समुद्रातल्या शेवाळाचा वापर भविष्यात अन्न आणि इंधन म्हणून केला जाऊ शकतो?

    • Author, अड्रिन मुरे,
    • Role, बीबीसी प्रतिनिधी, फरो

"इथं थोडा वारा आहे. या हार्वेस्टिंग बोटीवर बसून किती दूर जाता येईल, ते बघू."

थोड्याच वेळात आम्ही एका निवाऱ्याजवळ पोहोचलो. इथं उंचच उंच पर्वत समुद्राच्या लाटांचा आनंद घेत वसलेले आहेत. या परिसरातील तापमान नेहमीच 6 ते 11 डिग्री सेल्सिअस यादरम्यान कायम असतं.

समुद्री शेवाळाच्या उत्पादनाशी संबंधित ओशियन रेनफॉरेस्टचे संचालक ओलेवर ग्रेगसन सांगतात, "त्या एका विशिष्ट रेषेत आहेत. प्रत्येकी एका मीटर अंतरावर एक रांग खालच्या बाजूने आहे. इथंच सी-वीड (समुद्री शेवाळ) उगवते. समुद्रात खोलपर्यंत आढळून येणाऱ्या या शेवाळात अनेक पौष्टिक घटक आहेत."

यांत्रिकीकरण

खाद्य उद्योग आणि इतर क्षेत्रातून मागणी वाढल्यामुळे ग्रेगसन यांची कंपनी युरोप आणि उत्तर अमेरिकेतील समुद्री शेवाळांच्या आसपास ठाण मांडून आहे.

ते सांगतात, "याचा वापर जेवणासाठी तसंच जेवण बनवण्यासाठीही होऊ शकतो. इंधन म्हणूनही याचा उपयोग केला जाऊ शकतो.

समुद्री शेवाळ वेगाने वाढतं. हे सूर्याकडून ऊर्जा तर समुद्रातील पाण्याकडून पोषणतत्व आणि कार्बनडाय ऑक्साईड मिळवतात. समुद्री शेवाळ ग्लोबल वॉर्मिंगशी लढण्यासाठी उपयोगी ठरू शकतात. तसंच कार्बन उत्सर्जनाची भरपाई करू शकतात, असंही तज्ज्ञ सांगतात.

ओशियन रेनफॉरेस्टला नुकतेच अमेरिकेच्या ऊर्जा विभागाकडून निधी मिळाला आहे. त्यांनी कॅलिफोर्नियामध्येसुद्धा अशीच यंत्रणा उभी करावी, असं त्यांनी म्हटलंय.

समुद्री शेवाळ काढण्याचं काम लवकर होतं. पण हे अतिशय घाणेरडंसुद्धा मानलं जातं.

कंपनी या कामाचा आवाका वेगाने वाढवत आहे. यावर्षी दुप्पट क्षमतेने हे काम केलं जाण्याची शक्यता आहे.

सध्या तरी या कामातून जास्त परतावा मिळत नाही, पण येत्या काळात या व्यवसायातील उत्पन्न मोठ्या प्रमाणात वाढेल, असा अंदाज आहे.

सौंदर्य प्रसाधनं आणि औषधं

समुद्री शेवाळावर तातडीने प्रक्रिया करण्याची आवश्यकता असते. ते कापून आणल्यानंतर त्याची सफाई करण्याचं काम फारोईस गावातील एका छोट्याशा कारखान्यात केलं जातं.

यातलं काही शेवाळ वाळवलं जातं तर काही खाद्य उत्पादकांना पाठवण्यात येतं. उर्वरित शेवाळ जनावरांसाठी खाद्य बनवणाऱ्या कंपन्यांना पाठवलं जातं.

समुद्री शेवाळाची शेती प्रामुख्याने खाद्य म्हणून केली जाते. सोबतच टुथपेस्ट, कॉस्मेटिक, औषधं किंवा पाळीव प्राण्यांचं खाद्य म्हणूनही याचा वापर होतो. या सर्व उत्पादनांमध्ये समुद्री शेवाळात आढळणाऱ्या हायड्रोकोलॉईड्सचा वापर केला जातो. होतो.

