अमेरिका निवडणूक निकाल : ट्रंप की बायडन, कधी सुटणार निकालाचं कोडं?

डोनाल्ड ट्रंप आणि जो बायडन यांच्यातली स्विंग स्टेट्समधली स्पर्धा चुरशीची झालेली आहे. एकीकडे ट्रंप यांनी ते जिंकल्याचा दावा करत, निवडणूक प्रक्रियेत घोटाळा झाल्याचा आरोप केलाय.

यासाठी आपण सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचंही त्यांनी म्हटलं. तर दुसरीकडे डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार असणाऱ्या जो बायडन यांनीही आपण विजयपथावर असल्याचा दावा केलाय.

पण प्रत्यक्षात अजूनही लाखो मतपत्रिकांची मोजणी होणं शिल्लक असून कोणत्याही उमेदवाराने विजयाचा दावा करणं योग्य नाही. शिवाय निवडणूक प्रक्रियेत घोटाळा झाल्याचं दर्शवणारा कोणताही पुरावा उपलब्ध नाही.

3 नोव्हेंबरच्या मतदानाच्या दिवसाआधीच 10 कोटींपेक्षा जास्त मतदारांनी मतदान केलेलं होतं. परिणामी अमेरिकेमध्ये गेल्या शतकातल्या सर्वात जास्त मतदानाची नोंद या निवडणुकीत झालेली आहे.

आतापर्यंतचे निकाल काय सांगतात?

निवडणूक पूर्व सर्वेक्षणांनी व्यक्त केलेले अंदाज खोटे ठरवत प्रत्यक्षात ट्रंप यांनी चांगली कामगिरी केलेली असली तरी जो बायडन अजूनही स्पर्धेत आहेत आणि एकूण निकाल वा कल अजूनही स्पष्ट नाहीत.

अमेरिकेमध्ये मतदार हे राष्ट्राध्यक्षाची निवड थेट करत नाहीत, अप्रत्यक्षरित्या करतात.

प्रत्येक राज्याला ठरवून देण्यात आलेली इलेक्टोरल व्होट्स कोणता उमेदवार जास्त जिंकतो, यावर राष्ट्राध्यक्ष कोण होणार हे ठरतं. इलेक्टोरल कॉलेजच्या 538 मतांपैकी ज्या उमेदवाराला 270 किंवा त्यापेक्षा जास्त इलेक्टोरल व्होट्स मिळतात त्याची राष्ट्राध्यक्ष पदी निवड होते. प्रत्येक राज्याला तिथल्या लोकसंख्येनुसार इलेक्टोरल व्होट्स ठरवून देण्यात आलेली आहेत.

राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांच्यासाठी जमेची बाजू म्हणजे त्यांनी पूर्वेकडच्या फ्लोरिडा राज्यावरची आपली पकड कायम ठेवलीय.

ट्रंप यांच्या टेक्सासमधल्या वर्चस्वाला धक्का देणं हे बायडन कॅम्पेनचं स्वप्न होतं, पण फ्लोरिडासोबतच टेक्सासवरची आपली पकडही ट्रंप कायम ठेवतील असा बीबीसीचा अंदाज आहे.

पण आतापर्यंत कन्झर्व्हेटिव्ह विचारसरणी असणारं ऍरिझोना राज्य बायडन आपल्याकडे वळवतील, अशी चिन्हं दिसत आहेत. बायडन या राज्यात जिंकतील अशी शक्यता फॉक्स न्यूज आणि असोसिएटेड प्रेसने वर्तवली आहे. तर या राज्यातले कल डेमोक्रॅटिक पक्षाच्याच बाजूने दिसत असल्याचं बीबीसीचं अमेरिकेतलं सहयोगी चॅनल - CBS न्यूजने म्हटलंय.

रिपब्लिकन पक्षाला वर्षानुवर्षं पाठिंबा देणारं राज्य बायडन यांच्याकडे जाणं हा ट्रंप यांच्यासाठी मोठा फटका ठरू शकतो.

