You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना : ... म्हणून 'या' ठिकाणचे नागरिक शंभर वर्षं जगतातच
- Author, डेव्हीड रॉबसन
- Role, बीबीसी फ्यूचर
सध्या कोरोना व्हायरसमुळे जगभरात अनेक जणांना जीव गमवावा लागत आहे. फक्त कोव्हिड-19च नव्हे तर इतर अनेक आजारांमुळे लोकांचा बळी जाताना दिसतो.
अशा स्थितीतही काहीजण 'जीवेत शरदः शतम' म्हणजेच शंभर वर्ष जगण्याचा आशीर्वाद देतात. पण त्यांचा आशीर्वाद खरा ठरण्यासाठी, मानवाने शंभर किंवा त्यापेक्षा जास्त वर्षे जगण्यासाठी काय करायला हवं?
जगात अशी काही ठिकाणं आहेत, जिथल्या नागरिकांचं सरासरी वय जगभरातील इतर भागापेक्षा जास्त आहे. त्यामुळे वरील प्रश्नांचं उत्तरसुद्धा आपल्याला याच परिसरातून मिळू शकतं. या ठिकाणी राहणाऱ्या लोकांचं सरासरी आयुष्य 90 किंवा त्यापेक्षा जास्त आहे.
पण या लोकांच्या दीर्घायुष्याचं रहस्य आहे तरी काय? आणि अशी कोणती ठिकाणी आहेत, जिथल्या लोकांचं वय जास्त आहे?
मध्य अमेरिकेतील कोस्टारिका देशातील निकोया, इटलीमध्ये सार्डिनिया, युनानमधील इकारिया, जपानमध्ये ओकिनावा आणि अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील लोंबा लिंडा या 6 ठिकाणांना शास्त्रज्ञ ब्ल्यू झोन संबोधतात.
या परिसरात राहणाऱ्या लोकांचं सरासरी वय जगातील इतर भागापेक्षा जास्त आहे. या सहा ठिकाणी राहणाऱ्या लोकांची वयाची शंभरी पार करण्याची शक्यता जास्त असते.
- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोनावरची लस बनवण्याचं काम कुठवर आलं? येत्या सप्टेंबरपर्यंत लस येणार?
- वाचा- कोरोना व्हायरसची लक्षणं टाळायची असतील तर मास्कचा असा होईल उपयोग
इटलीतील संसर्गजन्य रोग तज्ज्ञ गियान्नी पेस आणि बेल्जियमचे लोकसंख्या तज्ज्ञ मायकल पाऊलेन यांनीच सर्वप्रथम या ठिकाणांना ब्लू झोन असं संबोधलं होतं.
त्यानंतर पेस आणि पाऊलेन यांनी अमेरिकेतील डॅन ब्यूटेनर या पत्रकारासोबत मिळून या सहा ठिकाणांबाबत एक पुस्तक लिहिलं होतं.
दीर्घायुष्याचं वरदान
डॅन ब्यूटेनर हे आपलं पुस्तक लिहिण्यासाठी काही संशोधन करत होते. त्यावेळी त्यांना ब्ल्यू झोन परिसरातील लोकांच्या आयुष्यात दैनंदिन जीवनातील अनेक वैशिष्ट्ये आढळली.
यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे आहार. ब्ल्यू झोन परिसरातील लोकांचा आहार अतिशय कमी आहे. उदाहरणार्थ जपानच्या ओकिनावा परिसरातील 80% लोक पोट भरल्यानंतर खाणं थांबवतात.
शास्त्रज्ञांच्या मते, आपण आपल्या आहारातील दहा टक्के कॅलरी कमी केली, तर त्यामुळे आपला वय वाढीचा वेग मंदावतो.
हॉर्वर्ड युनिव्हर्सिटीचे गुणसूत्रतज्ज्ञ डी. गोविंदराजू सांगतात, कमी अन्न खाल्ल्यामुळे आपल्या DNAमध्ये अपायकारक बदल होत नाहीत.
दुसरी गोष्ट म्हणजे, ब्ल्यू झोनमध्ये राहणारे लोक शाकाहारी जेवणाला जास्त प्राधान्य देतात. यामुळे चयापचय क्रियेत सकारात्मक बदल होतात.
अध्यात्मिक जीवनपद्धती
आहाराच्या सवयीप्रमाणेच ब्ल्यू झोनमध्ये राहणाऱ्या लोकांमध्ये सामाजिक जीवनाचंही वेगळं महत्त्व आहे.
या सर्व ठिकाणचे नागरिक एकत्रित पद्धतीने राहतात. त्यांच्यातील नातेसंबंध अतिशय मजबूत आहेत. मजबूत सामाजिक संबंधांमुळे आपला तणाव कमी होण्यास मदत होते, ही गोष्ट संशोधनातूनही सिद्ध झाली आहे.
मैत्री किंवा इतर सामाजिक नातेसंबंध आपल्या मानसिक आणि शारिरीक आरोग्यासाठी फायदेशीर मानले जातात.
