You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
चीनमधल्या समलिंगी समुदायासाठी नववर्षाची सुरुवात भयभीत करणारी कारण...
- Author, सोफी विलियम्स
- Role, बीबीसी न्यूज
दिवाळी, नाताळ हे जसे मोठे सण आहेत. तसाच चिनी नवीन वर्ष किंवा ल्युनर न्यू इयरचं स्वागत चिनी जनतेसाठी महत्त्वाचा उत्सव असतो. नवीन वर्षाचं स्वागत आपल्या कुटुंबीयांसोबत, प्रियजनांसोबत करण्यासाठी सर्वच चिनी नागरिक आपापल्या घरी जात असतात.
यंदा मात्र, या उत्सवावर कोरोना विषाणुच्या साथीचं मळभ आहे. त्यामुळे अनेकांना घरी जाता आलेलं नाही.
प्रत्येकालाच आनंद देणारा हा सुट्ट्यांचा काळ चीनच्या LGBT कम्युनिटीला मात्र भयभीत करत असतो. कारण घरी गेल्यावर त्यांना नको असलेल्या प्रश्नांचा सामना करावा लागतो.
शॅडोंगमधले चित्रपट निर्माते, लेखक आणि कार्यकर्ते असलेले फॅन पोपो सांगतात की आपला मुलगा गे आहे म्हणजे जगाचा अंत झाल्यासारखी काही पालकांची भावना असते.
बीबीसीशी बोलताना ते म्हणाले, "अनेकांना घरी गेल्यावर त्यांचे पालक लग्न कधी करणार, हा प्रश्न विचारून भांडावून सोडतात."
चीनमध्ये समलिंगी संबंधांना कायदेशीर मान्यता मिळून दोन दशकं उलटली आहेत. 2001 पासून चीनमध्ये समलैंगिकता मानसिक आजारही मानला जात नाही.
बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर
असं असलं तरी चिनी समाज अजूनही समलिंगी विवाहाला स्वीकारत नाही. अनेकांचे तर कुटुंबीयच त्यांचा स्वीकार करत नाहीत.
संयुक्त राष्ट्रांच्या डेव्हलपमेंट प्रोग्रामअंतर्गत 2016 साली एक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला होता. या अहवालानुसार चीनमध्ये स्वतःच्या कुटुंबीयांना स्वतःच्या लैंगिकतेविषयी सांगणाऱ्यांची संख्या 15 टक्क्यांहून जास्त नाही.
शांघाईमधली समलिंगी सिनेसंघटना असलेल्या CINEMQचे सदस्य शी शिआओ यांनी बीबीसीला सांगितलं, "ज्यांनी स्वतःच्या लैंगिकतेविषयी सांगितलं त्यांना त्याचा अभिमान आहे."
"तर काहींना आपल्या कुटुंबीयांना आपल्या लैंगिकतेवषयी कळलं तर काय होईल, याची मरणाची भीती वाटते."
बड्या कंपन्यांकडून आर्थिक पाठबळ
गेल्या काही वर्षांत चीनमधल्या अनेक बड्या कंपन्यांनी LGBT समुदायाला आणि या समुदायाच्या संभाव्य बाजारपेठेला पाठिंबा दिला आहे.
सात समलिंगी जोडप्यांना लग्न करायला अमेरिकेत पाठवण्यासाठी ई-कॉमर्स क्षेत्रातली बलाढ्य कंपनी असलेल्या अलिबाबाने 2015 साली एक मोठ्या प्रमोशनल इव्हेंटचं आयोजन केलं होतं. तर शांघाई प्राईड रनसाठी नाईके कंपनी टी-शर्ट वितरित करत असते.
लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या सोशल पॉलिसी डिपार्टमेंटचे सहप्राध्यापक टीम हिल्डरब्रँट यांच्या मते पाश्चिमात्य देशांप्रमाणेच चिनी कंपन्यासुद्धा LGBT मार्केटप्रती जागरुक झालेल्या दिसतात.
बीबीसीशी बोलताना ते म्हणाले, "LGBT लोकांकडे जे विशेष लक्ष पुरवलं जात आहे त्यामागे त्यातून मिळणारा पैसा हे खरं कारण आहे. समलैंगिक लोकांच्या माध्यमातून पैसा कमावणं तुम्ही योग्य मानत असाल किंवा नसाल मात्र, यामुळे या लोकांना अधिक मान्यता मिळाली आहे."
या महिन्याच्या सुरुवातीला अलिबाबाकडूनच चालवली जाणारी आणखी एक शॉपिंग वेबसाईट टीमॉलने चिनी नवीन वर्षाच्या निमित्ताने या समुदायाच्या लोकांना आकर्षित करणारी एक जाहिरात आणली होती.
