You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना लस उत्पादक कंपन्या केवळ स्वतःच्या फायद्याचं पाहतील का?
कोरोना विषाणू पसरू लागल्याच्या सुरुवातीच्या काळात आम्ही इशारा दिला होता की, कुठल्याही आजारावरील लस विकसित करण्यासाठी काही वर्षं जातात. त्यामुळे तातडीने लस मिळेल अशी आशा बाळगू नका.
पण कोरोनाचं संकट सुरू झाल्याच्या दहा महिन्यातच लस देण्यासही सुरुवात झालीय आणि ही लस विकसित करण्यात ज्या कंपन्या पुढे आहेत, त्यांमध्ये बऱ्याच कंपन्या देशांतर्गत आहेत.
आपण यासाठी सुरुवातील ब्रिटनंच उदाहरण घेऊ आणि मग एकूणच लशीच्या व्यवसायाकडे वळूया.
गुंतवणूकदारांच्या अंदाजाप्रमाणे, यातील दोन कंपन्या म्हणजेच अमेरिकन बायोटेक कंपनी मॉडर्ना आणि जर्मन बायोटेक कंपनी बायो-एन-टेक या पार्टनरशिपमधील कंपन्या अमेरिकेतील फायझरसोबत पुढच्या वर्षी अब्जावधी डॉलरचा व्यापार करतील.
मात्र, हे स्पष्ट नाही की, लस तयार करणाऱ्या कंपन्या याशिवाय आणखी किती रुपयांचा व्यापार करतील.
ज्या पद्धतीने लस बनवण्यासाठी निधी गुंतवला गेलाय आणि ज्या पद्धतीने मोठ्या संख्येत कंपन्या लसनिर्मितीसाठी पुढे आल्या आहेत, त्यावरून तरी वाटतंय की, मोठ्या फायद्याची संधी फार काळापर्यंत राहणार नाही.
लसनिर्मितीत कुणी पैसा गुंतवला आहे?
कोरोना आरोग्य संकटानंतर लशीची गरज पाहून सरकार आणि निधी देणाऱ्या संस्थांनी लसनिर्मितीची योजना आणि चाचण्यांसाठी अब्जावधी पाऊंड्सचा निधी दिला. गेट्स फाऊंडेशनसारख्या संघटनांनी उघडपणे या योजनांचं समर्थन केलं आहे.
त्याचसोबत अनेकांनी स्वत:हून पुढे येत या योजनांना पाठिंबा दिला. अलीबाबाचे संस्थापक जॅक मा आणि म्युझिक स्टार डॉली पार्टन यांनीही या योजनांसाठी निधी दिला आहे.
सायन्स डेटा अॅनालिटिक्स कंपनी एअरफिनिटीनुसार, कोरोनाची लस बनवण्यासाठी आणि चाचण्यांसाठी सरकारकडून 6.5 अब्ज पाऊंड्स देण्यात आले आहेत, तर गैरसरकारी संस्थांकडून 1.5 अब्ज पाऊंड्स देण्यात आले आहेत.
कंपन्यांची स्वत:ची गुंतवणूक केवल 2.6 अब्ज पाऊंड्स इतकीच आहे. यातील अनेक कंपन्या इतर देशातील निधीवरच अधिक अवलंबून आहेत.
हेच एक कारण आहे की, मोठ्या कंपन्यांनी लशीच्या योजनांसाठी निधी देण्यात घाई केली नाही.
फायद्याबाबत शंका का?
अशा आपत्कालिन स्थितीत लशीची निर्मिती इतिहासातही कधी फायद्याची ठरली नाही. लशीच्या संशोधनासाठी बराच वेळ लागतो. गरीब देशात लशीची अधिक गरज असते, मात्र ते अधिक किंमतीमुळे खरेदी करू शकत नाहीत. श्रीमंत देशात नियमित विकल्या जाणाऱ्या औषधांमध्ये अधिकचा फायदा कमावला जातो.
झिका आणि सार्स यांसारख्या आजारांसाठी लस बनवणाऱ्या कंपन्यांना मोठं नुकसान सहन करावं लागलं होतं. तर दुसरीकडे फ्ल्यूसारख्या आजारांसाठी बनवण्यात आलेल्या लशींचा व्यवसाय अब्जावधींचा आहे. अशा स्थितीत जर कोरोना एखाद्या फ्लूप्रमाणेच राहिला आणि दरवर्षी लस टोचून घेणं आवश्यक असलं, तर मग कंपन्यांना फायदा होऊ शकतो. मात्र, जी कंपनी सर्वाधिक परिणामकारक लस बनवेल, त्यांच्यासाठीच हे फायद्याचं ठरेल.
आजच्या घडीला सर्वांत स्वस्त लस कोणती आहे?
काही कंपन्या जागतिक आरोग्याच्या या संकटसमयी फायदा कमावत असल्याचं दाखवू पाहत नाहीत. विशेषत: बाहेरून इतका निधी मिळाल्यानंतर.
अमेरिकन औषध निर्माती कंपनी जॉन्सन अँड जॉन्सन आणि ब्रिटनच्या अॅस्ट्राझेनका ऑक्सफोर्ड यूनिव्हर्सिटीस्थित बायटेक कंपनीत एकत्र काम करत आहेत.
या कंपन्यांनी शब्द दिलाय की, ते लशीची किंमत तितकीच ठेवतील, जेवढी आवश्यक आहे.
आजच्या घडीला अॅस्ट्राझेनकाची लस सर्वांत स्वस्त म्हणजे प्रति डोस चार डॉलर (300 रुपये) मध्ये उपलब्ध होईल.
