अमेरिका निवडणूक 2020 : ट्रंप म्हणतात, बायडन निवडणूक 'चोरण्याचा' प्रयत्न करतायत

अमेरिकेमध्ये मतदान पार पडल्यानंतर आता मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. अनेक राज्यांमधले कल दिसायला लागले असले तरी मतमोजणी पूर्ण व्हायला वेळ लागणार आहे.

सुरुवातीचे कल पाहून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी म्हटलं आहे की 'हा मोठा विजय आहे. मी माझं मत आज रात्री मांडणार आहे.'

याआधी त्यांनी बायडन यांच्यावर निवडणूक चोरण्याचा आरोप केला होता. ट्रंप यांनी मतमोजणीबद्दल काही ट्वीट्स केली आहेत. त्यांनी म्हटलंय, "आम्ही मोठी आघाडी घेतलीय, पण ते निवडणूक 'चोरण्याचा' प्रयत्न करतायत. पण आम्ही त्यांना असं करू देणार नाही. वेळ संपल्यानंतर मतं देता येणार नाहीत."

डोनाल्ड ट्रंप यांच्या या ट्वीटवर ट्विटरने 'हे ट्वीट निवडणुकीबद्दलची दिशाभूल करणारी माहिती देत असल्याची शक्यता' असल्याचा टॅग लावलाय.

एखाद्या ट्वीटमधून चुकीची वा दिशाभूल करणारी माहिती दिल्याचं आढळत असल्यास त्यावर आपण अशी सूचना लावणार असल्याचं ट्विटरने यापूर्वीच जाहीर केलं होतं.

आपण आज रात्री एक मोठी घोषणा - विजयाची घोषणा करू असंही ट्वीट डोनाल्ड ट्रंप यांनी केलं.

मतदानाची वेळ संपल्यानंतरही जे मतदार रांगेत उभे आहेत, त्यांनी रांगेतच थांबावं, त्यांना मतदान करता येईल असं जो बायडन यांनी म्हटलं होतं. त्यावरून हा वाद सुरू झालेला आहे.

जो बायडन यांनी काही वेळापूर्वीच समर्थकांसमोर येत भाषण केलं. आपण योग्य मार्गावर असून, निकालाबद्दल आपल्याला सकारात्मक वाटत असल्याचं बायडन यांनी म्हटलंय. सोबतच आताचे कल पाहून निकालाचा अंदाज लावणं योग्य नसल्याचं बायडन यांनी म्हटलंय.

अजून पोस्टल मतपत्रिकांची मोजणी होणं बाकी असून आपल्याला आजच्या रात्रीत (अमेरिकेतली 3 नोव्हेंबरची रात्र - 4 नोव्हेंबर पहाट) निकाल मिळणं कठीण असल्याचंही जो बायडन म्हणाले. त्यांनी याबद्दल ट्वीटही केलेलं आहे.

अमेरिकेतल्या राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीच्या निकालाविषयीच्या ताज्या घडामोडी वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)