हंटर जो बायडनः भ्रष्टाचाराचा आरोप, स्ट्रीप क्लब आणि कोकेन; बायडन यांचे पुत्र वादात का असतात?

जो बायडन यांच्या रुपात अमेरिकेला नवीन राष्ट्राध्यक्ष मिळाले आहेत. निवडणूक जिंकल्यानंतर बायडन यांनी केलेल्या भाषणात त्यांनी आपल्या कुटुंबाचा उल्लेख करत पत्नी जिल, मुलगी अॅशले आणि मुलगा हंटर यांचेही आभार मानले.

माझं कुटुंब कायम माझ्या सोबत उभं राहिलं, असं बायडन म्हणाले. मात्र, राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत बायडन यांच्या मुलावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते.

विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी बायडन यांचा मुलगा आणि व्यावसायिक हंटर बायडन यांच्यावर वडिलांच्या पदाचा गैरवापर करत भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता. युक्रेनमधलं प्रकरण तर चांगलंच गाजलं होतं.

मुलावर गंडांतर येऊ नये, यासाठी जो बायडन यांनी उपराष्ट्राध्यक्षपदाचा गैरवापर करत युक्रेन सरकारवर हंटर ज्या कंपनीच्या संचालक मंडळावर होते त्या कंपनीतल्या गैरव्यवहारांची चौकशी करणाऱ्या तपास अधिकाऱ्याला काढून टाकण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप झाला.

हा आरोप सिद्ध झाला नाही. उलट, बायडन यांच्या मुलाच्या या नोकरीवरून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी युक्रेनच्या अध्यक्षांवर हंटर यांच्याविरोधात भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करावी, असा दबाव आणला होता. युक्रेनच्या अध्यक्षांना केलेल्या या फोनकॉलमुळेच ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोग खटल्याची सुरुवात झाली होती.

खरंतर 50 वर्षांचे हंटर बायडन कायम सत्तेच्या जवळ होते आणि या जवळीकीनेच त्यांच्या व्यावसायिक कारकीर्दीलाही आकार दिला, यात शंका नाही. कोण आहेत हंटर बायडन, आतापर्यंतचा त्यांचा प्रवास कसा होता, पाहूया.

कोण आहेत हंटर बायडन?

जो बायडन यांना पहिल्या पत्नीपासून एक मुलगी आणि दोन मुलं अशी तीन अपत्यं होती. मात्र, बायडन जेव्हा पहिल्यांदा सिनेटची निवडणूक जिंकले (1972) त्यावेळी शपथग्रहणाची तयारी करत असताना एका कार अपघातात त्यांची पहिली पत्नी नीलिया आणि मुलगी नाओमी यांचा मृत्यू झाला होता. तर ब्यू आणि हंटर ही दोन्ही मुलं गंभीर जखमी झाली होती.

या अपघातात जखमी झालेल्या त्यांच्या मुलांवर विलमिंग्टनमधल्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. त्यामुळे जो यांनी सिनेटपदाची शपथही त्या हॉस्पिटलमध्येच घेतली होती. त्यानंतर ते रोज 90 मिनिटांचा ट्रेनचा प्रवास करून वॉशिंग्टन डीसीला जायचे आणि परत येऊन आपल्या मुलांचा सांभाळ करायचे.

1977 मध्ये जो बायडन यांनी व्यवसायाने शिक्षिका असणाऱ्या जिल यांच्याशी दुसरं लग्न केलं. दुसऱ्या पत्नीपासून त्यांना अॅशले ही मुलगी आहे.

पुढे 2015 साली ब्यू यांचं वयाच्या 45 व्या ब्रेन ट्युमरने निधन झालं.

इतक्या कमी वयात जवळची माणसं गमावल्यामुळे अनेकांना जो बायडन यांच्याविषयी सहानुभूती आहे. मात्र, बायडन यांच्या कुटुंबाची दुसरी कहाणी याहून पूर्णपणे वेगळी आहे. विशेषतः त्यांचा मुलगा हंटर यांची…

व्यावसायिक कारकिर्दिला सुरुवात आणि वादाचा श्रीगणेशा

हंटर बायडन वकील आणि गुंतवणूक सल्लागार आहेत. 1992 साली त्यांनी जॉर्जटाऊन विद्यापीठातून पदवी घेतली. वकिलीचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी गुंतवणूक सल्लागार म्हणून काम सुरू केलं. या व्यवसायाने त्यांचं आयुष्य बेलगाम झालं.