मॉडर्ना लहानशी बायोटेक्नोलॉजी कंपनी आहे. ही कंपनी अनेक वर्षांपासून RNA लशीमागील तांत्रिक बाबींवर काम करतेय. या कंपनीच्या प्रति डोसची किंमत 37 डॉलर म्हणजे 2,000 रुपयांहून अधिक आहे. कंपनीच्या भागधारकांनाही लाभ देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
अर्थात, या किंमती अंतिम करण्यात आल्यात असंही नाही.
कंपन्या केवळ फायद्याचं पाहतील का?
सर्वसामान्यपणे औषध कंपन्या वेगवेगळ्या देशात वेगवेगळे शुल्क आकारतात. हे त्या त्या देशांच्या सरकारांवर अवलंबून असतं. अॅस्ट्राझेनका कंपनीने केवळ या आरोग्य संकटादरम्यान किंमती कमी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कदाचित पुढच्या वर्षी या लशीच्या किंमतीही वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे सर्व कोरोनाच्या संकटावर आधारित आहे.
बार्कलेजमध्ये युरोपियन फार्मास्युटिकलचे प्रमुख एमिली फिल्ड म्हणतात, आता श्रीमंत देशांची सरकारं अधिक किंमती देतील. ते लशीबाबत इतके उतावीळ आहेत की, कसंही करून त्यांना या आरोग्यसंकटाचा अंत करायचाय.
त्या पुढे म्हणतात, "पुढच्या वर्षी जसजशा बाजारात विविध लशी येतील, तसतशी स्पर्धा वाढेल आणि लशीचे भावही कमी होत जातील."
एअरफिनिटीचे चीफ एक्झिक्युटिव्ह बेक हॅनसेन म्हणतात, "आपण खासगी कंपन्यांकडून आशा ठेवायला नको आणि त्यातही ज्या कंपन्या लहान आहेत, दुसरं कुठलंच उत्पादन नाहीय, त्यांच्याकडून तर नकोच. या कंपन्या फायद्याविना लशी विकतील, अशी आशा ठेवायला नको."
लहान कंपन्या भविष्यात यशस्वी व्हाव्यात असं वाटत असेल, तर त्यांना जाणीवपूर्वक पाठबळ दिला पाहिजे, असंही त्या सांगतात.
मात्र, काही मानवातावादी कार्यकर्त्यांचं मत वेगळं आहे. सध्याचं आरोग्य संकट पाहता, ही नेहमीसारखं व्यापाराची वेळ नाही, असं त्यांचं म्हणणं आहे.
कंपन्यांनी लसनिर्मितीचं तंत्र सर्वांना सांगितलं पाहिजे?
सध्याची स्थिती पाहता लस बनवणाऱ्या कंपन्यांनी इतर देशांना लसनिर्मितीचं तंत्र सांगितलं पाहिजे, असंही काही लोकांचं म्हणणं आहे. जेणेकरून भारत आणि दक्षिण आफ्रिकेसारखे देश आपापल्या देशांमध्य डोस तयार करतील.
मेडीसीन्स लॉ अँड पॉलिसीच्या एलेन टी होएन म्हणतात, पब्लिक फंडिंग मिळवण्यासाठी ही एक अट असायला हवी.
"जेव्हा कोरोनाची सुरुवात झाली, तेव्हा मोठ्या कंपन्यांनी लशीबाबत तितकी उत्सुकता दाखवली नव्हती. मात्र, जेव्हा सरकार आणि संस्थांनी निधीसाठी पुढाकार घेतला, तेव्हा या कंपन्यांनी लशीवर काम करण्यास सुरुवात केली. लशीचा फायदा मिळवण्याचा अधिकार त्यांच्याकडे का असावा, हे कंपन्यांना समजत नाही. पुढे मग हे संशोधन या कंपन्यांची खासगी मालमत्ता बनून जाते," असंही होएन म्हणतात.
बौद्धिक स्तरावर काहीजण लशीबाबत काही गोष्टी एकमेकांना सांगत आहेत. मात्र, हा काही पर्याय नाहीय.
फार्मा कंपन्या मोठा फायदा कमावतील?
सरकारने कोरोना लशीच्या खरेदीचं आधीच जाहीर केल्यानं या कंपन्या मोठ्य प्रमाणात लशी तयार करतील, यात शंका नाही. ज्या कंपन्या श्रीमंत देशांना लशी विकतील, त्यांच्याकडून चांगल्या नफ्याचीही अपेक्षा करतील.
लशीचे डोस दिल्यानंतर ती किती परिणामकारक ठरतेय, यावरच पुढील वितरण आणि विक्री अवलंबून असेल. त्यामुळे एमिली फिल्ड सांगतात, लशीद्वारे फायदा कमावणं सुद्धा 'अस्थिरच' आहे.
जरी कुणी लशीचं तंत्र एकमेकांना सांगत नसले, तरी देशात एकाचवेळी जवळपास 50 प्रकारच्या लशी बनवल्या जात आहेत आणि क्लिनिकल ट्रायलच्या प्रक्रियेत सुद्धा पोहोचल्या आहेत.
एमिली फिल्ड म्हणतात, "आगामी दोन वर्षांत असं होऊ शकतं की, बाजारात 20 लशी असतील. अशावेळी मग लशीद्वारे जास्त किंमत वसूल करणं कंपन्यांनाही शक्य होणार नाही."
सरकारने कोरोनापासून सुरक्षेसाठी, बचावासाठी ज्याप्रकारे रणनिती बनवल्या आहेत, तशाच आता लशीसाठीही बनवायला हव्यात, असं एअरफिनिटीच्या हॅनसॅन म्हणतात.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)