You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कुणाल कामरा - अर्णब गोस्वामी: कामरांनी इंडिगोकडे केली 25 लाख रुपयांची मागणी
पत्रकार अर्णब गोस्वामीचा विमानात व्हीडिओ काढल्याप्रकरणी इंडिगो एअरलाइन्सने स्टॅंड अप कॉमेडिअन कुणाल कामरांवर सहा महिन्यांची बंदी घातली. या बंदीला आव्हान देत कुणाल कामरांनी इंडिगोला कायदेशीर नोटीस बजावली आहे.
माझ्यावर असलेली बंदी तात्काळ उठवण्यात यावी, बिनशर्त माफी मागावी आणि 25 लाख रुपये नुकसान भरपाई म्हणून देण्यात यावेत असं कुणाल कामरांनी म्हटलं आहे.
टाइम्स ऑफ इंडियानुसार, कुणाल कामरांच्या वकिलांनी म्हटलं की "इंडिगोने कामरांवर प्रवास बंदी घातल्यामुळे त्यांचे देशातील अनेक शो रद्द होऊ शकतात त्यामुळे ही नोटीस पाठवण्यात आली आहे. इंडिगोने घातलेली बंदी ही DGCAच्या नियमांविरोधात आहे."
कुणाल कामरांच्या नोटीसला कायदेशीर उत्तर दिली जाईल असं इंडिगो एअर लाइन्सच्या प्रवक्त्यांनी सांगितलं आहे.
याआधी काय घडलं?
पत्रकार अर्णब गोस्वामी यांना विमानात छळण्याप्रकरणी स्टँड-अप कॉमेडिअन कुणाल कामरा यांच्यावर इंडिगो एअरलाइन्सने सहा महिन्यांची बंदी घातली आहे. त्यापाठोपाठ सरकारी विमान कंपनी एअर इंडिया तसंच खासगी कंपनी स्पाईसजेटनेही कुणाल यांच्यावर प्रवासबंदी घातली आहे.
मंगळवारी इंडिगोच्या एका विमानात प्रवास करताना कामरा यांनी गोस्वामी यांना शिवीगाळ करणं आणि अपशब्द वापरण्याच्या प्रकरणावरून इंडिगोने कामरा यांच्यावर ही बंदी घातली आहे.
नक्की प्रकरण काय?
कॉमेडियन कुणाल कामरा आणि अर्णब गोस्वामी इंडिगोच्या विमानात प्रवास करत होते. तेव्हा कामरा यांनी गोस्वामी यांच्या पत्रकारितेवर टीका केली. "गोस्वामी भित्रट आहे," असं ते म्हणाले.
कामरा यांनी या संपूर्ण घटनेचं त्यांनी चित्रीकरण केलं आणि सोशल मीडियावर पोस्ट केलं. त्यानंतर ट्विटर युजर्सने परस्पराविरोधी प्रतिक्रियाही दिली.
याबाबत कामरा यांनी एक निवेदनही जारी केलं. ते म्हणतात, "मी आज लखनौला जाणाऱ्या विमानात अर्णब गोस्वामी यांना भेटलो. त्यांना मी संवाद साधण्याची विनंती केली. आधी त्यांनी फोनवर बोलत असल्याचं भासवलं. मी त्यांची वाट पाहिली. त्यावेळी सीटबेल्टचा संकेत बंद होता. मला त्यांच्या पत्रकारितेबद्दल काय वाटतं, याबद्दल एक स्वगतही सादर केलं. माझ्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देण्यास त्यांनी नकार दिला. मी मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याचे ते म्हणाले."
"नंतर सीटबेल्टचा लावण्यास सांगण्यात आलं आणि एअरलाईन कर्मचाऱ्याने मला जागेवर जाण्यास सांगितलं. टेक ऑफ झाल्यानंतर मी त्यांच्याकडे पुन्हा गेलो आणि बोलू शकतो का, अशी विचारणा केली. ते काहीतरी पाहत असल्याचं ते म्हणाले. त्यावेळी 'रिपब्लिक टीव्ही'चे लोक प्रेक्षकांच्या वैयक्तिक आयुष्याबरोबर जे करतात तेच मी केलं. मला त्याबद्दल काहीही पश्चात्ताप नाही आणि मी माफी मागणार नाही," असं कामराने एका निवेदनात म्हटलं.
काँग्रेस नेते शशी थरूर यांनी ट्वीट करत कामरा यांची बाजू घेतली. "सत्य परिस्थिती अशी आहे की गोस्वामी यांचेच दात घशात गेलेत. गोस्वामी अशाच पद्धतीने लोकांवर ओरडतात, त्यांना डिवचतात. कुणाल कामरा यांचा जितका आवाज आहे, त्यापेक्षा जास्त मोठ्या आवाजात बोलून हेच काम करतात."
त्याचवेळी राहुल ईश्वर नावाच्या एका ट्विटर युजरने कुणाल कामरा यांच्या कृतीवर टीका केली आहे. त्यांच्या मते अर्णव गोस्वामी एक नामांकित पत्रकार आहे. "मला त्यांचे हजार मुद्दे पटत नाहीत तरीही विमानात त्यांचा असा अपमान करणं योग्य नाही."
त्यानंतर नागरी विमान उड्डयन मंत्रालयाच्या निर्देशांनुसार इंडिगो कंपनीने कामरा यांच्यावर सहा महिन्यांसाठी प्रवासबंदी घातली.
दरम्यान इंडिगोने घातलेल्या प्रवासबंदीच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना कुणाल कामरा यांनी आणखी एक ट्वीट केलंय. "सहा महिन्याच्या निलंबनासाठी मी आभारी आहे. मोदीजी एअर इंडिया कदाचित कायमच निलंबित करून टाकतील."
कुणाल कामरांच्या या वागणुकीवर आक्षेप व्यक्त करत सरकारी विमान कंपनी एअर इंडियानेही कुणाल कामरावर प्रवासबंदी घातली आहे.
"कामरा यांची वागणूक चुकीचीच होती. अशा वागणुकीपासून लोकांना परावृत्त करण्यासाठी एअर इंडियामध्येही कुणाल कामरा यांना पुढील सूचना मिळेपर्यंत प्रवास करता येणार नाही," असं एअर इंडियाने ट्वीट केलं आहे.
त्यापाठोपाठ बुधवारी स्पाईसजेटनेही कामरा यांच्यावर प्रवासबंदी घातली आहे.
या एकंदर प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत नोंदवा इथे...
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)