यात एक मुलगा नवीन वर्षानिमित्ताने आपल्या एका मित्राला घरी जेवणासाठी बोलावतो. त्याचे वडील त्या मित्राला सूप देतात आणि तो मित्र म्हणतो, 'Thanks Dad'. चीनमध्ये सासऱ्याला वडील म्हणून संबोधलं जातं. ही जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि अनेकांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या.
मात्र, ही खरी प्रगती असण्यापेक्षा मार्केटिंग फंडा अधिक असल्याचं फॅन यांना वाटतं. ते म्हणतात, "ही जाहिरात LGBT समुदायचे प्रश्न मांडत नाही. त्यांना माहिती आहे की आमच्याकडे पैसा आहे आणि त्यांना तो पैसा हवा आहे."
ते पुढे म्हणतात, "LGBT समुदायातल्या गरिबांना त्यांचे हक्क मिळावेत, बेघर, निराधार लोकांना जगण्याचं साधन मिळावं, अशी माझी इच्छा आहे."
मात्र, शी जाहिरातीबद्दल अधिक सकारात्मक आहेत.
ते म्हणतात, "एक समलिंगी जोडपं दाखवणं, हे सामान्य जनतेसाठी अधिक महत्त्वाचं असल्याचं मला वाटतं. जुन्या पिढीसाठीही यात संदेश आहे."
नेटफ्लिक्सवरच्या 'Queer Eye' या सुप्रसिद्ध रिअॅलिटी शोची कॉपी असलेला एक कार्यक्रम नुकताच चीनमध्ये रिलीज झाला आहे. मात्र, या कार्यक्रमातला एकही सूत्रसंचालक LGBT समुदायातला नाही. ही एक मोठी त्रुटी प्रेक्षकांनी लगेच हेरली आणि त्यावरून सोशल मीडियावर बरीच टीका झाली.
इतकंच नाही तर मूळ 'Queer Eye' कार्यक्रमाचे सूत्रसंचालक बॉबी बर्क यांनीदेखील ट्वीटरवरून प्रतिक्रिया देत हा कार्यक्रम 'निराशाजनक' असल्याचं म्हटलं आहे.
समलिंगी विवाहाला पाठिंबा
समलिंगी संबंधांबद्दल चीनमध्ये आता बऱ्यापैकी मोकळेपणा आला आहे. समलिंगी लग्नाला कायदेशीर मान्यता मिळावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
प्रशासनाकडे येणाऱ्या विनंती अर्जांपैकी सर्वांत जास्त अर्ज समलिंगी लग्नाला परवानगी देण्याविषयीचे असल्याचं एका सरकारी अधिकाऱ्याने सांगितलं आहे.
या सर्व घडामोडींमुळे कायद्यात बदल होतील, अशी आशा LGBT समुदायाच्या लोकांना आहे. तसंच सोशल मीडियावरही याविषयावर चर्चा झडू लागल्या आहेत.
चीनची मायक्रोब्लॉगिंग साईट असलेल्या विबोवर एका महिलेने टाकलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे, "या समुदायाला समजून घेऊ न शकणारे किंवा त्यांना सहन करू न शकणारे अनेक लोक आहेत. त्यामुळे देश जेव्हा त्याला (समलिंगी लग्नाला) मान्यता देईल तेव्हाच अधिकाधिक लोक त्यांना स्वीकारतील."
दुसरी एक महिला लिहिते, "समलिंगी लग्नाला मान्यता दिल्याने किंवा न दिल्याने चीनमधल्या सामान्य लोकांना फरक पडत नाही. मात्र, जी समलिंगी जोडपी एकमेकांच्या आकंठ प्रेमात आहेत त्यांना फरक पडतो आणि म्हणूनच चीनमध्ये समलिंगी लग्नाला प्रोत्साहन दिलं पाहिजे."
हिल्डरब्रँट मात्र सबुरीचा सल्ला देतात. सोशल मीडियावर येणाऱ्या प्रतिक्रिया खरंच बहुतांश जनतेच्या भावना आहेत का, हे सांगता येत नाही आणि म्हणूनच त्यांना अत्याधिक महत्त्व देता कामा नये, असं त्यांचं म्हणणं आहे.
आजही ल्युनर न्यू ईअरच्या सुट्ट्यांमध्ये घरी जाणं LGBT लोकांसाठी त्रासदायक प्रकार आहे.
फॅन म्हणतात, "मी जवळपास दहा वर्षांपूर्वी नवीन वर्षाच्या दिवशीच माझ्या कुटुंबीयांना माझ्या लैंगिकतेविषयी सांगितलं होतं. ती वेळ खूप योग्य नव्हती. मात्र, तुमच्यावर खूप दबाव असतो तेव्हा तुम्ही लपवू शकत नाहीत."
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)