पुणे-पिंपरीच्या निकालाचे अर्थ काय? याचा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर काय परिणाम होईल?

    • Author, प्राची कुलकर्णी, प्रियंका जगताप
    • Role, बीबीसी मराठीसाठी

राज्यात 9 वर्षांनंतर 29 महानगरपालिकांच्या निवडणुका 15 जानेवारीला झाल्या. त्याचे निकाल 16 जानेवारीला समोर आले.

या निवडणुकीत मुंबईनंतर पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निकालांकडं अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. कारण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये पवार काका-पुतण्या पहिल्यांदाच एकत्र निवडणूक लढणार होते. त्यामुळे त्याची राज्यभरात चर्चा होती.

कारण पुणे आणि पिंपरी चिंचवडला अजित पवारांचा बालेकिल्ला मानलं जातं. त्यात, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानं भाजप आणि दोन्ही राष्ट्रवादींमध्ये जोरदार लढत पाहायला मिळेल, असं चित्र होतं. अजित पवारांसाठी तर ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात होती.

मात्र, आता पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये विजयाचा गुलाल भाजपनं उधळला आहे, हे स्पष्ट झालं आहे. त्यामुळे अजित पवारांना मोठा धक्का बसला आहे.

या निकालांमुळे महायुतीत अजित पवारांची बार्गेनिंग पॉवर कमी होईल का, या निकालांमुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानं कुणाला फायदा झाला, याचाच आढावा या लेखातून घेण्यात आला आहे.

पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेचा अंतिम निकाल काय?

पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेचा अंतिम निकाल पुढीलप्रमाणे,

पुणे : एकूण जागा 165

  • भाजप - 119
  • शिवसेना (शिंदे) - 00
  • शिवसेना (ठाकरे) - 01
  • राष्ट्रवादी (अजित पवार) - 27
  • राष्ट्रवादी (शरद पवार) - 03
  • काँग्रेस - 15
  • एमआयएम - 00
  • अपक्ष - 00
  • इतर - 00

पिंपरी चिंचवड - एकूण जागा 128

  • भाजप - 84
  • काँग्रेस - 00
  • राष्ट्रवादी (अजित पवार) - 37
  • राष्ट्रवादी (शरद पवार) - 00
  • शिवसेना (शिंदे) - 06
  • शिवसेना (ठाकरे) - 00
  • अपक्ष - 1

निकालांमागचा अर्थ काय?

पुणे महानगरपालिकेमध्ये 165 जागांसाठी तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये 128 जागांसाठी 15 जानेवारीला मतदान झालं. पुणे महानगरपालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी 82 जागांची, तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 65 जागांची गरज होती.

या निवडणुकीत राष्ट्रवादीला मिळालेल्या जागांबाबत बीबीसी मराठीच्या प्राची कुलकर्णी यांनी पुणे सकाळच्या संपादक शीतल पवार यांच्याशी चर्चा केली.

त्या म्हणाल्या, "पिंपरी चिंचवडचे राजकारण गावकी-भावकीचे आहे. त्यात उमेदवाराचा संपर्क किती, तो किती शक्तीशाली यावरही हे राजकारण अवलंबून असतं. लोकसभा किंवा विधानसभेला हिंदुत्वासारखं 'ब्रॉड कार्पेट नरेटिव्ह' आणलं जातं आणि त्याचा परिणाम होताना आपण बघतो. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत असं होत नाही. या निवडणुकांमध्ये स्थानिक उमेदवारांच्या ताकदीवर खूप काही अवलंबून असतं."

"या ताकदीत स्थानिक वोटबँक, आर्थिक क्षमता या सर्व गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. स्थानिक निवडणुकीत प्रत्येकाची आपआपली गणितं असतात. प्रत्येकजण आपला गड राखण्याचा, आपला प्रभाव कायम ठेवण्याचा प्रयत्न करत करतो.

