You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अर्णब गोस्वामी यांना कोर्टाचा दिलासा, FIRवर तात्पुरती स्थगिती
रिपब्लिक टीव्हीचे एडिटर इन चीफ अर्णब गोस्वामी यांना कोर्टानं दिलासा दिला आहे.
त्यांच्याविरोधात दाखल झालेल्या 2 वेगवेगळ्या FIR वर मंगळवार (30 जून) रोजी मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली.
त्यात कोर्टानं गोस्वामी यांच्याविरोधातल्या दोन्ही FIR तात्पुरत्या स्थगित करण्याचे आदेश दिले आहेत. पण, त्याचवेळी कोर्टानं त्यांच्याविरोधातल्या याचिका दाखल करून घेत त्यावर नियमित सुनावणी होणार असल्याचं म्हटलं आहे.
याआधी 24 एप्रिल रोजी सर्वोच्च न्यायालयाने गोस्वामी यांना पोलीस संरक्षण देण्याचे आदेश दिले होते.
तसंच नागपूर येथे 22 एप्रिल 2020 ला दाखल झालेला FIR वगळता अर्णव गोस्वामी यांच्याविरोधातील सर्व याचिका फेटाल्या होत्या. या पोलीस ठाण्यात दाखल झालेला FIR मुंबईतील ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात वळता करण्यात आला आहे.
टीव्ही कार्यक्रमादरम्यान काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींबद्दल अपशब्द वापरल्याचा आरोप करत काँग्रेसच्या काही नेत्यांनी अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात FIR दाखल केला होता.
दोन दिवसांपूर्वी ऑन एअर झालेल्या आपल्या शोदरम्यान अर्णब यांनी म्हटलं होतं, "जर एखाद्या मौलवी वा पाद्रीची अशाप्रकारे हत्या झाली असती तर मीडिया, सेक्युलर गँग आणि राजकीय पक्ष आज शांत असते का? जर पाद्रींची हत्या झाली असती तर 'इटलीवाल्या अँटोनिओ माईनो', 'इटलीवाल्या सोनिया गांधी' आज गप्प असत्या का?"
अर्णब गोस्वामींचा काँग्रेसवर आरोप
एकीकडे काँग्रेसने अर्णब गोस्वामीच्या शोमधल्या भाषेवर आक्षेप घेतले तर दुसरीकडे रिपब्लिक टीव्हीचे एडिटर इन चीफ अर्णब गोस्वामी यांनी काँग्रेसने त्यांच्यावर हल्ला घडवून आणल्याचा आरोप केला आहे.
बुधवारी (22 एप्रिल) रात्री उशीरा सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेल्या एका व्हीडिओद्वारे त्यांनी हा आरोप केलाय. मुंबईमधल्या ऑफिसमधून घरी परतत असताना मोटरसायकलवरून आलेल्या दोघांनी आपल्यावर हल्ला केल्याचा दावा अर्णब गोस्वामींनी केलाय.
या व्हीडिओमध्ये अर्णब सांगतात, "मी ऑफिसमधून घरी परतत असताना रस्त्यात बाईकवरून आलेल्या दोन गुंडांनी हल्ला केला. मी माझ्या पत्नीसोबत कारमध्ये होतो. हल्लेखोरांनी खिडकी फोडायचा प्रयत्न केला. ते काँग्रेसचे गुंड होते."
'काँग्रेसमधल्या उच्चपदस्थ'लोकांनी मला 'धडा' शिकवण्यासाठी या हल्लेखोरांना पाठवलं होतं, असं अर्णब या व्हीडिओत म्हणतात.
5 मिनिटांच्या या व्हीडिओमध्ये अर्णब यांनी सोनिया गांधींवर टीका करत त्यांना या हल्ल्यासाठी जबाबदार ठरवलंय. सोबतच आपल्याला काही झाल्यास त्यासाठी फक्त आणि फक्त सोनिया गांधीच जबाबदार असतील, असंही गोस्वामींनी म्हटलंय.
या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आल्याची बातमी ANI वृत्तसंस्थेने दिली होती.
सोनिया गांधींविषयीच्या वक्तव्यावरून अर्णबवर टीका
अर्णब गोस्वामींच्या सोनियांवरील टीकेनंतर काँग्रेसच्या नेत्यांनी सोशल मीडियावरून आक्षेप व्यक्त केले.
छत्तीसगढमधल्या काँग्रेस सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री असणाऱ्या टी. एस. सिंहदेव यांनी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामींच्या विरुद्ध FIR दाखल केली.
