You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
फाळणीत वेगळे झालेले भाऊ जेव्हा युद्धात एकमेकांसमोर उभे ठाकतात...
- Author, उमर दराज नंगियाना
- Role, बीबीसी उर्दू, लाहोर
71 वर्षांआधी ग्रॅबिएल जोसेफ यांनी आपलं खुशपूर सोडलं तेव्हा ते फक्त 22 वर्षांचे होते. नोकरी शोधण्यासाठी घराबाहेर पडलेले ग्रॅबिएल त्यानंतर कधीच घरी परतले नाहीत. मृत्यूआधी फक्त दोनदा त्यांनी आपल्या कुटुंबीयांची भेट घेतली होती. महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरापासून फक्त 100 किमी दूर असलेल्या अमृतसरला ते राहत होते.
इतकंच नाही तर ग्रॅबिएल यांनी दोन युद्धांमध्ये भाग घेतला. एकदा तर त्यांचा सामना दोन वर्षं मोठ्या असलेल्या त्यांच्या भावाशीही झाला. दोघंही भाऊ दोन वेगवेगळ्या देशाच्या लष्करी सेवेत होते.
तत्कालीन लायलपूर आणि आता फैसलाबाद (पाकिस्तान) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्ह्यात असलेलं खूशपूर एक छोटंसं गाव आहे. तिथं विसाव्या शतकात बेल्जिअममधून काही मिशनरी आल्या होत्या.
तिथं एक मोठं चर्च बांधलं होतं जे आजही तसंच आहे आणि मुलांची शाळाही तशीच दिमाखात उभी आहे.
गॅब्रिएल जोसेफ यांचं कुटुंब तिथं येऊन वसलं होतं आणि या शाळेतून सुरुवातीचं शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांनी आणि त्यांच्या काही मित्रांनी नोकरी शोधण्याचा विचार केला होता. त्यानंतर ते चालता-चालता अमृतसरला पोहोचले. तिथं काही नातेवाईकांच्या सल्ल्यानं ते भारतीय लष्करात दाखल झाले.
तिथं लायलपूरमध्ये गॅब्रिएल पेक्षा दोन वर्षं मोठे असलेले त्यांचे भाऊ राफेल जॉन आधीपासूनच लष्कराच्या सेवेत होते. गॅब्रिएलनी विचार केला की अमृतसर घरापासून फार लांब नाही, त्यामुळे येणं-जाणं सुरू राहील.
हे सगळं सुरू असताना एक अकल्पित अशी घटना घडली. 1947मध्ये ऑगस्टच्या 15 तारखेला भारताची फाळणी झाली. भारत आणि पाकिस्तान हे दोन नवीन देश तयार झाले. त्यावेळचं लायलपूर आणि सध्याचं फैसलाबाद पाकिस्तानात गेलं आणि अमृतसर भारतात राहिलं.
राफेल आणि कुटुंबीय पाकिस्तानात तर गॅब्रिएल भारतातच राहिले. राफेल यांची मुलगी एस्टिला जॉन यांनी बीबीसीला दोन्ही भावांची कहाणी सांगितली. त्या सांगतात की, फाळणीमुळे कुटुंबापासून आपली ताटातूट झाली आहे याचा अंदाज सुरुवातीला गॅब्रिएल यांना आला नाही.
64 वर्षीय एस्टिला सध्या लाहोर शहरात राहतात. त्या सांगतात की, त्यांच्या घरच्यांना असं वाटायचं की गॅब्रिएल यांना पाकिस्तानात येण्या जाण्यासाठी काही अडचणी येणार नाहीत.
1978 मध्ये झाली पुतणीशी भेट
ही ताटातूट टळली असती, पण दोन भावांची लष्कराची नोकरी मध्ये आली. त्या सांगतात, "मी त्यांना विचारलं की तुम्ही घरी परत का आले नाही तेव्हा ते म्हणाले की, आम्हाला माहिती नव्हतं की फाळणी होईल. आम्हाला वाटत होतं की ही अफवा आहे. कुणाचाच त्यावर विश्वास बसत नव्हता."
एस्टिला यांची आपल्या काकांशी पहिली भेट 1978 मध्ये झाली. तेव्हा त्यांना भेटण्यासाठी एस्टिला पहिल्यांदा भारतात आल्या. तोपर्यंत त्यांची भेट फक्त फोटो, पत्र किंवा घरातल्या ज्येष्ठ व्यक्तींच्या माध्यमातूनच व्हायची.
फाळणीनंतर एक वर्षांतच भारत आणि पाकिस्तान यांच्यात पहिलं युद्ध झालं. दोघंही भाऊ या युद्धात आपापल्या देशाकडून लढायला उभे होते. एस्टिला सांगतात की त्यावेळी त्यांचे आईवडील खूप काळजीत असायचे.
1960 मध्ये वडिलांच्या आग्रहाखातर गॅब्रिएल यांनी सैन्यातून राजीनामा दिला. पाच वर्षांनंतर भारत-पाकिस्तान यांच्यात दुसऱ्यांदा युद्ध झालं, तेव्हा त्यात भाग घेण्यासाठी त्यांना पुन्हा पाचारण करण्यात आलं.
