अर्णब गोस्वामी अटक : अमित शाह म्हणतात, 'कांग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांकडून लोकशाहीला बट्टा'

इंटेरियर डिझायनर अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक झाली आहे. यावरून सोशल मीडियावर गोस्वामी यांच्या समर्थनार्थ आणि विरोधात प्रतिक्रियांचा पूर आला आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह केंद्रातल्या अनेक मंत्र्यांनी अर्णबच्या अटकेवर टीका केली आहे. जवळपास सर्वच मंत्र्यांची या कारवाईची तुलना 1975 च्या आणीबाणीशी केली आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही ट्वीट केलं आहे. ते लिहितात, "काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी पुन्हा एकदा लोकशाही बट्टा लावला आहे. रिपब्लिक टिव्ही आणि अर्णव गोस्वामी यांच्याविरोधात राजसत्तेचा वापर हा व्यक्तिस्वातंत्र्यावर आणि लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर हल्ला आहे. या कारवाईने आणीबाणीची आवठण करून दिली. माध्यम स्वातंत्र्यावरच्या या हल्ल्याचा निषेध करायलाच हवा आणि आम्ही तो करतो."

केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलेल्या ट्‌वीटमध्ये ते लिहितात, "मुंबईत प्रेस-पत्रकारितेवर जो हल्ला झाला तो निषेधार्ह आहे. महाराष्ट्रा सरकारची ही कारवाई आणीबाणीसारखीच आहे. आम्ही याचा निषेध करतो."

"सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वात काम करणारा काँग्रेस पक्ष आजही आणीबाणीच्या मनस्थितीत आहे. आज महाराष्ट्रात याची प्रचिती आली. जनताच याला लोकशाही मार्गाने उत्तर देतील. #republic".

शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे की "ठाकरे सरकारने राज्याची धुरा सांभाळल्यापासून सुडाचं राजकारण केलं नाही. अर्णब गोस्वामींची अटक ही कायदेशीर प्रक्रियेनुसारचं झाली आहे."

केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद लिहितात, "ज्येष्ठ पत्रकार अर्णब गोस्वामी यांना झालेली अटक निंदनीय, अनावश्यक आणि काळजीत टाकणारी आहे. आम्ही माध्यम स्वातंत्रासाठी आणि 1957 च्या आणीबाणीविरोधात लढा दिला आहे."

तर केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी अर्णब गोस्वामी यांना पोलीस घेऊन जात असतानाचा व्हिडियो ट्वीट करत लिहिलं आहे, "स्वतंत्र मीडिया आपल्या लोकशाहीचं वैशिष्ट्यं आणि राज्यघटनेचा आदर्श आहे. या स्वातंत्र्याला दाबण्याचा प्रयत्न लोकशाहीचा गळा आवळण्यासारखं आहे. रिपब्लिकचे अर्णब गोस्वामी यांच्यासोबत आज जे काही घडलं त्यावरून आणीबाणीची आठवण होते. लोकशाहीच्या नावाने गळे काढणारे राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष गप्प का?"

तर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी पत्रकारांनाच खडे बोल सुनावले आहेत. "आज अर्णब गोस्वामीसोबत उभे राहिला नाहीत तर तुम्ही फॅसिझमला पाठिंबा देत आहेत, हे याद राखा," असं म्हटलं आहे. त्या लिहितात, "स्वतंत्र पत्रकारितेतले जे आज अर्णब गोस्वामीच्या बाजूने नाहीत ते फॅसिझमचं समर्थन करत आहात. तुम्हाला ते आवडत नसतील, तुम्ही त्यांच्या मताशी सहमत नसाल मात्र तरीही तुम्ही गप्प बसलात तर याचा अर्थ तुम्ही दबावतंत्राचं समर्थन करत आहात. कुणास ठाऊक पुढचा नंबर तुमचा असेल?"

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या कारवाईवर टीका करत ट्वीट केलं आहे, "धार्मिक हिंसा भडकवणाऱ्यांची साथ देणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कारस्थानाचा भांडाफोड करणाऱ्याची किंमत अर्णब गोस्वामीला चुकवावी लागत आहे. टुकडे-टुकडे गँग असो किंवा पालघरचे गुन्हेगार यांना शरण देणारे कोण आहेत? याचं उत्तर देश सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना मागत आहे."

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीही तीन ट्वीट करत अर्णब गोस्वामींचा बचाव करत काँग्रेवर तीव्र टीका केली आहे. आपल्या ट्वीटमध्ये ते लिहितात, "आणीबाणीमध्ये काँग्रेसने कशाप्रकारे पत्रकार आणि पत्रकारितेचं दमन केलं, हे लपून नाही. आज काँग्रेसच्या आशीर्वादाने महाराष्ट्र सरकारने आणीबाणीसारखी परिस्थिती पुन्हा आणली आहे. महाराष्ट्र सरकार द्वारे करण्यात आलेल्या लोकशाहीविरोधी, पत्रकारितेविरोधी कृत्याचा मी निषेध करतो."

