अर्णब गोस्वामी प्रकरण: शिवसेनेची अमित शाहांवर टीका, 'माहिती घेऊन बोलावे' #5मोठ्याबातम्या

आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या बातम्यांपैकी पाच महत्त्वाच्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...

1. अर्णब गोस्वामींच्या अटकेवरून आक्रमक प्रतिक्रिया देणाऱ्या अमित शहांना शिवसेनेचे प्रत्युत्तर

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईनंतर अनेक केंद्रीय नेत्यांनी राज्य सरकारवर टीका केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ही घटना इंदिरा गांधींनी देशात लावलेल्या आणीबाणीसारखीच आहे अशी प्रतिक्रिया दिली होती.

अमित शाह म्हणाले, "अर्णब गोस्वामी यांना झालेली अटक म्हणजे वैयक्तीक स्वातंत्र्य आणि लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर हल्ला आहे. स्वतंत्र माध्यमांनी या कारवाईला विरोध करायला हवा. ही घटना आणीबाणीची आठवण करून देते." असे ट्वीट त्यांनी केले आहे.

अमित शहा यांच्या ट्विटला शिवसेनेचे खासदार अरविंद सावंतांनी प्रत्युत्तर दिले आहे. ही बातमी लोकमतने दिली आहे.

ते म्हणाले, "अर्णब गोस्वामींच्या अटकेचा पत्रकारितेशी काय संबंध? एका खासगी व्यवसायिकेचे पैसे बुडवल्यानं आणि त्याने आत्महत्या केल्याने गोस्वामी यांना अटक झाली आहे. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी माहिती घेऊन बोलावे."

आपल्या ट्वीट मध्ये अमित शाह यांनी काँग्रेसवरही निशाणा साधला आहे. काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षाने लोकशाहीची लाज काढली अशी टीकाही त्यांनी केली आहे.

शिवसेनेचे मुखपत्र सामनाने अग्रलेखातून भाजपवर टीका केली आहे. भाजपला सवतीची पोरं मांडीवर खेळवण्यात मौज वाटते असं या अग्रलेखात म्हटलं आहे.

2. ठाकरे सरकार पाठोपाठ केरळचाही निर्णय, सीबीआयला परवानगीशिवाय तपास करता येणार नाही

महाराष्ट्र पाठोपाठ केरळनेही केंद्रीय तपास यंत्रणा सीबीआयकडून थेट तपास करण्याची परवानगी काढून घेतली आहे. यापुढे सीबीआयला केरळमध्ये तपास करण्यापूर्वी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार आहे. टीव्ही 9 हे वृत्त दिले आहे.

केरळचे मुख्यमंत्री पिनरई विजयन यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. सीबीआय़ आपली मर्यादा ओलांडत असून राज्य सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे असाही आरोप पिनरई विजयन यांनी केला.

केंद्र सरकारच्या यंत्रणा राज्याच्या धोरणांमध्ये हस्तक्षेप करत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

यापूर्वी पश्चिम बंगाल, राजस्थान, छत्तीसगड आणि महाराष्ट्राने असा निर्णय घेतलेला आहे.

3. केंद्राचे पाहणी पथक अद्याप आलेले नाही, विरोधक गप्प का? विजय वडेट्टीवार यांचा सवाल

राज्यात पूर आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. पण 18 दिवस उलटले तरी केंद्र सरकारचे पथक अद्याप पाहणीसाठी आलेले नाही.

यासंदर्भात विरोधक काहीच बोलत नसल्याने यामागे नेमके काय गौडबंगाल आहे? असा प्रश्न मदत व पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे. दैनिक प्रभातने हे वृत्त दिले आहे.

राज्य सरकारने मदत जाहीर केली असली तरी केंद्र सरकारचे पथक महाराष्ट्रात आलेले नाही. यावर आता भाजपचे नेते का गप्प आहेत? त्यांनी किमान पोपटासारखा आवाज तरी काढावा असं म्हणत वडेट्टीवार यांनी भाजपला टोला लगावला.

राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेली रक्कम दिवाळीपूर्वी देण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले.

4. 'पोलिसांनी मला बाजूला फेकले' - किरीट सोमय्या

देशभरातील भाजप नेत्यांकडून रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईचा निषेध करण्यात आला आहे. याविरोधात बुधवारी (4 नोव्हेंबर) भाजपकडून अनेक ठिकाणी आंदोलनही करण्यात आले.

भाजपचे नेते किरीट सोमय्या अर्णब गोस्वामी यांची भेट घेण्यासाठी अलिबाग येथे गेले असता पोलिसांनी आपल्याला उचलून बाजूला फेकले असा आरोप त्यांनी केला आहे. लोकमतने हे वृत्त दिले आहे.

किरीट सोमय्या म्हणाले, "पोलिसांच्या कामात कोणताही अडथळा आणला नसताना अशी वागणूक देण्यात आली. मी अर्णब गोस्वामी यांना पाहण्यासाठी अलिबाग पोलीस स्टेशनला गेलो होतो. पण पोलिसांनी मला उचलून बाजूला फेकले."

ही पोलिसांची दादागिरी असल्याचं ते म्हणाले.

5. भारतीय हवाई दलाची क्षमता वाढली, आणखी तीन रफाल विमानं भारतात दाखल

भारतीय लष्काराच्या ताफ्यात आणखी तीन रफाल विमानं दाखल झाली आहेत. रफाल विमानांची दुसरी दुकडी भारतात दाखल झाली असून गुजरात येथील जामनगर एअरबेसवर ही विमानं उतरली. लोकसत्तानं हे वृत्त दिले आहे.

भारताने आतपर्यंत एकूण 36 विमानं खरेदी केली आहेत. रफाल लढाऊ विमानांची पहिली तुकडी यापूर्वी पंजाबमधील अंबाला येथे दाखल झाली होती.

फान्सकडून खरेदी केलेली रफाल विमानं टप्प्याटप्प्याने भारतात दाखल होत असून आतापर्यंत आठ विमानं पोहचली आहेत.

हवाई दलाने दिलेले माहितीनुसार, प्रत्येक दोन महिन्यानंतर दोन ते तीन विमानं दिली जाणार आहेत.

1997 मध्ये रशियाकडून सुखोई-30 हे विमान खरेदी केल्यानंतर आता 23 वर्षांनंतर हवाई दलात लढाऊ विमानं दाखल होत आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)