सुप्रिया सुळे: ‘माय सीकेपी मोमेंट’ वर ट्रोल झाल्यावर सुप्रिया सुळेंची सारवासारव?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी माय सीकेपी मोमेंट हे ट्वीट केलं आणि त्यानंतर त्यावर नाराजीचा सूर उमटला होता. आता त्यांनी पुन्हा एक ट्वीट टाकून या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

आता सुप्रिया सुळेंनी पुन्हा एक ट्वीट करून त्यांचे पती सदानंद सुळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हॅप्पी बर्थ डे सीकेपी असं म्हणून त्यांनी पुढे कुल, काइंड हार्टेड प्लाटून असं म्हटलं आहे.

गणेशोत्सवानिमित्त ठाकरे-पवार कुटुंब एकत्र आले होते. या भेटी दरम्यान काढण्यात आलेला फोटो खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवर अपलोड केला, पण त्यावर नेटिझन्सकडून मात्र जोरदार टीका झाली.

सुप्रिया सुळेंनी काढलेल्या सेल्फीत मागे त्यांचे पती सदानंद सुळे, आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे, वरुण सरदेसाई आणि शौनक पाटणकर आहेत. ही पोस्ट टाकताना सुप्रिया सुळेंनी सीकेपी असं म्हटलं.

'MY CKP MOMENT' असं म्हणत त्यांनी फोटोत असलेल्या सगळ्यांच्या आडनावांचा उल्लेख केला. हा फोटो 31 ऑगस्टला रात्री 9 वाजून 53 मिनिटांनी पोस्ट करण्यात आला. तेव्हापासून दुपारी साधारण चारवाजेपर्यंत 432 जणांनी पोस्टखाली आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

या प्रतिक्रियांमध्ये नाराजीचा सूर दिसत आहे. सुप्रिया सुळे लोकप्रतिनिधी असूनही त्यांनी उघडपणे असा जातीचा उल्लेख करून पोस्ट का टाकली? यावर आक्षेप घेतला जातोय.

ट्विटवर प्रतिक्रिया देणारे अरविंद जोशी म्हणतात, "आपल्या जातीचा उल्लेख अभिमानाने करणे हे लोकप्रतिनिधींना शोभत नाही. जातीअंत केवळ भाषणांपुरताच बोलण्यासाठी आहे का? आपल्या वडिलांनी 'मी मराठा आहे,' असा उल्लेख कधीही केला नाही."

प्रितीश साठे म्हणतात, "विदर्भ पाण्याखाली असताना तुम्ही मराठा, सीकेपी, दलित, ब्राह्मण करत बसा. हे पुरोगामी महाराष्ट्रात कसे चालते?"

वर्षा राजपूत म्हणतात, "वैयक्तिक फोटोला जातीयवादी स्वरूप देणे योग्य वाटत नाही."

"असं करून तुम्ही जातीयवादाला खतपाणी खालत आहात असं नाही का वाटतं," असा सवाल राज कदम यांनी विचारला आहे.

अशा अनेक कॉमेंट्स सुळेंच्या पोस्टखाली लिहिलेल्या दिसून येतात.

सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सहकुटुंब मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरी गणपतीचं दर्शन घेतले. मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान 'वर्षा' याठिकाणी शरद पवार, त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार, खासदार सुप्रिया सुळे, त्यांचे पती सदानंद सुळे, यांची दोन्ही मुलं असा परिवार उपस्थित होता.

यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासह त्यांची पत्नी रश्मी ठाकरे, त्यांची मुलं आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे, मावशीचा मुलगा आणि युवा सेनेचे सरचीटणीस वरुण सरदेसाई आणि खा. संजय राऊत उपस्थित होते.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)