जो बायडन यांना राष्ट्राध्यक्ष म्हणून किती मानधन मिळणार?

अनेक दिवस सुरू असलेल्या मतमोजणीनंतर जो बायडन यांनी विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांना नमवत बाजी मारली आहे.

मतमोजणी सुरू होऊन दोन दिवस उलटले तरी अध्यक्ष कोण हे स्पष्ट होत नव्हतं. दोन्ही उमेदवारांनी विजयी असल्याचे दावे केले होते. मात्र अखेर बायडन यांची या लढाईत सरशी झाली आहे.

राष्ट्राध्यक्ष म्हणून व्हाईट हाऊसमध्ये जाणाऱ्या जो बायडन यांच्यासमोरची आव्हानं, प्रश्न यांची चर्चा तर होत राहील. पण अमेरिकेसारख्या देशाच्या राष्ट्राध्यक्षाला कोणत्या सुविधा मिळतात, त्यांची सुरक्षा कशी असते, त्यांचा प्रवास कसा होतो याबद्दलही सर्वसामान्यांना कुतूहल असतं.

अमेरिकन राष्ट्राध्यक्षांबद्दलच्या याच गोष्टी जाणून घेऊ.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचं मानधन?

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचं वार्षिक मानधन 4 लाख डॉलर्स इतकं असतं. रुपयाच्या परिमाणात सांगायचं तर ही रक्कम होते 2,98,77,800. मानधनाव्यतिरिक्त 50,000 डॉलर्स अन्य खर्चासाठी दिले जातात.

2016 मध्ये विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप म्हणाले की ते एक डॉलर एवढंच मानधन घेत आहेत. त्यावेळी ट्रंप यांच्याकडे 3.7 बिलिअन एवढी संपत्ती होती.

व्हाईट हाऊस

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानाला 'व्हाईट हाऊस' असं म्हटलं जातं. राष्ट्राध्यक्ष, त्यांची पत्नी अर्थात 'फर्स्ट लेडी' आणि कुटुंबीय इथं राहतात.

ट्रंप यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला मिळणारं मानधन नाकारलं असलं तरी ते आपल्या कुटुंबीयांसमवेत व्हाईट हाऊसमध्येच राहतात. सहा मजल्यांच्या या आलिशान वास्तूमध्ये 132 खोल्या असून 35 स्नानगृहं आहेत.

व्हाईट हाऊसच्या देखभालीचा वार्षिक खर्च 12.7 दशलक्ष डॉलर्स एवढा आहे.

व्हाईट हाऊसमध्ये शंभरहून अधिक कर्मचारी काम करतात. यामध्ये एक्झिक्युटिव्ह शेफ आणि पेस्ट्री शेफ यांचाही समावेश होतो.

कॅम्प डेव्हिड

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना व्यग्र दिनक्रमातून वेळ मिळाला तर विरंगुळा म्हणून जाण्यासाठी दोनशे एकरवर पसरलेलं फार्महाऊस आहे. त्याचं नाव कॅम्प डेव्हिड.

कॅम्प डेव्हिड या ठिकाणी बास्केटबॉल, बोलिंग, गोल्फकोर्स अशा सर्व सुविधा आहेत.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना निसर्गाच्या सान्निध्यात जाण्याची संधी मिळते. भरगच्च वेळापत्रकातून वेळ काढत स्वत:साठी शांत वेळ मिळवून देणारं हे ठिकाण आहे.

विदेशी राष्ट्रप्रमुखांची वास्तव्याची व्यवस्था कॅम्प डेव्हिड इथे करण्यात येते.

एअरफोर्स वन आणि मरिन वन

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना घेऊन जाणाऱ्या किंवा येणाऱ्या कोणत्याही विमानाला एअरफोर्स वन असं म्हटलं जातं. विसाव्या शतकाच्या मध्यंतरापासून अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांकरता खास दोन विमानं तयार करण्यात आली.

जगात कुठेही जायचं असेल तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष खास एअरफोर्स एअरक्राफ्टने प्रवास करतात. त्यापैकी एक आहे-बोइंग 747-200B.

ज्या विमानात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असतात त्याला एअरफोर्स वन असं म्हटलं जातं.

या विमानात इंधन भरण्याची यंत्रणा, अतिप्रगत कमांड सेंटर, आपात्कालीन ऑपरेशन थिएटर अशा अत्याधुनिक सुविधा असतात.

या विमानातून एका तासाच्या प्रवासाचा खर्च 18,000 डॉलर इतका आहे.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना खास मरिन वन हेलिकॉप्टरही मिळतं. मरिन वनच्या बरोबरीने डेकॉय नावाच्या हेलिकॉप्टर्सचा ताफाही उड्डाण भरतो. कोणताही हल्ला होऊ नये यासाठी ही सगळी हेलिकॉप्टर्स मरिन वनसाठी कवच म्हणूनही काम करतात.

डेकॉय हेलिकॉप्टर्समध्ये मिसाईल डिफेन्स सिस्टम कार्यान्वित असते.

बिस्ट

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांसाठी खास पद्धतीने तयार करण्यात आलेली लिमोझिन गाडी असते. ही गाडी सशस्त्र सुसज्ज असते.

काळोखात वावरताना या गाडीला नाईट व्हिजन कॅमेरे असतात.

ही गाडी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचं कोणत्याही स्वरुपाच्या रासायनिक हल्ल्यापासून बचाव करते.

कार्यकाळानंतर

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदावरून पायउतार होताना, त्यांना 237,000 डॉलर्स एवढं वार्षिक पेन्शन मिळतं. 96,000 डॉलर्स स्टाफसाठी पैसे मिळतात.

राष्ट्राध्यक्षांना आयुष्यभरासाठी सुरक्षायंत्रणा मिळते.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)