You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
संजय राठोड प्रकरण : बंजारा म्हणजे नेमका कुठला समाज? पोहरादेवी आणि सेवालाल महाराजांचं महत्त्व काय आहे?
- Author, नीलेश धोत्रे
- Role, बीबीसी मराठी
पोहरादेवी या स्थळाला बंजारा समाजात अनन्य साधारण महत्त्व आहे. बंजारा समाजाची काशी म्हणूनही पोहरादेवीला ओळखलं जातं. जेवढं वंजारी समाजात भगवानगडाला महत्त्व आहे तेवढंच महत्त्व बंजारा समाजात पोहरादेवीला आहे.
बंजारा हे नाव काढलं की शहरी माणसाच्या डोळ्यासमोर चित्र उभं राहातं ते बांधकाम साईटवर काम करणारे मजूर आणि खूप आरसे असलेली विशिष्ट अशी वेशभूषा केलेल्या महिलांचं.
पण बंजारा समाजातल्या महिला खूप आरसे असलेली वेशभूषा का करतात, बंजारा समाजातील लोक बांधकाम साईटवर काम करताना सर्रास का दिसतात, बंजारा म्हणजे नेमका कुठला समाज आहे, बंजारा आणि वंजारी एकच समाज आहे का, असे वेगवगेळे प्रश्न अनेकदा पडतात. आपण त्याच प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत.
बंजारा ही एक भटकी जमात आहे. इंग्रजपूर्व काळात घोड्यावरून मिठाचा व्यापार करणारी जमात म्हणून बंजारा प्रसिद्ध होते.
मग घोड्यावरून मिठाचा व्यापार करत भटकणारी ही जमात स्थिरावली कशी? या प्रश्नाचं उत्तर ब्रिटिशांनी आणलेल्या 1871च्या कायम स्वरुपी गुन्हेगारी जमातीचा शिक्का लावणाऱ्या कायद्यात असल्याचं पल्लवी रेणके सांगतात. देशभरातल्या भटक्या जमातींच्या त्या अभ्यासक आहेत.
त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, "भारतात इंग्रजांचं राज्य आल्यानंतर त्यांना भारतातल्या जंगलांवर प्रभुत्व प्रस्थापित करायचं होतं. पण व्यापारानिमित्त आणि कामाच्या शोधात देशभरातलं जंगल पादाक्रांत करणाऱ्या भटक्या जमातींमुळे त्यांना ते शक्य होत नव्हतं. जंगल हे आपलंच आहे इथं आपलंच वर्चस्व आहे असं मानणाऱ्या भटक्या जमातींनी त्यावेळी इंग्रजांनी त्यांच्यावर केलेले सर्व हल्ले परतवून लावले होते.
इंग्रजांनी मग भारतातल्या अशा सर्व जमातींचा एक सर्व्हे केला. त्यांची एक यादी तयार केली. शेवटी त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी इंग्रजांनी 1871 मध्ये या जमातींना गुन्हेगारी जमात घोषित करणारा कायदा आणला. आपल्यावरचा हा शिक्का पुसण्यासाठी मग बंजारा समाजातील लोकांनी इंग्रजांशी तह केला. तहानुसार इंग्रजांनी या समाजातल्या लोकांना बांधकाम कामांसाठी स्वस्तातलं मनुष्यबळ म्हणून वापरण्यास सुरूवात केली."
मजूर म्हणून काम करायला सुरुवात केल्यानंतर ही भटकी मंडळी स्थायिक झाली. पारंपरिक व्यवसायापासून ही मंडळी दूर गेली आणि मग या समाजानं इतर कामं करण्यास सुरूवात केली.
बंजारा समाजाचं अस्तित्व भारतभरात असल्याचं पल्लवी रेणके सांगतात. पण, समाजातील मंडळी मात्र त्यांची मुख्यभूमी राजस्थान असल्याचं सांगतात.
त्याचं कारण म्हणजे "महाराणा प्रताप यांनी अनेक भटक्या जमातींना राजाश्रय दिला होता. त्यांना जमिनी दिल्या होत्या. त्यांना वस्त्या उभारून दिल्या होत्या. यातल्या बऱ्याच जमातींची मदत महाराज त्यांच्या मोहिमांसाठी घेत होते. उदाहरणार्थ घिसाडी समाज हत्यारं तयार करण्यासाठी मदत करत होता. बंजारा समाजाला संपूर्ण देशभरातले रस्ते माहिती होते म्हणून त्यांची मदत दळणवळण आणि रसद पोहोचवण्यासाठी होत होती. पण महाराजांनंतर मात्र या जमातीचीं वाताहत झाली," असं पल्लवी रेणके सांगतात.
