वसंतराव नाईक: 'या' बंजारा नेत्याच्या काळात शिवसेना वाढली असा आरोप का होतो?

    • Author, अभिजीत कांबळे
    • Role, बीबीसी मराठी

जब्बार पटेल दिग्दर्शित 'सिंहासन' चित्रपटातील एक सीन...यामध्ये आपल्या मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर उपोषणाला बसलेल्या स्वातंत्र्यसैनिकाला मुख्यमंत्री भावनिक आवाहन करतात आणि त्यांना थेट आपल्या घरात घेऊन जाऊन उपोषण संपुष्टात आणतात.

हे असंच काहीसं साठच्या दशकात महाराष्ट्रात घडलं होतं आणि तेव्हा मुख्यमंत्री होते वसंतराव नाईक तर उपोषण करणारे व्यक्ती होते सेनापती बापट. विजय तेंडुलकरांनी 'हे सर्व कोठून येतं' या पुस्तकात लिहिलेला हा किस्सा वसंतराव नाईकांचा मुरब्बीपणा स्पष्ट करण्यासाठी पुरेसा आहे.

बंजारा समाजाची उपस्थिती राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात आहे. त्यांचे तांडे प्रत्येक जिल्ह्यात आहेत. त्यामुळे त्यांच्या मताची राजकीय दखल त्या-त्या ठिकाणी घेतली जाते.

महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचार केला तर वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक हे दोन मुख्यमंत्री बंजारा समाजानं महाराष्ट्राला दिले आहेत. त्यांपैकी वसंतराव नाईक यांनी प्रदीर्घकाळ राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं होतं. त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा घेतलेला हा आढावा...

मुरब्बी वसंतराव

सलग 11 वर्षं 2 महिने आणि 15 दिवस महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद वसंतराव नाईकांनी सांभाळलं त्यामध्ये या मुरब्बीपणाचा सिंहाचा वाटा होता. सेनापती बापटांच्या प्रसंगाविषयी विजय तेंडुलकरांनी लिहिलंय की,

'सेनापती बापट एकदा वसंतरावांच्या निवास-स्थानाबाहेर उपोषणाला बसले. म्हणजे विरोधी पक्षाच्या नेत्यांनी त्यांना बसवले. मुख्यमंत्री वसंतराव सेनापतींशी इतक्या लीनतेने आणि आर्जवाने वागले की सेनापतींना वसंतरावांची विनंती मान्य करून निवास-स्थानाबाहेरचं आपलं आसन निवास-स्थानात हलविण्याशिवाय गत्यंतर उरलं नाही. सेनापतींनीच ही हकिकत मला ऐकवली होती आणि आदराने उद्गारले होते, 'हुशार माणूस!' अमरावतीच्या वयोवृद्ध शिवाजीराव पटवर्धनांच्या महारोगविषयक कामाची नोकरशाही गुंत्यात गोची झाली की ते चिडून दंडा आपटीत सचिवालयात येत. त्यांचे आगमन आपल्या खोलीपुढे होताच वसंतराव खोलीबाहेर येऊन त्यांच्या पायांवर मस्तक ठेवून त्यांचा अर्धा राग जिरवून टाकत.'

पक्षांतर्गत राजकारणाला पुरुन उरले

वसंतराव नाईकांच्या मुरब्बीपणाचे, कसलेल्या राजकारणाचे अनेक दाखले दिले जातात. साठच्या दशकात महाराष्ट्राच्या राजकारणावर पश्चिम महाराष्ट्राचं, साखर कारखानदारांचं आणि मुख्य म्हणजे मराठा समाजाचे वर्चस्व होतं आणि ते वाढतच चाललं होतं. नाईकांकडे यापैकी कशाचंही पाठबळ नव्हतं.

नाईक विदर्भातील होते आणि ते भटक्या विमुक्त बंजारा समाजातील होती. मात्र तरीही ते मुख्यमंत्रिपदावर सलग ११ वर्षं राहिले कारण त्यांचा चाणाक्षपणा, राजकारणाची यशस्वी खेळी, परिस्थितीचे अचूक आकलन आणि ती समर्थपणे हाताळण्याची हातोटी.

याच बळावर ते मातब्बर काँग्रेस नेत्यांचं आव्हान परतवून लावू शकले. पश्चिम महाराष्ट्रातले बाळासाहेब देसाई, यशवंतराव मोहिते, विदर्भातले नासिकराव तिरपुडे, मुंबईतील रजनी पटेल या काँग्रेसमधील तत्कालीन वजनदार नेत्यांना वसंतराव नाईक पुरून उरले कारण ते एकीकडे यशवंतराव चव्हाण आणि दुसरीकडे इंदिरा गांधी या दोघांचाही पाठिंबा राखण्यात यशस्वी ठरले होते.

महाराष्ट्राची स्थापना झाली आणि दोन वर्षांतच यशवंतराव चव्हाणांना राष्ट्रीय राजकारणात दिल्लीत जावं लागलं. त्यानंतर काही दिवस मारोतराव कन्नमवार आणि पी. के. सावंत यांनी मुख्यमंत्रिपद सांभाळल्यानंतर धुरा आली ती वसंतराव नाईकांकडे.

वकिली करता - करता राजकारणात आलेल्या वसंतराव फुलसिंग नाईकांनी यवतमाळ जिल्ह्यातील पुसदचे नगराध्यक्ष म्हणून राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत 1952 मध्ये ते मध्य प्रदेश राज्यात महसूल खात्याचे उपमंत्री झाले.