1997 साली ते डेलवरमध्ये MBNA बँकेत एक्झिक्युटिव्ह व्हाईस प्रेसिडेंट म्हणून रुजू झाले. विशेष म्हणजे या बँकेने अनेकदा जो बायडेन यांच्या निवडणूक प्रचारासाठी निधी दिला होता. त्यामुळे हंटर बायडन बँकेत रुजू होताच सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या.

मात्र, नोकरीत त्यांचं मन रमेना. एक दिवसही बँकेचा बॅच घातला नाही तर कुणीही तुम्हाला टोकायचं, असं हंटर यांनी 'द न्यू यॉर्कर'ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं.

बिझनेस इनसायडरच्या वृत्तानुसार 1998 साली त्यांची ओळख विलियम ओल्डाकर यांच्याशी झाली. ओल्डाकर वकील होते आणि जो बायडन यांच्यासाठी त्यांनी काम केलं होतं.

या ओल्डाकर यांनी हंटर यांची भेट वाणिज्य सचिव विलियम डॅले यांच्याशी घालून दिली. हंटर राजकीय कुटुंबातून असल्याने डॅले यांची त्यांच्याशी मैत्री झाल्याचं द न्यूयॉर्करने म्हटलं आहे.

पुढे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनी हंटर यांची वाणिज्य खात्यात नियुक्ती केली आणि 1998 ते 2001 पर्यंत हंटर यांनी ई-कॉमर्सचं काम सांभाळलं. इथूनच त्यांनी वॉशिंग्टन डी. सीच्या राजकीय वर्तुळात स्वतःची छाप उमटवण्याचा प्रयत्न सुरू केला. याच भागात घर घेऊन आपली पत्नी आणि मुलांसोबत ते वॉशिंग्टनला स्थायिक झाले.

2001 पासून हंटर यांनी लॉबिंग फर्मसाठी काम सुरू केलं. त्यांनी एक लॉबिंग फर्म उघडली. मात्र, 2008 साली जो बायडेन उप-राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला उभे राहिले. त्यावेळी बराक ओबामा यांनी कुठल्याही लॉबिंग फर्मकडून प्रचार मोहिमेसाठी निधी घेणार नसल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे आपल्या वडिलांना निवडणुकीत अडचण येऊ नये म्हणून हंटर यांनी राजीनामा दिला.

मात्र, जो बायडन उपराष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर हंटर यांनी अनेक नवीन व्यवसाय सुरू केले आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या. सप्टेंबर 2008 आणि 2009 मध्ये त्यांनी दोन कन्सल्टिंग फर्म उघडल्या. याच कंपन्या आणि भागीदारांच्या माध्यमातून हंटर यांनी चीन आणि रशियामध्ये बिजनेस कनेक्शन्स स्थापित केल्याचं बोललं जातं.

एकीकडे हंटर यांचे आंतरराष्ट्रीय व्यावासायिक संबंध बहरत होते. तर दुसरीकडे उपराष्ट्राध्यक्ष म्हणून जो बायडन यांनी युक्रेनमधल्या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी पावलं उचलायला सुरुवात केली. या भ्रष्टाचारात हंटर यांचाही सहभाग असल्याचे आरोप झाले. मात्र, ते कधीही सिद्ध होऊ शकले नाही.

वैयक्तिक आयुष्यातील चढ-उतार

जो बायडेन उपराष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर हंटर यांच्या खाजगी आयुष्याविषयी प्रसार माध्यमांमध्ये बरंच काही छापून आलं. 2012 साली हंटर अमेरिकेच्या नेव्ही रिझर्व्हमध्ये भरती झाले. मात्र, दोनच वर्षात कोकेन सेवन प्रकरणात दोषी आढळल्याने त्यांना काढून टाकण्यात आलं.

