You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पूजा चव्हाणच्या वडिलांनी म्हटलं, 'माझ्या मुलीची बदनामी करू नका'
"माझी मुलगी पूजा चव्हाणबद्दल मीडियामध्ये सुरू असलेली चर्चा बंद करावी. ती गेली, ती आता काय येणार नाही. त्यामुळे तिला बदनाम करू नये," असं आवाहन लहू चंदू चव्हाण यांनी केलं आहे.
गेल्या चार-पाच दिवसांपासून चर्चेत असलेल्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात तिच्या वडिलांनी प्रथमच समोर येऊन प्रतिक्रिया दिली आहे.
पूजाचे वडील काय म्हणाले?
"पूजा चव्हाण ही खूप चांगली मुलगी होती. लोक तिला विनाकारण बदनाम करत आहेत. तिच्या डोक्यावर 25-30 लाख रुपये कर्ज होतं. या काळात माझं मन लागत नाही, मला खूप ताण येतोय, असं म्हणून आठ दिवसांपूर्वी पूजा पुण्याला गेली होती," असं लहू चव्हाण यांनी म्हटलं.
"त्यानंतर हे सगळं सुरू आहे. आमची बदनामी करण्यासाठी हे सगळं सुरू आहे. कृपया करून माझ्या मुलीला बदनाम करू नका, या बातम्या थांबवाव्यात," असं पूजाचे वडील लहू चव्हाण म्हणाले.
पूजा चव्हाण कोण आहे?
पूजा चव्हाण ही 22 वर्षीय तरुणी मूळची परळी, जिल्हा बीड येथील रहिवासी आहे. गेल्या काही दिवसांपासून ती पुण्यातील महंमदवाडी येथील हेवन पार्क या सोसायटीमध्ये राहत होती.
पूजाने महाविकास आघाडीमधील एका मंत्र्यामुळे आत्महत्या केल्याच्या चर्चा सोशल मीडियावर केल्या जात आहेत.
"पूजा चव्हाण घटनेत समोर आलेले सगळे अपडेट्स पाहाता प्रकरणाचा थेट रोख शिवसेना मंत्री संजय राठोड यांच्याकडे जातो. पोलिसांनी स्यू मोटो घेऊन मंत्री संजय राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा," अशी मागणी भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली आहे.
भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्र लिहून याप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
'पुण्याच्या वानवडी परिसरात राहणाऱ्या पूजा चव्हाण या तरुणीने 9 फेब्रुवारी 2021 रोजी मध्यरात्री एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली आहे. परंतु हे प्रकरण केवळ आत्महत्येचे नसल्याचे निदर्शनास आले आहे.
शिवसेना पक्षाचे यवतमाळ जिल्ह्यातील आमदार व आपल्या मंत्रिमंडळातील मंत्री असलेल्या नेत्याचे नाव याप्रकरणी पुढे आले आहे. या मंत्र्यांचे व आत्महत्या केलेल्या तरुणीचे प्रेमसंबंध असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरु आहेत. यासंदर्भातील ऑडिओ क्लिप्स व काही फोटो व्हायरल होत आहेत. ही अतिशय गंभीर बाब असून या प्रकरणाची सखोल चौकशी होण्याची आवश्यकता आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीच्या नावे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन,याप्रकरणी तात्काळ विशेष शोध पथकाकडून (एसआयटी) चौकशी करावी.' असे त्यांनी या पत्रात म्हटले आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)