लग्न गेल्यावर्षी झालं, आता आढळले मुलीच्या मृतदेहाचे तुकडे - ग्राऊंड रिपोर्ट

    • Author, शुभम किशोर
    • Role, बीबीसी प्रतिनिधी, नालंदा (बिहार)हून

मंजू देवी यांच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू थांबण्याचं नाव घेत नव्हते. शुक्रवारी (23 जुलै) जवळपास तीन तास त्या संपूर्ण कुटुंबासह नालंदाच्या हिलसा डीएसपी कार्यालयात बसून होत्या.

बराच वेळ पोलिसांबरोबर चर्चा झाल्यानंतर त्यांना न्याय मिळेल असं आश्वासन देण्यात आलं. मंजू यांची गर्भवती मुलगी काजलची तिच्या पतीच्या कुटुंबानं हुंड्यासाठी हत्या केल्याचं म्हटलं जात आहे.

हत्येनंतर मृतदेहाचे तुकडे-तुकडे करून जाळण्याचा आणि पुरण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही केला जात आहे.

'तिता मृतदेह जवळच्या एका शेतात मिळाला. त्याची अवस्था एवढी वाईट होती की, मृतदेहाचे तुकडे जमा करून थैलीत भरून न्यावे लागले', असा दावा काजलच्या कुटुंबीयांनी केला आहे.

20 जुलैला या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पण अद्याप पोलिस आरोपींना पकडू शकलेले नाहीत.

काय आहे प्रकरण?

पाटणा जिल्ह्यातील बख्तियारपूरच्या बिहटा गावातील काजलचं लग्न गेल्यावर्षी नालंदामध्ये हिलसाच्या नोनिया बिगहा गावच्या संजीत कुमार यांच्याशी झाला होता. संजीत रेल्वेमध्ये ड गटातील कर्मचारी असून बंगळुरूमध्ये काम करतात.

लग्नाच्या वेळी जवळपास 12 लाख रुपये हुंडा आणि त्याशिवाय दागिने आणि बाईकही दिल्याचा दावा काजलच्या कुटुंबानं केला आहे. पण मुलाच्या प्रमोशनच्या बहाण्यानं मुलाच्या कुटुंबीयांनी आणखी सहा लाख रुपयांची मागणी केली.

ड गटात असलेला मुलगा प्रमोशन मिळवून टीटीई बनला. त्यामुळं ते आणखी हुंड्याची मागणी करत होते, असं काजलच्या कुटुंबानं तक्रारीत म्हटलं आहे.

मुलीला शीवीगाळ आणि मारहाण करण्यात आल्याचंही तिच्या कुटुंबानं म्हटलं आहे. मुलीनं आधीही कुटुंबीयांकडं अत्याचाराची तक्रार केली होती.

मंजू देवी यांनी 17 जुलैला मुलीबरोबर अखेरचं फोनवर बोलणं झाल्याचं सांगितलं.

"ती म्हणाली मला भीती वाटत आहे. त्यानंतर नऊ वाजता तिचा मोबाईल बंद झाला. कुणाशीही मोबाईलवर बोलणं झालं नाही,'' असं ते बीबीसीबरोबर बोलताना म्हणाले.

कुटुंबातील इतर सदस्यही काजोलशी बोलणं करून देत नव्हते. यापूर्वीही तिला घरी पाठवायला ते तयार झाले नव्हते.

"ते लोक तिला आमच्याकडं येऊ देत नव्हते. तिचे वडील आणि भाऊ आणायलाही गेले होते, पण ते येऊ देत नव्हते,'' असं त्या म्हणाल्या.

पिशवीत भरले मृतदेहाचे तुकडे

काजलशी संपर्क झाला नाही, म्हणून कुटुंबानं तिचा शोघ घ्यायला सुरुवात केली. काही ग्रामस्थांनी त्यांना आसपासच्या शेतात शोधायला सांगितलं असा दावा त्यांनी केला. त्यानंतर रस्त्यापासून जवळपास 500 मीटर अंतरावर शेतामध्ये कुटुंबीय आणि पोलिसांना अनेक तुकड्यांत विखुरलेला एक मृतदेह आढळला.

पोलिसांच्या उपस्थितीत तुकडे पिशवीत भरल्याचं कुटुंबीयांनी म्हटलं आहे.

