डोनाल्ड ट्रंप 2024 साली पुन्हा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी निवडून येतील का?

    • Author, जान्हवी मुळे
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

अनपेक्षित विजय, चार वर्षांची वादळी कारकीर्द आणि पराभव स्वीकारण्यास नकार. अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या राजकीय कारकीर्दीचं वर्णन मोजक्या शब्दांत असंच करता येईल.

पण आता यंदाच्या निवडणुकीत आवश्यक इलेक्टोरल मतं मिळवून जो बायडन अमेरिकेचे निर्वाचित राष्ट्राध्यक्ष बनले असले, तरी त्यामुळे ट्रंप यांच्या कारकीर्दीची अखेर झाली असं म्हणता येणार नाही.

एक तर ट्रंप यांनी पराभव स्वीकारलेला नाही आणि वेगवेगळ्या राज्यांतल्या कोर्टांमध्ये या निकालाला आव्हान दिलं आहे. मात्र त्यानं निकालात फारसा फरक पडेल असं अमेरिकेतल्या बहुतांश कायदेतज्ज्ञांना वाटत नाही.

पण मग ट्रंप पुन्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनू शकतात का? कायद्यानुसार हे शक्य आहे.

अमेरिकेची राज्यघटना काय सांगते?

अमेरिकेत दर चार वर्षांनी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होते आणि कुठल्याही राष्ट्राध्यक्षाला चार वर्षांच्या दोन कार्यकाळांपेक्षा अधिक काळ सत्तेत राहता येत नाही. अमेरिकन राज्यघटनेत 1951 साली झालेल्या घटनादुरुस्तीनं हा नियम लागू केला.

पण कुणी किती वेळा निवडणूक लढवावी, यावर मात्र काहीही निर्बंध नाहीत. तसंच हे दोन कार्यकाळ सलगच असावेत असंही बंधन नाही. त्यामुळे पराभव झाला, तरी चार वर्षांनी पुन्हा निवडणूक लढवणं आणि जिंकणं हा पर्याय ट्रंप यांच्यासमोर आहे.

याआधी असं कधी झालं होतं?

ट्रंप पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि जिंकले, तर असं करणारे ते पहिलेच राष्ट्राध्यक्ष ठरणार नाहीत.

ग्रोव्हर क्लीव्हलँड 1884 साली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले होते पण 1988 साली त्यांना बेंजामिन हॅरिसन यांनी पराभूत केलं. मात्र क्लीव्हलँड 1892 सालच्या निवडणुकीत हॅरिसनना हरवत राष्ट्राध्यक्षपद परत मिळवलं.

अर्थात, एकच कार्यकाळ सत्तेत राहिलेल्या राष्ट्राध्यक्षांची यादीही मोठी आहे आणि त्यात जॉर्ज बुश सीनियर, जिमी कार्टर, जेराल्ड फोर्ड, हर्बर्ट हूवर यांच्यासारख्यांचाही समावेश आहे. या चौघांनाही राष्ट्राध्यक्षपदाच्या दुसऱ्या कार्यकाळासाठी निवडणूक जिंकता आली नाही.

ट्रंप 2024 ची निवडणूक लढवणार?

ट्रंप यांचे माजी सल्लागार मिक मुलवानी यांच्या मते, सध्या आलेल्या निकालाप्रमाणेच ट्रंप यांचा 2020 मध्ये पराभव झाला तरी ते पुन्हा निवडून येऊ शकतात.

इन्स्टिट्यूट फॉर इंटरनॅशनल अँड युरोपियन अफेयर्सच्या एका वेबिनारमध्ये बोलताना मुलवानी म्हणाले की, "ट्रंप राजकारमात सक्रीय राहतील असं मला वाटतं आणि ते निर्विवादपणे 2024 साली रिपब्लिकन पक्षाकडून उमेदवारीसाठीच्या शर्यतीत प्राधान्यानं असतील."

ट्रंप यांचा स्वभाव पाहता त्यांना हारणं आवडत नाही, याकडेही मुलवानी यांनी लक्ष वेधून घेतलं आहे. मुलवानी यांच्या दाव्यात काहीसं तथ्य असल्याचं दिसतं. कारण ट्रंप यांचा पराभव झाला, तरी त्यांना मिळालेल्या मतांचा आकडाही खूप मोठा आहे.

जनतेनं टाकलेल्या मतांचा म्हणजे पॉप्युलर व्होट्सचा विचार केला, तर आजवरच्या इतिहासात रिपब्लिकन पक्षाला मिळाली नव्हती एवढी मतं ट्रंप यांना मिळताना दिसत आहेत. तसंच अनेक राज्यांत बायडन आणि त्यांच्यात असलेला मतांचा फरकही खूप मोठा नाही.

ट्रंप काही महत्त्वाच्या 'स्विंग स्टेट्समध्ये' बायडन यांच्यापेक्षा पिछाडीवर गेले. पण रिपब्लिकन वर्चस्व असलेल्या राज्यांमध्ये त्यांचं वर्चस्व कायम आहे.

