You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अमेरिका निवडणूक निकाल : ही 7 राज्येच का ठरवणार पुढचा राष्ट्राध्यक्ष?
- Author, ऋजुता लुकतुके आणि जान्हवी मुळे
- Role, बीबीसी मराठी
डोनाल्ड ट्रंप की जो बायडन? जगातल्या सगळ्यांत श्रीमंत आणि शक्तिशाली देशाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष कोण होणार, हे कोण ठरवणार? तुम्ही म्हणाल अमेरिकेतले मतदार.
पण कहानी में ट्विस्ट इथेच येतो. कारण इतका महत्त्वाचा निर्णय तिथले सगळे मतदार घेत नाहीत, तर फक्त 7 राज्यांमधले मतदार ठरवतात! अमेरिकेच्या निवडणुकीत निर्णायक ठरणाऱ्या राज्यांना 'स्विंग स्टेट' म्हटलं जातं.
पण स्विंग स्टेट्स म्हणजे नेमकं काय आहे आणि यंदाच्या निवडणुकीत ही सातच राज्य इतकी महत्त्वाची का आहेत? हे जाणून घेण्यासाठी आधी अमेरिकेतली निवडणूक प्रक्रिया समजून घ्यावी लागेल.
थोडक्यात सांगायचं तर अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक ही एकच एकच निवडणूक नसून देशाच्या 50 राज्यांमधल्या निवडणुका राष्ट्राध्यक्षपदाचा विजेता ठरवणार आहेत.
मतदार नाही, तर 'इलेक्टोरल कॉलेज' महत्त्वाचं
साधारणपणे कुठल्याही निवडणुकीत सर्वाधिक मतं मिळवणारा उमेदवार किंवा पक्ष विजयी ठरतात. पण अमेरिकेत असं होत नाही.
अमेरिकेत मतदार आपलं मत देतात, तेव्हा ते मत प्रत्यक्षात थेट राष्ट्राध्यक्षाला नाही, तर डेलिगेट्स किंवा अधिकाऱ्यांच्या एका छोट्या गटाला देत असतात. याच गटाला 'इलेक्टोरल कॉलेज' असं म्हटलं जातं आणि त्यातल्या सदस्यांना इलेक्टर.
परंपरेनुसार निवडणुकीनंतर काही दिवसांनी इलेक्टर्स एकत्र येतात आणि राष्ट्राध्यक्षांची निवड करतात. एखाद्या राज्यात ज्या उमेदवाराला बहुमत मिळतं, त्यानं त्या राज्यातल्या सगळ्या इलेक्टर्सची मतं जिंकली, असं मानलं जातं. इलेक्टर्सच्या या मतांना इलेक्टोरल व्होट्स असंही म्हणतात.
त्यामुळे मतदारांची सर्वाधिक मतं (पॉप्युलर व्होट्स) मिळालेला उमेदवार नाही, तर सर्वाधिक इलेक्टोरल व्होट्स जिंकणारा उमेदवार राष्ट्राध्यक्ष बनतो.
आता एखादं राज्य किती इलेक्टोरल व्होट्स देणार, याचा आकडाही निश्चित केलेला आहे. अमेरिकन विधीमंडळात सिनेट आणि हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह्ज ही दोन सभागृहं मिळून एखाद्या राज्यातून जितके लोकप्रतिनिधी निवडून जातात, तितकी इलेक्टोरल व्होट्स त्या राज्याच्या खात्यात येतात.
स्विंग स्टेट्स म्हणजे काय?
सध्या अमेरिकेत 50 राज्यांत 538 इलेक्टर्स असून कॅलिफोर्निया राज्याच्या खात्यात सर्वाधिक 55 इलेक्टोरल व्होट्स आहेत तर टेक्ससकडे 38 इलेक्टोरल व्होट्स आहेत.
पण तरीही कॅलिफोर्निया या निवडणुकीत निर्णायक ठरत नाही. याचं कारण म्हणजे ही दोन्ही राज्यं ही एका विशिष्ट पद्धतीनेच मतदान करतात. कॅलिफोर्निया हे राज्य डेमोक्रॅटिक पक्षालाच बहुमत देतं आणि टेक्सस हे अनेक दशकांपासून रिपब्लिकन पक्षालाच बहुमत देत आलंय.
