देशोदेशीच्या पासपोर्टबद्दल या 12 रंजक गोष्टी तुम्ही वाचायलायच हव्या

परदेशवारी करायची असेल तर सगळ्यांत महत्त्वाचं दस्तावेज म्हणजे पासपोर्ट. खूप कष्टानंतर मिळवलेला हा दस्तावेज असतो.

पण तुमचा पासपोर्ट परदेशवारीसाठी वैध आहे की नाही, हे तुम्ही कधी तपासलंय का? या क्षणीसुद्धा लाखो लोक याची चाचपणी करत असतील.

पण परदेशवारीसाठी पासपोर्टची गरज कधी आणि कशी लागली, याची गोष्टही तितकीच रंजक आहे.

1. स्कँडेनेव्हियन पासपोर्ट

युरोपच्या उत्तरेस असलेल्या भागाला स्कँडिनेव्हिया म्हणतात. हा भाग उत्तर ध्रुवाच्या जवळ आहे. त्यामुळे इथं खूप थंडी असते. इथं असे अनेक भौगोलिक चमत्कार बघायला मिळतात जे जगात कुठेही बघायला मिळत नाहीत.

असाच एक नजारा म्हणजे 'नॉर्दन लाईट्स'. बर्फाच्या चादरीवर सूर्यकिरणं पडल्यानंतर दिसणारं हे दृश्यं सर्वांत दुर्मिळ आणि तितकंच आकर्षक आहे.

या दृश्यालाच इथल्या देशांच्या पासपोर्टशी जोडण्यात आलं आहे.

जर तुम्ही स्कँडेनेव्हियाचा पासपोर्ट अल्ट्रा व्हायोलेट प्रकाशात पाहिलात तर कागदावर नॉर्दन लाईट्सची आकृती दिसते.

2. सर्वात पहिल्यांदा पासपोर्टचा उल्लेख बायबलमध्ये

पासपोर्टचा वापर हा काही गेल्या 100 वर्षात सुरू झालाय, असं नाही.

नेहेमियाह यांच्या पुस्तकात एक उल्लेख आहे की फारसचा राजा आर्थरजेक्सिस प्रथमनं एका अधिकाऱ्याला पहिल्यांदा असं पत्र दिलं होतं, ज्यामुळे त्याला संपूर्ण ज्युडियात कुठेही फिरण्याची, प्रवास करण्याची मुभा होती.

3. पहिल्या महायुद्धानंतर पासपोर्टवर फोटो छापणं सुरू झालं

पहिल्या महायुद्धानंतर जर्मनीसाठी गुप्तहेराचं काम करणाऱ्याने अमेरिकन पासपोर्टच्या मदतीने इंग्लंडमध्ये प्रवेश केला होता. या घटनेनंतर पासपोर्टवर फोटो छापणं अनिवार्य करण्यात आलं.

4. वजन कमी झालं..? नवा पासपोर्ट बनवा

अमेरिकेत राहणाऱ्यांचं अचानकपणे वजन वाढलं किंवा कमी झालं तर त्यांना पुन्हा पासपोर्ट बनवावा लागतो. इतकंच नाही तर चेहऱ्यावर सर्जरी केली किंवा टॅटू बनवला तरीही नवा पासपोर्ट बनवणं अत्यावश्यक आहे.

5. पासपोर्टसाठी कौटुंबिक फोटो चालायचा

सुरुवातीला पासपोर्टवर स्वत:चा आवडता फोटो लावण्याची मुभा होती. इतकंच नाही तर अख्ख्या कुटुंबाचे फोटोही चालायचे.

6. पासपोर्ट रद्द होण्याआधी सहा महिने नवा पासपोर्ट बनवा

परदेशवारीला जाताना आपल्या पासपोर्ट संबंधित कुठलीही जोखीम उचलू नका. काही देशांच्या कायद्यानुसार तुम्ही त्यांच्या देशात प्रवेश केल्यानंतरच्या 90 दिवसापर्यंत तुमचा पासपोर्ट वैध असला पाहिजे. युरोपातल्या बऱ्याच देशात हा नियम लागू आहे.

मात्र सुरक्षेच्या कारणास्तव किमान सहा महिन्याच्या कालावधीचं पालन तुम्ही करायला हवं. चीन, इंडोनेशिया, रशिया, सौदी अरेबियासारख्या देशात हाच नियम लागू आहे.

हा नियम तुम्ही देशातून परतताना कुठल्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये यासाठी तयार करण्यात आला आहे.

7. क्वीन्सलँडमधून ऑस्ट्रेलियाला जाण्यासाठी पासपोर्टची गरज नाही

जर तुम्ही क्वीन्सलँडच्या मार्गे ऑस्ट्रेलियात प्रवेश करणार असाल तर तुम्हाला पासपोर्ट आवश्यक नाही.

अर्थात हा नियम सरसकट सगळ्यांना लागू नाहीए. तुम्ही जर पापुआ न्यू गिनीच्या तटालगत असलेल्या 9 विशेष गावातील रहिवाशी असाल तरच तुम्हाला ही मुभा आहे.

पापुआ न्यू गिनीच्या स्वातंत्र्यानंतर एक संधी म्हणून अशा लोकांना विना पासपोर्ट ऑस्ट्रेलियात जाण्याची विशेष संधी देण्यात आली आहे.

8. व्हॅटिकनचं इमिग्रेशनवर नियंत्रण नाही

व्हॅटिकनजवळ इमिग्रेशनचं कुठलंही नियंत्रण नाहीए. हे नियंत्रण थेट पोप व्हॅटिकन यांच्यापाशीच असतं, जे पासपोर्ट नंबर 1चे अधिकारी आहेत.

9. बऱ्याच अमेरिकन नागरिकांकडे पासपोर्ट नाही

अमेरिकी परराष्ट्र खात्याच्या माहितीनुसार अमेरिकेत जवळपास 32 कोटी नागरीक आहेत. ज्यातील 12 कोटी लोकांकडे पासपोर्ट नाहीए.

10. इथं पासपोर्ट विकले जातात

टोंगामध्ये कधीकाळी 20 हजार डॉलरला पासपोर्ट विकला जायचा.

असं सांगितलं जातं की पॉलिनेशियाईचे दिवंगत राजे तौफा आहातुपु चौथे यांनी देशाचं उत्पन्न वाढवण्यासाठी इतर देशातल्या नागरिकांना टोंगाचे पासपोर्ट विकले होते.

11. फिनिश आणि स्लोव्हेनियन पासपोर्ट फ्लिकर बुक स्वरूपात

जर तुमच्याकडे फिनिश किंवा स्लोव्हेनियन पासपोर्ट असेल, आणि तुम्ही एअरपोर्टवर बसल्या बसल्या बोर झाला असाल तर पासपोर्ट तुमचं मनोरंजन करू शकतो.

कारण या पासपोर्टची पानं उलटलीत तर त्यातून एक चलचित्र तयार होतं, कारण हे पासपोर्ट एक फ्लिकर बुकसारखं असतं.

12. निकारागुआचा पासपोर्ट सगळ्यांत सुरक्षित

निकारागुआच्या पासपोर्टमध्ये 89 प्रकार सुरक्षेच्या गोष्टी असतात, ज्यात होलोग्राम आणि वॉटरमार्कचाही समावेश आहे.

त्यामुळे हा जगातला सर्वांत सुरक्षित पासपोर्ट मानला जातो.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)