You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पकडौआ शादी : तरुणांचं अपहरण करून लग्न लावलं जातं तेव्हा...
- Author, दिव्या आर्य
- Role, बीबीसी प्रतिनिधी
कल्पना करा की तुम्ही एखादी तरुणी आहात आणि तुमचं लग्न जुळत नाहीये, तुमच्यासाठी आई-वडिलांनी खूप स्थळं शोधली पण हाती काहीच लागलं नाही. मग त्यांनी एका मुलाचं अपहरण केलं आणि त्याचं तुमच्याशी लग्न लावून दिलं!
या लग्नाला 'पकडौआ शादी' किंवा धरून आणलेल्या मुला सोबत लग्न असं म्हणतात. या लग्नात ना तुमची मर्जी विचारली जाते ना त्या मुलाची.
जेव्हा मला पाटण्यामध्ये BBCShe च्या कार्यक्रमात एका मुलीकडून पकडौआ शादीबद्दल कळलं तेव्हा माझा त्यावर प्रथम विश्वासच बसला नाही.
अशा गोष्टीसाठी एखादी मुलगी तयार कशी होऊ शकते?
लग्नानंतर जर त्या पुरुषानं तिला स्वीकारलं नाही तर?
जर रागाच्या भरातच त्या मुलीला घरी आणलं तर ते लग्न पुढे टिकेल का?
बिहारमध्ये 2017 या एका वर्षात लग्नासाठी अंदाजे 3,500 अपहरण झाली असं पोलिसांचं म्हणणं आहे.
तर मी ही पाटण्याच्या बाहेर पडले आणि सहरसा जिल्हा गाठला. तिथं माझी भेट झाली महाराणी देवी आणि त्यांचे पती परवीन कुमार यांच्यासोबत.
महाराणी यांचं वय तेव्हा 15 वर्षं होतं. परवीन यांचं अपहरण करून दोघांचं बळजबरी लग्न लावून देण्यात आलं होतं.
"माझं लग्न होणार आहे याबाबत मला जराशीही कल्पना नव्हती. माझी मर्जी जाणून घेण्याचा कुणी प्रयत्न केला नाही," महाराणी सांगतात.
मी विचारलं, "का"?
"कारण, आई-वडिलांना जे करायचं असतं तेच होतं. लग्नाच्या बाबतीत मुलीचं मत कुणीच विचारात घेत नाही," असं त्या सांगतात.
त्यांच्या आई-वडिलांच्या निर्णयाचा परिणाम असा झाला की लग्नानंतर तीन वर्षं परवीन यांनी त्यांना घरी नेलं नाही.
परवीन सांगतात, "डोक्यात खूप टेन्शन होतं. खूप राग होता की माझ्यासोबत काय झालं? त्यामुळे मी तिला माहेरीच सोडलं. मी माझ्या घरी एकटाच राहत असे."
सिमरी गावापासून दोन चार किमी दूर असलेल्या टोला ढाब या गावातला 17 वर्षांचा रोशन कुमार हा देखील चिडलेला आहे. 2018मध्ये त्याच्या शेजाऱ्यांनी त्याला फूस लावून दुसऱ्या गावी नेलं. तिथं त्याला मारहाण करण्यात आली, एका बंद खोलीत ठेवलं गेलं. बंदुकीचा धाक दाखवून त्याच्यापेक्षा जास्त वयाच्या मुलीसोबत त्याचं लग्न लावून दिलं.
जेव्हा त्याची मुलीच्या कुटुंबीयांच्या तावडीतून सुटका झाली तेव्हा तो पोलिसांकडे गेला. त्यानं तिथं बालविवाहाची तक्रार नोंदवली.
"मग हे प्रकरण मिटवण्यासाठी एक पंचायत बसवली गेली. मी म्हणालो तुम्ही माझ्या गळ्यात हे लोढणं बांधलं, तुम्ही माझा जीव घेतला तरी मी हे लग्न मान्य करणार नाही," असं रोशननं सांगितलं.
मग त्यांनी विचारलं, "त्या मुलीचं काय?"
