श्री ठाणेदार : एक मराठी माणूस अमेरिकेत आमदार म्हणून कसा निवडून आला?

    • Author, मयांक भागवत
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष कोण होणार? व्हाईट हाऊसचं तिकीट होणाला मिळणार? याची उत्कंठा जगभरातील लोकांप्रमाणे भारतीयांना देखील आहे.

ट्रंप-बायडेन यांच्यात सत्तेसाठी सुरू असलेली लढत अत्यंत चुरशीची बनली आहे. पण, आपल्यासाठी ही निवडणूक अजून एका कारणामुळे महत्त्वाची आहे. एक भारतीय मराठमोळा मुंबईकर आहे, जो अमेरिकेत 'आमदार' बनलाय.

अमेरिकेच्या मिशिगन राज्यात डेमॉक्रॅटिक पक्षाचे डॉ. श्री ठाणेदार 93 टक्के मतं मिळवून आमदार म्हणून निवडून आले. गेल्या 41 वर्षांपासून अमेरिकेत राहणारे 65 वर्षांचे श्री ठाणेदार अमरिकन लोकांचं 'प्रतिनिधीत्व हाऊस ऑफ रिप्रेझेन्टेटिव्हज'मध्ये करणार आहेत.

अमेरिकेची निवडणूक प्रक्रिया कशी असते? त्यांचा अनुभव कसा होता? परप्रांतीय म्हणून त्यांच्याकडे पाहिलं गेलं? या अनेक विषयांवर त्यांच्याशी चर्चा केली.

ही निवडणूक प्रक्रिया कशी होती? तुम्ही उमेदवार म्हणून ही प्रक्रिया पाहिली आहे? या निवडणुकीत तुमचा अनुभव कसा होता?

सर्वात मोठा फरक म्हणजे पक्षाचं तिकिट पक्षश्रेष्ठी किंवा हायकमांड ठरवत नाहीत. प्रत्येक पक्ष आपल्या मतदारांनी निवडून दिलेल्या व्यक्तीला उमेदवार ठरवतो.

ट्रंप रिपब्लिकन पक्षातर्फे उमेदवार निवडले गेले. त्यांना हायकमांडने निवडलं नाही. 2016 मध्ये ट्रंप यांच्यासमोर 30 उमेदवार होते. त्यातून त्यांची निवड झाली. त्यामुळे ही प्रक्रिया खूप चांगली आहे. पक्षांतर्गत लोकशाही आहे. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. पॉवर हायकमांडकडे नाही तर लोकांकडे आहे.

आताची निवडणूक अत्यंत चुरशीची होती. 'कांटे की टक्कर' म्हणावी लागेल. यामागची कारणं काय?

डेमोक्रॅटीक पक्षाला असं वाटलं की, ट्रंपबद्दल लोक खूप नाराज आहेत. त्यामुळे ट्रंप निवडून येणार नाहीत आणि मोठ्या मतांनी निवडणूक हरतील. या निवडणुकीत अमेरिकाभर डेमोक्रॅटिक पक्षाची निळी लाट पहायला मिळेल अशी पक्षाला अपेक्षा होती.

लोकांचा कल जाणण्यासाठी पक्षाने लोकांचं पोलिंग केलं. त्यात बायडन ट्रंप यांच्यापेक्षा 10-12 टक्के मतांनी पुढे होते. पण आता असं लक्षात आलंय की, ते पोलिंग चुकीचं होतं. खरंतर एका शास्त्रीय पद्धतीने हे करण्यात आलं होतं. मग, ते चुकीचं का होतं? तर, ट्रंप यांना लोकांचा छूपा पाठिंबा आहे. 5-10 टक्के लोक ज्यांना ते 'शाय ट्रंप सपोर्टर' असं म्हणतात. हे लोक ट्रंपना मत देणार हे उघडपणे सांगत नाहीत.

