You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अर्णब गोस्वामी यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, कोठडीसाठी पोलिसांनी केले 15 युक्तीवाद
रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना पोलिसांनी घरात शिरून अटक केली. त्यानंतर अलिबागच्या सत्र न्यायालयानं त्यांना 18 नोव्हेंबरपर्यंत म्हणजेच 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
गोस्वामी यांच्यासह इतर 2 आरोपींनासुद्धा 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. फोरोज शेख आणि नितेश सारडा अशी इतर दोन आरोपींची नावं आहेत.
दरम्यान तिनही आरोपींनी त्यांना जामीन मिळावा यासाठी कोर्टात अर्ज केला आहे. त्यावर आपलं म्हणण मांडण्यासाठी कोर्टानं पोलिसांना वेळ दिलेला आहे. पण, कोर्टानं जामीन अर्जावरील सुनावणीसाठी निश्चित तारीख दिलेली नाही, आरोपींचे वकली सुशील पाटील यांनी ही माहिती दिली आहे.
'अ समरी' रिपोर्ट मान्य झाल्यावर पुन्हा केसचा तपास करण्यासाठी न्यायालयाची मंजुरी घेतली नाही, पोलिसांवर असा ठपका ठेवत कोर्टानं पोलिसांना अर्णब गोस्वामी यांची पोलीस कोठडी नाकारली आहे.
अन्वय नाईक आणि त्यांच्या आईचा मृत्यू या घटनेशी आरोपींचा थेट संबंध प्रस्तापित व्हायला हवा, तो पोलिसांना करता आला नाही. तसंच आरोपींची पोलीस कोठडी घेण्यासाठी सबळ पुराव्याची गरज आहे, असं म्हणत कोर्टानं पोलिसांना कोठडी देण्यास नकार दिला आहे.
अर्णब गोस्वामी यांना अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणी रायगड पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना अलीबागच्या सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं होतं.
दरम्यान बुधवारी (4 नोव्हेंबर) सकाळी अर्णब गोस्वामी यांना अटक केल्यानंतर महिला पोलीस अधिकाऱ्याच्या सरकारी कामात अडथळा घातल्याप्रकरणी त्यांच्यावर 353 कलमांतर्गत आणखी एक FIR दाखल करण्यात आली आहे.
अर्णब गोस्वामी यांच्याघरी रायगड पोलीस सकाळीच पोहचले आणि त्यांनी अर्णब यांना अटक केली.
पोलिसांनी आपल्याला ताब्यात घेताना धक्काबुक्की केली असं अर्णब गोस्वामींने एएनआय वृत्तसंस्थेला सांगितलं आहे.
पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांच्या कोठडीची मागणी केली होती. त्यासाठी सरकारी वकिलांनी कोर्टात 15 वेगवेगळे युक्तीवाद केले होते.
सरकारी वकिलांचे 15 युक्तीवाद
- अर्णब गोस्वामी एका प्रस्थापित न्यूज चॅनलचे संपादक असून त्यांचा सामान्यांवर प्रभाव आहे.
- अन्वय नाईक यांची स्युसाईड नोट मृत्यूपूर्वीची जबानी म्हणून ग्राह्य धरण्यात आली आहे. आरोपींच्या कंपन्यांच्या मालकी/भागिदारीची कागदपत्र प्राप्त करून घ्यायची आहेत.
- नाईक यांच्या कंपनीतील साक्षीदारांचा तपास करायचा आहे. त्यावेळी अर्णव पोलीस कोठडीत असणे गरजेचं आहे. नाहीतर साक्षीदारांवर दबाव आणला जाऊ शकतो.
- या गुन्ह्यांत नव्याने तपासामध्ये सकारात्मक माहिती मिळाली आहे. त्याचा तपास करायचा आहे.
- यापूर्वी केलेल्या तपासात कोणत्या वेंडर्सकडून कामं आरोपींनी पूर्वा करून घेतली याची माहिती नाही. त्यामुळे या वेंडर्सचा तपास करायचा आहे. त्यांना अटक करायची आहे.
- काम केल्याची कागदपत्र जप्त करायची आहेत.
- वर्क ऑर्डरपेक्षा जास्त काम केल्याचं साक्षीदीरांचं म्हणणं आहे. याचा तपास करायचा आहे.
- अन्वय नाईक यांनी वेळेत काम पूर्ण केले नाही, असा आरोपींचा दावा आहे. त्याची कागदपत्र जप्त करायची आहेत.
