शरद पवार : 'एखाद्या वाघासारखे चवताळून उठलेत,' पण त्यांना उशीर झाला आहे का?

    • Author, नामदेव अंजना
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

राज्याच्या निवडणुका जाहीर होण्याच्या आधीपासूनच शरद पवार पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे राज्याचा दौरा करत आहेत. त्यांच्या पक्षाला मोठी खिंडार पडली आहे. नेते सोडून गेलेत. आहेत त्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत, काहींच्या चौकश्या सुरू आहेत. तर काहींवर नव्यानं गुन्हे दाखल होत आहेत. शरद पवारांवरही ईडीनं गुन्हा दाखल केला आहे.

शरद पवारांना नेते का सोडून गेले, पक्षाची धुरा पूर्णपणे हातात घेण्याची वेळ त्यांच्यावर वयाच्या 80 व्या वर्षी का आली. याआधी 2 वेळा पवारांबाबत असं घडलं होतं, तेव्हा त्यांना राज्यभर फिरून यश आलं होतं. पण यंदा त्यांना यश येईल का, या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा केलेला हा प्रयत्न.

"आत्मविश्वास ढळू न देता एखाद्या वाघानं चवताळून उठणं म्हणतात ना, तसं शरद पवार आता चवताळून उठलेत," असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले.

गेल्या काही दिवसात राष्ट्रवादी काँग्रेसमधील दिग्गज नेत्यांनी भाजपची वाट धरली. त्यानंतर शरद पवारांनी मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांना तरूणांचा चांगला प्रतिसाद लाभल्याचं पाहायला मिळाला.

शरद पवार यांच्या वयाची ऐंशी जवळ आली, तरीही ते अजून तळागाळात पोहोचून, लोकांमध्ये जाऊन सभा घेताना दिसत आहेत.

स्वत: शरद पवार त्यांच्या वयाबाबत साताऱ्यातील सभेत म्हणाले, "काही लोक मला वयस्कर म्हणतात. पण मी गरज पडली तर सोळा नाही, आठरा तास काम करेन. पण महाराष्ट्र चुकीच्या हातात जाऊ देणार नाही."

ज्येष्ठ पत्रकार प्रताप आसबे म्हणतात, "आपली विचारधारा टिकून राहिली पाहिजे, असं पवारांना वाटतं. कट्टरतावद्यांच्या ते विरोधात आहेत. शिवाय, राजकारणात प्रत्येकवेळी नव्या पिढ्या त्यांनी आणल्या आहेत. त्यामुळे तोही प्रयत्नही यातून दिसून येतो."

मात्र तरीही वयानुसार येणाऱ्या मर्यादांवर मात करणाऱ्या शरद पवारांच्या उर्जेची चर्चा राज्यात सुरूच आहे.

'...पण पवारांना उशीर झालाय हे मात्र नक्की'

ज्येष्ठ पत्रकार भारतकुमार राऊत म्हणतात, "आता राष्ट्रवादी काँग्रेस अत्यंत अडचणीत आहे. एका बाजूला पक्षाला गळती लागलीय, दुसरीकडे पक्षाच्या नेत्यांवर वेगवेगळे आरोप होतायत. अशावेळेस पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवायचं असेल, त्यासाठी शरद पवारांनी रस्त्यावर उतरणं गरजेचं होतं."

राऊत पुढे म्हणतात, "शरद पवार हे मुळातच चळवळीतले नेते आहेत. ते दरबारी राजकारणी नाहीत. ते रस्त्यावरचे राजकारणी आहेत. ते अक्षरश: पिंजून काढतायत, गावागावात जातायत. याचा निश्चित परिणाम पक्षाच्या हितासाठी होणार आहे."

"लोकसभेच्या निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणीबाणी निर्माण झाली. लोकसभेतील पराभवानंतर पक्षाला गळती लागली. त्यामुळे शरद पवारांना दौऱ्याचं पाऊल उचलावं लागलं. म्हणजेच, परिस्थितीमुळे त्यांना उशीर झालाय. आता गळ्यापर्यंत पाणी आल्यानं पवारांसारख्या मोठ्या नेत्याला मैदानात उतरणं भाग पडलंय," असं भारतकुमार राऊत म्हणतात.

