#Aadhar : आधारवरची तुमची वैयक्तिक माहिती खरंच सुरक्षित आहे का?

    • Author, प्रशांतो के रॉय
    • Role, बीबीसी हिंदीसाठी

बीबीसीच्या या 'आधार विशेष' लेखमालिकेमध्ये आम्ही 'आधार'शी संबंधित अनेक बाबी तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. एकूण चार लेख असलेल्या या लेखमालिकेमधला हा पहिला लेख आहे. या भागात 'आधार'शी संबंधित प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. नागरिकांच्या डिजिटल हक्कांवर काम करणारे निखिल पाहवा देत आहेत विविध प्रश्नांची उत्तर.

प्रश्न: कुणाजवळ माझा आधार क्रमांक असेल तर ती व्यक्ती माझ्याबद्दल कोणती माहिती मिळवू शकते?

उत्तर : तुमच्या आधार क्रमांकाचा वापर करून इतर कुणीही तुमच्याशी संबंधित माहिती मिळवू शकत नाही, असं सरकारनं सांगितलं आहे. म्हणजेच सरकार आणि तुम्ही सोडून इतर तिसऱ्या व्यक्तीकडे तुमचा आधार क्रमांक आणि नाव असेल तर युनिक आयडेंटिफिकेशन अॅथॉरिटी त्याला ते बरोबर आहे की चूक इतकंच सांगू शकते. तुमची इतर माहिती त्या व्यक्तीला मिळवता येऊ शकत नाही.

असं असलं तरी आधारच्या अंतर्गत ऑथेंटिकेशन प्लस ही सेवाही देण्यात येते. यात व्यक्तीचं नाव, वय आणि पत्ता ही माहिती नमूद केलेली असते. ही माहिती एखादी सेवा देणारी कंपनी तसंच पडताळणी करणारी संस्था मिळवू शकते.

खरंतर बँकिंग आणि इतर सेवांना त्यांच्या ग्राहकांबद्दल (KYC) अधिक जाणून घ्यायचं असतं. कंपन्यांना ग्राहक पडताळणीसाठी आधारच्या माध्यमातून माहिती मिळवणं सोपं झालं आहे. कारण त्यांना त्यांच्या ग्राहकांचं व्हेरिफिकेशन करणं आवश्यक असतं.

UIDAI ने (युनिक आयडेंटिफिकेशन अॅथॉरिटी ऑफ इंडिया) ई-केवायसीच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं पडताळणी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. वेबसाईटनुसार ही सेवा कॉर्पोरेट जगासाठी आहे. ज्यामध्ये कागदपत्रांशिवाय त्वरित एखाद्या व्यक्तीची पडताळणी होऊ शकते.

उदाहरणार्थ, एखादी मोबाईल कंपनी या माहितीच्या माध्यमातून ग्राहकाच्या पडताळणीची प्रक्रिया लगेच पूर्ण करू शकते. यापूर्वी मात्र कागदपत्रांच्या तपासणीत बराच वेळ लागत होता. आता UIDच्या डेटाबेसमधून आधार क्रमांक आणि फिंगरप्रिंटवरून तुमच्याविषयीची माहिती मिळू शकते.

इतर खासगी कंपन्या आधारवरून मिळालेल्या माहितीच्या आधारे स्वत:चा स्वतंत्र डेटाबेस तयार करतात. तुमच्या ओळखीला दुसऱ्या माहितीशी जोडू शकतात. याचा अर्थ कोणतीही कंपनी आधारपासून मिळालेल्या माहितीला तुमच्या इतर जसं की वय आणि पत्ता यांच्याशी जोडून ग्राहकांची पडताळणी करू शकते.

ई-कॉमर्स कंपन्यांवर आपण पैशांची जी देवाणघेवाण करतो त्याच्या आधारे तुमची विस्तृत प्रोफाईल तयार करता येऊ शकते. हा डेटाबेस मात्र UIDच्या नियंत्रणाबाहेर असेल. पण आधार क्रमांकाच्या माध्यमातून याची जोडणी करता येऊ शकते.

