कोरोना आहारः निरोगी, धडधाकट माणसं व्हिटॅमिनच्या गोळ्या का घेतात?

    • Author, संदीप सोनी
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

तुम्ही कधी व्हिटॅमिनच्या गोळ्या घेतल्या आहेत? जगभरातील कोट्यवधी लोक दररोज व्हिटॅमिनच्या गोळ्या खातात. तुम्ही पण त्यांच्यापैकी एक आहात का?

गेल्या शंभर वर्षांत जग खूप बदललं आहे. व्हिटॅमिनच्या गोळ्या या बदलाचाच एक भाग आहेत. शंभर वर्षांमध्ये व्हिटॅमिनच्या गोळ्या अब्जावधी डॉलर्सची एक बाजारपेठ बनल्या आहेत.

शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी व्हिटॅमिन्स अतिशय महत्त्वपूर्ण समजले जातात. पण म्हणून आपल्यापैकी प्रत्येकानंच या गोळ्या घेण्याची आवश्यकता आहे का? या गोळ्या अनेक लोकांच्या आयुष्याचा भाग कशा बनल्या? या प्रश्नांची उत्तरं जाणून घेणं खूप रोचक आहे.

शंभर वर्षांपूर्वी ज्या गोळ्यांचं नावही कधी ऐकलं नव्हतं, त्या गोळ्या आता वेगवेगळ्या वयोगटातले लोक फूड सप्लिमेंट म्हणून घ्यायला लागले आहेत.

जागतिक आरोग्य संघटना अर्थात WHO साठी काम करणाऱ्या डॉक्टर लीसा रोजर्स यांच्या मते, 17 व्या शतकात शास्त्रज्ञांना पहिल्यांदा जाणवलं, की प्रोटीन, कार्बोहायड्रेट आणि फॅट्सव्यतिरिक्तही खाण्या-पिण्यात असेही काही घटक आहेत, जे उत्तम आरोग्यासाठी महत्त्वाचे आहेत.

त्या सांगतात, "त्याकाळात शास्त्रज्ञांच्या लक्षात आलं की, सागरी प्रवासाला जाणाऱ्या खलाशांना खाण्यासाठी ताजी फळं आणि भाज्या मिळत नाहीत. खाण्यापिण्यातील या कमतरतेमुळं त्यांच्या तब्येतीवर परिणाम होतो."

मात्र 'व्हायटल-अमिन्स' ज्यांना आपण सध्याच्या काळात व्हिटॅमिन म्हणून ओळखतो, त्यांचं महत्त्व शास्त्रज्ञांना विसाव्या शतकाच्या सुरूवातीला लक्षात आलं.

आपल्या शरीराला 13 वेगवेगळ्या व्हिटॅमिन्सची आवश्यकता असते. व्हिटॅमिन ए, सी, डी, ई आणि के. त्याशिवाय व्हिटॅमिन बी आहे, ज्याचे आठ वेगवेगळे प्रकार आहेत. हे सर्व मिळून 13 व्हिटॅमिन्स होतात.

प्रत्येक व्हिटॅमिनचा गुणधर्म वेगळा आहे आणि चांगल्या आरोग्यासाठी हे सर्व व्हिटॅमिन योग्य प्रमाणात शरीराला मिळणं आवश्यक आहे.

या व्हिटॅमिनपैकी डी व्हिटॅमिन आपल्याला सूर्यप्रकाशाद्वारे मिळतं, मात्र बाकीचे व्हिटॅमिन आहारातूनच मिळतात.

डॉक्टर लीसा रोजर्स यांच्या मते, "जगभरात दोन अब्जाहून अधिक लोकांना व्हिटॅमिन किंवा मिनरल्सची कमतरता भासते. यातील बहुतांश लोक हे आफ्रिका आणि आग्नेय आशियामध्ये राहतात.

लहान मुलांमध्ये व्हिटॅमिनची कमतरता ही जीवघेणी ठरू शकते. कारण जेव्हा मुलं आजारी पडतात किंवा त्यांना कोणताही संसर्ग होतो, तेव्हा भूक कमी होते आणि जरी काही खाल्लं तरी शरीर पोषक तत्त्व ग्रहण करू शकत नाही."