"तर शरद पवारांनी प्रचाराची सगळी धुरा आपल्या खांद्यावर घेतली आहे, या वयात त्यांनी हत्यार टाकण्याऐवजी लढण्याचा निर्णय घेतलाय, पण उशीर झालाय हे मात्र नक्की," असं ज्येष्ठ पत्रकार रवींद्र आंबेकर म्हणतात.

भारतकुमार राऊत म्हणतात, "परिस्थिती सांभाळण्यासाठी ते प्रयत्न करतायत. यश म्हणजे निवडणूक जिंकणं असेल, तर ते यश येईल असं वाटत नाही. नुकसान कमी करणं हे यश मानलं, तर ते यश नक्कीच पवारांना मिळेल."

'...म्हणून नेते सोडून गेले'

पवारांना नेते सोडून का जातात, यावर बोलताना भारतकुमार राऊत म्हणतात, "पवारांनी कायम सत्तेचं राजकारण केलंय. सत्तेचे पक्षी सत्तेशिवाय राहू शकत नाही. त्यामुळे सत्ता गेल्यानंतर अनेक नेते पक्ष सोडून गेले. 1980 साली सुद्धा पवारांच्या समाजवादी काँग्रेसनं 54 आमदार निवडून आणले. मात्र, बघता बघता सगळे निघून गेले आणि सहा-सात आमदारच सोबत राहिले. याचा अर्थ ज्यावेळी सत्तेचं राजकारण केलं जातं, त्यावेळी हे होणं स्वाभाविक आहे."

"भाजप, समाजवादी पार्टी, शेकाप या पक्षांनी विरोधकांचं राजकारण केलं, त्यामुळे त्यांना विरोधात बसण्याची सवय होती. शरद पवारांच्या पक्षातील नेत्यांना ही सवय नव्हती. कारण त्यांना सत्तेवरच त्यांचं राजकारण अवलंबून होतं," राऊत पुढे सांगतात.

रवींद्र आंबेकर म्हणतात, "शरद पवारांनी 80 व्या वर्षी प्रचाराची धुरा आपल्या खांद्यावर घ्यावी हा खरं तर शरद पवारांचाच पराभव आहे. शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली त्यावेळी राज्यातली तरूण नेत्यांची फळी त्यांच्या मागे गेली. तरूण नेत्यांना त्यांनी नेतृत्व दिलं. त्यानंतर त्या तरूण नेत्यांनी पक्षावर कब्जा केला, सत्तेचे सगळे लाभ घेतले."

"भ्रष्टाचारामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आघाडीवर राहिले. या नेत्यांवर वेळीच कारवाई केली असती, दुसऱ्या - तिसऱ्या फळीला वेळीच ताकद दिली असती तर कदाचित आज इतरी पडझड झाली नसती. शरद पवारांना जीवाचं रान करून फिरावं लागलं नसतं."

'मंत्री झाले, पण संघटनेपासून दूर गेले नाहीत'

ज्येष्ठ पत्रकार प्रताब आसबे म्हणतात, "विरोधकी बाकांवर गेल्यावर शरद पवार जास्त आक्रमक होतात, असा इतिहास आहे."

आसबे पुढे म्हणतात, "शरद पवार खूप मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये जातात. त्यांचा सतत लोकांशी संपर्क असतो. छोट्या-छोट्या गावात ते जातात. त्यांचा जनसंपर्क मोठा आहे. हल्लीच्या काळात ते खूप दौरे करतात. सत्तेत असले किंवा नसले तरी दौरे खूप करतात."

काँग्रेसचे वरिष्ठ नेते उल्हास पवार म्हणतात, "60 च्या दशकात यशवंतराव चव्हाण प्रचंड लोकप्रिय होते. त्यांचा मानसपुत्र अशी शरद पवारांची ओळख त्या काळात झाली. त्यामुळे अर्ध चैतन्य पवारांना तिथेच मिळालं. मग पक्ष समजून घेतला, शिबिरं घेतली. महाराष्ट्रभर फिरून तरूण मित्र जोडले, संघटना समजून घेऊन बांधणी केली. युवक काँग्रेस आणि प्रदेश काँग्रेस असा दोन्ही ठिकाणचा त्यांचा संघटना बांधणीचा अनुभव प्रदीर्घ आहे."

