कोरोना लस : ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेन्का लशीच्या वापराला युकेमध्ये मान्यता

कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी ऑक्सफर्ड विद्यापीठानं तयार केलेल्या लशीच्या वापराला युकेमध्ये मान्यता देण्यात आली आहे.

युकेमधील लसीकरणाच्या मोहिमेला वेग देण्याच्या दृष्टिनं ही मान्यता निर्णायक ठरू शकते.

लस उत्पादन करणाऱ्या अॅस्ट्राझेन्का या कंपनीला युकेनं 100 दशलक्ष लशींची ऑर्डर दिली आहे. 50 दशलक्ष लोकांचं लसीकरण करण्यासाठी हे डोस पुरेसे आहेत.

औषध नियामकांकडून मान्यता मिळाल्यामुळे ही लस सुरक्षित आणि परिणामकारक असल्याचं सिद्ध झालं आहे.

ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेन्कानं 2020 च्या सुरुवातीला लस तयार करायला घेतली. एप्रिल महिन्यात पहिल्या स्वयंसेवकावर लशीची चाचणी घेण्यात आली आणि त्यानंतर या लशीच्या क्लिनिकल चाचण्यांना सुरूवात झाली. या चाचण्यांमध्ये हजारो स्वयंसेवक सहभागी झाले होते.

डिसेंबर महिन्यात फायझर-बायेNटेकच्या लशीला युकेमध्ये मान्यता देण्यात आली होती. त्यापाठोपाठ आता ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेन्काच्या लशीला मंजुरी देण्यात आलीये.

क्लिनिकल चाचण्या झाल्यानंतर लशीचा पहिला डोस मार्गारेट किनन यांना देण्यात आला. कोरोनाची लस देण्यात आलेल्या त्या पहिल्या व्यक्ती ठरल्या होत्या. त्यानंतर आतापर्यंत युकेमध्ये सहा लाख लोकांना लस दिली गेली आहे.

आता ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेन्का लशीला मिळालेल्या मान्यतेमुळे लसीकरणामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होईल, कारण ही लस स्वस्त आहे आणि अधिक प्रमाणावर उत्पादन घ्यायला सोपी आहे.

सर्वांत महत्त्वाचं म्हणजे ही लस सर्वसाधारण फ्रीजमध्ये साठवता येते. फायझर-बायोNटेकची लस साठवायला अल्ट्रा कोल्ड स्टोअरेजची व्यवस्था लागते. म्हणजेच ही लस साठवायला उणे 70 अंश सेल्सिअस इतकं तापमान आवश्यक आहे.

लसीकरणासाठी वृद्ध नागरिक, केअर होममधील रहिवासी, आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी यांना प्राधान्य दिलं जाईल.

संसर्गाचं प्रमाण वेगानं वाढत असल्याचं पब्लिक हेल्थ इंग्लंडकडून सांगण्यात आल्यानंतर तसंच वेल्स, स्कॉटलंड आणि दक्षिण इंग्लंडमधील आरोग्य कर्मचाऱ्यांनी नॅशनल हेल्थ सर्व्हिसवरील (NHS) वाढत्या दबावाबद्दल चिंता व्यक्त केल्यानंतर लशीला मान्यता देण्यात आली आहे.

ही लस कसं काम करते?

पारंपरिक लशीमध्ये- म्हणजे लहान मुलांना जन्मानंतर तसंच बालपणात ज्या लशी वेळोवेळी दिल्या जातात त्यामध्ये मूळ व्हायरस जो मृतावस्थेत आहे त्याचे काही भाग किंवा मूळ व्हायरस कमकुवत करून त्याचं शरीरात रोपण केलं जातं. या प्रक्रियेत व्हायरसचा बचाव करण्याची रोगप्रतिकारक क्षमता विकसित होण्यासाठी वेळ लागतो.

याऐवजी ऑक्सफर्ड संधोधकांनी ChAdOx1- अर्थात चिंपाझी अॅडनोव्हायरस ऑक्सफर्ड तयार केलं.

चिंपाझी प्राण्याला होणारा व्हायरस शास्त्रज्ञांनी घेतला. आता तयार झालेल्या लशीचा तो अविभाज्य घटक ठरला. कोणत्याही व्हायरसपासून बचावात हा घटक निर्णायक ठरेल.

कोव्हिडपूर्वी 330 लोकांना ChAdOx1 लस देण्यात आली होती. कधी कारण होतं झिका व्हायरसचं तर कधी होतं फ्ल्यूचं. चिकन गुनियावर उतारा म्हणूनही ही लस देण्यात आली होती.

चिंपाझींना होणाऱ्या व्हायरसपासून तयार झालेल्या या लशीत जनुकीयदृष्ट्या आवश्यक बदल करण्यात आले आहेत त्यामुळे ही लस दिल्यानंतर माणसांना तो संसर्ग होण्याची शक्यता नाही.

त्यामध्ये कोरोना व्हायरसची ब्ल्यू प्रिंट अल्टर करण्यात आली आहे.

जेव्हा ही ब्लू प्रिंट शरीरात जाते, तेव्हा ती कोरोना व्हायरस स्पाइक प्रोटीन तयार करायला सुरूवात करते. त्यामुळे प्रतिकारशक्ती तयार होते.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)