You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अर्णब गोस्वामी अलिबागच्या जेलमध्ये नाही तर ‘या’ ठिकाणी आहेत क्वारंटाईन
अर्णब गोस्वामी यांच्या मुंबई हायकोर्टातल्या याचिकेवरील आजची सुनावणी टळली आहे. ती आता उद्या (शुक्रवार, 6 नोव्हेंबर) दुपारी ३ वाजता होणार आहे. त्यामुळे आजची रात्रसुद्धा त्यांना जेलमध्येच काढावी लागणार आहे.
दरम्यान अर्णब गोस्वामी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. या प्रकरणी आता अलिबाग सत्र न्यायालयात पुनर्निरीक्षण अर्ज दाखल करण्यात आला आहे. ज्यावर 7 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. त्यामुळे बहुदा त्यांना तोपर्यंत कोठडीत रहावं लागण्याची शक्यता आहे.
अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करावा. तसंच पोलिसांची अटक अवैध ठरवावी या मागणीसाठी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
बुधवारी रायगड पोलिसांनी अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी अर्णब गोस्वामी यांना त्यांच्या मुंबईतील राहत्या घरून अटक केली होती.
गोस्वामी यांना अलिबागच्या मॅजिस्ट्रेट कोर्टासमोर हजर करण्यात आलं. अलिबागच्या मॅजिस्ट्रेट कोर्टाने त्यांच्या पोलीस कोठडीची पोलिसांची मागणी फेटाळून लावत. गोस्वामी यांना 18 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.
त्यानंतर अर्णव गोस्वामी आणि या गुन्ह्यातील इतर दोन आरोपींनी कोर्टासमोर जामीनासाठी अर्ज दाखल केला. मात्र कोर्टाने यावर पोलिसांना बाजू मांगण्यासाठी वेळ देत यावर सुनावणीची निश्चित तारीख ठरवली नव्हती.
एकीकडे अर्णव गोस्वामी यांनी हायकोर्टात याचिका दाखल केलीये. तर दुसरीकडे अन्वय नाईक यांची मुलगी आद्या नाईक यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.
रायगड पोलिसांनी दाखल केलेल्या अ-समरी (A-summery) रिपोर्टवर पुन्हा चौकशी करण्याची मागणी त्यांनी कोर्टाकडे केली आहे. आद्या नाईक यांच्या याचिकेवरही आजची सुनावणी टळली आहे.
दुसरीकडे पोलिसांनी मॅजिस्ट्रेट कोर्टाच्या आदेशाविरोधात अलिबाग सत्र न्यायालयात पुर्नविचार याचिका दाखल केली आहे.
अलिबाग सत्र न्यायालयात या प्रकरणी आता पुनर्निरीक्षण अर्ज दाखल करण्यात आला आहे. त्यावर 7 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे.
मॅजिस्ट्रेट कोर्टात दाखल केलेली जामीन याचिका मागे घेतली असल्याची माहिती अर्णबच्या वकिलांनी मुंबई हायकोर्टाला दिली होती.
ही केस सेशन्स कोर्टची असल्याने या याचिकेवर सुनावणी करण्याबाबत स्पष्टता नाही, असं आम्हाला कोर्टाने सांगितल्याचं त्यांच्या वकिलांचं म्हणणं आहे.
आम्ही जामीनासाठी याचिका केली आहे. पण आमची मागणी अंतरिम दिलासा देण्याची आहे, असं अर्णबच्या वकिलांनी हायकोर्टात सांगितलं आहे.
अर्णब शाळेमध्ये क्वारंटाईन
अर्णब गोस्वामींना 14 दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिल्यानंतर त्यांना अलिबागच्या मराठी शाळेत ठेवण्यात आलं आहे.
करोनाच्या पार्शभूमीवर अलीबाग नगरपालिकेच्या मराठी शाळेत त्यांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. तिथं कच्च्या कैद्यांचा विभाग तयार करण्यात आला आहे. क्वारंटाईनचा कालावधी संपल्यानंतर कैद्यांना जिल्हा कारागृहात हलविण्यात येतं.
सध्या या शाळेच्या कोरोना विभागात 40 कच्चे कैदी असून त्यांच्यामध्येच अर्णब गोस्वामी यांना ठेवण्यात आलं आहे. त्याना आजची रात्र देखील इथंच काढावी लागणार आहे.
नाना पटोलेंच्या निर्णयाकडे सर्वांच्या नजरा
दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत अपमानजनक शब्द उच्चारल्याने महाराष्ट्र विधीमंडळाने अर्णब गोस्वामी यांना पाठवलेल्या हक्कभंग प्रस्तावावर गुरूवारी बैठक आयोजित करण्यात आली होती.
विधानसभेत हक्कभंग सादर करणारे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनासुद्धा या बैठकीसाठी बोलावण्यात आलं होतं.
विधानसभा अध्यक्षांनी अर्णब गोस्वामींना आतापर्यंत ७ नोटीसा पाठवल्या आहेत. त्यापैकी एकाही नोटीशीला त्यांनी उत्तर दिलेलं नाही, अशी माहिती शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी बीबीसीशी बोलताना दिली आहे.
त्यामुळे अर्णब गोस्वामींविरोधात दुसरा हक्कभंग दाखल करावा अशी मागणी त्यांनी आता केली आहे. आता या समितीची बैठक ११ नोव्हेंबरला होणार आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)