सध्या टेक्स्टाइल आणि प्लास्टिक इंडस्ट्रीचा पर्याय म्हणूनही याकडे पाहिलं जात आहे.

वॉटर कॅप्सूल किंवा स्ट्रॉ बनवण्यासाठीही याचा वापर केला जाऊ लागला आहे. समुद्री शेवाळाचं उत्पादन सध्याचा काळात बरंच वाढलं आहे.

2005 ते 2015 दरम्यान याचा वापर दुप्पट झाला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या फुड अँड अॅग्रीकल्चर ऑर्गनायझेशनच्या अहवालानुसार, वार्षिक 3 कोटी टन समुद्री शेवाळाचं उत्पादन केलं जात आहे.

जगभरात याचा व्यवसाय 6 अब्ज डॉलरपेक्षाही जास्त आहे. पण तरीसुद्धा आशिया खंडात काही ठिकाणीच याची शेती होते. हे काम अतिशय कष्टाचं असल्यामुळे कमी प्रमाणात ते केलं जातं.

अधिक श्रमाची आवश्यकता

एनेट ब्रह या डेन्मार्कच्या आरहस युनिव्हर्सिटीमध्ये वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून काम पाहतात.

त्यांच्या मते, युरोपमध्ये मजुरी अत्यंत महाग आहे. यामुळे याचं उत्पादन स्वस्त बनवण्यासाठी ते वाढवण्याची आवश्यकता आहे. उत्पादन खर्च कमी झाला तर ते स्वस्त होऊ शकतं. वेगवेगळ्या भागातलं पाणी हे वेगळं असतं. याबाबतही संशोधन होण्याची गरज आहे. एकच पद्धत सर्व ठिकाणी वापरता येणार नाही."

अनेट यांच्या मते, या क्षेत्रात अधिक संशोधन झाल्यास चांगल्या पद्धतीने काम करता येऊ शकतं.

सिनटेफ यांच्यासारखे संशोधक असंच काहीसं करण्याच्या प्रयत्नात आहेत. नॉर्वेचे संशोधक समूह शेती सुकर बनवण्यासाठीच्या तंत्रज्ञानाबाबत काम करत आहेत.

संशोधक सिजे फोर्बर्ड सांगतात, सध्याच्या काळात बहुतांश समुद्री शेवाळाचा वापर खाण्यासाठी केला जात आहे. पण भविष्यात याचा वापर मत्स्य आहार, खते आणि बायोगॅससाठी केला जाऊ शकतो. त्यासाठी याचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेण्याची गरज आहे.

प्रयोगशाळा, आधुनिकीकरण आणि आव्हानं

प्रोटोटाईप मशीनप्रमाणे समुद्री शेवाळ स्पीनर स्वयंचलित पद्धतीने शैवालाचं रोपण करतात. याशिवाय उत्तर पोर्तुगालमध्ये SPOKE नावाची आणखी एक पद्धत वापरली जाते. ते काम पाहणाऱ्या कंपनीच्या संचालक हेलेना एब्रू यांच्या मते, ही पद्धत जास्त फायदेशीर आहे.

एब्रू सांगतात, खाऱ्या पाण्याच्या सरोवरातही याची शेती केली जाऊ शकते. या पाण्यात समुद्री शेवाळ उगवू शकतं. हे पाणी नायट्रोजनयुक्त असतं. शैवाल अशाच वातावरणात उगवतं. यासाठी कोणतंच खत वापरण्याची गरज नाही.

या कामात सर्वात मोठं आव्हान म्हणजे विजेचा खर्च. टँकमध्ये पाणी चालू ठेवण्यासाठी पंप सतत सुरू ठेवावा लागतो. यासाठी विजेची आवश्यकता असते.

याची बाजारपेठ अजूनपर्यंत मोठी झालेली नाही. त्यामुळे याच्या उत्पादन खर्चाचा धोका अद्याप स्वीकारू शकत नाही. पण आगामी काळात समुद्री शेवाळाची मागणी नक्कीच वाढेल, असा विश्वास हेलेना व्यक्त करतात.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)