डिजिटल अधिकारांसाठीची लढाई लढणारे निखिल पाहवा म्हणतात, "आधार क्रमांकाच्या आधारे अधिक माहिती मिळवली जाऊ शकते."

निखिल आधार योजनेवर टीका करत आलेले आहेत.

पाहवा एक उदाहरण देतात. डिसेंबरमध्ये UIDAIनं एक क्रमांक ट्वीट केला होता. त्या क्रमांकावर तुम्ही एखादा आधार क्रमांक एसएमएस केल्यास ज्या बँक खात्याशी तो आधार क्रमांक जोडलेला असतो, त्या बँकेचं नाव समोर येतं. असं असलं तरी बँक खात्याचा क्रमांक दिसत नाही.

निखिल पाहवा सांगतात, "हा क्रमांक ट्वीट झाल्यानंतर अनेक लोकांना फोन आले. पलीकडून बोलणारी व्यक्ती स्वत:ला बँकेचा कर्मचारी सांगत असे. लोकांना फोनवर आलेला OTP तो विचारत असे आणि लोकांच्या खात्यातील पैसे परस्पर स्वत:च्या खात्यात वळवून घेत असे."

प्रश्न : कुणाजवळ माझा अर्धवट आधार क्रमांक असेल तरीही ती व्यक्ती माझ्याबद्दलची माहिती मिळवू शकते का?

उत्तर :एखाद्या व्यक्तीच्या हातात तुमच्या आधार क्रमांकातील किती आकडे लागलेत यावर ते अवलंबून असतं. पण फक्त काही आकड्यांच्या आधारेच ते तुमची माहिती मिळवू शकत नाही. पण त्या आकड्यांमध्ये दुसरे आकडे मिळवण्यासाठी ते नक्कीच प्रयत्न करू शकतात. कदाचित ते तुमच्या आधार क्रमांकाशी मॅच होऊ शकतात. असं झालं तर मग ते तुमच्या आधारमधील माहिती मिळवू शकतात.

प्रश्न : कुणाकडे माझा आधार क्रमांक असेल अथवा तो लीक झाला असेल तर ती व्यक्ती त्याचा दुरुपयोग करू शकते का? करू शकत असेल तर कसा?

उत्तर : नुसता आधार क्रमांक लीक होत असेल तर दुरुपयोग होऊ शकत नाही. पण सध्या मोबाईल कंपन्या आणि पुढे चालून बँकाही तुमच्या बायोमेट्रिक डेटाला आधार क्रमांकाशी जोडू शकतात.

ई-कॉमर्स कंपन्यांकडे तुमच्याशी संबंधित डेटाबेस असेल आणि त्यांना आधार क्रमांकही मिळत असेल तर ही माहिती लीक होऊन तुमच्यासाठी अडचण ठरू शकते. यामुळे तुमच्या वैयक्तिक माहितीला धोका निर्माण होतो. तुमच्याशी संबंधित माहितीच्या आधारे नागरिकांची एक मोठी प्रोफाईल तयार करता येऊ शकते. नंतर ही माहिती दुसऱ्यांना विकली जाऊ शकते. अथवा नागरिकांची माहिती श्रीमंतांना निशाणा बनवण्याच्या तयारीत असलेल्या गुन्हेगारांच्या हाती लागू शकते.

कोणत्याही वाईट यंत्रणेचा दुरुपयोग होऊ शकतो. जसं की पडताळणीसाठी तुमचा आधार क्रमांक मागणाऱ्या कोणत्याही सेवादात्याकडून तुमची माहिती लीक होऊ शकते.

