जिल जो बायडन : शिक्षिका ते अमेरिकेच्या फर्स्ट लेडीपर्यंतचा प्रवास

अमेरिकेच्या फर्स्ट लेडी जिल बायडन यांच्याविषयी तुम्हाला किती माहिती आहे?

जो बायडन यांची अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून अधिकृत घोषणा झाल्यावर जिल बायडन यांनी ज्या वर्गात त्या विद्यार्थ्यांना इंग्रजी विषय शिकवायच्या त्याच खोलीतून डेमोक्रेटिक पक्षाच्या संमेलनाला संबोधित केलं.

त्यांच्या संपूर्ण भाषणात जो बायडन राष्ट्रध्यक्षपदासाठी किती योग्य आहेत, यावर भर होता. तर जिल यांच्यानंतर बोलायला उभे राहिलेले जो यांनीही अमेरिकेच्या 'फर्स्ट लेडी' होण्यासाठी जिल यांच्यात किती गुणवत्ता आहे हे सांगितलं.

त्यावेळी ते म्हणाले होते, "मला तुम्हा सगळ्यांना सांगायचं आहे की स्वतःवर विश्वास ठेवण्याचा आत्मविश्वास ज्या शिक्षिकेने तुम्हाला दिला तिच्याविषयी विचार करा. फर्स्ट लेडी म्हणूनही त्या इतकीच चांगली कामगिरी बजावतील."

जून 1951 साली अमेरिकेतल्या न्यू जर्सीमध्ये जिल जॅकब्स यांचा जन्म झाला. पाच बहिणींमध्ये त्या सर्वात थोरल्या. फिलाडेल्फियाच्या शहरी भागात त्यांचं बालपण गेलं.

जिल यांचंही हे दुसरं लग्न आहे. जो यांच्याशी लग्न करण्याआधी बिल स्टिव्हेंसन या कॉलेज फुटबॉलपटूशी त्यांचं लग्न झालं होतं.

1972 साली एका कार अपघातात जो बायडन यांच्या पहिल्या पत्नी आणि एका वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला.

ब्यू आणि हंटर ही त्यांची दोन मुलंही त्या अपघातात गंभीर जखमी झाली होती. मात्र, ते दोघंही बचावले. जवळपास तीन वर्षांनंतर जिल यांच्या भावाने त्यांची आणि जो बायडन यांची भेट घालून दिली.

त्यावेळी जो सिनेटर होते आणि जिल अजून महाविद्यालयीन शिक्षण घेत होत्या.

आपल्या पहिल्या भेटीविषयी 'व्होग' मासिकाशी बोलताना त्या म्हणाल्या, "त्यावेळी मी जिन्स-टीशर्टमधल्या मुलांना डेट करत होते आणि एक दिवस अचानक माझ्या दारात स्पोर्ट्स कोट आणि लोफर्स घातलेले जो आले. त्यांना बघून माझ्या मनात पहिला विचार आला - देवा, आमचं लग्न होऊ शकत नाही. येणाऱ्या लाखो वर्षांतही ते शक्य नाही."

"ते माझ्याहून 9 वर्ष मोठे होते. पण आम्ही फिलाडेल्फियामधल्या एका चित्रपटगृहात एक सिनेमा बघायला गेलो आणि आमचे सूर जुळले."

जिल यांनी होकार देण्याआधी जो यांनी त्यांना 5 वेळा प्रपोज केल्याचंही त्या सांगतात. "त्यांच्या मुलांपासून दुसरी आईसुद्धा हिरावली जाऊ नये, असं मला वाटत होतं. त्यामुळे 100 टक्के खात्री पटत नाही, तोवर मी वेळ घेतला."

अखेर 1977 साली दोघांनी न्यूयॉर्कमध्ये लग्न केलं. 1981 साली त्यांची मुलगी अॅशले हिचा जन्म झाला.

जो राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून घोषित झाल्यानंतर डेमोक्रेटीक पक्षाच्या संमेलनाला संबोधित करताना जिल त्यांचं कुटुंब आणि कुटुंबाने केलेला खडतर प्रवास याविषयी भरभरून बोलल्या.

जो यांचा मुलगा ब्यू यांचं 2015 साली वयाच्या 45 व्या वर्षी ब्रेन कॅन्सरने निधन झालं.

याविषयी बोलताना जिल बायडन म्हणाल्या, "देशाने जो यांच्यावर विश्वास दाखवला तर जो तुमच्या कुटुंबासाठीही तेच करतील जे त्यांनी स्वतःच्या कुटुंबासाठी केलं."

शिक्षिका म्हणून कारकीर्द

69 वर्षांच्या जिल यांनी अनेक दशकं शिक्षिका म्हणून काम केलं आहे. पदवीधर असलेल्या जिल यांच्याकडे दोन मास्टर्स पदव्याही आहेत. 2007 साली डेलवेअर विद्यापीठातून त्यांनी शिक्षण या विषयात डॉक्टरेटही मिळवली.

वॉशिंग्टनला स्थायिक होण्याआधी त्यांनी कम्युनिटी कॉलेज, पब्लिक हायस्कूल आणि सायकॅट्रीक हॉस्पिटलमध्ये किशोरवयीन मुलांना शिकवलं आहे.

जो बायडन बराक ओबामा यांच्या सरकारमध्ये उपराष्ट्राध्यक्ष होते. त्यावेळी जिल बायडन नॉर्दन वर्जिनिया कम्युनिटी कॉलेजमध्ये इंग्रजी विषयाच्या प्राध्यापिका होत्या.

ऑगस्ट महिन्यात जिल यांनी एक ट्वीट केलं होतं. त्यात त्यांनी लिहिलं होतं, "मी जे करते अध्यापन नाही. तर ती मीच आहे."

राजकारण

2009 ते 2017 या काळात जो बायडन अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष होते. त्यावेळी जिल बायडन अमेरिकेच्या 'सेकंड लेडी' होत्या.

सेकंड लेडी म्हणून त्यांनी कम्युनिटी कॉलेजचा प्रचार केला, ब्रेस्ट कॅन्सरविषयी जागरुकता निर्माण करण्याचं काम केलं. तसंच सैन्य जवानांच्या कुटुंबीयांसाठीही त्यांनी काम केलं.

फर्स्ट लेडी मिशेल ओबामा यांच्यासोबत मिळून जिल यांनी 'जॉईनिंग फोर्सेस' उपक्रमाचीही सुरुवात केली होती. निवृत्त सैन्य अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना शिक्षण आणि रोजगाराच्या उत्तम संधी मिळण्यासाठी मदत करण्याचं काम या उपक्रमांतर्गत करण्यात येतं.

2012 साली त्यांनी आपल्या नातीच्या अनुभवावर आधारित 'Don't Forget, God Bless Our Troops' हे पुस्तक प्रकाशित केलं होतं.

2020 च्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूक प्रचारात त्यांनी पती जो बायडेन यांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं.

निवडणूक प्रचाराच्या प्रत्येक कार्यक्रमात त्या पती जो बायडन यांच्या सोबत असायच्या. त्यांनी स्वतःही अनेक कार्यक्रम घेतले आणि प्रचारासाठी निधी उभारण्याचंही कामही केलं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)