"मला काही तिच्याशी घेणंदेणं नाही. मला तिच्याशी नातं ठेवायचं नाही. मला शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे."
जे नातं इतक्या कटू अनुभवावर सुरू होतं त्याचं भवितव्य कसं असेल?
पकडौआ लग्नाचं सत्य जाणून घेऊनही मुलीच्या घरचे आपल्या मुलीला या दलदलीत का ढकलतात?
पाटणा विद्यापीठात वुमन स्टडीज विभागाची सुरुवात करणाऱ्या इतिहासच्या प्राध्यापिका भारती कुमार सांगतात ही पद्धत सरंजामशाहीची देणगी आहे.
"उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यांत सामाजिक दबाव इतका आहे की, लोकांना वाटतं की आपली मुलगी आपल्याच जातीच्या घरी पडावी. पकडौआ विवाह बहुतेक करून ग्रामीण भागात होतात. या ठिकाणी महिलांचं आयुष्य चूल आणि मूल असंच असतं," त्या सांगतात.
रोशनला एक चुलत बहीण आहे. ती पंधरा वर्षांची आहे, पण खूप विचारपूर्वक बोलते. आपल्या भावासोबत बळजबरी झाल्यामुळे ती नाराज आहे. ती म्हणते, "मी पण एक मुलगी आहे. मला वाटतं, की त्या मुलीनं म्हटलं नसेल की माझं लग्न लावून द्या कुणासोबतही. ही तिच्या आई-वडिलांची चूक आहे."
"न भेटताच लग्न लावून टाकतात. मुलगा आणि मुलगी दोघंही सुखी होऊ शकत नाही. मुलीचं आयुष्य वाया जातं."
बिहारमध्ये हुंडापद्धतीविरोधात सरकारनं कठोर पावलं उचलली आहे. या ठिकाणी दारू आणि हुंडा या दोन्ही गोष्टीवर पूर्णपणे बंदी आहे.
पण प्रियांकाच्या गावात या गोष्टीचा काही प्रभाव नाही. अशी लग्न होण्याचं एकच कारण आहे ते म्हणजे लग्नात हुंडा देण्यासाठी पैसा नसणे. तेच लोक मुलगा धरून आणून लग्न लावून देतात ज्यांच्याकडे हुंडा देण्यासाठी पैसा नसतो. पैसा असता तर त्यांनी लग्न लावून दिलं नसतं का?
अशा प्रकारचं लग्न लावल्यानंतर जेव्हा मुलगा मुलीला स्वीकारण्यासाठी तयार नसतो तेव्हा त्याला हुंड्याचं आमिष देऊनच पटवलं जातं. जणू काही लग्न आणि हुंडा हे एक चक्रव्यूह आहे, ज्यातून स्वतःची सुटका करून घेणं अशक्य आहे.
परवीन कुमार यांनी तीन वर्षांनंतर आपल्या पत्नीला स्वीकारलं. त्यांच्या मते हा कुटुंबाच्या मान आणि मर्यादांचा प्रश्न होता.
"जर हे लग्न मी स्वीकारलं नसतं तर लोकांनी माझ्याबद्दल काय विचार केला असता? तसं पण एखाद्या चांगल्या कुटुंबानं माझा जावई म्हणून स्वीकार नसता केला."
त्यामुळे परवीन यांनी 'अॅडजस्ट' करून एक नवी सुरुवात करण्याचा निर्णय घेतला. महाराणी यांच्याकडे तर निर्णय घ्यायचं स्वातंत्र्य नव्हतं.
"माझ्या मैत्रिणी मला म्हणाल्या. जे झालं ते झालं. खूप लोकांसोबत होतं. आता जास्त विचार नको करू. जसं आयुष्य आहे तसं जग."
परवीन आणि महाराणी यांना जुळी मुलं झाली. आता त्यांना विचारलं तर त्या सांगतात, सासरचे माझी काळजी घेतात.
"आता असं वाटत नाही आमचं लग्न बळजबरीनं झालं आहे."
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता. )