पाकिस्तानात आलेल्या मलाला मूळ गावी जाणार का?

तालिबानी कट्टरवाद्यांविरोधातील मानवाधिकारी चळवळीचा चेहरा झालेली मलाला युसुफझाई हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पाकिस्तानला भेट देते आहे.

मुलींच्या शिक्षणासाठी अभियान चालवणाऱ्या मलालावर तालिबानी कट्टरवाद्यांनी 2012 मध्ये हल्ला केला होता. जीवघेण्या हल्ल्यातून वाचल्यानंतरही मलालानं मूलभूत मानवी हक्कांसाठीचं काम सुरूच ठेवलं. आता 20 वर्षांची मलाला मानवाधिकार चळवळीचं प्रतीक ठरली आहे.

मलाला पाकिस्तान भेटीदरम्यान पंतप्रधान शाहीद खाक्वान अब्बासी यांची भेट घेण्याची शक्यता आहे. विषयाची संवेदनशीलता लक्षात घेऊन या भेटीचा तपशील गोपनीय ठेवण्यात आल्याचं एएफपी वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे.

मलाला आपल्या पालकांसह इस्लामाबादमधील बेनझीर भुट्टो आंतरराष्ट्रीय विमानतळावर आल्याचा व्हीडिओ पाकिस्तानमधल्या वृत्तवाहिन्यांनी प्रसारित केला. मलालाच्या आगमनावेळी कडकोट सुरक्षाव्यवस्था पुरवण्यात आली होती.

मलालाचा दौरा चार दिवसांचा आहे. पालकांच्या बरोबरीनं मलाला फंड ग्रुपचे सहकारी सोबत असतील, असं स्थानिक प्रसारमाध्यमांनी म्हटलं आहे.

पाकिस्तानच्या वायव्य भागात असलेल्या स्वात प्रांतातील मूळ घरी मलाला जाणार का, याविषयी माहिती मिळू शकलेली नाही.

मलालावर हल्ला का झाला होता?

तालिबान राजवटीमध्ये सामान्य माणसाचं जीणं कसं असतं यासंदर्भात मलालानं अकराव्या वर्षीच बीबीसी उर्दू करता लेखन करण्यास सुरुवात केली. अर्थातच हे लिखाण तिच्या नावासह प्रसिद्ध होत नसे.

मुलींचं आणि पर्यायानं महिलांचं शिक्षण तसंच पाकिस्तानमधली लष्करी राजवटीची दडपशाही थांबावी यासाठी मलालानं लहान वयातच काम सुरू केलं होतं. मलाला प्रवास करत असलेल्या स्कूलबसवर हल्ला करण्यात आला होता. ती त्यावेळी 15 वर्षांची होती. मलालावरील हल्ल्यानं आंतरराष्ट्रीय समुदायाचं लक्ष वेधलं.

पाश्चिमात्य विचारसरणीला धार्जिणे विचार आणि पश्तून प्रांतात त्याच विचारांचा प्रसार केल्याबद्दल मलालावर हल्ला केल्याचं पाकिस्तानमधील तालिबाननं स्पष्ट केलं होतं.

या हल्ल्यात मलाला अतिशय गंभीर जखमी झाली. मेंदूला आलेली सूज रोखण्याकरता कवटीचा काही भाग काढावा लागला होता. पाकिस्तानमध्ये लष्करी रुग्णालयात आपात्कालीन विभागात मलालावर उपचार करण्यात आले. पुढच्या उपचारांसाठी मलालाला युके अर्थात इंग्लंडला स्थलांतरित करण्यात आलं. उपचारांची पूर्तता झाल्यानंतर मलाला आपल्या कुटुंबीयांसह इंग्लंडमध्येच राहते आहे.

मलालाचे कार्य

हल्ल्यातून पूर्णपणे सावरल्यानंतर मलालानं मुलांच्या शिक्षणासाठीचं काम सुरूच ठेवलं. वडील झियाउद्दीन यांच्या पाठिंब्यानं तिला मलाला फंडची स्थापना केली. प्रत्येक मुलीनं शिकावं आणि निर्भयपणे जगावं या उद्देशानं मलाला काम करते आहे.

2014 मध्ये शांततेसाठीचा नोबेल पटकावणारी ती सगळ्यात तरुण पुरस्कारविजेती ठरली. मलाला आणि भारतात लहान मुलांच्या हक्कांसाठी काम करणारे कैलाश सत्यार्थी यांना एकत्रितपणे त्यावर्षीचा नोबेल पुरस्कार देण्यात आला.

पुढचं शिक्षण सुरू असतानाच मलालानं आपल्या उपक्रमाचं काम सुरूच ठेवलं. गेल्यावर्षी तिनं ऑक्सफर्ड विद्यापीठात प्रवेश घेतला.

पाकिस्तान अजूनही असुरक्षित आहे का?

सुरक्षा यंत्रणांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांनंतरही पाकिस्तान तालिबान प्रांत आजही अस्थिर मानला जातो. शाळा तसंच कॉलेजांवर हल्ला करून शेकडोजणांचे बळी त्यांनी घेतले आहेत.

मलालानं अनेकदा स्वात प्रांतात परतण्याची इच्छा व्यक्त केली होती. हा प्रदेश म्हणजे भूतलावरचं नंदनवन आहे, अशा शब्दांत मलालानं स्वात खोऱ्याचं वर्णन केलं होतं. मला माझ्या देशातून खूप पाठिंबा मिळतो आहे, असं मलालानं नेटफ्लिक्सवरील मुलाखतीच्या कार्यक्रमात सांगितलं होतं. डेव्हिड लेटरमन यांनी या कार्यक्रमात मलालाची मुलाखत घेतली होती.

'बदलासाठी लोक उत्सुक आहेत. आपल्या देशात सुधारणा व्हावी असं त्यांना वाटतं आहे. मी यासाठी काम करतेच आहे पण मला तिथे जायचं आहे', अशा शब्दांत मलालानं आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.

पाकिस्तान धार्मिकदृष्ट्या कर्मठ देश मानला जातो. गेल्यावर्षी ऑक्सफर्ड विद्यापीठात जीन्स आणि हिल्सचे बूट परिधान केलेल्या मलालाचे फोटो प्रसिद्ध झाल्यानंतर तिच्यावर टीका झाली होती.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)