You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नितीश कुमार : 7 दिवसांचं मुख्यमंत्रिपद ते 17 वर्षं बिहारच्या राजकारणावर पकड
- Author, कीर्ति दुबे
- Role, बीबीसी प्रतिनिधी
बिहारची राजधानी पाटनामध्ये कडाक्याच्या थंडीत राजकीय तापमानाचा पार अचानक वाढला आहे. इंडिया आघाडी आणि बिहारमधील महाआघाडीपासून नितीश कुमार फारकत घेणार आहेत का?
बुधवारी बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांच्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली वाहताना नितीश कुमार यांनी घराणेशाहीच्या राजकारणावर जोरदार टीका केली होती.
नितीशकुमार यांनी कुणाचंही नाव घेतलं नसलं तरी, ते म्हणाले होते की कर्पूरी ठाकूर यांनी कधीच त्यांच्या कुटुंबाची बाजू घेतली नाही पण आजकाल लोक आपल्या कुटुंबाला पुढे रेटण्यात धन्यता मानत आहेत.
नितीश कुमार यांची टिप्पणी लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबीयांवर असल्याचं बोललं जातंय. भाजप सरकारने दोन दिवसांपूर्वी कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर केला होता आणि त्याबद्दल नितीश कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले होते.
यानंतर गुरुवारी सकाळी बातमी आली की, 30 जानेवारीला बिहारच्या पूर्णियामध्ये येणाऱ्या राहुल गांधींच्या रॅलीमध्ये नितीश कुमार सहभागी होणार नाहीत.
भारत जोडो न्याय यात्रेचा भाग म्हणून राहुल गांधी पूर्णियाला जाणार आहेत. याआधी 'जदयू'ने नितीशकुमार हे राजदच्या नेत्यांसोबत यात्रेला उपस्थित राहणार असल्याचे संकेत दिले होते.
नितीश कुमार यांचा राजकीय प्रवास अत्यंत रंजक मानला जातो. त्यांच्या राजकीय प्रवासावर एक नजर टाकूया :
टिकून राहण्याची कला
जीतनराम मांझी यांचा कालखंड सोडला तर नितीश कुमार जवळपास सलग 17 वर्षं बिहारचे मुख्यमंत्री राहिले आहेत. 2014च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी भाजपशी युती तोडून नितीश कुमार यांनी लोकसभेची निवडणूक स्वतंत्रपणे लढवली आणि त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं.
मे 2014 मध्ये मुख्यमंत्रिपद सोडणाऱ्या नितीश कुमार यांनी फेब्रुवारी 2015मध्ये जीतनराम मांझी यांना पक्षातून काढून टाकलं आणि स्वतः 130 आमदारांसोबत राज भवनात पोहोचले. त्यांनी सरकार स्थापनेचा दावा केला.
लालूप्रसाद यादव यांच्या 15 वर्षांच्या कार्यकाळाविरोधात लढून सत्तेवर येणाऱ्या नितीश कुमारांना नंतर विधानसभा निवडणुकीच्या वेळेस लक्षात आलं की, बिहारमध्ये कोणाच्यातरी सोबत गेल्याशिवाय सरकार बनवणं शक्य नाहीये.
त्यामुळेच जेपी आणि कर्पूरी ठाकूर यांच्या हाताखाली राजकारणाचे धडे गिरवलेले लालू प्रसाद यादव आणि नितीश कुमार एकत्र आले.
बिहारमध्ये दोन नेत्यांनी 'सामाजिक न्यायासोबत विकास' हा नारा देत राज्यातील भाजपच्या 'विकासा'च्या घोषणेवर मात केली. मात्र त्यानंतर 27 जुलै 2017 ला नितीश कुमारांनी राज्यपाल केसरी नाथ त्रिपाठी यांची राजभवनात जाऊन भेट घेतली आणि आपला राजीनामा दिला.
बिहारचं राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघालं. राज्याचे तत्कालिन उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर नितीश यांनी राजीनामा दिली होता. हेच आपल्या राजीनाम्याचे कारण असल्याचंही त्यांनी म्हटलं.
त्यानंतर नितीश कुमार भाजपसोबत गेले. याच भाजपबद्दल बोलताना त्यांनी म्हटलं होतं- 'मिट्टी में मिल जाऊंगा लेकिन भाजपा के साथ नहीं जाऊंगा.'
राजकारण हा समीकरण आणि शक्यतांचा खेळ आहे. नितीश कुमार यांच्या राजकारणानं हेच सिद्ध केलं. जे नितीश कुमार नरेंद्र मोदींच्या सांप्रदायिक प्रतिमेला कचरत होते, 2019 मध्ये त्याच मोदींसाठी त्यांनी मतं मागितली आणि 2020 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नितीश कुमार यांच्यासाठी मतं मागितली.
नितीश कुमार यांचं एकूणच राजकीय करिअर चढ-उतारांनी भरलेलं आहे.
इंजिनिअर बाबू ते सुशासन बाबूपर्यंतचा प्रवास
पटना शहराला लागून असलेल्या बख्तियारपूरमध्ये 1 मार्च 1951 ला नितीश कुमार यांचा जन्म झाला. त्यांनी बिहारच्या इंजिनिअरिंग कॉलेजमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं. या काळात ते 'इंजिनिअर बाबू' म्हणून ओळखले जात होते.
