेंट ग्रुप नावाच्या एका कंपनीनं हा व्हीडिओ तयार केला होता. एखादी व्यक्ती आपत्कालीन स्थितीत कसा प्रतिसाद देईल हे पाहण्यासाठी, त्यांच्या सायकोमॅट्रिक टेस्टचा एक भाग म्हणून बनवण्यात आला होता."
"YouTube वर प्रकाशित केलेल्या व्हिडिओेत, हा काल्पनिक व्हिडिओ असून तो बीबीसीच्या खऱ्या बातमीसारखा तो नाही, हे स्पष्ट करण्यात आलं होतं," असंही राइसनं म्हणतात.
"मी त्यात अभिनेता म्हणून काम केलं होतं आणि हिरव्या पडद्याच्या पार्श्वभूमीवर त्याचं चित्रीकरण झालं होतं. त्या संपादनात माझी कोणतीही भूमिका नव्हती," असंही राइस यांनी स्पष्ट केलं.
बीबीसीची भूमिका काय?
बीबीसीच्या प्रेस ऑफिसनं यासंदर्भात ट्वीट करुन अशा प्रकारचा व्हीडिओ शेअर होत असल्याची माहिती असल्याचं म्हटलं आहे. तसंच हा व्हीडिओ यूटयूबवरील असण्याची शक्यता आहे. तेथे तो काल्पनिक असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे, असं बीबीसीच्या प्रवक्त्यानं सांगितलं. परंतु तो खुलासा व्हीडिओ व्हॉट्सअॅपवर शेअर करताना सोबत दिला जात नसल्यानं हे ट्वीट केल्याचंही स्पष्ट केलं आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)