विज्ञानानं एवढी प्रगती केली आहे, मात्र तरीही अजून व्हिटॅमिन्सबद्दल बऱ्याच गोष्टींचा उलगडा होणं बाकी आहे. आपल्या बदलत्या जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयींमुळे अजूनच गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

डॉक्टर लीसा रोजर्स सांगतात, "आपल्याला फायदा होईल हाच विचार करून बहुतांश लोक व्हिटॅमिनच्या गोळ्या खातात. जणूकाही या गोळ्या म्हणजे जादूची कांडी आहेत. आपण नियमितपणे चौरस आहार घेतला, तर शरीराची व्हिटॅमिनची गरज आपसूकच भागते, हे ते विसरुनच जातात. केवळ गोळी घेऊन सगळं ठीक होत नाही. गरोदरपणात किंवा वय झाल्यावर अशा गोळ्या घेणं वेगळी गोष्ट आहे."

तरीसुद्धा लाखो लोक असे आहेत, जे सप्लिमेंट म्हणून व्हिटॅमिनच्या गोळ्या घेतात. पण निरोगी, धडधाकट लोकांनी व्हिटॅमिन सप्लिमेंट घेणं आवश्यक आहे?

भीती आणि आशेवर उभी असलेली बाजारपेठ

विज्ञानविषयक पत्रकार कॅथरीन प्राइस यांनी व्हिटॅमिन्सवर बराच अभ्यास केला आहे. त्यांच्या मते, विसाव्या शतकाच्या सुरूवातीला व्हिटॅमिन हा शब्द शोधून काढणाऱ्या पोलंडमधील बायोकेमिस्ट कॅशमेक फंक यांना मार्केटिंगसाठीचा पुरस्कारच मिळायला हवा.

त्या म्हणतात, "या दिशेने काम करणाऱ्या अन्य वैज्ञानिकांनी याला फूड हार्मोन किंवा फूड अॅक्सेसरी फॅक्टर अशी नावं दिली होती. पण या नावात ती कमाल नाहीये, जी व्हिटॅमिन या शब्दात आहे. दररोज आपल्या मुलांना फूड अॅक्सेसरी फॅक्टर देणं कोणालाच आवडणार नाही."

जे लोक त्याकाळात पैसा कमावण्याचा विचार करत होते, त्यांच्यासाठी व्हिटॅमिन ही संकल्पना एखाद्या लॉटरीसारखी ठरल्याचा कॅथरीन प्राइस यांचा दावा आहे.

त्या म्हणतात, "फूड प्रॉडक्ट्सचं मार्केटिंग करणाऱ्यांना वाटलं की, ही काहीतरी भारी गोष्ट आहे. कारण शास्त्रज्ञचं म्हणत होते की, आपल्या आहारात अशाकाही गोष्टी असतात ज्या दिसत नाहीत, ज्यांची वेगळी चव नसते. आपल्या शरीराला त्यांची आवश्यकताही अतिशय कमी प्रमाणात असते, पण त्यांच्या कमतरतेमुळे होणारे आजार प्राणघातक ठरू शकतात."

ज्या काळात व्हिटॅमिनवर संशोधन सुरू होतं, त्याच काळात फूड इंडस्ट्रीमध्येही अनेक बदल होत होते. खाद्यपदार्थांमध्ये जे अन्नघटक नैसर्गिकरित्या अस्तित्वात असतात, ते फूड प्रोसेसिंगदरम्यान नष्ट होत होते.

कॅथरीन प्राइस सांगतात, "फूड प्रोसेसिंगदरम्यान अन्नपदार्थात नैसर्गिकरित्या आढळणारे व्हिटॅमिन नष्ट होतात. त्यामुळे ही हानी भरून काढण्यासाठी प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थामध्ये सिंथेटिक व्हिटॅमिन मिसळले जाऊ लागले."

मार्केटिंगच्या भाषेत याला 'अॅडेड व्हिटॅमिन्स' असं म्हटलं गेलं आणि अशातऱ्हेनं 'अॅडेड व्हिटॅमिन्स' या संकल्पनेची चलती सुरू झाली. याच साखळीत 1930 मध्ये अमेरिकेमध्ये व्हिटॅमिनच्या गोळ्या तयार होऊ लागल्या. या गोळ्यांसाठी डोळ्यासमोर ठेवण्यात आलेला ग्राहकवर्ग होता महिला.

कॅथरीन प्राइस सांगतात, "मार्केटिंगमध्ये महिलांवर लक्ष केंद्रित करण्यात आलं. महिलांसाठी मासिकांमध्ये जाहिराती दिल्या गेल्या. हीच पद्धत सध्याच्या काळातही वापरली जाते. बायकांनी व्हिटॅमिनच्या सेवनाबद्दल जागरूक असलं पाहिजे, तरच त्यांचं कुटुंब निरोगी आणि निकोप राहील असं बिंबवलं जातं. मुलांना व्हिटॅमिन सप्लिमेंट देणं किती आवश्यक आहे, हे आयांना सांगितलं जातं."