पवारांना सध्या मिळत असलेल्या प्रतिसादाबद्दल बोलताना उल्हास पवार म्हणतात, "मंत्री झाल्यावरही शरद पवार कधीच संघटनेपासून दूर गेले नाहीत. त्यामुळे लोक त्यांच्यापासून दूर गेले नाहीत."

संघटना बांधणीसह पवारांमधील खिलाडूवृत्तीचा उल्लेख महाराष्ट्र टाईम्सचे वरिष्ठ सहाय्यक संपादक विजय चोरामारे करतात.

विजय चोरमारे म्हणतात, "सामना खूप विषम आहे, याची जाणीव पवारांसह सगळ्यांनाच आहे. परंतु विषम असला म्हणून सामनाच खेळायचा नाही किंवा नुसता खेळल्याचा देखावा करायचा हे पवारांसारख्या आयुष्यभर राजकारणासोबतच क्रीडांगणावर वावरणाऱ्या पट्टीच्या खेळाडूला मान्य होणारे नाही."

पवार नव्या पिढीचे हिरो बनतायत?

उल्हास पवार म्हणतात, "जनरेशन गॅपमुळं काही लोकांमध्ये अंतर पडतं. मात्र, शरद पवारांना हा अडसर कधीच आला नाही. कारण सत्तेतली किंवा विरोधातली पदं भूषवत असताना नवनवीन तरूणांना भेटून त्यांच्या आशा-आकांक्षा ते जाणून घेतात. त्यामुळे नव्या पिढीला काय हवंय, ही ओळखण्याची ताकद त्यांच्यात आहे."

"जनरेशन गॅप न ठेवता हा ऐंशी वर्षांचा माणूस ज्या तऱ्हेने फिरतोय, ज्या चैतन्यानं बोलतोय, ते आकर्षण करणारं आहे. आत्मविश्वासानं सगळ्या गोष्टींवर मात करणारं आहे." असं उल्हास पवार म्हणतात.

महाराष्ट्र टाइम्सचे वरिष्ठ सहाय्यक संपादक विजय चोरमारे म्हणतात, "काही महिन्यांपूर्वीपर्यंत असं चित्र होतं की शरद पवारांचा नव्या पिढीशी कनेक्ट नाही. परंतु परवाची सोलापूरची मिरवणूक आणि मराठवाड्यातील ताजी गर्दी पाहिल्यावर लक्षात येते की पवार पुन्हा नव्या पिढीचे हिरो बनत आहेत. सत्ताधारी पक्षाविरुद्ध जो असंतोष खदखदतो आहे तो संघटित करण्यात पवारांना यश येतंय."

पवारांकडे तरूणवर्ग आकर्षित होण्याला कारण सांगताना उल्हास पवार म्हणतात, "जो माणूस जाहीरपणे सांगातो की, आता मला कोणतेही पद नको, त्यावेळी लोकांचा विश्वास बसतो. सर्व महत्त्वाची पदं त्यांनी भोगली आहेत. आता राहिलं काय? शिवाय, त्यांनाही कळतं की, आणखी काय मिळालं, तर ते बोनस असेल. पण ज्यांनी दगा दिला, त्यांना धडा शिकवायला हवा, हेही त्यांना माहीत आहे."

शिवाय, "मी काँग्रेस पक्षात असूनही सांगतो, महाराष्ट्रात काँग्रेसमध्ये नेतृत्त्वच नाही. किंबहुना, राष्ट्रवादीची दुसरी फळीही निष्प्रभ वाटते. या सगळ्यांसमोर शरद पवार प्रचंड वरचढ ठरतात. आक्रमक भाषेसोबत सौजन्यता, बोलण्यातली सभ्यता, भारदस्तपणा, अशा अनेक गोष्टी पवारांमध्ये दिसून येतात," असंही उल्हास पवार सांगतात.

विरोधकाच्या भूमिकेत असताना शरद पवारांच्या दोन टप्प्यांचा विशेष उल्लेख महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात केला जातो. पहिला टप्पा म्हणजे, 1980 साली पुलोदचं सरकार बरखास्त झाल्यानंतर सलग पाच वर्षं शरद पवार विरोधी बाकांवर बसले होते, तर 1999 काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर राष्ट्रवादीची स्थापना हा दुसरा टप्पा.