निखिल पाहवा सांगतात, "आधार क्रमांक ही तुमची कायमची ओळख आहे. आधारला जसंजसं दुसऱ्या सेवांशी जोडलं जात आहे, त्यापासूनचे धोके आणखी वाढत आहेत. एका जागेपासून जरी डेटा चोरी करण्यात आला तरी तुमच्या ओळखीत त्रुटी निर्माण होतील. कारण एखाद्याच्या हातात तुमचा आधार क्रमांक लागला तर मग त्या व्यक्तीला तुमच्या OTP आणि फिंगरप्रिंटची गरज लागेल. या माध्यमातून ते तुमच्या बँक खात्याविषयी अथवा अन्य वैयक्तिक माहिती मिळवू शकतात."

असं असलं तरी सरकार नेहमी असं म्हणत आलंय की, कोणत्याही व्यक्तीच्या आधारशी जोडलेला डेटा एनक्रिप्टेड आहे आणि त्याला सुरक्षित ठेवण्यात आलं आहे. त्याला लीक करणाऱ्या आणि चोरणाऱ्या कुणाही व्यक्तीला दंड तसंच तुरुंगवासही भोगावा लागू शकतो.

प्रश्न : माझ्या आधार क्रमांकाला ऑनलाईन कंपन्या आणि रिटेल स्टोअरशी जोडणं किती सुरक्षित आहे?

उत्तर :हळूहळू सर्व ऑनलाईन कंपन्या त्वरित पडताळणी करण्यासाठी तुमचा आधार क्रमांक मागत आहेत. पण धोका यातील धोका असा आहे की आधारशी संबंधित माहितीच्या आधारे या कंपन्या एखादा नवीन स्वतंत्र असा डेटाबेस तयार करतील.

या कंपन्यांजवळ असलेली तुमची माहिती लीक झाली तर दुसऱ्या कंपन्या आधार क्रमांकाशिवायही तुमच्या मोबाईल क्रमांकाशी ती माहिती जोडून तुमचं प्रोफाईल तयार करू शकतात. जसं की टॅक्सी सेवा देणाऱ्या कंपन्या, मोबाईल अथवा वीज कंपन्या.

असं झालं तर तो तुमच्या खासगीपणासाठी मोठा धोका आहे. मोठ्या कंपन्यांमधून साधारणपणे अशा माहितीची चोरी होत नाही. पण अशा काही घटना झालेल्या आहेत.

जसं की मागील वर्षीच्या डिसेंबरमध्ये 'एअरटेल पेमेंट बँके'वर आधारशी संबंधित माहितीचा दुरुपयोग केल्याचा आरोप झाला होता. त्यानंतर UIDAIनं बँकेच्या आधारशी संबंधित e-KYC सेवांवर बंदी घातली होती. बँकेचे सीईओ शशी अरोरा यांना राजीनामा द्यावा लागला होता.

निखिल पाहवा यांच्यानुसार, "तुम्ही जितक्या सेवांना आधारशी जोडण्याचा प्रयत्न कराल, तितकी तुमची माहिती लीक होण्याचा धोका वाढेल."

असं असलं तरी UIDAIचा दावा आहे की, त्यांचा डेटाबेस इतर कोणत्याही डेटाबेससोबत जोडलेला नाही. तसंच त्यातील माहिती इतर कोणत्याही डेटाबेससोबत शेअर करण्यात आलेली नाही.

प्रश्न : मी विदेशी नागरिक असेल तर मलाही आधारची गरज आहे का?

उत्तर : तुम्ही भारतात काम करणारे विदेशी नागरिक असाल तर काही सेवांचा लाभ घेण्यासाठी तुम्ही आधार क्रमांक काढू शकता. कारण बऱ्याच सेवांसाठी आता आधार अनिवार्य करण्यात आलं आहे. असं असलं तरी याबाबत शेवटचा निर्णय सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या आधारवरील सुनावणीवेळी होईल. मोबाईल क्रमांक अथवा सिम घेण्यासाठी आधार अनिवार्य असेल की नाही तसंच बँक आणि क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी आधार गरजेचं असेल की नाही, अशा विविध विषयांवर निर्णय अपेक्षित आहे.