पुढे हंटर बायडन यांनी मादक पदार्थ सेवनामुळे आपल्याला काढल्याचं मान्य केलं होतं आणि यासंबंधी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात ते म्हणाले होते, "अमेरिकेच्या नेव्हीमध्ये काम करणं माझ्यासाठी अभिमानाची बाब होती. मात्र, माझ्या कृतीमुळे माझ्यावर जी कारवाई झाली त्याबद्दल मला खंत आणि लाज वाटते. मी नेव्हीने घेतलेल्या निर्णयाचा आदर करतो. माझ्या कुटुंबाकडून मिळणारं प्रेम आणि आदर या बळावर मी आयुष्यात पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय."

इतकंच नाही तर 2015 साली हंटर यांचे बंधू ब्यू बायडन यांच्या मृत्यूच्या काही वर्षातच त्यांच्या पहिल्या पत्नीने त्यांना घटस्फोट दिला. हंटर ब्यू यांच्या पत्नी हॅली यांना डेट करत असल्याचं त्यांच्या कुटुंबीयांनी मान्य केलं होतं. जो बायडन यांनी तर अधिकृत स्टेंटमेंट काढून दोघांच्या प्रेमाला आणि विवाहाला मान्यता दिली होती.

आपल्या निवेदनात जो बायडन म्हणाले होते, "इतक्या मोठ्या दुःखानंतर हंटर आणि हॅली यांनी एकमेकांची निवड केली आणि एकत्र येण्याचा निर्णय घेतला, त्यासाठी आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो. त्यांना माझा आणि जिल यांचा संपूर्ण पाठिंबा आहे. आम्ही त्यांच्यासाठी आनंदी आहोत."

मात्र, हे नातंही टिकलं नाही. दोघांचं ब्रेकअप झालं. मे महिन्यात हंटर यांनी मेलिसा कोहेन नावाच्या दक्षिण आफ्रिकन मॉडेलसोबत लग्न केलं. इथेही आश्चर्याची बाब म्हणजे जेमतेम 6 दिवसांच्या ओळखीत दोघांनी लग्न केलं.

दारू आणि अंमली पदार्थांचं व्यसन

हंटर बायडेन यांच्या पहिल्या पत्नीने ज्यावेळी त्यांना घटस्फोट दिला तेव्हा कोर्टात सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये हंटर यांना दारू आणि ड्रग्जचं व्यसन असल्याचं आणि ते स्ट्रीप क्लबला जात असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. कोकेनमुळेच नेव्हीने त्यांना नोकरीवरून काढून टाकलं होतं. स्वतः हंटर बायडन यांनी आपण महाविद्यालयीन आयुष्यातच कोकेनचं सेवन करत असल्याचं मान्य केलं होतं.

व्यावसायिक संबंधांवरून वाद

हंटर खाजगी आयुष्यामुळे जसे चर्चेत राहिले त्याहून जास्त व्यावसायिक संबंधांमुळे. युक्रेन आणि चीनशी असलेल्या व्यावसायिक संबंधात जो बायडन यांच्या पदाचा गैरवापर करत हंटर बायडन यांनी बक्कळ मालमत्ता कमावल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आले आहेत.

यातला एक आरोप 2014 सालचा आहे. त्यावेळी हंटर बायडन युक्रेनच्या बरिस्मा होल्डिंग्ज या युक्रेनच्या गॅस उत्पादन कंपनीच्या संचालक मंडळावर गेले. मात्र, हंटर एप्रिल 2019 मध्ये संचालक मंडळावरून निवृत्त होताच महिनाभरातच न्यू यॉर्क टाईम्सने एक बातमी छापून खळबळ उडवून दिली.

या बरिस्मा होल्डिंगमधल्या भ्रष्टाचाराची चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्याला काढून टाकण्यासाठी जो बायडन यांनी युक्रेन सरकारवर दबाव टाकल्याचं न्यू यॉर्क टाईम्सच्या बातमीत म्हटलं होतं.

2016 साली बायडन यांनी व्हिक्टर शोकीन नावाच्या या तपास अधिकाऱ्याला काढून टाकण्याची शिफारस केली होती. मात्र, युक्रेनला आर्थिक मदत पुरवणारे देश आणि आंतरराष्ट्रीय संस्थांनीही व्हिक्टर यांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करत त्यांना या कामावरून काढून टाकावं, अशी इच्छा व्यक्त केली ती.