गेल्या 20 वर्षांमधल्या 5 निवडणुका पाहिल्या तर अमेरिकेतल्या ५० पैकी ३८ राज्यांतले लोक प्रत्येक वेळी एका विशिष्ट पक्षालाच निवडून देतात. त्यांच्या मतदानात बदल होत नाही.
पण काही राज्य ही एका निवडणुकीत एका पक्षाला तर पुढच्या निवडणुकीत दुसऱ्या पक्षाच्या पारड्यात आपलं वजन टाकतात. या राज्यांना स्विंग स्टेट्स किंवा बॅटलग्राउंड स्टेट्स किंवा पर्पल स्टेट्स असं म्हणतात.
अमेरिकेत अशी 12 राज्य असून तिथे चुरशीची लढत होते आणि त्यांचा निकाल राष्ट्राध्यक्ष पदाच्या शर्यतीत निर्णायक ठरतो.
दोन स्वतंत्र सवेक्षणांवरून आमच्या लक्षात आलं की यांतली 5 राज्य ही स्थिरावली आहे. पण 7 राज्यांमध्ये काय होईल हो कुणालाही सांगता येत नाही.
ही अतिशय महत्त्वाची 7 स्विंग राज्यं आहेत :
- विस्कॉन्सिन
- अॅरिझोना
- नॉर्थ कॅरोलिना
- मिशिगन
- पेनसिल्व्हेनिया
- फ्लोरिडा
- जॉर्जिया
या 7 पैकी विस्कॉन्सिनसारख्या छोट्या राज्याचं उदाहरण घेऊ. तिथे 1 टक्के मतांची लीड मिळवून जर ट्रंप जिंकले, तर त्यांचा विजयाचा मार्ग सुकर होतो. त्यामुळे या 7 राज्यांमधलं एक-एक मत महत्त्वाचं असतं.
स्विंग स्टेट्स का महत्त्वाची आहेत?
2016 सालच्या निवडणुकीत खरं तर हिलरी क्लिंटन यांना पूर्ण देशातली 48 टक्के मतं मिळाली. तर ट्रंप 47 टक्के मतं मिळवूनही म्हणजे 13 लाख कमी मतं मिळूनही जिंकू शकले. याचं एक मुख्य कारण म्हणजे 6 स्विंग राज्यांमधल्या मतदारांनी ट्रंप यांच्या बाजूने कौल दिला. त्यामुळे मोठ्या राज्यांत जास्त मतं मिळवूनही हिलरी पराभूत झाल्या.
म्हणूनच जी राज्य निश्चित आपलीच आहे, तिथे उमेदवार ढुंकूनही पाहत नाहीत आणि स्विंग राज्यांमध्ये प्रचाराचा धडाका लावतात. आताचा निवडणूक प्रचार बघितला तरी ट्रंप काय किंवा बायडन काय यांनी स्विंग राज्य पिंजून काढली आहेत. आणि पारंपरिक राज्यांना अक्षरश: गृहित धरलंय. जो बायडान कालचा अख्खा दिवस पेनसिल्व्हेनियामध्ये तळ ठोकून होते.
स्विंग राज्यांमध्ये कोण आघाडीवर?
आतापर्यंतच्या विविध सर्वेक्षणांची सरासरी दाखवतेय की बायडन सर्व 7 स्विंग राज्यांमध्ये पुढे आहेत, पण अनेक राज्यांमधलं अंतर इतकं कमी आहे की तिथे काहीही होऊ शकतं.
- विस्कॉन्सिन (6 टक्क्यांनी बायडन आघाडीवर)
- अॅरिझोना (1 टक्क्याने बायडन आघाडीवर)
- नॉर्थ कॅरोलिना (0.3 टक्क्यांनी बायडन आघाडीवर)
- मिशिगन (5 टक्क्यांची बायडन यांच्याकडे आघाडी)
- पेनसिल्व्हेनिया (4 टक्क्यांनी बायडन आघाडीवर)
- फ्लोरिडा (1 टक्क्याने बाडयन पुढे)
- जॉर्जिया (0.4 टक्क्याने बायडन आघाडीवर)
या 7 राज्यांध्ये कोण बाजी मारतंय ते बुधवारी 4 नोव्हेंबरच्या दिवशी कळेल. या निकालांचं वेगवान, सविस्तर आणि सोप्या भाषेत कव्हरेज तुम्ही फक्त बीबीसी मराठीवर वाचू आणि पाहू शकता.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)