पेन्सलव्हेनिया, मिशिगन आणि विस्कॉन्सिन या राज्यांकडून मिळालेल्या पाठिंब्याच्या जोरावरच चार वर्षांपूर्वी डोनाल्ड ट्रंप राष्ट्राध्यक्ष पदावर निवडून आले होते. पण अजूनही ही राज्यं कोणताही ठोस कल देत नाहीयेत. ही राज्यं दोन्हीपैकी कोणत्याही बाजूला वळू शकतात.

यातल्या विस्कॉन्सिनमध्ये बायडन यांनी काही काळ आघाडी घेतली असली, तरी हे मताधिक्य फार मोठं नव्हतं. 2016मध्ये डोनाल्ड ट्रंप यांनी विस्कॉन्सिनमधून हिलरी क्लिंटन यांचा 30,000 पेक्षा कमी मतांनी पराभव केला होता.

राष्ट्राध्यक्ष पदाच्या या स्पर्धेतला पराभव टाळायचा असेल तर ट्रंप यांच्यासाठी पेनसेल्व्हेनिया राज्यातून जिंकणं महत्त्वाचं मानलं जातंय.

याशिवाय जॉर्जिया आणि नॉर्थ कॅरोलिना राज्यातले निकालही महत्त्वाचे आहेत.

ओहायो आणि मिसोरी या राज्यांमधली आपली आघाडी डोनाल्ड ट्रंप कायम ठेवतील अशी चिन्हं आहेत.

नेब्रास्कामधूनही ट्रंप यांच्याकडेच कल जात असल्याचा अंदाज आहे. पण इथल्या इलेक्टोरल कॉलेजच्या मतांपैकी एक मत जो बायडन यांनी पटकावलेलं आहे.

आतापर्यंत अमेरिकेतल्या कोणत्याही राज्याने धक्कादायक निकाल नोंदवलेला नाही.

ट्रंप यांच्या विधानाचे परिणाम

दरम्यान निवडणुकीमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करत डोनाल्ड ट्रंप यांनी अमेरिकेतल्या लोकशाहीवरच प्रश्नचिन्हं निर्माण केलं असल्याचं बीबीसीचे उत्तर अमेरिका प्रतिनिधी अँथनी झर्कर यांनी म्हटलंय.

राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक अटीतटीची झाली तर आपण डेमोक्रॅटिक प्रतिस्पर्ध्यांवर व्होटर घोटाळ्याचा, निवडणूक फिरवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करू असं डोनाल्ड ट्रंप अनेक आठवड्यांपासून म्हणत होते, आणि 3 सप्टेंबरच्या संध्याकाळी (अमेरिकेतल्या) त्यांनी नेमकं हेच केल्याचं अँथनी झर्कर सांगतात.

अँथनी झर्कर म्हणतात, "अनेक अमेरिकन मतदारांना याचीच भीती होती. व्हाईट हाऊसमधूनच खुद्द राष्ट्राध्यक्षांनी मतमोजणीवर प्रश्नचिन्हं उपस्थित करत त्याचं महत्त्वं डावलण्याचा प्रयत्न होण्याची भीती होती. ज्या काळामध्ये साथीचा रोगामुळे मतदार वेळेआधी मतदान करण्याकडे वा पोस्टाने मतपत्रिका पाठवण्याच्या पर्यायाकडे वळले नव्हते, त्या काळातही मतमोजणीच्या या प्रक्रियेला निवडणुकीचा दिवस उलटून गेल्यानंतरही काही दिवसांचा काळ लागत असे. राष्ट्राध्यक्ष ट्रंप बोलल्यानंतर उपाध्यक्ष माईक पेन्स यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.

"आपण वेळेआधीच विजय घोषित करण्याचा प्रयत्न करत नाही आणि कायदेशीररित्या नोंदवण्यात आलेलं प्रत्येक मत मोजलं जाईल असंही त्यांनी सांगितलं. माईक पेन्स यांची वागणूण सध्याच्या राजकीय अनिश्चिततेच्या काळामध्ये एखाद्या नेत्याने कसं वागावं अपेक्षित आहे, याला धरून होती. पण तोपर्यंत ट्रंप यांच्या विधानाने व्हायचं ते नुकसान झालं होतं. डोनाल्ड ट्रंप जिंकले वा हरले तरी अमेरिकन लोकशाही प्रक्रियेबद्दलच सवाल उपस्थित करणारं विधान करत त्यांनी गालबोट लावलेलं आहे."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)