…तेव्हाही पवारांना तरूणांचा पाठिंबा

आणीबाणीनंतर 1980 साली केंद्रात इंदिरा गांधी यांची सत्ता आल्यानंतर त्यांनी महाराष्ट्रातील शरद पवारांच्या नेतृत्त्वातील पुलोदचं सरकार बरखास्त केलं होतं. या पुलोद सरकारमुळे वयाच्या 38 व्या वर्षी शरद पवार पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले होते.

1980 च्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या समाजवादी काँग्रेसचे महाराष्ट्रात फक्त 54 आमदार निवडून आले होते, तर इंदिरा काँग्रेसचे 187 आमदार जिंकले होते. त्यामुळे पर्यायानं पवारांची समाजवादी काँग्रेस विरोधकाच्या रूपात गेली. 1967 साली पहिल्यांदा आमदार झाल्यानंतर प्रथमच पवार विरोधी बाकांवर बसले होते.

'लोक माझे सांगाती' या आपल्या राजकीय आत्मकथेत शरद पवारांनी या कालावधी रेखाटला आहे.

विशेष म्हणजे, पवारांच्या समाजवादी काँग्रेसमधील सहा-सात आमदार वगळता सर्व आमदार काँग्रेसमध्ये गेले.

त्यावेळचा अनुभव सांगताना शरद पवार म्हणतात, 'माझ्या आमदारांनी पक्ष सोडला, त्यावेळी मी लंडनला होता. तिथून परतल्यावर विमानतळावर स्वागतासाठी प्रचंड संख्येत युवक होते. तरूणांचा आपल्यावर भरवसा असल्याची अनुभूती मिळाली. आमदारांच्या सोडून जाण्यानं मनात निर्माण झालेल्या अस्वस्थतेवर तरूणांच्या पाठिंब्यामुळे उमेद रोवली गेली. आपण पुन्हा शून्यातून जग उभं करू, अशा निर्धारानं दुसऱ्या दिवसापासून कामाला लागलो."

पवारांच्या नेतृत्त्वातील 1980 ची शेतकरी दिंडी

आज ज्याप्रकारे शरद पवारांच्या राज्यव्यापी दौऱ्याची चर्चा होते, तसेच दौरे 1980-81 च्या काळात केले होते.

त्याबद्दल शरद पवार लिहितात, "आठवड्याला पाच दिवस राज्यभर दौरे करायचे, असं ठरवलं होतं. त्यात समाजातल्या वेगवेगळ्या घटकांशी अनौपचारिक गप्पागोष्टी करण्यावर मी अधिकाधिक भर दिला."

शरद पवारांच्या पुढाकारनं 7 डिसेंबर 1980 साली जळगावमधून नागपूरच्या दिशेनं निघालेली 'शेतकरी दिंडी' त्यावेळी विशेष गाजली.

विरोधात असल्यानं आपल्याला खूप वेळ मिळाला, त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांच्या समस्या जाणून घेता आल्या, असंही पवार लिहितात.

1980 साली बॅरिस्टर अंतुले, 1982 ला बाबासाहेब भोसले, नंतर वसंतदादा पाटील, नंतर निलंगेकर असे 1985 पर्यंत मुख्यमंत्री होते. या काळात पवार विरोधी बाकांवरच होते.

1980 ते 1985 या कालावधीत विरोधी बाकावर बसून विरोधकाची भूमिका निभावल्यानंतर पुढे 1986 साली शरद पवार राजीव गांधी यांच्या नेतृत्त्वात पुन्हा काँग्रेसमध्ये आले. आपला समाजवादी काँग्रेस पक्ष त्यांनी काँग्रेसमध्ये विलीन केला.

"1980 ते 85 काळात विरोधक म्हणून पवारांनी जनआंदोलन, मोर्चे सुरूच ठेवले. विशेष म्हणजे, याला त्यांनी सामाजिक चळवळीचीही जोड दिले. 1978 साली बाबा आढावांच्या एक गाव एक पाणवठा चळवळीला त्यांनी जाहीर पाठिंबा दिला," असं उल्हास पवार सांगतात.