म्हणजे ट्रंप यांनी नवे मतदार पक्षाच्या बाजून वळवले आहेत. पण दुसरीकडे त्यांच्याच पक्षात असलेले काहीजण त्यांच्याविरोधात गेले आहेत. त्यामुळे पुन्हा निवडणूक लढवणं ट्रंप यांच्यासाठी शक्य असलं, तरी तितकं सोपं नसेल.

पुन्हा निवडून येणं ट्रंप यांच्याच हातात?

आपल्या विरोधात गेलेली मतं आपल्या बाजूनं वळवण्यासाठीही ट्रंप यांच्या हातात पुढचे काही आठवडे आहेत. अमेरिकेसमोरची आर्थिक आव्हानं आणि कोव्हिडचं संकट अजून संपलेलं नाही.

पुढच्या महिनाभरात त्याविषयी ठोस भूमिका घेतली, तर ट्रंप या कार्यकाळाची अखेर एका सकारात्मक पद्धतीनं करू शकतात, ज्याचा रिपब्लिकन पक्षाला फायदा होईल, असं ट्रंप समर्थकांना वाटतं.

ट्रंप यांचे माजी सल्लागार ब्रायन लँझा 'बीबीसी रेडियो फोर'ला दिलेल्या मुलाखतीत म्हणतात, की चार वर्षांनंतर ट्रंप यांच्याकडे निवडणूक जिंकण्याची संधी असेल.

"बायडन यांच्याकडे कोव्हिडच्या काळात देशाचं नेतृत्व करण्याची संधी आहे. ते किती यशस्वी ठरतात आणि कुठे अपयशी ठरतात हे दिसून येईलच. आणि रिपब्लिकन पक्षाच्या प्राथमिक निवडणुकीत ट्रंप यांच्या उमेदवारीला आहान देईल असं सध्या तरी कुणी दिसत नाही."

पण स्वतः ट्रंप यांच्यावर कायदेशीर कारवाईची टांगती तलवारही आहे. ट्रंप यांच्यावर करचुकवल्या प्रकरणी तसंच 90च्या दशकात एका महिलेवर लैंगिक अत्याचाराच्या आरोपाप्रकरणी कोर्टात खटले सुरू आहेत.

राष्ट्राध्यक्षपदावर असल्यानं ट्रंप यांना या खटल्यांपासून संरक्षण मिळालं होतं. पण ते पुन्हा खाजगी जीवन जगू लागले, तर अशा खटल्यांमधले निकाल त्यांच्या प्रतिमेला आणखी नुकसान पोहचवू शकतात.

प्रकाशझोत कायम ट्रंप यांच्यावर?

स्वतः ट्रंप यांनी पुन्हा निवडून येण्याची आणि दीर्घकाळ राष्ट्राध्यक्षपदावर राहण्याची इच्छा असल्याचे संकेत याआधी दिले होते.

चीननं दोन कार्यकाळांचं बंधन 2018 साली काढून टाकलं, तेव्हा तिथले राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग अमर्याद काळासाठी (आयुष्यभरासाठी) राष्ट्राध्यक्षपदी कायम राहण्याचा मार्गही सुकर झाला.

त्यावर ट्रंप यांनी ही कालमर्यादा काढून टाकल्याबद्दल चीनचं अभिनंदन केलं होतं आणि आपल्याकडेही असं काही करता येईल अशा आशयाचं विधान केलं होतं.

तर बीबीसीचे न्यूयॉर्कमधले प्रतिनिधी निक ब्रायंट सांगतात, की अमेरिकेमधलं ध्रुवीकरण याही निवडणुकीत दिसून आलं आहे आणि ट्रंप त्या ध्रुवीकरणाचं कारण आहेत.

"ही 'डिसयुनायटेड' स्टेट्स ऑफ अमेरिका पुन्हा अचानक एकत्र आलेली नाहीत. ट्रंप यांच्याविषयी बहुतांश अमेरिकनांच्या मनात भीतीपासून निंदेपर्यंत वेगवेगळ्या टोकांच्या भावना आहेत. या देशानं त्यांच्या इतिहासातल्या सर्वात अपारंपरिक राष्ट्राध्यक्षाला पाहण्याची ही शेवटची वेळ नसेल."

ट्रंप यांना 2024 च्या निवडणुकीत उतरताना हा प्रकाशझोत आपल्यावर चार वर्ष कायम ठेवावा लागू शकतो.

एक मात्र नक्की. ट्रंप यांची आजवरची वाटचाल पाहता विस्मृतीत जाणं त्यांना पटत नाही. त्यामुळे राष्ट्रीय पातळीवर ते कुठल्या ना कुठल्या प्रकारात सक्रिय राहतील. निदान सतत ट्वीट्स करून ते चर्चेत रहतील, याची शक्यता जास्त आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज संध्याकाळी आठ वाजता बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर कोरोना पॉडकास्ट पाहायला विसरू नका. )