सुनील देवधर : मराठी माणसाने आणली त्रिपुरात भाजपची सत्ता

सुनील देवधर हे मराठमोळं नाव महाराष्ट्रात फारसं कुणाला माहीत नाही. पण ईशान्य भारतातल्या त्रिपुरा राज्यात हे नाव वृत्तपत्रांच्या मथळ्यांवर झळकतंय. कारण ते फक्त राज्य भाजपचे प्रभारीच नाहीयेत, तर डाव्यांचा हा 25 वर्षांपासूनचा बालेकिल्ला सर करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.

त्रिपुरामध्ये 43 जागा मिळवत भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. इथे गेल्या वेळी भाजपला भोपळाही फोडता आला नव्हता. अशा परिस्थितीत पक्षाची बांधणी करत कम्युनिस्टांना टक्कर देणं हे अतिशय कठीण आव्हान होतं.

मूळ गुहागरचे आणि सध्या अंधेरीत घर असलेल्या देवधरांनी खऱ्या अर्थाने ईशान्य भारतालाच आपलं घर मानलं आहे. 52 वर्षांचे देवधर अविवाहित असून अनेक वर्षांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते म्हणून ईशान्य भारतात काम करत होते.

''सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी प्रत्येक संघ स्वयंसेवकानं देशासाठी एक वर्ष द्यावं असं आवाहन केलं होतं. त्याला प्रतिसाद देत देवधर यांनी ईशान्य भारतात काम करण्याची इच्छा व्यक्त केली. तेथून त्यांचं या भागातलं काम सुरू झालं," असं देवधरांचे सहकारी दिनेश कानजी सांगतात.

'मोदी दूत'

भाजपमध्ये आल्यानंतर त्यांच्यावर पहिली मोठी जबाबदारी सोपवण्यात आली ती वाराणसीची. त्यापूर्वी त्यांनी गुजरात आणि दिल्लीमध्ये विधानसभेच्या काही मतदारसंघांमध्ये काम केलं होतं. लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी मतदारसंघातून लढले होते. त्यावेळी त्यांच्या निवडणुकीची आणि व्यवस्थापनाची जबाबदारी देवधरांच्या खांद्यांवर होती.

वाराणसीत मोदींचा विश्वास कमावल्यानंतर त्यांच्याकडे त्रिपुराची जबाबदारी देण्यात आली. त्यांना शुन्यातून पक्षाची मांडणी करायची होती. त्यांनी अगदी बूथ लेव्हलपासून पक्षबांधणीचं काम सुरू केलं होतं.

त्यांच्याकडे निवडणूक लढवण्याचा अनुभव नव्हता, पण वाराणसीत अमित शहांची निवडणूक यंत्रणा त्यांनी जवळून पाहिली होती. देवधर प्रसारमाध्यमांमध्ये फारसे झळकले नाहीत, पण मोदींप्रमाणेच ते सोशल मीडियावर सक्रिय आहेत. ते दररोज फेसबुकवर स्वतः क्रिएटिव्ह तयार करून प्रसिद्ध करतात.

"रस्त्यावर खड्डा दिसला, तर ते तिथून थेट फेसबुक लाईव्ह करायचे. ट्रेनमध्ये लोकांशी बोलायचे. त्यांनी मोठ्या सभांपेक्षा गावोगाव फिरण्यावर भर दिला," असं बीबीसी प्रतिनिधी सलमान रावी सांगतात.

त्यांनी 'मोदी दूत' नावाची योजना आखली. ते रोज 24 कार्यकर्त्यांना रेल्वे स्टेशनवर पाठवायचे आणि मोदींनी केलेल्या कामाची माहिती सांगायचे. असा थेट प्रचार एक वर्ष आधीपासून सुरू झाला होता.

साधेपणासाठी ओळखल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री माणिक सरकार यांच्यावर देवधर थेट हल्ला करायचे. बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले होते, "लोकांना गरीब मुख्यमंत्री नको. गरिबी दूर करणारा मुख्यमंत्री हवा."

स्थानिक भाषा शिकले

देवधरांनी त्रिपुराच्या आधी मेघालयातसुद्धा भाजपसाठी काम केलं. यावेळी मेघालयातही भाजपला दोन जागा मिळाल्या आहेत.

सुनील देवधर 'माय होम इंडिया' नावाची संस्था चालवतात आणि ईशान्य भारतातील तरुणांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करतात. स्थानिक तरुणांशी संवाद साधण्यासाठी त्यांनी मेघालयच्या खासी आणि गारो समाजाच्या लोकांशी त्यांच्याच भाषेत संवाद साधला तेव्हा लोकांना आश्चर्याचा धक्का बसला. त्याच प्रमाणे ते अस्खलित बंगालीही बोलतात.

लोकांशी संवाद साधत असताना देवधरांनी मोडतोडीचं राजकारणही केलं. त्रिपुरामध्ये डावे पक्ष, काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसला खिंडार पाडण्याचं कामसुद्धा त्यांनी केल्याचं म्हटलं जातं. नेमकं विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर या पक्षांचे अनेक नेते आणि आमदार भाजपात सामील झाले.

ईशान्य भारताचा दौरा करताना अनेक चांगल्या काँग्रेस नेत्यांची भेट झाल्याचं ते सांगतात. तेव्हापासूनच त्यांनी अशा नेत्यांना आपल्या पक्षात सामील करून घ्यायला सुरुवात केली. पण यामुळे भाजपच्या जुन्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची नाराजी त्यांनी ओढावून घेतल्याचं बीबीसी प्रतिनिधी सलमान रावी सांगतात.

ज्येष्ठ पत्रकार संदीप फुकन बीबीसीला सांगतात, "मी या यशाचं श्रेय सुनील देवधर यांना देतो. त्यांनी पाच वर्षें खूप काम केलं. RSSनंही या भागात काम केलं."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)