त्यामुळेच बंजारासह महाराष्ट्रातील इतर काही भटके समाज यांचं मूळ राजस्थानात असल्याचं सांगतात.
बंजारा समाज मुख्यत्वे वायव्य, पश्चिम आणि दक्षिण भारतात जास्त आढळतो. बंजारा, गोर, लंबाणी, लामण अशा पोटजाती या समाजामध्ये आहेत किंवा अशा वेगवेगळ्या नावानं हा समाज ओळखला जातो. तर राठोड, नाईक, पवार, जाधव, तवर, चव्हाण, आडे अशी आडनावं या समाजामध्ये आढळतात.
अनिल अवचट यांनी त्यांच्या 'माणसं' या पुस्तकात या समाजाचं वर्णन केलं आहे. नजर लागू नये म्हणून या समाजातील महिला अनेकदा खूप आरसे असलेली वेशभूषा करातात, असं अवचट यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलं आहे.
'बंजारा समाजाची काशी'
पोहरादेवी या स्थळाला बंजारा समाजात अनन्य साधारण महत्त्व आहे. बंजारा समाजाची काशी म्हणूनही पोहरादेवीला ओळखलं जातं. जेवढं वंजारी समाजात भगवानगडाला महत्त्व आहे तेवढंच महत्त्व बंजारा समाजात पोहरादेवीला आहे. महाराष्ट्रातल्या वाशिम जिल्ह्यातल्या मानोरा तालुक्यात पोहरा हे ठिकाण आहे. पोहरा इथं जगदंबा देवीचं मंदिर आहे. जे पोहरादेवी नावानं ओळखलं जातं.
महत्त्वाचं म्हणजे बंजारा समाजातील संत सेवालाल महाराज यांची इथं समाधी आहे. सेवालाल महाराज यांनी सांगितलेलं तत्वज्ञान बंजारा समाजात सर्वोच्च मानलं जातं. पोहरामध्ये जगदंबा मंदिर आणि सेवालाल महाराज यांची समाधी समोरासमोर आहे. महत्त्वाच्या सर्व हिंदू सणांना पोहरामध्ये बंजारा समाजाचे लोक मोठ्या संख्येनं एकत्र येतात.
पोहरा हे बंजारा समाजाचं मुख्य धर्मपीठ आहे. इथून जारी होणाऱ्या संदेशाचं बंजारा समाजात अनुकरण केलं जातं.
संजय राठोड यांच्यावर पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी होणाऱ्या आरोपांच्या मुद्द्यावरून इथल्या महंतांनी संजय राठोड यांच्या बाजूनं उभं राहण्याचा निर्णय घेतला आहे. बंजारा समाजातलं नेतृत्व संपवण्याचं हे कारस्थान असल्याचा आरोप पोहरादेवी येथील महंत सुनील राठोड यांनी केल्याचं वृत्त काही ठिकाणी छापून आलं आहे.
सेवालाल महाराज कोण आहेत?
महाराष्ट्रात किंवा देशभरात कुठेही बंजारा समाजाची वस्ती आहे आणि तिथं सेवालाल महाराज आणि जगदंबा देवीचं मंदिर नाही असं कधीच होत नाही. बंजारा समाजाच्या प्रत्येक वस्ती, वाडा आणि तांड्यावर तुम्हाला सेवालाल महाराजांचं छोटंसं का होईना मंदिर दिसेलच. बंजारा समाजात सेवालाल महाराज यांना मानाचं स्थान आहे.
मराठवाडा आणि विदर्भातल्या बंजारा समाजांच्या वस्त्यांवर सेवालाल महाराजांचा झेंडाही बरेचदा फडकताना दिसतो. सेवालाल महाराज यांचा व्यक्ती पूजेला विरोध होता. पण आजच्या बंजारा समाजात त्यांची पूजा केली जाते.
17 व्या शतकात होऊन गेलेल्या सेवालाल महाराज यांच्याकडे समाजसुधारक म्हणूनही पाहिलं जातं. त्यांनी त्यांच्या अनुयायांसाठी 22 वचनं किंवा शिकवणी सांगितल्या आहेत.
