You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अमेरिका निवडणूक : पराभव होऊनही तो मान्य न करण्याचा ट्रंप हट्ट का करत आहेत?
- Author, सिद्धनाथ गानू
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
मी निवडणूक जिंकलो अशा आशयाचं ट्वीट डोनाल्ड ट्रंप यांनी केल्याने पुन्हा एकदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठीच्या निकालांवरून चर्चेला सुरुवात झाली आहे.
मात्र ट्रंप यांच्या ट्वीटखाली अधिकृत सूत्रं निवडणुकीचा निकाल वेगळा सांगतात अशी सूचनाही येते आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी पहिल्यांदाच जो बायडन यांनी निवडणूक जिंकल्याचं मान्य केल्यासारखं वाटलं मात्र त्यांनी पुन्हा ट्वीट करून जुना हेका सोडला नव्हता.
डोनाल्ड ट्रंप यांनी रविवारी मात्र एक ट्वीट करून म्हटलं की, ते (बायडन) निवडणूक जिंकले आहेत.
आपले प्रतिस्पर्धी जो बायडन निवडणूक जिंकल्याचं ट्रंप यांनी अखेरीस मान्य केलं असं मात्र नाहीये. मतमोजणीत घोटाळा झाल्याच्या आरोपापासून ते मागे हटताना दिसत नाहीयेत.
"त्यांनी निवडणूक जिंकली आहे. कारण मतमोजणीत घोटाळा झाला आहे," असं त्यांनी म्हटलं.
3 नोव्हेंबरला झालेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयासाठी आवश्यक असलेल्या 270 मतांपेक्षा कमी मतं मिळूनही डोनाल्ड ट्रंप यांनी अधिकृतरित्या आपला पराभव मान्य केला नाहीये.
त्यांनी काही प्रमुख राज्यांमध्ये निवडणूक निकालाला आव्हान देण्याची कायदेशीर प्रक्रियाही सुरू केली आहे, मात्र अजूनही ते आपल्या दाव्यांची पुष्टी करणारे सबळ पुरावे सादर करू शकले नाहीयेत. त्यामुळेच त्यांना कायदेशीर लढाईत यश मिळालं नाहीये.
रविवारी त्यांनी एक ट्वीट करून म्हटलं, "मतदानात घोटाळा. आपण जिंकू!"
त्यांनी पराभव मान्यही केलेला नाही. त्यांनी फक्त ट्वीट्स करून आपण जिंकलोय, मतदान प्रक्रियेत घोटाळा झाला, हे इलेक्शन चोरण्याचा प्रयत्न होतोय आणि मीडिया आणि डेमोक्रॅटस एकमेकांना सामील आहेत हेच आरोप पुन्हा केले.
प्रश्न हा आहे की ट्रंप पराभव का मान्य करत नाहीयत? अमेरिकन निवडणुकीत ही प्रथा आहे की राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत जेव्हा चित्र स्पष्ट व्हायला लागतं तेव्हा दुसरा उमेदवार पराभव मान्य करतो आणि विजयी उमेदवाराशी सहसा फोन करून बोलतो.
या पराभव पत्करण्याला इलेक्शन concede करणं म्हणतात आणि त्यानंतर दिल्या जाणाऱ्या भाषणाला concession speech म्हणतात. पण ट्रंप यांच्याकडून तसं काहीही घडण्याचे संकेत दिसत नाहीयत. त्यामुळे प्रश्न पडतो की पराभव मान्य न करण्याचा हट्ट ट्रंप का करतायत?
1. कायदेशीर लढाई
डोनाल्ड ट्रंप यांनी आतापर्यंत चार राज्यांमधल्या निवडणूक आणि मतमोजणी प्रक्रियेविरोधात खटले दाखल केलेत. पेन्सिल्व्हेनियामध्ये विजय मिळवत बायडन यांनी राष्ट्राध्यक्षपदावर शिक्कामोर्तब केलं. तिथे ट्रंप कोर्टात गेलेत.