त्यानंतर जवळपास 10 ते 12 वर्षांनी म्हणजे 1999 साली पुन्हा एकदा शरद पवार हे रस्त्यावर उतरल्याचं महाराष्ट्राच्या जनतेनं पाहिलं.

"महाराष्ट्राच्या बदलत्या अर्थव्यवस्थेत शेतकरी जातीचे महत्त्व कमी होऊ लागले होते. या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी सोनिया गांधींच्या नेतृत्त्वाला विरोध करत, 10 जून 1999 रोजी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली," असं 'महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष' या पुस्तकातील 'राष्ट्रवादी काँग्रेस' या लेखात नितीन बिरमल लिहितात.

'1999 साली पवारांना आजच्या एवढा तरूणांचा प्रतिसाद नव्हता'

राष्ट्रवादीची स्थापना केल्यानंतर काही महिन्यातच देशात लोकसभा आणि राज्यात विधानसभा निवडणुका झाल्या. पवारांच्या नव्या पक्षाला कमी अवधी मिळाला. समोर शिवसेना-भाजप युती आणि कँग्रेस असे पक्ष उभे ठाकले होते.

नितीन बिरमल सांगतात, "सेना-भाजप आणि काँग्रेसला आव्हान देण्यासाठी पवारांनी सपा, आरपीआय (आठवले गट), शेतकरी संघटना, शेकाप या पक्षांना सोबत घेतलं."

1999 साली राष्ट्रवादीनं महाराष्ट्रात विधानसभेला 288 पैकी 217 जागा लढवल्या. त्यातील 57 जागा जिंकल्या.

नवा पक्ष असल्यानं लोकांपर्यंत पोहोचणं महत्त्वाचं होतं, त्यामुळं शरद पवार पुन्हा लोकांमध्ये गेल्याचं पाहायला मिळालं.

याबाबत राष्ट्रवादीचे पहिले प्रदेशाध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते छगन भुजबळ सांगतात, "1999 साली आमची जिल्हा यंत्रणा सुद्धा पूर्णपणे तयार झाली नव्हती. आता जे राष्ट्रवादीचे मोठे नेते आहेत, त्यातले बरेचशे नेते निवडणुकीनंतर आले. काही नेते महिनाभर थांबून आले. त्यावेळी मी आणि पवारसाहेब एका रात्रीत 13-14 बैठका घेत, सर्व मतदारसंघ कव्हर केले. त्यावेळी दिवसा हेलिकॉप्टरचा वापर आणि संध्याकाळ झाली की कारने पुढे जात दोन-तीन सभा निपटवायचो."

भुजबळ पुढे सांगतात, "1999 साली आमचा पक्ष (राष्ट्रवादी) नवीन होता. आम्ही उमेदवारही जाहीर केले होते. मात्र, अनेकदा लोक सांगायचे की, आम्ही पवारसाहेबांना मत दिलं. कुठे मत दिलं तर पंजाला मत दिलं असं सांगायचं. म्हणजे आमचं घड्याळ चिन्ह लोकांपर्यंत पोहोचलं नव्हतं."

"जुन्या एस काँग्रेसची चरखा निशाणी मिळवण्याचा प्रयत्न केला. त्या निशाणीचा प्रचारही केला. मात्र, निशाणी मिळाली नाही. मग घड्याळ घेतलं. पण ही नवी निशाणी लोकांपर्यंत पोहोचलीच नाही. अन्यथा 1999 साली आमचं बहुमत येऊ शकलं असतं," अशी खंत भुजबळ व्यक्त करतात.

1999 साली तरूणांपासून वयस्कर लोकांपर्यंत सगळ्यांचा आम्हाला पाठिंबा होता, असा दावाही भुजबळ करतात.

मात्र, ज्येष्ठ पत्रकार प्रताप आसबे म्हणतात, "1999 साली सुद्धा शरद पवार रस्त्यावर उतरले होते. त्यावेळी त्यांच्या जोडीला छगन भुजबळांसारखे नेतेही होते. पण शरद पवार हेच प्रामुख्यानं प्रचार करायचे."

शिवाय, 1999 साली शरद पवारांच्या सोबत लोक होते, मात्र तरूण जास्त नव्हते. यावेळी जास्त तरूणांच पाठिंबा दिसतोय, असं प्रताप आसबे सांगतात.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)