1930 च्या दशकानंतर अमेरिकेमध्ये व्हिटॅमिन्सच्याच आधारावर फूड इंडस्ट्रीची भरभराट झाली. फूड सप्लिमेंट्सच्या या बाजारपेठेची उलाढाल 40 अब्ज डॉलर्सच्या घरात पोहोचली. बाजारपेठ मोठी होत गेली, पण व्हिटॅमिन्स मागे पडत गेले, असं कॅथरीन प्राइस यांचं म्हणणं आहे.

त्या सांगतात, "आपल्याला 13 व्हिटॅमिन्सची गरज असते. पण बाजारपेठेत सध्याच्या घडीला 87 हजारांहून अधिक फूड सप्लिमेंट्स आहेत. ही एक मोठी इंडस्ट्री उभी राहिलीये आणि आपण त्यावरच अवलंबून राहायला लागलो आहे. व्हिटॅमिन्स आपल्यासाठी आवश्यक आहेतच, पण फूड सप्लिमेंट्सच्या मेगा इंडस्ट्रीनं आपल्या डोक्यात भरवून दिलंय की, उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्याची गुरूकिल्ली या गोळ्यांमध्येच दडलेली आहे."

'व्हिटॅमिन्स फॉर व्हिक्टरी'

"व्हिटॅमिन्स फॉर व्हिक्टरी...युद्धात विजय मिळविण्यासाठी उत्तम आरोग्य असणं गरजेचं होतं. मिळवलेला विजय टिकविण्यासाठीही लोकांचं आरोग्य चांगलं असण्याची आवश्यकता होती. देशाला विजयाच्या वाटेवर ठेवण्यासाठी जनतेचं आरोग्य राखणं महत्त्वाचं होतं."

ब्रिटनच्या केंब्रिज विद्यापीठात 'फूड आणि न्यूट्रिशन' हा विषय शिकविणारे डॉक्टर सलीम अल-गिलानी सांगतात.

व्हिटॅमिनची सरकार दरबारी दखल घेतली गेल्याचे रोचक प्रसंग दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान पहायला मिळाले. 1941 साली राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन रुझवेल्ट यांच्या सरकारनं अमेरिकन सैनिकांसाठी चक्क 'व्हिटॅमिन अलाउन्स'चीच घोषणा केली.

ब्रिटीश सरकारही आपल्या सैनिकांच्या आरोग्याबद्दल चिंतित होतं. दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यानच ब्रिटननं हे निश्चित केलं की, त्यांच्या सैनिकांना व्हिटॅमिनची कमतरता भासता कामा नये.

डॉक्टर सलीम अल-गिलानी यांच्या मते, "1940 च्या दशकात ब्रिटन व्हिटॅमिन्सच्या बाबतीत जास्तच जागरूक झाला. सुशिक्षित लोक मार्केटिंगमुळे व्हिटॅमिन सप्लिमेंट घ्यायला लागले होते. व्हिटॅमिनच्या गोळ्यांना 'व्हाइट मॅजिक' असं म्हटलं जाऊ लागलं."

शरीराला व्हिटॅमिन कमी प्रमाणात मिळणं जितकं घातक आहे, तितकंच जास्त व्हिटॅमिनचं सेवनही घातक आहे.

दुसऱ्या महायुद्धानंतर डॉक्टरांच्या लक्षात आलं की, आवश्यकतेपेक्षा जास्त व्हिटॅमिन घेतल्यामुळे लहान मुलं आजारी पडत आहेत. सरकारनं ही गोष्ट गांभीर्यानं घेतली आणि आपली योजना बदलली.

1980 च्या दशकाच्या सुरुवातीला हे लक्षात आलं की, भ्रूणाच्या वाढीसाठी फॉलिक अॅसिडची आवश्यकता असते. हा 'व्हिटॅमिन बी'चा एक प्रकार आहे.

महिला बाळासाठी प्रयत्न करत असतील तर त्यांना सुरूवातीला फॉलिक अॅसिडची कमतरता दूर करण्यास सांगितलं जातं, तसंच गरोदरपणाच्या सुरूवातीच्या आठवड्यांमध्ये फॉलिक अॅसिडची कमतरता भरून काढण्याचाही सल्ला दिला जातो.

याबद्दल डॉक्टर सलीम अली-गिलानी सांगतात, "बऱ्याचदा गरोदरपण हे अनपेक्षित असतं, अशावेळी फॉलिक अॅसिडची कमतरता भरून काढण्यात खूप वेळ जातो. त्यामुळे अन्नधान्यापासून बनणाऱ्या फूड प्रॉडक्ट्समध्ये फॉलिक अॅसिडचं प्रमाण वाढविण्यात येऊ लागलं. जगभरातील जवळपास 75 देशांमध्ये ही गोष्ट अनिवार्य करण्यात आली. ब्रिटन आणि युरोपीय युनियनमधले देश मात्र याबाबतीत सुस्त राहिले. त्यांच्यावरही दबाव टाकण्यात येऊ लागला की, फूड प्रॉडक्ट्समध्ये फॉलिक अॅसिड असणं अनिवार्य करण्यात आला."