दरम्यान काही दिवसांपूर्वी न्यू यॉर्क पोस्टने छापलेल्या बातमीमुळे हंटर पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले. युक्रेनच्या बरिस्मा कंपनीच्या सल्लागाराने हंटर यांना एक ई-मेल करत त्यांचे वडील जो बायडन यांची भेट घालून दिल्याबद्दल धन्यवाद दिल्याचं, या बातमीत म्हटलं होतं. मात्र, अशी कुठलीही भेट झाल्याचं व्हाईट-हाऊसच्या कागदपत्रांमध्ये नमूद नसल्याचं म्हणत ही रशियाने पसरवलेली चुकीची माहिती असल्याचं जो बायडेन यांच्याकडून सांगण्यात आलं.

न्यू यॉर्क पोस्टनेही अशी कुठली बैठक झाली होती का, याचे पुरावे दिलेले नाही.

एप्रिल 2015 सालचा हा ई-मेल आहे. हंटर बायडन यांनी एप्रिल 2019मध्ये डेलव्हरच्या एका दुकानात लॅपटॉप दुरुस्तीसाठी दिला होता. त्यातूनच हा ई-मेल रिकव्हर करण्यात आला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनीही आपल्या निवडणूक प्रचारामध्ये या ई-मेलचा उल्लेख करत हंटर आणि जो बायडेन यांच्यावर पुन्हा एकदा चिखलफेक केली होती. ट्रम्प यांच्या दोन माजी सल्लागारांनीच या ई-मेलसंबंधीची माहिती न्यू यॉर्क पोस्टला दिली होती.

न्यू यॉर्क पोस्टनेच आणखी एक बातमी दिली होती. यात हंटर बायडन यांच्या ऑगस्ट 2017 च्या एका ई-मेलचा हवाला देत हंटर बायडेन यांना एक चीनी उद्योजक 'केवळ ओळखी करून देण्यासाठी' वर्षाला 1 कोटी डॉलर्स देत असल्याचे संकेत दिले होते.

फॉक्स न्यूजनेही एका ई-मेलच्या हवाल्याने हंटर यांनी चीनमधल्या सर्वात मोठ्या ऊर्जा कंपनीशी डील केल्याचं म्हटलं होतं. या ई-मेलची खात्री पटवल्याचं फॉक्स न्यूजचं म्हणणं आहे.

या ई-मेलमध्ये ज्या 'बिग गाय'चा उल्लेख आहे ते जो बायडन असल्याचं फॉक्स न्यूजचं म्हणणं आहे. हा मेलही 2017 सालचा आहे. म्हणजेच न्यू यॉर्क पोस्ट आणि फॉक्स न्यूज या दोघांनीही ज्या दोन ई-मेलचा हवाला दिला आहे ते दोन्ही मेल त्यावेळचे आहेत जेव्हा जो बायडन उपराष्ट्राध्यक्ष नव्हते.

आपल्या मुलाच्या व्यावसायिक कामकाजात आपला कुठलाच हस्तक्षेप नसल्याचं जो बाायडेन म्हणत असले तरी चीनमधल्या महत्त्वाच्या डिलसाठी हंटर जो बायडन यांची स्वाक्षरी किंवा सल्ला घ्यायचे, असं हंटर यांच्याच एका माजी सहकाऱ्याने फॉक्स न्यूजला सांगितलं आहे. चीनमधल्या डीलविषयी बोलण्यासाठी मे 2017 मध्ये आपण स्वतः जो बायडन यांना दोनवेळा भेटल्याचं त्यांनी सांगितलं.

न्यू यॉर्कर मासिकाला दिलेल्या एका मुलाखतीत एका चीनी उद्योजकाने आपल्याला हिरा भेट केल्याचं हंटर बायडन म्हणाले होते. यानंतर चीनी सरकारने त्या उद्योजकावर लावण्यात आलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी केली होती.

अशाप्रकारे हंटर बायडन कायम वादाच्या भोवऱ्यात राहिले. हंटर यांनी स्वतःच्या आयुष्याची जी माती केली त्याचा फटका बायडन यांच्या राजकीय जीवनालाही बसला.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)