- नवीन तपासात काही कंपन्यांचे बॅंक अकाउंट नंबर मिळाले आहेत. त्यात आणखी काही अकाउंट आहे का, याची माहिती गोळा करायची आहे.
- काही साक्षीदारांचे 164 CRPC अंतर्गत जबाब नोंदवायचे आहेत. त्यासाठी गोस्वामी यांना पोलीस कोठडी गरजेची आहे.
- आरोपींकडून सादर करण्यात आलेली कागदपत्र बनावट आहेत का, याचा तपास बाकी आहे.
- आरोपींनी सादर केलेल्या डेबिट नोटवर मयत यांची किंवा त्यांच्या कंपनीची सही असल्याचा पुरावा नाही. त्यामुळे या एकतर्फी जारी करण्यात आल्या आहेत. याचा तपास पोलीस कोठडीत करायचा आहे.
- वादग्रस्त रक्कमेचा प्रश्न सोडवण्यासाठी आरोपी यांच्याकडून ठोस प्रयत्न नाहीत. त्यामुळे मयत मानसिक दडपणाखाली होते अशी साक्षीदारांकडून माहिती उपलब्ध झाली आहे. त्यामुळे मयत व्यक्तीस आत्महत्या करण्यायोग्य परिस्थिती निर्माण केली आणि परिणामी मयत यांनी गळफास लावून आत्महत्या केली. याचा सखोल तपास करण्यासाठी पोलीस कोठडी गरजेची आहे.
- मयत यांच्या मुलीला पैसे स्वीकारावे आणि तक्रारी बंद कराव्यात यासाठी धमक्या देण्यात आल्या. त्यांच्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी गोस्वामी यांना नोटीस बजावलेली आहे.
- तत्कालीन तपास अधिकाऱ्यांकडून तपासामध्ये अनेक उणीवा. फौजदारी प्रक्रिया संहितेचे उल्लंघन याकारणासाठी "अ समरी" अहवालावर फिर्यादीने आक्षेप घेतला होता. त्या तक्रारींमध्ये तथ्य असल्याचं तपासात आढळून आलं आहे.
काय घडलं कोर्टात
आरोपीने अटक करताना सहाय्य केलं नाही, असं रायगड पोलिसांनी कोर्टात सांगितलं. तसंच बनावट डेबिट नोट तयार केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
तसंच पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप अर्णब गोस्वामी यांच्या वकिलांनी कोर्टात केला. तसंच ही चौकशी अवैध असल्याचा दावासुद्धा गोस्वामी यांच्या वकिलांनी केला.
त्यावर आरोपीने पोलिसांवर केलेल्या मारहाणीच्या आरोपांची तक्रार मी विचाराधीन घेत नाही. आरोपीने पोलिसांवर केलेले आरोप चुकीचे आहेत, असं कोर्टानं म्हटलं.
15 ऑक्टोबर 2020 पासून नव्याने तपास
रायगड पोलिसांनी या प्रकरणी 15 ऑक्टोबरपासून नव्याने तपास सुरू केला आहे. त्यात त्यांनी फिर्यादी अक्षता नाईक यांचा जबाब नोंदवला आहे. तसंच नाईक यांच्या कंपनीचा महत्त्वाचा वेंडर असलेल्या व्यक्तिचाही जबाब नोंदवण्यात आला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत २८ साक्षीदारांना तपासासाठी नोटीस पाठवली आहे. यापूर्वी केलेल्या तपासातील काही साक्षीदारांनीही नवी माहिती दिल्याचा पोलिसांचा दावा आहे.
त्यांच्याकडून मिळालेली माहिती सकारात्मक असल्याचं पोलिसांचं म्हणण आहे.
नाईक यांच्या लॅपटॉपमधील फाईल्सची तपासणी सुरू असून त्यात १ लाख पेक्षा जास्त फाईल्स असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. तसंच त्यांच्या आणि आरोपींच्या बॅंक खात्यांचीही चौकशी सुरू आहे.
अर्णब गोस्वामींबाबत मॅजिस्ट्रेट कोर्टाने काय म्हटलं?
'आरोपींकडून काहीही जप्त करण्यात आलेलं नाही. तथाकथीत गुन्ह्याची पार्श्वभूमी प्रथमदर्शनी सिद्ध होत नाही. आरोपींच्या पोलीस कोठडीसाठी त्यांचा घटनेशी असणारा संबंध जोडणारी श्रृंखलासुद्धा प्रथमदर्शनी प्रस्थापित होत नाही.