डॉक्टर सलीम अल-गिलानी यांच्या मते, व्हिटॅमिन विकणाऱ्या कंपन्या मोठे दावे करतात. सरकारं त्यासंबंधीचं नियमन योग्यपद्धतीनं करत नाहीत. कदाचित त्यामुळेच बरेचसे लोक व्हिटॅमिनसंबंधीच्या मार्केटिंगच्या जाळ्यात अडकतात.

ते सांगतात, "आरोग्यावर होणारे दुष्परिणाम आणि व्हिटॅमिन्समुळे होणारे फायदे याचा विचार करून लोक गोळ्या आणि सप्लिमेंट्स घ्यायला लागतात. व्हिटॅमिन्सबद्दल दिशाभूल करणारी माहिती मिळाल्यामुळेच लोक सहसा असं करतात. त्यांचा गैरसमज कोणी दूरही करत नाही. यामुळेच जगभरात व्हिटॅमिनचा व्यवसाय जगभर पसरत गेला."

परफेक्शनचा ध्यास

"जगभरात मध्यमवर्ग वाढत आहे. या वर्गाकडे खरेदी करण्याची क्षमता असते, पैसा असतो. त्यांच्याकडे स्वतःच्या आरोग्यावर गांभीर्यानं विचार करण्याइतका वेळही असतो."

युरो मॉनिटर या रिसर्च संस्थेत काम करणाऱ्या मॅथ्यू ओस्टर यांना असं वाटतं. त्याचं काम हे आरोग्य विषयावर जगभरातील ग्राहकांच्या माहितीचं विश्लेषण करणं हेच आहे.

ते सांगतात, "हेल्थ प्रॉडक्टचा खप आशिया खंडात वेगानं वाढत आहे. चीन ही वेगानं वाढणारी बाजारपेठ आहे. आग्नेय आशियातील देशांमध्ये विशेषतः थायलंड आणि व्हिएतनाममध्ये हेल्थ प्रॉडक्टचं मार्केट वाढत आहे. आशियामध्ये हे मार्केट गेल्या काही वर्षांत खूप कमर्शिअल झालं आहे."

मॅथ्यू ऑस्टर यांना वाटतं की, तरुण व्हिटॅमिन्सच्या गोळ्या खात आहेत. हेल्थ प्रॉडक्ट्सच्या मागणीत जागतिक पातळीवर जी वाढ होत आहे, त्यामागे हे पण एक कारण आहे.

ते सांगतात, "गेल्या काही वर्षांत आपण पाहिलं की, लोक अगदी लहान वयातच व्हिटॅमिनच्या गोळ्या घेतात. आधीच्या पिढीत असं काही नव्हतं. पण आता प्रत्येकाला 'सेक्सी आणि कूल' दिसायचं आहे. सेलिब्रिटी आपल्या लुक्स आणि फिटनेसमधून या गोष्टीला उत्तेजन देतात."

पण हा ट्रेंड असाच राहील की लोक गोळीपेक्षा आपल्या जेवणाच्या थाळीकडे अधिक लक्ष द्यायला लागतील?

मॅथ्यू ऑस्टर म्हणतात, "मला वाटतं की, या इंडस्ट्रीच्या वाढीचा वेग मंदावेल. आता ग्राहकांचा एक असा वर्ग आहे, जो सध्या गोळ्या खात नाहीये. ग्राहकांनी स्वतःलाच बजायला हवं आहे की, जेवणातूनच आपल्याला पुरेसं पोषण मिळायला हवं. जर आपण चौरस आहार घेतला आणि ताण-तणाव कमी केले तर अपवादात्मक परिस्थिती वगळता सप्लिमेंट्सची गरज पडणार नाही."

काही लोकांची प्रकृतीच अशी असते की, त्यांना फूड सप्लिमेंट्स घ्यावेच लागतात. पण एखादी निरोगी, धडधाकट व्यक्ती सप्लिमेंट्स का घेते हा खरा प्रश्न आहे.

तुम्हीही हा प्रश्न एकदा स्वतःला विचारून पाहा आणि त्याचं प्रामाणिक उत्तर द्या. कारण आरोग्य तुमचं आहे, त्यावर खर्च होणारा पैसाही तुमचा आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)