जर्मनीत तिढा सुटला: अँगेला मर्केल चौथ्यांदा सरकार स्थापन करणार

जर्मनीत पुन्हा एकदा अँगेला मर्केलप्रणीत युतीचं सरकार सत्तेवर येणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. सोशल डेमोक्रॅट्स (SPD) पक्षाने मर्केलच्या पक्षासोबत महायुतीच्या बाजूने कौल दिल्यामुळे निवडणूक निकालांच्या जवळपास सहा महिन्यांनंतर सत्तेसाठीचा तिढा अखेर सुटला आहे.

कोणाच्या बाजूने कौल द्यायचा, यावरून SPD पक्षात दोन तट पडले होते. SPDच्या नेत्यांचा गट महाआघाडीला पाठिंबा देत होता तर मूलतत्त्ववादी युथ विंगचा या युतीला विरोध होता.

12 वर्षं जर्मनीच्या चान्सलरपदाची धुरा सांभाळणाऱ्या मर्केल या चौथ्यांदा सत्ता स्थापन करतील. त्यांनी SPD चं अभिनंदन केलं आहे.

देशाच्या भल्यासाठी एकत्र काम करण्यासाठी कटिबद्ध आहोत, अशा शब्दांत मर्केल यांच्या पक्षाने ट्विटरवर आपल्या भावना व्यक्त केल्या.

SPDच्या 66 टक्के सदस्यांनी युतीत कायम राहून काम करण्याला पाठिंबा दिला. युथ विंगचे युवा मतदार या धोरणाला आक्षेप घेतील, याची पक्षाच्या नेत्यांना चिंता होती. बर्लिनमध्ये पक्षाच्या मुख्य कार्यालयात रात्रभर मतमोजणी सुरू होती.

"आता चित्र स्पष्ट झालं आहे. सोशल डेमोक्रॅट्स सरकारचा भाग असेल," असं पक्षाचे अंतरिम नेते ओलाफ स्कॉल्झ यांनी सांगितलं.

मर्केल यांच्यासमोर आता 'Alternative for Germany (AfD)' या राष्ट्रवादी पक्षाच्या विरोधासह अनेक मोठी आव्हानं आहेत. स्थलांतराला विरोध करणाऱ्या या पक्षाने पहिल्यांदा सप्टेंबरमध्ये संसदेत आपली छाप उमटवली. सध्या 12 टक्के मतांसह हा पक्ष जर्मन संसदेतला सगळ्यांत मोठा विरोधी गट असणार आहे.

निवडणुकीत आतापर्यंतच्या सगळ्यांत वाईट कामगिरीमुळे SDP पक्षावर नामुष्की ओढवली. मर्केल यांच्या Christian Democrats (CDU/CSU) पक्षाशी युती केल्यामुळे त्यांच्यावर ही वेळ आली, अशी टीका अनेकांनी केली.

मर्केल यांच्या पक्षाचीही कामगिरी यथातथाच राहिली. CDU/CSUने निवडणुकीत 65 जागा गमावल्या. उदारमतवादी Free Democrats (FDP) आणि Greens या पक्षांना हाताशी घेत मर्केल यांनी सत्ता स्थापण्यासाठी प्रयत्न सुरू केले. पण त्यांना यश आलं नाही.

सत्ता स्थापनेसाठी युती जुळवून आणताना मर्केल यांना मोठी किंमत चुकवावी लागली आहे, कारण जर्मनीचे अर्थमंत्री सोशल डेमोक्रॅट्स पक्षाचे असणार आहे. अन्य सहा मंत्रीपदांबाबतचा निर्णय सोशल डेमोक्रॅट्स पक्षातर्फे घेतला जाईल.

सोशल डेमोक्रॅट्स पक्षाचे माजी कार्याध्यक्ष मार्टिन शुल्झ यांनी परराष्ट्र मंत्रीपदासाठी दावेदारी सादर केली होती. मात्र पक्षांतर्गत विरोधामुळे त्यांनी माघार घेतली. सुरुवातीला त्यांनी मर्केल यांच्या पक्षाबरोबर आघाडी होणार नसल्याचं वक्तव्य केलं होतं. मात्र पक्षाने मर्केल यांच्या पक्षाशी हातमिळवणी केल्याने शुल्झ तोंडघशी पडले.

आता जर्मनीत राजकीय चित्र स्पष्ट झाल्याने युरोपियन युनियनच्या कामकाजात सुरळीतता येणाची चिन्हं आहेत.

अँगेला यांच्यासाठी खडतर वाटचाल

बर्लिनहून या सत्तास्थापनाचं विश्लेषण करताना बीबीसी न्यूजच्या जेनी हिल सांगतात की अँगेला मर्केलसाठी पुढची वाटचाल खडतर असेल.

"जर्मनीत जवळपास सहा महिने सत्ता कोणाची असणार याविषयी स्पष्टता नव्हती. आता मर्केल यांच्या कॉन्झर्व्हेटिव्ह्स आणि सोशल डेमोक्रॅट्स यांचं हे संयुक्त सरकार असेल."

"आघाडीमुळे मर्केल यांनी सुटकेचा निश्वास सोडला असेल. मात्र सत्तास्थापनेसाठी मर्केल यांना तडजोड करावी लागली आहे. त्यामुळे मर्केल यांच्या नव्या सरकारची वाटचाल खडतर असेल. जर्मन नागरिकांना स्थिर सरकार मिळवून देणं हे मोठं आव्हान असेल."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)