ट्रंप यांचा बोलण्याचा स्वभाव, स्टाईल, वागण्याची पद्धत त्यामुळे अनेक लोकांना सांगायचं नाहीये की त्यांचा ट्रंपना पाठिंबा आहे. अशामुळे निवडणूक आधीचा पोलिंग डेटा चुकीचा ठरला. त्यामुळे डेमोक्रॅटिक लोकांचा अंदाज चुकला. ते थोडे बेफिकीर राहिले बायडन पुढे आहेत हा विचार करून. पण तसं नव्हतं. ही अत्यंत चुरशीची लढत होती.

49-50 टक्के लोक ट्रंप यांचं नेतृत्व मान्य करतात. याची आम्हाला कल्पना नव्हती. हा आकडा 40 टक्क्यापर्यंत असेल असं आम्हाला वाटलं होतं. त्यामुळे ही लढत अपेक्षा नसताना चुरशीची झाली.

याचा अर्थ ट्रंप यांची लोकप्रियता कमी झालेली नाही? त्यांची लोकप्रियता अजूनही जास्त आहे? मग याचं कारण काय?

ट्रंप वेगळ्या प्रकारचे राजकारणी आहेत. ते स्पष्टवक्ते आहेत. मनातलं बोलतात. लोकांना वाटतं की, ही व्यक्ती आपल्या मनातलं बोलते. त्यांच्या बोलण्यात नाटकीपणा नाही. ट्रंप पूर्वी सेलिब्रिटी होते. त्यांमुळे लोकांना त्यांच्याबाबत कुतूहल आहे.

लोकं सेलिब्रेटीना फॉलो करतात. त्यांच्या चुकांकडे दुर्लक्ष करतात. लोकांचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन इतर राजकारण्यांसारखा नाही.

लोकांना ट्रंप यांची शैली आवडते. दुसरीकडे जो बायडन आक्रमक नाहीत. त्यांची शैली वेगळी आहे. त्यांचा लोकांवर प्रभाव कमी पडला असं म्हटलं जातं. त्यामुळे ट्रंप-बायडन यांच्या तुलनेत बायडन कमी पडतात?

कमी पडतात असं अजिबात नाही. प्रत्येकाची शैली वेगळी असते. ट्रंप यांनी कोव्हिड-19 असताना मोठ्या रॅली केल्या. यामुळे कोरोनाचा संसर्ग खूप मोठ्या प्रमाणात पसरला. दुसरीकडे बायडन यांनी सोशल डिस्टन्सिंग, मास्क याला महत्त्व दिलं. पोलिंगमध्ये पुढे असल्याने त्यांना आत्मविश्वास होता. जास्त धडपड करण्याची गरज नाही. त्यामुळे दोन उमेदवारांमध्ये प्रचाराचा फरक झाला.

अमेरिकेतील 35 टक्के ट्रंप यांना पाठिंबा देणारे अल्ट्रा कॉन्झर्व्हेटिव्ह आहेत. दुसरीकडे 25 टक्के सोशलिस्ट आहेत, तर उरलेले 25-30 टक्के लोक स्वतंत्र आहेत. त्यामुळे रिपब्लिकन आणि डेमोक्रॅट यांचा समोतोल 50-50 टक्के आहे. ही लोकशाहीसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांना एकत्र येऊन काम करावं लागेल.

मी मिशिगन विधानसभेचा सदस्य आहे. ही विधानसभा आणि सिनेट रिपब्लिकन पक्षाच्या हातात आहे. मात्र राज्यपाल (गव्हर्नर) डेमोक्रॅटिक आहे. एका पक्षाच्या हाती सत्ता असली की तो पक्षा काहीही करू शकतो. मात्र अमेरिकेत तसं नाही. एकहाती सत्ता नसल्याने कोणताही पक्ष आपली धोरणं राबवू शकत नाही. त्यांना विरोधकांची मदत घ्यावीच लागेत, समन्वय ठेवावा लागतो.