युद्धाबाबत बोलणं कुटुंबीयांना आवडायचं नाही
एस्टिला सांगतात, "काहीही होऊ शकत होतं. दोघांपैकी एकाचा मृत्यू होण्याची शक्यता होती. मला आठवतं की हा विचार करूनच माझे आजोबा अक्षरश: हंबरडा फोडायचे."
परंतू नशिबानं राफेल शारीरिक दृष्ट्या सक्षम नसल्यानं त्यांना घरी परत पाठवलं.
त्यांच्या काकांनी 1971 च्या युद्धात भाग घेतला की नाही याबद्दल एस्टिला यांना नक्की माहिती नाही, कारण त्यांना याविषयी बोलणं आवडायचं नाही आणि आम्ही त्यांना विचारायची हिंमत केली नाही.
त्या सांगतात,"युद्धाबद्दल बोलणं हे आमच्यासाठी अतिशय वेदनादायी होतं. पण त्यांनी एस्टिलाला एकदा सांगितलं की 1947 मध्ये पहिल्यांदा जेव्हा ख्रिसमसचा सण आला तेव्हा ते आपल्या इतर साथीदारांबरोबर घरी जायला निघाले तेव्हा त्यांनाही वाटलं की आपणही कुटुंबीयांना भेटावं."
एस्टिला पुढे सांगतात, "मात्र आता दोन देश निर्माण झाले होते आणि त्यांचं घर सीमेवर होतं. त्यांनी बरेच प्रयत्न केले, पण त्यांना यश आलं नाही."
केवळ पत्राद्वारेच गप्पा
लष्करात असल्यामुळे ग्रॅबिएल पाकिस्तानात येऊ शकत नव्हते आणि राफेलही भारतात जाऊ शकत नव्हते. याच दरम्यान दोन्ही भावाचं लग्नही झालं. तेव्हाही ते एकमेकांना भेटू शकले नाहीत. राफेल यांचं लग्न 1949 मध्ये झालं त्यानंतर काही काळातच ग्रॅबिएल यांचंही भारतात लग्न झालं.
एस्टिला यांच्यामते, "माझे काका जिथं राहतात तिथं सिस्टर्सची एक शाळा होती. तिथंच माझी काकी शिक्षिका होती. सिस्टर्सची अशी इच्छा होती की माझ्या काकीचं लग्न एखाद्या चांगल्या मुलाशी व्हावं. त्यांनी माझ्या काकांसमोर लग्नाचा प्रस्ताव मांडला तेव्हा काकांनी त्याला होकार दिला."
त्या दिवसांत गॅब्रिएल आपल्या भावाबहिणींबरोबर पत्रांच्या माध्यमातून संपर्कात होते. काही काळानंतर जेव्हा खुशपूर आणि अमृतसर या दोन्ही भागात सार्वजनिक टेलिफोन केंद्र उघडली तेव्हा त्यांना एकमेकांचा आवाज ऐकण्याची संधी मिळाली.
परंतू गॅब्रिएल लष्कराच्या सेवेत असल्यामुळे जास्त फोन करू शकले नाहीत, असं एस्टिलानं सांगितात. "त्यांना विचारणा व्हायची की पाकिस्तानहून तुम्हाला इतके फोन का येतात?"
50 वर्षांचे असताना पोहोचले घरी
70 च्या दशकात लष्करातून निवृत्ती घेतल्यानंतर पहिल्यांदा ते पाकिस्तानातल्या वडिलोपार्जित घरी गेले. ते घर त्यांनी 30 वर्षांआधी सोडलं होतं. 19 वर्षांचा तो मुलगा आता 50 वर्षांचा माणूस झाला होता.
त्यांचे आईवडील त्यांना एकदा तरी पाहण्याची इच्छा मनात ठेवून काही वर्षांआधीच मरण पावले होते. गॅब्रिएल यांच्या लग्नानंतर त्यांचे आईवडील फक्त एकदाच त्यांना भेटायला भारतात येऊ शकले होते. एस्टिला सांगतात, "त्यानंतर ते व्हिसासाठी रांगेत उभं राहण्याच्या स्थितीतही नव्हते. फक्त आपल्या मुलाची आठवण काढत ते निघून गेले."
गॅब्रिएल आपल्या आईवडिलांचं अंतिम दर्शन घ्यायला सुद्धा जाऊ शकले नाहीत. एस्टिला सांगतात की ते जेव्हा घरी आले तेव्हा एखादा सण असल्यासारखं वातावरण होतं. गाव सजवलं होतं, ढोल ताशांसह त्यांची मिरवणूक काढण्यात आली होती. ते आपलं घर पाहून अतिशय आनंदित झाले होते.
82 वर्षांचे असताना गॅब्रिएल यांनी आपल्या भावाच्या निधनानंतर दोन वर्षांनी म्हणजेच 2014 मध्ये जगाचा निरोप घेतला. एस्टिला यांना दु:ख आहे की ते कुटुंबापासून वेगळे होऊन कायम एकटे राहिले.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)