अजित पवारांना देखील त्यांनी तयार केलेल्या 'नॅरेटिव्ह'च्या आधारे जागा मिळतील याची खूप खात्री होती. मात्र, आकड्यांमध्ये तसं दिसत नाही. भाजपनं जिंकण्यासाठी जे जे करावं लागतं ते केलं आणि आज विजयाचं पारडं त्यांच्याकडे आहे", असंही त्या पुढे म्हणाल्या.

पुण्याची निवडणूक भाजपसाठी एकतर्फी वाटत होती. मात्र, निवडणूक जशी पुढे गेली तशी अजित पवार यांचा आवाज वाढताना दिसला. त्यांनी माध्यमांमध्येही जागा व्यापली, असं पुण्याच्या निकालांबाबत शीतल पवार सांगतात.

पवार यांच्या मते, "2017 च्या निवडणुकीत भाजपकडे दोन्ही महानगरपालिकांमध्ये सत्ता होती. त्यांचे 100 पेक्षा अधिक नगरसेवक होते. त्या बळावर आधीपासून भाजप आघाडीवर होता. शेवटच्या टप्प्यात भाजपनं पुणे शहरात आरोप प्रत्यारोपांना बगल दिली आणि त्यांचं सगळं नरेटिव्ह विकासाकडे शिफ्ट केलं. त्यामुळे पुणे शहराचे निकाल मला अजिबात आश्चर्याचे वाटत नाहीत."

मात्र, राष्ट्रवादीत तसं नव्हतं, शेवटच्या टप्प्यात पक्षांतरं करून घेतली गेली, स्थानिक मजबूत इलेक्टिव्ह मेरिट असलेले उमेदवार राष्ट्रवादीकडे फार उरले नव्हते.

त्यांच्या स्थानिक नेत्यांनीही संघटना वाढण्यासाठी किंवा ताकदीचे उमेदवार देण्यासाठी फार प्रयत्न केले नाहीत, असं निरिक्षण त्या नोंदवतात.

तर ज्येष्ठ पत्रकार सुनील माळी म्हणाले, "दोन्ही राष्ट्रवादी पक्षांना एकत्र लढायचं होतं की नाही हेच कळलं नाही. कारण शेवटपर्यंत दोन्ही पक्षांत मनोमिलन झालेलं दिसलं नाही. कारण शरद पवार कुठेच प्रचारात आले नाहीत."

या निकालांमुळे अजित पवारांची बार्गेनिंग पॉवर कमी होईल का?

मात्र, या निकालांमुळे महायुतीत अजित पवारांची बार्गेनिंग पॉवर कमी होईल का, असा प्रश्नही उपस्थित होतो. यावरही ज्येष्ठ पत्रकार सुनील माळी यांनी बीबीसी मराठीशी चर्चा केली.

या निकालांमुळे अजित पवारांचं महायुतीमधलं वजन कमी होईल, असं त्यांना वाटत नाही.

सुनील माळी म्हणाले, "शरद पवारांना 'चेक' करण्यासाठीच भाजपनं अजित पवारांना जवळ घेतलेलं आहे. कारण बारामती, पुणे जिल्हा आणि एकूणच मराठा राजकारण पाहता जोपर्यंत शरद पवारांना 'चेक' करण्याचं काम अजित पवार करत आहेत तोपर्यंत महायुतीला अजित पवारांची गरज आहे. त्यामुळे या निवडणुकीचा त्याच्याशी काही संबंध येत नाही."

पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानं कुणाला फायदा झाला?

राष्ट्रवादीला दोन्ही पक्ष एकत्र आल्याचा फायदा होईल असं वाटलं होतं. पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) नेत्या सुप्रिया सुळे पत्रकार परिषदेसोबत फक्त दोन दिवस प्रचारात उतरलेल्या दिसल्या.

पिंपरीमध्ये अमोल कोल्हे, रोहित पवार अगदी शेवटी शेवटी प्रचारात लक्ष घालताना दिसले.