घटनेबाबत कोणताही पुरावा आलेला नसल्यामुळे अ-समरी अहवाल स्वीकारला जातो. सदरचा अहवाल आजतागायत अस्तित्वात असताना सदरच्या खटल्याबाबत पुन्हा तपास सुरू होतो, यासाठी आरोपींच्या पोलीस कोठडीचं समर्थन करणारं कोणतंही योग्य, संयुक्तिक आणि कायदेशीर कारण आढळत नाही.
या पूर्वी करण्यात आलेला तपास अपूर्ण होता का? त्यात कशा प्रकारे त्रुटी राहिल्या आहेत? त्या का राहिल्या? याबाबत अभियोग पक्षाकडून कोणतंही सबळ कारण आणि पुरावा मांडण्यात आलेला नाही. त्यामुळे आरोपी क्रमांक 1 ते 3 बाबतच्या पोलीस कोठडीचं समर्थन करता येत नाही.
अन्वय नाईक प्रकरण काय आहे?
5 मे 2018 रोजी अन्वय नाईक यांनी अलिबाग येथील कावीर गावातील राहत्या घरी आत्महत्या केली. तिथेच त्यांच्या आई कुमूद नाईक यांचाही मृतदेह आढळला होता.
अन्वय नाईक हे पेशाने वास्तुविशारद होते. कॉन्कर्ड डिझाइन्स लिमिटेड या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक होते.
अन्वय नाईक यांनी आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्यावर पैसे थकवल्याचा आरोप केला आणि त्यांना आत्महत्येला जबाबदार धरलं होतं, असा आरोप अन्वय नाईक यांची पत्नी अक्षता नाईक यांनी केला आहे.
त्यानंतर अन्वय नाईक यांच्या पत्नीनं अलिबाग पोलीस ठाण्यात अर्णब गोस्वामी यांच्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल केला होता.
अन्वय नाईक यांच्या कंपनीनं अर्णब गोस्वामी यांच्या रिपब्लिक टीव्हीचा स्टुडिओ उभारला होता. याच कामाचे अर्णब गोस्वामी यांनी पैसे थकवल्यानं अन्वय नाईक यांनी आत्महत्येचं पाऊल उचलल्याचा आरोप अक्षता नाईक यांचा आहे.
रायगडमधील अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊनही कुठलीच कारवाई होत नसल्याने, नंतर 5 मे 2020 रोजी म्हणजे अन्वय नाईक यांच्या आत्महत्येला दोन वर्षं झाल्यानंतर अक्षता नाईक यांनी सोशल मीडियावर एक व्हीडिओ शेअर केला आणि न्यायाची मागणी केली.
त्यावेळी काँग्रेससह विविध पक्षांनी हा मुद्दा उचलला आणि अर्णब गोस्वामी यांच्यावर कारवाईची मागणी केली.
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या व्हीडिओची आणि अक्षता नाईक यांच्या तक्रारीची दखल घेत, 26 मे 2020 रोजी सांगितलं की, "आज्ञा नाईक (अन्वय नाईक आणि अक्षता नाईक यांची मुलगी) यांनी अर्णब गोस्वामींच्या रिपब्लिकनं पैसे थकवल्यानं वडील आणि आजीनं आत्महत्या केल्याच्या प्रकरणाची रायगड पोलीस तपास करत नाहीत अशी तक्रार केली. त्यानंतर मी सीआयडीला या प्रकरणाचा पुन्हा तपास करण्याचे आदेश दिले आहेत."
अर्णब गोस्वामींनी फेटाळले आरोप
"अक्षता नाईक या सत्याला तोडून-मोडून मांडत आहेत. कॉन्कर्ड डिझाइन्स लिमिटेडशी (अन्वय नाईक यांची कंपनी) असलेला सर्व व्यवहार पूर्ण करण्यात आला असून, त्याचे कागदपत्रही आमच्याकडे आहेत," असं अर्णब गोस्वामींच्या टीमने म्हटलं आहे.
तसंच, "अक्षता नाईक यांना त्यांनी केलेल्या आरोपांचे कुठलेच पुरावे पोलिसांसमोर सादर करता आले नाही. त्यामुळे हे प्रकरण बंद झाले आहे. कुठलेही अवैध कृत्य झाले, याचे त्यांच्याकडे पुरावे नाहीत.
"अक्षता नाईक यांनी सत्या चुकीच्या पद्धतीने मांडल्यास, चुकीचे दावे केल्यास किंवा ARG आऊटलायर मीडियाला लक्ष्य केल्यास बदनामी केल्याप्रकराणी कायदेशीर कारवाई करू," असा इशाराही अर्णब गोस्वामींनी दिला होता.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)