या सर्व बाबी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर अवलंबून असतील. सध्या तरी सुप्रीम कोर्टाने सर्व प्रकारच्या सेवा आधारशी जोडण्याला अनिश्चित कालावधीसाठी मुदत वाढ दिली आहे.

प्रश्न : अनिवासी भारतीय आणि मूळ भारतीय लोकांसाठी आधार किती गरजेचं आहे?

उत्तर : निखिल पाहवा सांगतात, "आधार नागरिकत्वाचं ओळखपत्र नाही. हा भारतात राहणाऱ्या लोकांचा क्रमांक आहे. विदेशात राहणारे भारतीय आधार क्रमांक घेऊ शकत नाही. घ्यायचं असल्यास त्यांना मागील वर्षी कमीतकमी 182 दिवस भारतात राहिल्याची अट पूर्ण करावी लागेल."

याचा अर्थ असा की, बँक खात्याच्या पडताळणीसाठी त्यांना आधार देणं अनिवार्य नाही. त्यांना सिम कार्ड आणि पॅनही आधारशी जोडण्याची गरज नाही.

प्रश्न : माझ्या आधारशी संबंधित माहिती एखादी सेवा देणारी कंपनी मागत असेल तर ते कायदेशीर असतं का?

उत्तर : सध्या तरी सर्वोच्च न्यायालयानं सर्व प्रकारच्या सेवांना आधारशी जोडण्याची मुदत अनिश्चित काळासाठी वाढवली आहे.

त्यामुळे सेवा देणाऱ्या कंपन्या तुम्हाला आधार मागत असेल तर ते कायदेशीर आहे. पण निखिल पाहवा यांच्या मते, "ही बाब योग्य नाही."

"सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतरही अनेक कंपन्या आधार संबंधित माहिती मागत आहेत. पण तुम्ही ही माहिती पुरवण्यासाठी त्यांना नकार देऊ शकता. मुख्य गोष्ट ही आहे की, कुणी तुम्हाला आधार क्रमांक अथवा बायोमेट्रिक डेटा मागत असेल तर तुम्ही त्याला नकार देऊ शकता. पण त्यामुळे एखादी कंपनी अथवा बँक तुम्हाला सेवा देण्याचं टाळू शकते," पाहवा सांगतात.

जसं की दूरसंचार कंपन्यांना दूरसंचार विभागानं नोटीसा पाठवल्या आहेत. सर्व मोबाईल क्रमांक आधारशी जोडा असं दूरसंचार कंपन्यांना सांगण्यात आलं आहे. लोकांची ओळख म्हणूनही बऱ्याचदा मोबाईल क्रमांक वापरले जातात. अनेक डिजिटल व्यवहार आणि मोबाईल वॉलेटमध्येही त्यांची गरज पडते. त्यामुळे त्यांची पडताळणी आणि आधारशी जोडणी करण्याची अट सरकारनं ठेवली आहे.

निखिल पाहवा सांगतात की, "मला वाटतं आधार अनिवार्य असायला नको. त्यात दिलेली माहिती बदलण्याचा पर्यायही उपलब्ध असायला हवा. आधारला कोणतीही बायोमेट्रिक ओळख जसं की फिंगरप्रिंट वैगेरेंशी जोडता कामा नये. आधार रद्द करण्याचाही अधिकार लोकांना द्यायला हवा."

UIDAIच्या वेबसाईटनुसार, सध्या तरी आधार रद्द करण्याचं कोणतही धोरण नाही. ज्यांच्या जवळ आधार आहे ते लोक त्यांच्या बायोमेट्रिकला UIDAIच्या वेबसाईटवरून लॉक अथवा अनलॉक करून सुरक्षित अथवा सार्वजनिक करू शकतात.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)