आहार आणि राहणीमानाप्रमाणेच नातेसंबंधांमुळे आपलं आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होते.
100 वर्षांपेक्षा जास्त आयुष्य जगण्यासाठी धार्मिक श्रद्धेची भूमिकाही अतिशय महत्त्वाची आहे. ब्लू झोन परिसरात राहणारे बहुतांश लोक धार्मिक श्रद्धेवर विश्वास ठेवणारे आहेत.
उदाहरणार्थ, कॅलिफोर्नियाच्या लोमा लिंडा परिसरात राहणारे नागरिक सेवंथ डे अॅडव्हेंटीस्ट चर्चचे अनुयायी आहेत. तर कोस्टारिकाच्या निकोया आणि इटलीच्या सार्डिनिया भागात राहणारे लोक कॅथलिक ख्रिश्चन आहेत. ग्रीसच्या इकारिया बेटांवर राहणाऱ्या लोकांची ग्रीक ऑर्थोडॉक्स चर्चवर श्रद्धा आहे.
डॅन ब्यूटेनर यांनी ब्ल्यू झोनमध्ये तब्बल 250 लोकांशी बातचीत केली. हे सर्व लोक कोणत्या ना कोणत्या अध्यात्मिक गटाशी संबंधित होते, असं त्यांनी आपल्या पुस्तकात लिहिलं आहे.
धार्मिक श्रद्धा आपल्या जीवनात महत्त्वाची भूमिका बजावू शकते. तुम्ही एखाद्या समस्येने त्रस्त असाल, तर आपण धार्मिकतेचा मार्ग निवडू शकता. यामुळे आपलं वय पाच वर्षांनी वाढू शकतं.
चहा-कॉफी यांचं सेवन
याशिवाय, ब्ल्यू झोन परिसरात राहणाऱ्या लोकांना दिवसात अनेकवेळा चहा किंवा कॉफी पिण्याची सवय आहे. जाणकारांच्या मते, दिवसभरात या उष्ण पेयांच्या सेवनामुळे हृद् यविकाराचा धोका कमी होतो. यामध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम, नियासीन आणि व्हिटॅमिन-ई यांच्यासारखे घटक आढळून येतात.
या पेय पदार्थांच्या मदतीने टाईप-2 डायबेटिस रोखता येऊ शकतो. यामुळे आपली पचनशक्ती चांगली होते.
याच्या जोडीने आहारात कमी कॅलरी असलेलं अन्न, फळं आणि भाज्यांचं मुबलक प्रमाण असेल तर तुम्ही एक आदर्श आहार घेत आहात.
जपानच्या ओकिनावा बेटावरचे लोक रताळी आणि टरबूज मोठ्या प्रमाणात खातात.
रताळ्यांमध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि ई मुबलक प्रमाणात आढळून येतं. यात पोटॅशियमसुद्धा मोठ्या प्रमाणात असतं. यामुळे रक्तदाब कमी होण्यास मदत होते. तसंच रताळ्यांमध्ये फायबरसुद्धा जास्त प्रमाणात असतं, त्यामुळे आपलं पोट साफ राहण्यास मदत होते.
नयनरम्य परिसर
जगभरात ब्ल्यू झोन म्हणून ओळखले जाणारे परिसर अतिशय नयनरम्य आहेत.
इटलीतील सार्डिनिया परिसर एक पर्वती प्रदेश आहे. इथं शेती करणाऱ्यांना सतत डोंगरांवर चढणं-उतरणं करावं लागतं. यामुळे त्यांचा व्यायामसुद्धा होतो.
तसंच ग्रीसच्या इकारियामध्ये सौम्य रेडिओअॅक्टिव्हिटी असल्याचं आढळून आलं आहे. हे रेडिअॅक्टिव्ह घटक या बेटावरील झऱ्याच्या परिसरात आढळून येतात. स्थानिक नागरिक या झऱ्यांना अमृत झरे असे संबोधतात.
याचप्रकारे कॅलिफोर्नियातील लोमा लिंडा परिसरातही सौम्य लहरी असल्याचं सांगितलं जातं. पण याबाबत जास्त माहिती अद्याप उपलब्ध होऊ शकलेली नाही.
संयमी दिनचर्या
एकूणच, ब्ल्यू झोनमध्ये राहणाऱ्या लोकांच्या दीर्घायुष्याचं ठराविक असं एक कारण नसून अनेक कारणांमुळे त्यांना हे वरदान प्राप्त झालं आहे.
फळ आणि भाज्यांनी युक्त असं अन्न विशिष्ट प्रमाणात घेणं, नियमितपणे व्यायाम, कॉफी, संकटकाळात अध्यात्मिक भावनेला शरण जाणं, अशा विविध कारणांमुळे ब्ल्यू झोनमध्ये राहणाऱ्या लोकांचं वय वाढण्यास मदत होते. तुम्हीसुद्धा अशा प्रकारच्या सवयी लावून तुमचं जीवन दीर्घायुषी बनवू शकता.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)