1956 मध्ये राज्यपुनर्रचनेनंतर विदर्भ आणि मराठवाडा हे प्रदेश मुंबई द्विभाषिक राज्यात समाविष्ट झाल्यानंतर 1965 मध्ये नाईक यशवंतरावांच्या मंत्रिमंडळात कृषिमंत्री झाले.

पुढे 1960 मध्ये महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर ते प्रथम महसूल मंत्री होते. 1962 च्या निवडणुकीनंतरही कन्नमवारांच्या मंत्रिमंडळात ते महसूल मंत्री होते, पण कन्नमवारांच्या मृत्यूनंतर ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले

राजकारणातील यशस्वी खेळी हेच नाईकांच्या मुख्यमंत्रिपदाच्या प्रदीर्घ कारकीर्दीचं एकमेव वैशिष्ट्य नव्हे. या काळात त्यांनी एक कुशल प्रशासक म्हणूनही लौकीक मिळवला.

नाईकांच्या कार्यकाळात महाराष्ट्राचं औद्योगिकीकरण वाढत गेलं, ग्रामीण महाराष्ट्रात सहकारी साखर कारखाने, दूध उत्पादक संघ, सूत गिरण्यांचं जाळं पसरलं. ज्या योजनेच्या धर्तीवर देशात मनरेगा योजना आली, ती रोजगार हमी योजना नाईकांच्या काळात महाराष्ट्रात सुरू झाली. 'दोन वर्षांत महाराष्ट्र धान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला नाही, तर मी स्वतः फाशी जाईन' हे त्यांचं जाहीर वक्तव्यही खूप गाजलं.

वसंतराव आणि 'वसंतसेना'

साठच्या दशकात कामगारांचा संप, 'मुंबई बंद'ची हाक यामधून केवळ गिरणीच नव्हे; तर सर्व कामगारांची एकजूट झाल्याने डाव्या पक्षांची ताकद वाढत होती. जॉर्ज फर्नांडिस यांचा दबदबा वाढत चालला होता. ही काँग्रेसपुढील डोकेदुखी होती अन् त्यावर उताराही सापडला. तो म्हणजे, शिवसेनेचा उदय.

बाळासाहेब ठाकरे यांनी 1966 मध्ये मुंबईत शिवसेनेची स्थापना केली. शिवसेना डाव्या पक्षांना शह देईल म्हणून काँग्रेसही शिवसेनेला खतपाणी घालत असल्याचा त्यावेळी आरोप झाला. वसंतराव नाईक उघडपणे शिवसेनेची पाठराखण करत आहेत अशी टीका करत शिवसेनेला 'वसंत सेना' म्हटलं गेलं.

पत्रकार सुजाता आनंदन सांगतात की, "त्याकाळी विनोदानं शिवसेनेला वसंत सेना म्हटलं जायचं. महाराष्ट्राचे तत्कालिन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्याशी असलेल्या जवळीकीमुळं सेनेला हे टोपण नाव मिळालं होतं."

विजय तेंडुलकरांनी 'हे सारे कोठून येते' या पुस्तकात वसंतराव नाईक आणि शिवसेनेबाबत लिहिलंय की, 'शिवसेनेचा विशेष दरारा होता त्या काळात खासगी बैठकांतून वसंतरावांना शिवसेनेविषयी बोलताना अनेकांनी ऐकले होते. वसंतराव पाइप झटकत म्हणत, 'तुम्ही त्यांचा उगीच बाऊ करता. वेळ आली तर चोवीस तासांत त्यांना बंद करू शकेन इतका पुरावा माझ्यापाशी आहे.'

पण ही वेळ त्यांच्या कारकीर्दीत कधीच आली नाही किंवा त्यांनी ती आणली नाही. शिवसेनेचा वाघ त्यांनी चांगला सांभाळला. तो कम्युनिस्टांशी डरकाळ्या फोडीत हाणामारीचे मुकाबले करी आणि वसंतरावांचे अंग चाटी.'

कारकीर्द कशी संपली?

अकरा वर्षं सलगपणे मुख्यमंत्रिपदी राहिल्यानंतर अखेर फेब्रुवारी 1975 मध्ये त्यांना या पदावरून पायउतार व्हावे लागले.

नाईकांची मजबूत पकड सैल होण्यास सुरुवात झाली ती 1972 पासून. 1972 च्या निवडणुकीत काँग्रेसला यश मिळाले खरं, पण पक्षात मोठी बंडखोरी झाली. जवळपास 20 हून अधिक बंडखोर निवडून आले. त्यानंतर 1974 मध्ये राज्यात लोकसभेच्या चार आणि विधानसभेच्या नऊ जागांसाठी पोटनिवडणुका झाल्या, त्यात बहुतेक जागांवर काँग्रेसचा पराभवच झाला.

विदर्भातही जांबुवंतराव धोटे आणि रामभाऊ हेडाऊ हे महाविदर्भ संघर्ष समितीचे नेते काँग्रेसच्या उमेदवारांचा पराभव करून निवडून आले. ही नाईकांसाठी धोक्याची घंटा होती. या पोटनिवडणुकांनंतर नाईकांच्या नेतृत्वाला पक्षातून आव्हान मिळू लागलं. त्यावेळी यशवंतराव चव्हाणही त्यांना संरक्षण देऊ शकले नाहीत. पुढील काही दिवसांतच नाईकांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागलं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)