You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
बंजारा समाज युरोपापर्यंतही पसरला आहे का? बंजारा आणि जिप्सी यांच्यात किती साम्य आहे?
जिप्सी हा शब्द ऐकताच हिप्पीसारख्या दिसणाऱ्या लोकांचा विचार आपल्या मनात येतो. यांचं एक ठिकाण नसतं. हे लोक दूरवरचा प्रवास करतात. अशी भटकंती करणाऱ्या लोकांना भारतात बंजारा तर परदेशात जिप्सी म्हणून संबोधलं जातं.
2014 साली 13 ते 15 मार्चदरम्यान राजस्थानच्या जोधपूरमध्ये अशाच जिप्सी लोकांचं संमेलन झालं होतं.
तिथं पहिल्यांदाच अशा प्रकारचा जिप्सी महोत्सव आयोजित करण्यात आला होता. त्याठिकाणी देश-विदेशातून फ्लेमेंको जिप्सी संगीत आणि नृत्य कलाकार आले होते. पण त्यांनी त्या ठिकाणी येण्यामागचं नेमकं काय कारण होतं? कोणत्या गोष्टीने त्यांना आकर्षित केलं?
बंजारा-जिप्सी भाई-भाई
जोधपूरमध्ये फ्लेमेंको जिप्सी महोत्सवात क्वीन हरीश यांनी आपला सहभाग नोंदवला होता. हरीश हे गेल्या कित्येक वर्षांपासून राजस्थानी बंजारा लोकनृत्याचं सादरीकरण जगभरात करत असतात. जैसलमेरच्या एका जिप्सी कुटुंबातूनच ते येतात.
क्वीन हरीश यांच्याशी बीबीसीने त्यावेळी चर्चा केली होती.
हरीश सांगतात, "खरंतर, जिप्सी संस्कृतीची सुरुवात भारतातूनच झालली होती. इथूनच पाकिस्तान, अफगाणिस्तान, टर्की, रोमानियामार्गे ही संस्कृती स्पेनपर्यंत पोहोचली."
आपलं म्हणणं सिद्ध करण्यासाठी हरीश यांनी काही पुरावेही दिले. गेल्या काही वर्षांत त्यांनी जगभरातील जिप्सी संस्कृतीच्या अभ्यासादरम्यान या गोष्टींचं निरीक्षण केल्याचं त्यांनी सांगितलं.
1. भाषा
या महोत्सवात सहभाग नोंदवण्यासाठी आलेल्या फ्लेमेंको कलाकारांची मूळ भाषा स्पॅनिश असली तरी ते आपल्या बोलीभाषेत डोळा, कान, तोंड, नाक यांच्यासाठी तेच शब्द वापरतात. पण इतर स्पॅनिश भाषिक मंडळी अशा प्रकारचे शब्द वापरत नाहीत.
2. पोशाख
बंजारा आणि जिप्सी लोकांमध्ये असलेली आणखी एक समानता म्हणजे त्यांचा पोशाख. दोघांच्याही कपड्यांमध्ये हस्तकलेचा वापर हमखास केलेला असतो.
प्रसिद्ध स्पॅनिश नृत्यकलाकार तमार गोंजालेज याबाबत सांगतात, "फ्लेमेंको नृत्यादरम्यान आपलं शरीर पूर्णपणे झाकलं जाईल, याची काळजी घेतली जाते."
बंजारा संस्कृतीमध्येही लोक नृत्य करताना संपूर्ण शरीर झाकलं जाईल, याची काळजी घेतात.
3. आहार
क्वीन हरीश यांच्या मते, बंजारा आणि जिप्सी लोकांच्या आहारातही साम्य आहे. भारतीय बंजारा असो किंवा स्पॅनिश जिप्सी दोन्ही समाजातील व्यक्ती मांसाहारी खाणं पसंत करतात.
प्रसिद्ध फ्लेमेंको कलाकार पेपे यांना भारतीय पद्धतीचं जेवण, विशेषतः तंदुरी चिकन खूप आवडत असल्याचं त्यांनी सांगितलं. स्पेनमध्येही त्यांना या जेवणाची आठवण येते, असं ते म्हणतात.
4. कौटुंबिक मूल्य
अफगाणिस्तान, टर्की किंवा रोमानिया आपण कुठेही गेलो तरी आपल्याला एकल जिप्सी कुटुंब मिळणार नाही, असं क्वीन हरीश यांनी सांगितलं.
भारतात ज्याप्रकारे बंजारा समाजातील तीन-चार पिढ्या एकाच पद्धतीचं काम करताना दिसतात. तसंच जगभरातील जिप्सी कुटुंबांमध्येही दिसतं. हे कुटुंबीय घराणं बनवून एकत्रित राहतात.
5. संगीत
क्वीन हरीश यांनी फ्लेमेंको संगीतकार आणि गायक आगुस्तिन कार्बोनेल यांच्या काही गोष्टींचा अनुवाद करून सांगितलं.
कार्बोनेल हे 'बोला' या नावाने लोकप्रिय होते. भारतात त्यांचा तो पहिलाच शो होता.
गेल्या 25-30 वर्षांपासून ते 'आवो नी म्हारे देस' ही धून स्पॅनिश बोलीसह गात आहेत. ही धून वारसाहक्काने मिळाली आहे. पूर्वीच्या काळी हे गीत नक्कीच स्पॅनिश आणि भारतीय कलाकारांनी एकत्रित गायलं असेल, असं हरीश यांना वाटतं.
6. कास्तानियस आणि खड ताल
फ्लेमेंको नृत्यात ताल देण्यासाठी कास्तानियस नामक एका वाद्याचा वापर केला जातो.
हे वाद्य भारतीय खड ताल या वाद्याशी मिळतंजुळतं आहे. प्राचीन काळापासूनच स्पॅनिश जिप्सी लोक हे वाद्य वापरतात, अशी माहिती हरीश यांनी दिली.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)