अभिनेत्री कंगणा राणावत हिनेही या अटकेचा निषेध करताना पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारवर टीका केली आहे. तिने एक व्हिडियो केला आहे. या व्हिडियोमध्ये ती विचारतेय, "मला महाराष्ट्र सरकारला विचारायचं आहे की तुम्ही अर्णब गोस्वामीला घरात घुसून मारलं आहे. केस ओढले आहे. तुम्ही अजून किती घरं तोडणार आहात? किती तोंडं बंद करणार आहात?"

काही पत्रकारांनीही या अटकेचा निषेध केला आहे. पत्रकार राहुल शिवशंकर ट्वीटवर लिहितात, "तुम्ही त्यांच्याशी सहमत असाल किंवा नसाल मात्र, अर्णब गोस्वामीला अटक करणं म्हणजे सर्व मर्यादांचं उल्लंघन आहे. यानंतर कोण, असा प्रश्न अनेकजण विचारत आहेत."

तर ज्येष्ठ पत्रकार तवलीन सिंह यांनीही गोस्वामी यांच्या अटकेचा निषेध केला असला तरी ज्या प्रकारे ज्येष्ठ मंत्री या अटकेचा विरोध करत आहेत, तसा निषेध यापूर्वी ज्या पत्रकारांना अटक झाली, त्यावेळी का केला नाही, असा सवालही त्यांनी विचारला आहे.

त्या लिहितात, "अर्णबला अटक करणं चुकीचं आहे. मात्र, विशेष म्हणजे आज अर्णबसाठी अनेक मंत्र्यांनी ट्वीट केलं. मात्र, भाजपच्या मुख्यमंत्र्याच्या राजवटीत अनके पत्रकारांना अटक झाली. त्यावेळी त्यांनी असे ट्वीट का केले नाही? यातून आपल्याला कोणता संदेश मिळतो?"

राज्यसरकारच्या दडपशाहीविरोधात भाजप काळ्या फित लावून काम करणार

पुरोगामी महाराष्ट्रात अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करत पत्रकार अर्णव गोस्वामी यांना अटक करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या दडपशाही विरोधात अर्णव गोस्वामी यांची सुटका होईपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रभर भाजपाचे सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्ते काळ्या फिती लावून काम करतील, अशी माहिती महाराष्ट्र भाजपचे कार्यालय सचिव मुकूंद कुलकर्णी यांनी दिली आहे.

एडिटर्स गिल्डनेही अर्णब गोस्वामी यांच्या अटकेवर आश्चर्य व्यक्त केलं आहे. एडिटर्स गिल्डने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकार म्हटलं आहे, "अर्णब गोस्वामी यांच्या अटकेची बातमी धक्कादायक आहे. अचानक करण्यात आलेल्या या कारवाईचा आम्ही निषेध करतो आणि ही कारवाई अत्यंत त्रासदायक असल्याचं स्पष्ट करतो. अर्णब गोस्वामी यांची निष्पक्षपणे चौकशी होईल आणि टीकात्मक पत्रकारिता करणाऱ्या प्रसार माध्यमांविरोधात सत्तेचा वापर होणार नाही, याची काळजी घेण्याचं आवाहन आम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना करतो."

पत्रकार संघटनांची सावध भूमिका, काहींचं अटकेला समर्थन

दरम्यान, महाराष्ट्रातील पत्रकार विरोधी समितीचे अध्यक्ष एस. एम. देशमुख यांनी हा पत्रकारितेवरचा हल्ला नाही. ही वैयक्तिक बाब असल्याचं म्हणत महाराष्ट्र पत्रकारविरोधी समिती या अटकेचा निषेध करणार नसल्याचं म्हटलं आहे.

देशमुख यांनी केलेल्या पोस्टमध्ये ते लिहितात, "रिपब्लिक टीव्ही चे संपादक अर्नब गोस्वामी यांच्या अटकेचा निषेध यासाठी करता येणार नाही की, हे प्रकरण व्यक्तीगत आहे. त्याचा पत्रकारितेशी दुरान्वयाने संबंध नाही. त्यामुळे अर्नब यांची अटक म्हणजे चौथ्या स्तंभावरचा हल्ला वगैरे म्हणत कोणी गळे काढण्याची गरज नाही."

