अर्णब गोस्वामी यांची आजची रात्रही तुरुंगातच, उद्या दुपारी 12 वाजता होणार पुढील सुनावणी

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना आजची रात्रही तुरुंगातच काढावी लागणार आहे. अर्णब यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवरची पुढील सुनावणी उद्या (शनिवार - 7 नोव्हेंबर) दुपारी बारा वाजता होईल, असं कोर्टाने म्हटलं आहे.

2018 सालच्या अन्वय नाईक आणि त्यांच्या आईच्या आत्महत्या प्रकरणात दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करावा आणि अटक अवैध ठरवावी, यासाठी गोस्वामी यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. गुरुवार (5 नोव्हेंबर) आणि शुक्रवार (6 नोव्हेंबर) असे दोन दिवस उच्च न्यायालयाकडून निर्णय न आल्याने अर्णब गोस्वामी यांना तिसरी रात्रही पोलिसांच्या पहाऱ्यातच काढावी लागली.

दरम्यान, गोस्वामी यांना गुरुवारी (5 नोव्हेंबर) अलिबागच्या मॅजिस्ट्रेट कोर्टात हजर करण्यात आलं. पोलिसांनी त्यांच्या पोलीस कोठडीची मागणी केली. मात्र, कोर्टाने गोस्वामी यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. यासंबंधीच्या आपल्या 11 पानी ऑर्डरमध्ये न्यायालयाने काही कारणं दिली आहेत.

जे प्रकरण बंद करण्यात आलं होतं आणि या प्रकरणाची A-समरीही दाखल करण्यात आली होती अशा प्रकरणात गोस्वामी यांना पोलीस कोठडी का आवश्यक आहे, हे रायगड पोलिसांना सांगता आलेलं नाही, असं मुख्य न्यायदंडाधिकारी सुनैना पिंगळे यांनी आपल्या ऑर्डरमध्ये म्हटलं आहे. शिवाय ज्या आधारे ही अटक झाली आणि पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली ते बघता ही अटकच बेकायदेशीर वाटू शकते, असं म्हणत त्यांनी पोलिसी कारवाईवरच प्रश्नचिन्हं उपस्थित केलं आहे.

इतकंच नाही तर 2018 साली झालेल्या तपासात कुठल्या उणिवा आणि त्रुटी होत्या ज्यामुळे हे प्रकरण पुन्हा उघडण्यात आलं, हे सांगण्यातही पोलीस अपयशी ठरल्याचंही कोर्टाने आपल्या ऑर्डरमध्ये म्हटलेलं आहे.

तसंच त्या आत्महत्या आणि त्याच्याशी अर्णब गोस्वामी यांचा असलेला संबंध दाखवून देण्यातही रायगड पोलीस अपयशी ठरल्याचं कोर्ट ऑर्डरमध्ये म्हटलेलं आहे.

2018 साली तपासात कुठलेही पुरावे सापडले नसल्याने प्रकरण बंद करण्यासाठी A-समरी अहवाल दाखल करण्यात आला. मात्र, अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता यांनी हे प्रकरण पुन्हा उघडण्यासाठी नव्याने तक्रार दाखल केली आणि त्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात अर्णब गोस्वामी आणि इतर दोघांची चौकशी करण्यासाठीचे पुरावे हाती आल्याचं अतिरिक्त सरकारी वकील महाकाळ यांनी कोर्टात सांगितलं.

पोलिसांनी मॅजिस्ट्रेट कोर्टाच्या आदेशाविरोधात अलिबाग सत्र न्यायालयात पुर्नविचार याचिका दाखल केली आहे. ज्यावर 7 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. त्यामुळे बहुदा त्यांना तोपर्यंत कोठडीत रहावं लागण्याची शक्यता आहे.

एकीकडे अर्णब गोस्वामी यांनी हायकोर्टात याचिका दाखल केलीये. तर दुसरीकडे अन्वय नाईक यांची मुलगी आद्या नाईक यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.

रायगड पोलिसांनी दाखल केलेल्या अ-समरी (A-summery) रिपोर्टवर पुन्हा चौकशी करण्याची मागणी त्यांनी कोर्टाकडे केली आहे.

अर्णब शाळेमध्ये क्वारंटाईन

अर्णब गोस्वामींना 14 दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिल्यानंतर त्यांना अलिबागच्या मराठी शाळेत ठेवण्यात आलं आहे.

कोरोनाच्या पार्शभूमीवर अलीबाग नगरपालिकेच्या मराठी शाळेत त्यांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. तिथं कच्च्या कैद्यांचा विभाग तयार करण्यात आला आहे. क्वारंटाईनचा कालावधी संपल्यानंतर कैद्यांना जिल्हा कारागृहात हलविण्यात येतं.

सध्या या शाळेच्या कोरोना विभागात 40 कच्चे कैदी असून त्यांच्यामध्येच अर्णब गोस्वामी यांना ठेवण्यात आलं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)