आम्हाला खात्री आहे की बायडन निवडून येतील. मात्र आमची लोकसभा ही डेमोक्रॅटिक पक्षाच्या, तर सिनेट रिपब्लिकन पक्षाच्या हातात आहे. त्यामुळे बायडन यांना त्यांच्यासोबत समन्वयाने काम करावं लागेल. मात्र, अलिकडे दोन पक्ष एकमेकांपासून इतके दूर गेले आहेत. त्यामुळे एकत्र येऊन काम करण्यापेक्षा, जो सत्तेवर आहे, तो दोन-चार वर्ष दुसऱ्याला खाली खेचण्यासाठी प्रयत्न केले जातात. त्यामुळे लोकांची काम होत नाहीत.

एक भारतीय, मुंबईकर अमेरिकेला जातो. त्या देशाची संस्कृती आत्मसात करतो. त्यांच्यासारखं जगतो. मात्र, या व्यक्तीला लोकांमध्ये काम करायचं आहे, लोकांमध्ये जायचं आहे. तेव्हा हा काय आमच्यासाठी काम करणार? याला काय कळणार? हा बाहेरचा आहे. असं तुमच्यासोबत कधी झालं?

पूर्वी अमेरिकन लोकांना डॉक्टर त्यांच्यासारखा हवा असे. मात्र आता चित्र बदललं आहे. आता भारतीय आणि इतर डॉक्टर काम करतात. IT इंजीनिअर चालतो. पण, त्यांना राजकारणी चालत नाही. अजूनही आपल्यासारखा दिसणारा, आपल्यासारखा बोलणारा राजकारणी हवा अशी कल्पना लोकांची आहे. त्यामुळे राजकारणात फारशी बाहेरून आलेली लोक नाहीत.

मी वयाच्या 24 व्या वर्षी अमेरिकेत आलो. मी दिसतो भारतीय, बोलतो भारतीयांसारखं. त्यामुळे लोकांना मी आणखी वेगळा वाटलो. कारण, बोलणं आणि भाषा फार महत्त्वाची आहे. लोकांशी बोलणं सर्वात महत्त्वाचं आहे. ट्रंप चांगले बोलतात, त्यांचा प्रभाव पडतो. त्यामुळे सुरुवातीला मला खूप कठीण गेलं. हा आपल्यासारखा बोलू शकत नाही. हा बाहेरून आलेला आहे. आमचे प्रश्न यांना काय करणार? असा त्यांचा सूर असतो.

मग तुम्ही प्रचार कसा केला?

प्रत्येकाच्या घरी गेलो. त्यांच्या घराबाहेर उभा राहिलो. मला काय करायचं आहे हे समजावून सांगितलं. मला शिक्षण पद्धती सुधारायची आहे. गुन्ह्यांचं प्रमाण कमी करायचं आहे. मी 10-10 हजार लोकांच्या घरी जाऊन निवडणूक लढवली होती. अशावेळी एका वेगळ्या दिसणाऱ्या माणसावर विश्वास कसा ठेवायचा? हा प्रश्न होता. मग त्यांना मी भारतात कसे गरिबीत दिवस काढले हे सांगितंल. तुमचे आणि माझे प्रश्न वेगळे नाहीत. मुलांवर केले जाणारे संस्कार वेगळे नाहीत. असं त्यांना समजावून सांगितलं.

जेव्हा मी कष्टात काढलेले दिवस आणि त्यांचे दिवस यांच्यात फार जास्त फरक नाही हे त्यांना कळलं. तेव्हा त्यांनी मला आपला मानलं.

मुंबईत पिढ्यानपिढ्या रहाणाऱ्यांना परप्रांतीय बोललं जातं. तुमच्यासोबत असं काही घडलं?

गेली 41 वर्ष मी अमेरिकेत रहातोय. पण, मला अजूनही बाहेरचा व्यक्ती म्हणून समजलं जातं. मी या देशात व्यवसाय उभा केला. पण मी बोलतो वेगळा, अॅक्सेंट अमेरिकन नाही त्यामुळे मी बाहेरचा आहे. एका डॉक्टरला बाहेरचा मानणार नाहीत. जोपर्यंत लोकांना समजणार नाही, बाहेरचा व्यक्ती राजकारणी, नेता होऊ शकतो. तर, त्यांच्यापर्यंत हे पोहोचवण्याची जबाबदारी आमची आहे. आम्ही अमेरिकन आहोत हे त्यांना समजावून दिलं पाहिजे.

