You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
तारुण्य टिकवण्यासाठी जपानी लोक 'हा' पदार्थ खातात
- Author, एरिका होबर्ट
- Role, बीबीसी ट्रॅव्हल
माझी आई दररोज एक खास पदार्थ तयार करते. तो दिसायला आणि चाखायला किळस येते असं अनेक लोक म्हणतील.
जपानमध्ये आंबवलेल्या सोयाबीनपासून नट्टो हा पदार्थ तयार केला जातो. अमोनियासारखा त्याचा वास आणि त्याचं कफासारखं चिकटसं दिसणं, हा पदार्थ खाऊन मोठं झालेल्या लोकांनाही आवडत नाही.
2017 साली जपानमधील निफ्टी या इंटरनेट पुरवणाऱ्या कंपनीने सर्वेक्षण केलं होतं. त्यात 62 टक्के लोकांना हा पदार्थ आवडीने खात असल्याचं दिसलं तर 13 टक्के याचे फायदे माहिती असूनही नट्टोला हात लावत नव्हते.
लंडन कुकिंग स्कूल चालवणाऱ्या जपानी शेफ युकी गोमी म्हणतात, नट्टोचा वास फारच घाण असतो. त्याचा वास टाळता येत नाही. पण तरीही माझ्या फ्रिजमध्ये नट्टो नेहमी असतं.
घराघरात चीज आणि दही असावं त्यापद्धतीने गोमीच्या घरात नट्टो आढळतं.
जपानचं सुपरफूड
नट्टो हे एक सुपरफूड आहे असं जपानी लोक मानतात. त्यामुळे रक्ताभिसरण सुधारतं आणि हृद्यरोगाचं प्रमाण कमी होतं असं त्यांना वाटतं.
या देशात वयस्कर लोक जास्त आहेत. त्यांच्या दीर्घायुष्यात नट्टोचा वाटा अशल्याचं मानलं जातं.
नट्टोमुळे माझं रक्त 'सारा सारा' म्हणजे (पातळ) राहातं असं आई म्हणते. जपानी वृत्तवाहिनी सोरान्यूज 24ने तर रोज एक पाकिट नट्टो खाल्ल्यास मृत्यूही दूर राहातो असं म्हटलं आहे.
तोहोकू विद्यापीठातील प्राध्यापक हितोशी शिराकावा यांच्यामते हा दावा खरा अशू शकतो.
शिराकावा त्यासाठी ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या निबंधाचा दाखला देतात. टोकियोच्या नॅशनल कॅन्सर सेंटरच्या संशोधकांनी हे संशोधन केले होते. पुरुष असो वा स्त्री जे लोक नट्टोसारखे सोयाबीनचे पदार्थ खातात त्यांना हृद्यविकाराचा धक्का बसण्याची शक्यता 10 टक्के कमी असते असं त्यात आढळलं होतं.
शिराकावा म्हणतात, सोयाबीनवर किण्वन प्रक्रिया करताना त्यातील पोषणमुल्यं नष्ट होण्याची शक्यता कमी असते. त्यामुळेच नट्टो खाणं आणि हृद्यसोरागाचे प्रमाम कमीहोणे यांचा संबंध असल्याचं समजलं जातं.
भरपूर पोषणमूल्यं
नट्टोमध्ये भऱपूर प्रमाणात प्रथिनं, लोह आणि तंतूमय पदार्थ म्हणजे फायबर्स असतात. त्यामुळे रक्तदाब आणि वजनावर सकारात्मक परिणाम होतो. तारुण्य टिकायलाही यामुळे मदत होते.
जपान सरकारने निश्चित केलेली व्हीटॅमिन के ची पातळी (प्रत्येक माणसाला दिवसभरात आवश्यक असलेलली पातळी) 40-50 ग्रॅम नट्टो खाल्ल्यावर पूर्ण होते. त्यामुळे ऑस्टिओपोरोसिसला दूर ठेवण्यासाठी मदत होते.
नट्टोमध्ये व्हीटॅमिन ब-6, व्हीटॅमिन ई मोठ्या प्रमाणात असतं त्यामुळे त्वचेवर सुरकुत्या पडत नाहीत.
हे आंबवलेले सोयाबीन जपानी खाद्यसंस्कृतीत गेली अनेक शतके आहेत. तेव्हा याच्या पोषणविषयक फायद्यांबद्दल फारशी माहितीही नव्हती.
कॅलिफोर्नियामधील क्लेरमॉन्टच्या पोमोना कॉलेजमध्ये जपानी इतिहास शिकवणारे डॉ. सॅम्युएल यामाशिता यांच्यामते हा पदार्थ इ.स. 710 ते 784 मध्ये असलेल्या नारा काळात चीनमधून जपानमध्ये आलं.
कामाकुरा काळात (इस. 1192-1333) अभिजात वर्ग, लढवय्यांमध्ये हा पदार्थ लोकप्रिय झाला असं इतिहास सांगतो.