जयप्रकाश नारायण यांच्या 'संपूर्ण क्रांती आंदोलना'च्या मुशीतून निघालेले नितीश कुमार बिहारच्या सत्ताकारणात जवळपास दीड दशक केंद्रस्थानी होते.
इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये त्यांचे मित्र आणि क्लासमेट असलेल्या अरुण सिन्हा यांनी आपल्या 'नितीश कुमारः द राइज ऑफ बिहार' या पुस्तकात लिहिलं आहे की, कॉलेजच्या दिवसात नितीश राज कपूरच्या चित्रपटांचे फॅन होते. या विषयावर मित्रांनी केलेली चेष्टा-मस्करीही त्यांना सहन व्हायची नाही.
नितीश कुमार यांना 150 रुपये स्कॉलरशिप मिळायची. त्यातून ते दर महिन्याला पुस्तकं आणि मासिकं खरेदी करायचे. त्याकाळातल्या इतर बिहारी विद्यार्थ्यांसाठी या गोष्टी स्वप्नवत होत्या.
मात्र एका स्वातंत्र्यसैनिकाचा मुलगा असलेल्या नितीश यांचा कल कायमच राजकारणाकडे होता.
सुरुवातीला लालू प्रसाद यादव आणि जॉर्ज फर्नांडिस यांच्या छत्रछायेत राजकारणाची सुरूवात करणाऱ्या नितीश कुमार यांचा राजकीय प्रवास 46 वर्षांचा आहे.
1995 साली समता पार्टीला केवळ सात जागा जिंकता आल्या. तेव्हा नितीश कुमार यांच्या लक्षात आलं की, राज्यात तीन पक्ष वेगवेगळं लढू शकत नाहीत. त्यानंतर मग 1996 साली त्यांनी भाजपसोबत युती केली.
हा तो काळ होता जेव्हा भाजपचं नेतृत्व अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्याकडे होतं. या युतीचा नितीश कुमार यांना फायदा झाला आणि 2000 साली के पहिल्यांदा बिहारचे मुख्यमंत्री बनले. त्यांना हे पद केवळ सात दिवसांसाठी मिळालं, मात्र त्यांनी स्वतःला लालू प्रसाद यादव यांना सक्षम पर्याय म्हणून सिद्ध केलं.
महादलितांचं राजकारण
2007 मध्ये नितीश कुमार यांनी दलितांमध्येही सर्वांत मागास राहिलेल्या जातींसाठी महादलित असा वर्ग बनवला. त्यांच्यासाठी विविध सरकारी योजना राबविण्यात आल्या.
2010 साली घर, शिक्षणासाठी कर्ज आणि शाळेचा युनिफॉर्म देण्यासाठीही योजना राबविल्या गेल्या.
आज बिहारमध्ये सर्वच दलित जातींचा समावेश महादलित या वर्गात करण्यात आला आहे. 2018 साली पासवानांनाही महादलित दर्जा देण्यात आला.
खरंतर बिहारमध्ये दलितांचे सर्वांत मोठे नेते होते रामविलास पासवान. मात्र, तज्ज्ञ सांगतात की, दलितांसाठी ठोस काम हे नितीश कुमारांनी केलं होतं.
स्वतः नितीश कुमार हे 4 टक्के लोकसंख्या असलेल्या कुर्मी समाजातून येतात. मात्र, सत्तेत असताना त्यांनी नेहमीच अशा पक्षांसोबत युती केली, ज्यांच्याकडे एका विशिष्ट जातीची व्होट बँक असेल.
मग जेव्हा त्यांनी भाजपसोबत निवडणूक लढवली तेव्हा त्यांना भाजप समर्थक मानल्या जाणाऱ्या सवर्ण मतदारांची साथ मिळाली. त्यानंतर 2015 मध्ये यादव-मुस्लिम अशी व्होट बँक असलेल्या आरजेडीसोबत त्यांनी निवडणूक लढवली.
नितीश कुमार यांची प्रतिमा भलेही विनम्र आणि सौम्य असेल, पण जेव्हा राजकारण करायची वेळ येते तेव्हा इतर अनेक राजकारण्यांप्रमाणेच तेही कठोर होऊ शकतात.
याबाबत बोलताना मणिकांत ठाकूर सांगतात की, "त्यांनी शरद यादव आणि जॉर्ज फर्नांडिस यांच्यासोबत काय केलं हे सगळ्यांना माहीत आहे. जॉर्ज यांचे शेवटचे दिवस कसे गेले हे कोणापासून लपून राहिलं नाही."
स्वतः नितीश कुमार यांच्या पक्षाकडे कोणताही संस्थात्मक ढाचा नाहीये, मात्र नितीश कुमार यांचं राजकीय कौशल्य हे आहे की, राज्यात व्होट बँक आणि कार्यकर्ते असलेल्या पक्षांना सोबत घेत 17 वर्षं सत्तेच्या केंद्रस्थानी राहिले.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)