शरद पवारांचा उत्तराधिकारी काळच ठरवेल : सुप्रिया सुळे - विधानसभा निवडणूक

बीबीसी मराठीला दिलेल्या विशेष मुलाखतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे पक्षांतर करून जाणारे नेते, ईडी, प्रचारातले मुद्दे, घराणेशाही, अजित पवारांचा राजीनामा या विषयांवर बोलल्या. पवार घराण्यात कोणताही संघर्ष नसून शरद पवार यांचा उत्तराधिकारी काळच ठरवेल असं सुप्रिया सुळेंनी या मुलाखतीत म्हटलं. त्या मुलाखतीचा सारांश-

ज्यांचे हात बरबटलेले आहेत त्यांच्याभोवती ईडीचा फास आवळला जाणारच, असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी 'सामना'ला दिलेल्या मुलाखतीत केलं होतं.

त्याबाबत सुप्रिया सुळे यांना विचारलं असता त्यांनी उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर देताना म्हटलं, की सत्ताधाऱ्यांकडून ईडीच्या माध्यमातून विरोधकांना लक्ष्य केलंच जात आहे, मात्र मित्र पक्षांच्याही फाईल्स ओपन ठेऊन त्यांना भीती दाखवली जाते आहे.

मित्र पक्षांनी विरोधात जाऊ नये म्हणून या फाईल्स त्यांच्यावर टांगत्या ठेवल्या जात आहेत, असं सुळे यांनी बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय.

राज्याच्या निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यातल्या मुद्द्यांऐवजी इतर मुद्द्यांवरच बोलत असल्याची टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे. "मुख्यमंत्री यशस्वी आहे म्हणतात. पण पाच वर्षांत एकही ठोसपणे सांगण्यासारखं काम त्यांच्याकडे नाही. दिल्लीत ज्या गोष्टी हिंदीमध्ये ऐकते त्याच गोष्टी महाराष्ट्रात मुख्यमंत्री मराठीत बोलतात. यात तुमचं योगदान काय? ही राज्याची निवडणूक आहे. मग येथे महाराष्ट्राचे प्रश्न का नाहीत?" असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

पक्षांतरामुळे राष्ट्रवादीला फटका नाही

गेल्या काही महिन्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधून मोठ्या संख्येनं नेते भाजपमध्ये गेले आहेत. त्याबद्दल सुप्रिया सुळे यांनी म्हटलं, की या पक्षांतरांमुळे पक्षाला विशेष फटका बसला नाहीये.

जे नेते भाजपमध्ये गेले त्यांना उलट कमी महत्व मिळतंय, असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं. त्यासाठी त्यांनी गणेश नाईक यांचं उदाहरण दिलं.

"गणेश नाईक जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते तेव्हा ते तीस-तीस आमदारांना तिकीट वाटत होते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना त्यांची आन-बान-शान होती. आज त्यांना भाजपमधून दोन तिकिटं मिळवणं सुद्धा शक्य झालं नाही."

ज्या इतर नेत्यांना मुलांमुळे पक्षांतर करावं लागलं त्यांना सुप्रिया सुळे यांनी टोला लगावला.

"गणेश नाईक यांना त्यांच्या मुलाचं तिकीट घ्यावं लागलं. अर्थात त्यांच्या मुलाचंही कौतुक आहे, की त्यानं वडिलांसाठी जागा सोडली. नाही तर सध्या महाराष्ट्रात मुलांच्या मागे वडिलांना फरफटत जावं लागत आहे."

भाजपला पाठिंबा देण्याचा 'तो' निर्णय योग्यच

भारतीय जनता पक्षाचं राज्यातील सरकार 2014 मध्ये वाचवण्यात राष्ट्रवादी काँग्रेसनं जी भूमिका घेतली ती योग्यच असल्याचं सुप्रिया सुळे यांनी मुलाखतीत म्हटलं आहे. भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय चुकीचा होता असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं. मात्र सुप्रिया सुळे यांनी त्यांच्याशी असहमती दर्शवली आहे.

या विधानसभा निवडणुकीत महिलांना 30 टक्के उमेदवारी देऊ न शकल्याची कबुली सुप्रिया सुळे यांनी दिली असून इच्छा असूनही हे शक्य झालं नसल्याचं त्यांनी म्हटलं. निवडून येण्याची क्षमता या निकषामुळे महिलांना पुरेशा प्रमाणात उमेदवारी देणं शक्य होत नसल्याचं त्यांनी सांगितलं.

"यशवंतराव चव्हाणांशी रक्ताचं नातं नसतानाही शरद पवार त्यांचे उत्तराधिकारी ठरले. त्यामुळे शरद पवारांचा उत्तराधिकारी अमुकच एक असेल असं म्हणता येणार नाही. पवारांची उत्तराधिकारी मी असू शकते, अजित पवार असू शकतात किंवा इतरही कोणी असू शकतो."

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)