रोहित पवारांनी पिंपरीत काहीसं लक्ष घातलं, पण सगळा प्रचार हा अजित पवारांच्या भोवतीच फिरताना दिसला. अजित पवार ज्या भाजपसोबत राज्याच्या सत्तेत आहेत, त्याच भाजपला त्यांनी थेट लक्ष केलं.

यामुळे लोकांमध्ये असंच वातावरण राहिलं की, हे तर नंतर एकत्र येणारच आहेत, मग आत्ता का भांडण करत आहेत.

शितल पवार यांच्यामते, पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन लढले याचा फायदा भाजपलाच झाला.

त्या म्हणाल्या, "तुम्ही तुमच्या विरोधातील एक आवाज कमी केला. अजित पवारांनी दुसऱ्या राष्ट्रवादीशी जुळवून घेऊन त्यांना अधिक जागा दिल्या, त्यांना चर्चेत आणलं. जाहिरनाम्याच्या पत्रकार परिषदेत अजित पवारच बोलत होते. सुप्रिया सुळेंचा आवाज नव्हता."

"शेवटच्या टप्प्यात त्यांनी शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीतील पक्षप्रवेश कमी केले. मात्र, अगदी प्रचाराच्या मध्यापर्यंत अजित पवारांकडे होणारे बहुतांशी पक्षप्रवेश राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षातून होते."

तर ही निवडणूक भाजपनं ज्याप्रकारे हाताळली आहे ते महत्त्वाचं असल्याचं सुनिल माळी सांगतात.

ते म्हणाले, "भाजपचं विकास धोरण त्यांनी लोकांसमोर मांडलं, देवेंद्र फडणवीसांनी पुण्यात सभा घेतल्या, वेगवेगळ्या योजना मांडल्या आणि पुण्यातील लोकांच्या रोजच्या प्रश्नांविषयी बोलले, तर ते लोकांना जास्त भावलं."

निकालाने दोन्ही राष्ट्रवादींना काय दिशा मिळेल?

शितल पवार यांच्यामते, दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र येणं हा चकवा होता. याचा सगळा राजकीय फायदा हा भाजपला झाला.

त्या म्हणाल्या, "यामुळे विरोधाचा आवाज कमी झाला. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील, न येतील याबाबत अजित पवार प्रचाराच्या शेवटच्या दिवशी बोलले आणि यावर काहीही विचार झालेला नाही, असं सांगितलं. या निवडणुकीत त्यांनी कितीतरी प्रवेश शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून करून घेतले."

"शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादीच्या एकमेव विद्यमान आमदारांच्या कुटुंबातून दोनपेक्षा अधिक उमेदवार भाजपच्या तिकिटावर लढले. त्यांच्या मतदारसंघात एकही उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर नाहीय. अशी परिस्थिती असताना अनेक ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादींच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत", असेही मुद्दे त्यांनी उपस्थित केले.

या मुद्द्यावर राजकीय विश्लेषक आणि पत्रकार प्रशांत आहेर यांनी बीबीसी मराठीशी चर्चा केली.

ते म्हणाले, "सुरुवातीपासूनच देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांमध्ये हे स्पष्ट होतं की, अजित पवारांची राष्ट्रवादी ही निवडणूक स्वतंत्रपणे लढेल. तसेच ही लढत मैत्रीपूर्ण असेल, असंही देवेंद्र फडणवीसांनी वारंवार स्पष्ट केलं."

हा मतविभागणीचा डाव असल्याचंही ते सांगतात.

प्रशांत आहेर म्हणाले, "अजित पवारांना स्वतःवर असा विश्वास होता की, ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत घेतील. मुळात स्वतंत्र लढण्याशिवाय त्यांना पर्यायच नव्हता. कारण भाजपबरोबर गेले असते, तर भाजपचे विनिंग उमेदवार 100 आणि अजित पवारांचे 42 असते आणि 165 पैकी 142 जागा गेल्या असत्या तर उरलेल्या किती जागांवर ते लढणार, असा प्रश्न होता. त्यामुळे त्यांनी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)