You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अबखाजिया : ज्याचं स्वतंत्र अस्तित्त्व जगाला मान्य नाही असा एक देश
- Author, स्टीफन डाऊलिंग
- Role, बीबीसी फ्युचर
काळानुसार व्यक्तीच काय पण जागाही बदलतात असं म्हणतात. पण काही लोक आणि जागा या काळाच्या चौकटीच्या बाहेर येत नाहीत.
अशाच एका जागेचं नाव आहे - अबखाजिया.
कदाचित तुम्ही हे नाव ऐकलंही नसेल. काहींनी हे नाव ऐकलं असेल, पण ते इथे गेले नसतील. हा भूभाग युरोपाच्या पूर्वला काळा समुद्र आणि कॉकेशस पर्वत रांगांच्या मधोमध आहे.
1990 च्या दशकात अबखाजिया आपण एक स्वतंत्र देश असल्याचं घोषित केलं. पण जगातल्या काही मोजक्याच देशांनी या भागाला एक देश म्हणून मान्यता दिलीय. हा असा एक देश आहे, जो जगाला माहित नाही, ज्याचं स्वतंत्र अस्तित्त्व मान्य नाही.
1980च्या दशकाच्या शेवटी सोव्हिएत युनियन फुटायला सुरुवात झाली. त्याच सुमारास अबखाजियानेही जॉर्जियापासून वेगळं होण्याच्या हालचाली सुरू केल्या. जॉर्जियाला सोव्हिएत संघातून वेगळं व्हायचं होतं, तर अबखाजियाला जॉर्जियातून.
1930च्या दशकापासूनच अबखाजिया प्रांत हा सोव्हिएत संघाच्या जॉर्जियाचा भाग होता. पण त्याला बरीच स्वायत्तता होती.
पण त्यापूर्वी अबखाजिया हा एक स्वतंत्र प्रांत होता.
आपण सोव्हिएत संघापासून वेगळं होतं स्वतंत्र होत असल्याचं 1991मध्ये जॉर्जियाने जाहीर केलं आणि आता आपली स्वायत्तता संपुष्टात येणार अशी भीती अबखाजियावासियांना वाटू लागली.
यातूनच तणाव वाढला आणि 1992मध्ये गृह कलहाला सुरुवात झाली. जॉर्जियाच्या सैन्य सुरुवातीला वरचढ ठरलं आणि त्यांनी अबखाजियाच्या बंडखोरांना राजधानी सुखुमीच्या बाहेर पिटाळून लावलं.
पण बंडखोरांनी पुन्हा सगळी शक्ती पणाला लावत जॉर्जियाच्या सैन्यावर प्रतिहल्ला केला. या युद्धात हजारो लोक मारले गेले.
यानंतर जॉर्जियन वंशाच्या 2 लाखांपेक्षा जास्त जणांना अबखाजिया सोडून पळ काढावा लागला. यासाठी रशियन लष्करानेही अबखाजियाच्या बंडखोरांना मदत केली होती.
सोव्हिएत संघ असतानाच्या काळापासून अबखाजिया पर्यटकांमध्ये लोकप्रिय होता. सौम्य उन्हाळा आणि हिवाळा असल्याने फिरण्यासाठी इथे जायला अनेकांची पसंती होती. पण 1990च्या दशकात यादवी युद्ध सुरू झालं आणि पर्यटक यायचे थांबले. आता जॉर्जियाचं सैन्य इथून माघारी गेलं असलं तरी इथली हॉटेल्स आणि रेस्टॉरंट सुनसान आहेत.
प्रसिद्ध फोटोग्राफर स्टिफानो माझ्नो यांनी काळाच्या चक्रात अडकलेल्या या देशाला अनेकदा भेट दिली आणि तिथले फोटो काढले.
स्टिफानो सांगतात, "खरंतर अजूनही अबखाजियाच्या सीमेवर रशियन सेनेचा ताबा आहे, पण तिथे जाऊन फोटो काढणं अवघड नव्हतं. हा फक्त नावापुरता स्वतंत्र देश आहे. प्रत्यक्षात अबखाजिया ही रशियाच्या हातची कळसुत्री बाहुली आहे."
2008 मध्ये जॉर्जियासोबत लहानसं युद्ध झाल्यापासून रशियनाने अबखाजियाचा वापर जॉर्जियावर हल्ला करण्यासाठी केलाय. अबखाजिया आणि रशियाचे संबंध चांगले आहेत. अबखाजिया रशियाकडून मिळणाऱ्या मदतीवरच अवलंबून आहे.
स्टेफानो सांगतात, "अबखाजियाच्या फक्त सीमांवरच रशियाचं नियंत्रण आहे असं नाही. रशियाने अबखाजियाच्या सामाजिक आणि राजकीय व्यवस्थांवरही कब्जा केलाय. इथल्या रिअल इस्टेट क्षेत्रावरही रशियाचाच अंमल वाढतोय. यात अबखाजियाचा फायदा असा, की त्यांना रशियाकडून मदत मिळत राहील."
रशिया, निकाराग्वा, सीरिया, नाऊरु आणि व्हेनेझुएला या पाचच देशांनी आतापर्यंत अबखाजियाला मान्यता दिली आहे.
टॅक्सी मिळवणं कठीण
अबखाजियामध्ये भाड्यावर टॅक्सी घेणं हे एक अतिशय मोठं आव्हान असल्याचं स्टेफानो सांगतात. प्रवासासाठी तुम्हाला सरकारी बसेसवर अवलंबून रहावं लागतं. टाईम मशीनद्वारे काळात मागे गेल्यासारखं इथे वाटत असल्याचं स्टिफानो सांगतात.
पण गंमतीची गोष्ट म्हणजे इथली बस स्थानकंही सोव्हिएत संघाच्या काळातली आहेत. 1990च्या दशकापासून युद्ध सुरू असल्याने जागोजागी ढिगारे पडलेले आहेत. रशियाचं चलन - रुबल हेच अबखाजियामध्येही वापरलं जातं. या देशातल्या बहुतेक मालमत्तेवर रशियाचाच ताबा आहे.
अबखाजियाची स्वतःची संसदही नाही. इथली राजधानी सुखुमीमध्ये असणारी संसदेची जुनी इमारत भकास झालेली आहे. जवळच्याच शहरातलं मुख्य रेल्वे स्टेशनही असंच उजाड आहे.
इथल्या सरकारी इमारतींचे फोटो काढणं खूप कठीण असलं तरी लोकांचे फोटो काढण्यात कोणतीच अडचण आली नसल्याचं स्टिफानो सांगतात. तिथली परिस्थिती अशी आहे की फोटो डेव्हलप करण्याचं तंत्रज्ञानही तिथे उपलब्ध नाही.
एक काळ असा होता जेव्हा दर वर्षी साधारण दोन लाख लोक अबखाजियाला फिरायला येत. जगभरातून पर्यटक इथे फिरायला येत होते. आता फक्त रशियातून लोक इथे फिरायला येतात.
शेजारी देश जॉर्जियाने तर या देशात जाण्याची मनाई करणारा कायदाच अंमलात आणलाय. अबखाजियाच्या एकूण लोकसंख्येपैकी 25 टक्के जण हे जॉर्जियन वंशाचे होते. पण त्या सगळ्यांनी पलायन केल्याने आता अबखाजिया सुना झालाय.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)