भारतीयांसाठी सर्वात मोठा मुद्दा H-1-B व्हिसाचा आहे. गेल्याकाही दिवसांपासून यावर बंधन घालण्यात आली. व्हिसा मिळणं बंद झाले. बायडन यांची सक्ता आली तरही परिस्थिती बदलेल?

ट्रंप यांचा राष्ट्रवादाचा मुद्दा आहे. त्यांनी 'अमेरिका फर्स्ट' असं धोरण ठेवलं आहे. बाहेरून आलेल्या व्यक्तीला नोकरी मिळाली तर तो अमेरिकन लोकांची नोकरी हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत नाही. H-1-B व्हिसा हा कुशल कामगार देशात येतील यासाठी होता. हा देश बाहेरून आलेल्या व्यक्तींच्या परिश्रमांनी मोठा झाला आहे. पण, आपली लोकप्रियता टिकवण्यासाठी ट्रंप यांनी हा निर्णय घेतला.

35 टक्के लोकांना खूष करण्यासाठी त्यांचं धोरण आहे. व्यापार, संशोधन आणि इतर क्षेत्रांमध्ये कुशल कामगार नाहीत. त्यामुळे त्यांना या व्यक्तींना अमेरिकेत आणावं लागेल. ट्रंप यांचं धोरण व्यापाराला घातक आहे. बायडन यांचं धोरण वास्तववादी आहे. त्यामुळे H-1-B व्हिसाचा विषय लवकरच सुटेल.

अमेरिकेची निवडणूक होते कशी? हे भारतीयांना माहीत नाही.

राष्ट्रध्यक्ष निवडण्यासाठी आमच्या संविधानात इलेक्टोरल कॉलेज पद्धत आहे. फक्त लोकप्रियतेवरून निवडणूक ठरवली, तर कॅलिफोर्नियासारख्या परिसरात 50 दशलक्ष लोक राहतात. मग सर्व कंट्रोल त्यांच्याकडे जाईल. त्यामुळे इतर राज्यांना त्यांचा हक्क देण्यासाठी ही पद्धत अवलंबण्यात आली.

प्रत्येक राज्याला त्यांनी मतं विभागून दिली. ही पद्धत वेगळी आहे. काही लोक सांगतात ही पद्धत बदलावी. गेल्या निवडणुकीत हिलरी क्लिंटन यांना जास्त मतं मिळाली. पण ट्रंप अध्यक्ष झाले कारण त्यांना इलेक्टोरल कॉलेज वोट मिळाले.

हे प्रकरण कोर्टात गेलं तर काय होईल?

अमेरिकेची न्यायपद्धती पारदर्शक आहे. हे प्रकरण कोर्टात जाईल. त्याठिकाणी ट्रंप यांनी त्यांच्या विचारसरणीचे लोक नेमणूक केले. या न्यायाधीशांचा कल त्यांच्याबाजूने असू शकेल पण, ते घटनेच्याबाहेर न जाता निर्णय देतील. ट्रंप यांना हरायला अजिबात आवडत नाही. त्यामुळे त्यांच्या आरोपात फार तत्थ्य नाही. हरायचं नाही, आपल्या पाठीशी असलेल्यांदा दाखवण्यासाठी हे सुरू आहे. सुप्रीम कोर्ट त्यांच्याबाजूने निर्णय देण्याची शक्यता नाही. ट्रंप यांना फक्त भांडल्यासारखं वाटेल.

कोर्टात बायडेन जिंकतील. पण ट्रंप यांच्या बाजूचे लोक हे मान्य करणार नाहीत. ते आरोप करत रहातील. पण, पुढील काही दिवसात हे चित्र स्पष्ट झालेलं असेल.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)