जंगल आणि पर्यावरणाचं रक्षण करा, कुणाशीही कुठल्याही प्रकारचा भेदभाव करू नका, चोरी करू नका, खोटं बोलू नका, दुसऱ्याची निंदा करू नका, कुणाला दुखावू नका, आत्मसन्मानाने जगा, पाण्याचं संवर्धन करा, पाणी कधीही विकू नका, दारूचं सेवन अजिबात करू नका, शिक्षण घ्या, अनैतिक संबंध ठेवू नका, या सारख्या काही शिकवणीचा त्यामध्ये समावेश आहे.
सेवालाल महाराज यांनी दिलेली सर्वांत महत्त्वाची शिकवण आहे ती म्हणजे 'महिलाचं सन्मान करा.'
सेवालाल महाराजांच्या वंशजांना आजही बंजारा समाजात त्यांच्याएवढाच मान आहे.
बंजारा आणि वंजारीमध्ये काय फरक आहे?
बंजारा समाज आणि वंजारी समाज यांच्यात खूप फरक असल्याचं पल्लवी रेणके सांगतात.
"वंजारी समाज हा महाराष्ट्रापुरताच मर्यादित आहे. तसंच तो शेतीशी निगडीत कामं करतो. मुख्यत्वे ऊसतोडीचं काम हा समाज करतो. ऊसतोडीसाठी हा समाज स्थलांतर करत असतो. पण बंजारा ही मात्र व्यापारी जमात आहे. दोघांच्या नावामध्ये असलेल्या साधर्म्यामुळे लोकांना त्या एकच जामाती असाव्यात असं वाटतं. पण तसं नाही," असं पल्लवी रेणके सांगतात.
दोन्ही समाजांमध्ये सांस्कृतिक फरक सुद्धा आहे. बंजारा हा संपूर्ण भारतात विखूरलेला समाज आहे. तो असा एकमेव समाज आहे ज्यांची भारताच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात एकच भाषा (गोरमाटी) आणि एकच ड्रेसिंग कोड आहे. त्यांचे देवदेवतासुद्धा एकच आहे.
वंजारी समाज हा मुख्यत्वे महाराष्ट्रात आणि त्यातही मराठवाड्यात आढळतो.
महाराष्ट्राच्या जातींच्या यादीत बंजारा समाज DT(A) म्हणजेच विमुक्त जमाती या प्रवर्गात येतो, ज्यांना नोकरी आणि शिक्षणात आरक्षण आहे. तर वंजारी समाज NT(D) या विशेष प्रवर्गात येतो. त्यांनाही वेगळं आरक्षण देण्यात आलं आहे. केंद्र सरकारच्या पातळीवर मात्र हे दोन्ही समाज ओबीसी जातींमध्ये येतात.
बंजारा समाजाची वेगवेगळ्या राज्यांमध्ये मात्र वेगवेगळ्या प्रवर्गांखाली नोंद आहे.
बंजारा राजकीयदृष्ट्या किती सक्रिय समाज आहे?
देशात जातनिहाय जनगणना झालेली नसल्याने राजकीयदृष्या कुठला समाज जास्त वरचढ आहे हे सांगणं कठीण आहे, असं पल्लवी रेणके सांगतात.
"पण बंजारा समाजाची उपस्थिती राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात आहे. त्यांचे तांडे प्रत्येक जिल्ह्यात आहेत. त्यामुळे त्यांच्या मताची राजकीय दखल त्या-त्या ठिकाणी घेतली जाते. वंजारी मात्र फक्त मराठवाड्यापुरते मर्यादित आहे. मराठवाड्यांमध्ये मात्र त्यांच्या एकगठ्ठा व्होट बँक आहेत.
पण बंजारा समाज मात्र संपूर्ण महाराष्ट्रात पसरलेला असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बंजारा समाजाचं नेतृत्व आणि प्रतिनिधित्व दिसून येतं. प्रत्येक ठिकाणी त्यांच्या वस्त्या आणि तांडे असल्यामुळे त्यांच्या मागण्या पूर्ण करून घेण्याची क्षमता त्यांच्यात जास्त असल्याचं दिसून येतं," असं निरिक्षण पल्लवी रेणके नोंदवतात.
बंजारा समाज महाराष्ट्राच्या राजकारणात प्रभावी असल्याचंही दिसून आलं आहे. वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक हे दोन मुख्यमंत्री बंजारा समाजानं महाराष्ट्राला दिले आहेत.
शिवाय राजेश राठोड, हरिभाऊ राठोड, संजय राठोड असे वेगवेगळे नेते या समाजातून येतात.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)