मुरोमोची काळात शाकाहारी पदार्थांमध्ये टोफूबरोबर हा पदार्थ खाल्ला जाऊ लागला तर इडोकाळात त्याला महत्त्वाचा पदार्थ म्हणून स्थान मिळालं आणि तो घराघरात बनवला जाऊ लागला.
नट्टो कसं तयार करतात?
पूर्वी नट्टो बनवण्यासाठी सोयाबीन पाण्यात भिजवलं जायचं. उकळून त्यात बॅसिलस सबटिलिस बॅक्टेरिया मिसळले जायचे. मग गवत गुंडाळून चार दिवस ठेवलं जायचं. हा काळ तापमान आणि ऋतूनुसार बदलतो.
आजकाल नट्टो बनवण्यासाठी एवढी मेहनत करावी लागत नाही. संपूर्ण जपानमध्ये सूपरमार्केटमध्ये ते सहज मिळतं.
नट्टोचे तीन कंटेनरचा सेट 100 ते 300 येन म्हणजे 0.75 पौंड ते 2.25 पौंडाला मिळतो.
प्रत्येक कंटेनरमध्ये एका वेळेस पुरेल एवढं नट्टो, सोया सॉस आणि आणि तिखट चटणीचं पाकिट असतं.
झटपट जेवण तयार
नट्टो तयार करण्यासाठी हे तिन्ही घटक एकत्र करायचे आणि चिकटशा या मिश्रणाला भाताच्या बाऊलमध्ये घ्यायचं. मग कांद्याचे तुकडे, अंडं घालून सजवायचं. झालं...
जपानमध्ये नट्टो सकाळी नाश्त्याला खाल्लं जातं. माझी आई फार काही नट्टोप्रेमी नाही पण पौष्टीक आहार समजून रोज सकाळी एक वाडगा नट्टो खाते.
अकेमी फुकुता टोकियामध्ये ज्वेलरीच्या दुकानात सेल्सगर्ल आहे. आठवड्यातून बऱ्याचदा ती नट्टो खाते कारण नट्टो पौष्टिक आहे असं तिला वाटतं आणि तिला त्याची चवही आवडते.
गोमी आपल्या चार वर्षांच्या मुलीच्या रात्रीच्या जेवणासाठी नट्टो तयार करतात. कामात व्यग्र असणाऱ्या आयांसाठी नट्टो ही देवानं दिलेली देणगीच आहे असं त्या मानतात.
मयोकी सुझुकी या पदार्थाचं भरपूर कौतुक करतात. त्या रोज दोन-तीनवेळा नट्टो खातात. नट्टो इन्फ्लुन्सर असं त्याचं करिअरच आहे. यूट्यूब, इंन्स्टाग्रामवर त्या नट्टो गर्ल म्हणून ओळखल्या जातात.
नट्टो डिश बनवणाऱ्या रेस्टोरंट्सना त्या प्रमोट करतात.
त्या नट्टो पास्ता, नट्टो पिझ्झा, नट्टो गेलाटोचे फोटो नेहमी पोस्ट करत असतात.
टोकियोच्या सेंडाई-या हॉटेलात 900 येन किंमतीपर्यंतचे नट्टोचे पदार्थ मिळतात. त्याचे प्रमुख हिदेफुमी आहेत. रेस्टोरंट चालवणारी ही त्यांची तिसरी पिढी आहे. 1961 साली ते सुरू झालं होतं. नट्टोचे डोनट्सही अथं मिळतात.
जपानच्या बाहेर नट्टो
सुपरफूड म्हटलं जात असलं तरी नट्टो जपानच्याबाहेर लोकप्रिय नाही. स्वीडनमध्ये 'डिस्गस्टिंग फूड म्युझियम'मध्ये त्याला ठेवण्यात आलं आहे. चिकटपणा आणि वासामुळे लोकांना ते आऴडत नसेल असं या म्युझियमचे संचालक आंद्रेस आरेन्स सांगतात. बॅक्टेरियामुळे याला मातीसारखा वास येतो.
गोमी म्हणतात, "पूर्वीपेक्षा आता मोठ्या संख्येने लोक जपानला जाऊ लागले आहेत. ते पारंपरिक जपानी सरायांमध्ये उतरतात. तिथं नट्टोचा नाष्टा मिळतो. ते आल्यावर नट्टो आवडलं नाही असं सांगतात. मी त्यांना दोष देत नाही. काही लोकांना ते आवडतं. काही लोक नट्टो फारच आवडल्याचं सांगतात. इकडे कोणत्या दुकानात मिळेल असं ते विचारतात."
जगभरातले शेफ नट्टो करायला लागतील अशी त्यांना अपेक्षा आहे. "नट्टोची वेळ नक्की येईल", असं त्या म्हणतात.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)