आपल्या चॅनलवरच्या एका कार्यक्रमादरम्यान अर्णब यांनी समाजामध्ये द्वेष पसरवण्यासाठी जाणीवपूर्वक चिथावणीखोर वक्तव्य केलं आणि सोनिया गांधींबाबत अपमानकारक भाषा वापरली, असा आरोप टी. एस. सिंहदेव यांनी केला.
महाराष्ट्रातल्या पालघरमधून सुरतला जाणारे दोन साधू आणि त्यांच्या ड्रायव्हरची जमावाने मारहाण करत हत्या केली होती. हे सगळे चोर असल्याचा या जमावाला संशय होता. यावरूनच अर्णब गोस्वामींनी सोनिया गांधींवर टीका केली होती
कार्यक्रमादरम्यान अर्णब गोस्वामींनी सोनिया गांधीवर केलेल्या या टीकेवर अनेक नेत्यांनी आक्षेप घेतलाय.
सत्यजित तांबेंनी अर्णब गोस्वामींच्या विरोधात संगमनेर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केलेली आहे. याविषयी त्यांनी ट्वीट केलंय.
त्यांनी म्हटलं आहे, "समाजात धार्मिक तेढ वाढवणे, व बांद्रा/पालघर सारख्या प्रसंगांचे खोटे वृत्तांकन केल्याबद्दल अर्णब गोस्वामीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, असे निवेदन सगळ्या जिल्ह्यातल्या पोलिसांना देण्यात आले आहे. मी स्वतः संगमनेर पोलिस ठाण्यात यासंबंधी तक्रार दिली."
मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी गोस्वामींवर टीका केलीय. तर अर्णबवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केलीय. एडिटर्स गिल्डने अर्णब गोस्वामींवर कारवाई करावी, असं त्यांनी म्हटलंय.
काँग्रेसचे महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनीही अर्णब गोस्वामींच्या वक्तव्याचा निषेध केलाय.
वेणुगोपाल यांनी म्हटलं, "काही न्यूज अँकर्स सोनिया गांधींच्या तत्वांविषयी प्रश्न उपस्थित करत आहेत, हे दुर्दैवी आहे. आपल्या आयुष्याची 50 पेक्षा अधिक वर्षं त्यांनी भारतात घालवली आहेत. आपल्या जवळच्या व्यक्तींचं बलिदान देत त्यांनी सन्मानपूर्वक आणि चिकाटीने भारतीय असण्याचा अर्थ सिद्ध केलाय."
तर सोनिया इतरांप्रमाणेच एक भारतीय असल्याचं कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी म्हटलंय.
मे 1999मधला सोनिया गांधींचा एक व्हीडिओ ट्वीट करत त्यांनी लिहिलं, "सोनिया गांधी अर्णब गोस्वामींपेक्षा जास्त भारतीय आहेत. एकीकडे अर्णब विष ओकत देशाच्या चौथ्या स्तंभाला कमकुवत करत असताना, दुसरीकडे सोनिया गांधींनी देशात एकता आणि बंधुभाव वाढवण्यासाठी काम केलंय."
"पत्रकारिता एक सन्मान्य काम आहे, त्यामार्फत जनता लोकशाहीच्या तीन स्तंभांविषयी जाणून घेऊ शकते, विचार करू शकते. पण अर्णब गोस्वामी आणि रिपब्लिक टीव्ही हे पत्रकारिता कशी करू नये, याचं उदाहरण आहेत."
काँग्रेसच्या या प्रखर टीकेनंतर भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रांनी सोनिया गांधींवर टीका केलीय.
ते म्हणतात, "भगवान रामांचं अस्तित्त्वं नाही असं सोनिया गांधींनी सुप्रीम कोर्टाला सांगितलं होतं. सोनिया गांधींना ना भगवान राम आवडतात, ना राम भक्त."
अर्णब जे बोलले ते खरं असल्याने काँग्रेसने त्यांच्यावर हल्ला केल्याचं भाजपच्या आयटी सेल प्रमुखांनी म्हटलंय.
त्यांनी ट्विटरवर लिहिलंय, "विकी केबल्सनुसार 2013 साली ओडिशा आणि कर्नाटकमध्ये बजरंग दलावर बंदी घालण्यात यावी अशी मागणी सोनिया गांधी करत होत्या. पण त्यांचे हे प्रयत्न ख्रिश्चन लोकांच्या धर्मांतराच्या विरोधात असल्याचं एम. के. नारायणन यांनी सांगितल्यानंतर त्यांनी माघार घेतली होती."
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)