अरिझोना, मिशिगन आणि जॉर्जियामध्येही प्रकरण कोर्टात गेलंय. या राज्यांमध्ये अत्यंत अटीतटीची लढत झाली होती. पण बायडन यांनी हजारांच्या घरात मतांची आघाडी घेतली आणि म्हणूनच त्यांचा विजय निश्चित मानला जातोय. ट्रंप यांनी जर पराभव मान्य केला तर त्यांच्या या कायदेशीर लढ्याला काहीच अर्थ राहणार नाही. रिपब्लिकन पक्षाकडून या कायदेशीर लढाईसाठी हजारो डॉलर्सचा विशेष निधी उभा केला जातोय असं रॉयटर्स वृत्तसंस्थेचं म्हणणं आहे.
2. दावे खोटे ठरतील
डोनाल्ड ट्रंप यांनी निवडणूक प्रचार सुरू असतानापासूनच टपाली मतदानाबद्दल आक्षेप घेतले होते. यात घोटाळा होण्याची शक्यता असते असा दावा ते वारंवार करत आलेत. आजवर त्यांनी आपलं म्हणणं सिद्ध करण्यासाठी एकही पुरावा दिलेला नाही. आता ट्रंप यांनी पराभव स्वीकारला तर त्यांनी आतापर्यंत केलेले दावे खोटे होते याचीच ती कबुली दिल्यासारखं ठरेल म्हणून ट्रंप तयार नाहीत.
ट्रंप यांनी ट्विटरवरून माध्यमांना लक्ष्य करत म्हटलं की निवडणुकीचा विजेता तुम्ही कसा ठरवू शकता? ट्रंप यांचा सवाल वरकरणी योग्य वाटतो पण यात एक मेख आहे. माध्यमांनी विजेता ठरवलेला नाहीय तो घोषित केलाय. ज्या राज्यांचे निकाल शेवटी आले तिथेही 99% मतमोजणी झालेली होती आणि उर्वरित मतांचा आकडा इतका मोठा नव्हता की त्यामुळे निकाल बदलू शकेल. पण ट्रंपना मुळात निवडणुकीवरच विश्वास नाहीय त्यामुळे या गोष्टींकडे ते लक्ष देण्याची शक्यताही नाहीच.
3. ट्रंप यांचा स्वभाव
डोनाल्ड ट्रंप यांची राष्ट्राध्यक्षपदाची कारकीर्द पाहिली तर एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे ट्रंप आपण ठरवलेल्या गोष्टींपासून आणि आपण केलेल्या दाव्यांपासून मागे हटत नाहीत. मुस्लीम बॅन असेल किंवा इराण अणूकरारातून बाहेर पडणं असेल किंवा आजवरचा सर्वांत जास्त काळ चाललेला फेडरल शटडाऊन असेल. ट्रंप आपलं म्हणणं खरं करण्यासाठी इरेला पेटतात. माघार घेणं त्यांच्या कार्यशैलीतच नाहीय.
आपण जिंकलो नाही तर सुप्रीम कोर्टात जाऊ आणि त्यांना आपल्याला विजयी घोषित करावंच लागेल असं ट्रंप प्रचाराच्या शेवटच्या चार दिवसांत म्हटले होते. CNN ने अशी बातमी दिली की ट्रंप यांच्या पत्नी मेलानिया आणि जावई जॅरेड कुशनर यांनी पराभव पत्करण्यासाठी ट्रंप यांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला. पण या बातमीनंतर काही तासांतच मेलानिया यांनीही बेकायदेशीर मतांबद्दल ट्वीट करत ट्रंप यांचाच सूर आळवला आणि एकप्रकारे या बातमीचं खंडन केलं.
4. पक्षाच्या एका गटाचं पाठबळ
रिपब्लिकन पक्षाच्या नेतृत्वात आणि समर्थकांमध्येही एक मोठा वर्ग ट्रंप यांची अजूनही पाठराखण करतोय. निवडणुकीत घोटाळा झाला आणि ट्रंप यांचाच विजय होईल अशी अजूनही अनेकांना खात्री आहे. यातले अनेक नेते उघडपणे ट्रंप यांच्या दाव्यांचं- ज्याचा एकही पुरावा लोकांसमोर ठेवला गेला नाहीय, अशा दाव्यांचं समर्थन करतायत. पण रिपब्लिकन पक्षातल्या अनेक नेत्यांनी बायडन यांचं अभिनंदन केलंय, ट्रंप यांनी सन्मानाने पायउतार व्हावं असंही अनेक नेत्यांनी सांगितलंय.
माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांनी बायडन यांचं अभिनंदन केलंय आणि ही निवडणूक प्रक्रिया योग्यरितीनेच पार पडली असेल याची जनतेने खात्री बाळगावी असं आवाहन केलंय. रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्राध्यक्षपदाचे माजी उमेदवार मिट रॉम्नी यांनीही जनतेने बायडन यांना पाठिंबा द्यावा असं म्हटलंय. ट्रंप यांचा पराभव झाला असला तरी आजवर कुठल्याही पराभूत उमेदवाराला मिळालेली सर्वोच्च मतं ट्रंप यांना मिळाली आहेत यावरून त्यांना असलेला पाठिंबा लक्षात येतो. ट्रंप सन्मानाने बाहेर पडले तर कदाचित 2024 साली रिपब्लिकन उमेदवार म्हणून त्यांना रिंगणात उतरता येईल अशीही शक्यता काहींनी बोलून दाखवलीय.
पराभव स्वीकारण्याची परंपरा
उमेदवाराने आपला पराभव मान्य करणं बंधनकारक नाहीय. ही प्रथा आहे जी गेल्या 100 वर्षांपेक्षा जास्त काळ पाळली जातेय. एक दोन अपवाद वगळता. 1896 मध्ये विलियम जेनिंग्ज ब्रायन यांनी रिपब्लिकन पक्षाचे विलियम मेकिन्ले यांच्याकडून पराभव झाल्यानंतर त्यांना तार करून पराभव मान्य करत शुभेच्छा दिल्या तेव्हापासून पराभव मान्य करण्याची प्रथा रुजली असं मानतात. 1944 साली रिपब्लिकन पक्षाचे थॉमस ड्यूवी यांनी आपला पराभव एका रेडिओ कार्यक्रमात स्वीकारला, पण विजेत्या रुझवेल्टना थेट हे कळवलं नाही.
रुझवेल्ट यांनी ड्यूवी यांना पत्र लिहून आपण ही बातमी रेडिओवर ऐकली असा टोमणा मारला अशी आठवण आहे. आणखीनही अशी उदाहरणं पाहायला मिळतील. पण पराभव मान्य आणि अमान्य करण्याचं नाट्यमय उदाहरण 2000 साली पाहायला मिळालं. रिपब्लिकन जॉर्ज बुश आणि डेमोक्रॅट अल गोर यांच्यात अत्यंत अटीतटीची निवडणूक झाली.
निकालाच्या रात्री अल गोर यांनी जॉर्ज बुश यांना फोन करून पराभव स्वीकारला होता. पण मतमोजणी पुढे गेली तसं गोर जिंकू शकतील असं चित्र उभं राहू लागलं आणि गोर यांनी पुन्हा फोन करून आपण पराभव स्वीकारत नसल्याचं सांगितलं. या निवडणुकीचे अंतिम निकाल लागायला 36 दिवस लागले होते आणि सुप्रीम कोर्टाच्या मध्यस्थीनंतरच बुश यांना राष्ट्राध्यक्ष घोषित केलं गेलं होतं.
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर बरीच टीका झाली होती. खुद्द गोर यांनी हा निकाल आपल्याला मान्य नसल्याचं सांगितलं, पण आपल्या भाषणात पराभव मान्य करत पक्षीय भेदाभेद बाजूला ठेवण्याचं आवाहनही त्यांनी केलं. म्हणजे थोडक्यात, जाहीरपणे पराभव स्वीकारत ते आपल्या मार्गाला लागले. चार दिवस मतमोजणीनंतर अमेरिकन निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आणि तरी मजमोजणी पूर्ण झालेली नव्हतीच. बायडन आणि कमला हॅरिस यांची विजयाची भाषणं झाली पण डोनाल्ड ट्रंप अजूनही लोकांसमोर आलेले नाहीत.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)