ते पुढे लिहितात, " मे 2018 मध्ये अलिबाग तालुक्यातील कावीर येथील वास्तूविषारद अन्वय नाईक आणि त्यांच्या मातोश्री कुमूद नाईक यांनी आत्महत्या केली होती. अर्नब गोस्वामी यांच्याकडून कामाची मोठी रक्कम येणे होती पण ती ते देत नसल्याने ही आत्महत्या झाल्याचे तेव्हा सांगण्यात येत होते. गोस्वामी यांच्या विरोधात तेव्हा अलिबाग पोलिसांनी गुन्हाही दाखल केला होता पण पुढे कोणतीच कारवाई झाली नव्हती. त्यामुळे नाईक कुटुंबियांनी या प़करणाची सीआयडी मार्फत चौकशी करावी अशी मागणी केली होती. त्यानुसार गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हे प्रकरण सीआयडीकडे वर्ग करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार अलिबाग गुन्हा अन्वेषण विभागाने नव्याने चौकशी करून आज गोस्वामी यांना अटक केली."

"या विषयाचा पत्रकारितेशी दुरान्वयाने देखील संबंध नाही. दोघांच्या मृत्यूचा हा विषय असल्याने या अटकेचा निषेध उचित ठरणार नाही. पत्रकारितेची झुल पांघरून वाट्टेल तसे उद्योग करणा-यांची पाठराखण मराठी पत्रकार परिषद आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती करू शकत नाही. कायद्याला त्याचे काम करू द्यावे हेच उचित ठरेल."

शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही पोलिसांनी कायद्याने कारवाई केली, अशी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, "कुणाविरोधातही पुरावे असल्यास पोलीस कारवाई करू शकते. ठाकरे सरकार स्थापन झाल्यापासून कुणाविरोधातही सूडबुद्धीने कारवाई झालेली नाही."

तर अल्ट न्यूजचे सहसंस्थापक प्रतिक सिन्हा लिहितात, "जो कुणी अर्णब गोस्वामी पत्रकार असल्याचं म्हणत आहेत ते चुकीची माहिती पसरवत आहेत."

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी शिवसेना कायमच मराठी माणसाच्या पाठीशी असल्याचं म्हटलं आहे. आपल्या प्रतिक्रियेत ते म्हणतात, "अन्वय नाईक नावाच्या मराठी वास्तूविशारदाच्या आत्महत्या प्रकरणात अर्णब गोस्वामी यांचं नाव आलं आहे. एफआयआरमध्ये त्यांचं नाव असूनही पूर्वीच्या भाजप सरकारने कारवाई होऊ दिलं नाही. आतातरी नाईक कुटुंबाला न्याय मिळेल. यासाठी मी गृहमंत्री अनिल देशमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं अभिनंदन करतो."ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनीही अर्णब गोस्वामी यांच्या बाजूने ट्वीट करणाऱ्या केंद्रीय मंत्री इतर पत्रकारांच्या अटकेवेळी गप्प का होते, असा सवाल विचारला आहे. ते लिहितात, "अर्णब गोस्वामीला मुंबई पोलिसांनी अटक केल्यावर केंद्रीय मंत्री ज्या पद्धतीने त्यांच्या बाजूने उभे राहिले, हे हेलावून टाकणारं आहे. विशेषतः जेव्हा ते याची तुलना आणीबाणीशी करतात. यापूर्वी भाजप सरकारने अनेक पत्रकारांना अटक केली आहे. त्यावेळी ते काहीही बोलले नाही. तसंच NIA/CBI/ED/पोलीस यांनी सामाजिक कार्यकर्त्यांना अटक करून त्यांचा छळ केला, तेव्हाही ते काहीही बोलले नाही."

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनीही या अटकेचा पत्रकारितेशी काहीही संबंध नसल्याचं ट्वीट केलं आहे. ते लिहितात, "अर्णब गोस्वामीच्या अटकेचा पत्रकारितेशी संबंध नाही. ही एक जुनी केस आहे. ज्याचा तपास करायला तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने नकार दिला होता. पीडित कुटुंबानेच या प्रकरणाचा नव्याने तपास करण्याची मागणी केली होती."

काय आहे प्रकरण?

2018 साली अन्वय नाईक या 53 वर्षांचे इंटेरिअर डिझायनर यांनी अलिबागमध्ये त्यांच्या राहत्या घरी आत्महत्या केली होती. घटनेनंतर मिळालेल्या सुसाईड नोटमध्ये अर्णब गोस्वामी आणि इतर दोघांनी त्याचे 5.40 कोटी रुपये थकवल्याचे म्हटलं होतं. त्यामुळे आपल्याला मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागल्याचंही त्यांनी लिहिलं होतं. असं नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांनी सांगितलं. त्याआधारावर ही तक्रार करण्यात आली होती.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)