"आमच्याकडं दुसरा पर्यायच नव्हता. ती 17 तारखेला सकाळी बेपत्ता झाली आणि चार दिवसांनी 21 तारखेला तिला जाळून पुरण्याचा प्रयत्न केला. तिचे हात-पाय सर्व कापून वेगळं केलं होतं. त्यामुळं पोत्यात भरावं लागलं," असं काजलचे वडील पिता अरविंद कुमार यांनी बीबीसीबरोबर बोलताना म्हटलं.

"त्याठिकाणी पोलिस होते, पण त्यांनी मृतदेहांच्या तुकड्यांना हात लावला नाही. हे प्रशासनाचं काम आहे? पण काय करणार."

मृतदेह मिळण्याच्या एक दिवस आधीपर्यंत आरोपी गावातच होते, असा दावा त्यांनी केला आहे.

ज्याठिकाणी मृतदेहाचे तुकडे आढळले आहेत, तिथून थोड्याच अंतरावर जाळलेली लाकडं आणि गवत आढळलं आहे. वरच्या झाडाची पानंही होरपळलेली आहेत.

शेतातील एका महिलेनं मृतदेह पाहिल्याचं म्हटलं होतं, असा दावाही कुटुंबानं केला आहे.

हत्येचा गुन्हा दाखल

पोलिसांनी 20 जुलैला गुन्हा दाखल केला. त्याच दिवशी मृतदेहाचे तुकडे पोस्टमॉर्टम आणि डीएनए चाचणीसाठी पाटण्याला पाठवले. पण कुटुंबीयांना अद्याप रिपोर्ट मिळालेले नाहीत.

पोलिसांनी काजल यांच्या कुटुंबीयांना 23 जुलैला मृतदेहाचे अवशेष सोपवले. त्यानंतर पाटण्यात गंगा नदीच्या किनाऱ्यावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

"304 बी अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. अत्याचारामुळं मृत्यू झाला आहे. या गुन्ह्यात सात जणांच्या नावाचा समावेश आहे. पती, दीर, दोन्ही बहिणी आणि त्यांचे पती यांचा त्यात समावेश आहे," असं हिलसाचे पोलिस उपअधीक्षक कृष्ण मुरारी प्रसाद यांनी बीबीसी बरोबर बोलताना सांगितलं.

ही हत्या आहे की आत्महत्येनंतर मृतदेहाचे तुकडे करण्यात आले आहेत हे लगेच सांगता येणार नाही. पण मृत्यू अत्याचारांमुळं झाल्याचे पुरेसे पुरावे आहेत, असं पोलिसांचं म्हणणं आहे.

मात्र हे वृत्त देईपर्यंत या प्रकरणात कुणालाही अटक झाली नव्हती.

शेजाऱ्यांना काहीही माहिती नाही

मृतदेह आढळला तिथून आरोपींचं घर अवघ्या 500 मीटर अंतरावर आहे. रस्त्यात दोन्ही बाजुंनी घरं असून या भागात भरपूर लोक राहतात. पण एवढे लोक राहत असूनही शेजाऱ्यांनी या घटनेबाबत त्यांना काहीही माहिती नसल्याचं सांगितलं.

शेजारी बसलेल्या महिलांनी त्या कुटुंबाशी अत्यंत कमी संबंध होते असं सांगितलं. मात्र या घरातून कधीही आरडा-ओरडा अथवा भांडणाचा आवाज आला नाही, असंही त्या महिला म्हणाल्या.

घरातील सर्व सदस्य फरार झाले, पण शेजाऱ्यांना मात्र त्याबाबत काहीही कळलं नाही.

न्यायाची अपेक्षा आणि आयुष्यभराच्या वेदना

आरोपींना लवकरच अटक केली जाईल, असं पोलिसाचं म्हणणं आहे. काजलच्या कुटुंबीयांना न्यायाची अपेक्षा आहे. पण वेळीच मुलीला घरी बोलावलं असतं, तर हा दिवस पाहावा लागला नसता, याची खंत त्यांना आहे.

"आम्ही राक्षसांच्या हाती आमची मुलगी सोपवली. ती घरी आली तेव्हा तिला परत पाठवायची आमची इच्छा नव्हती. बाळ झाल्यावर पाठवू असं आम्हाला वाटलं. पण त्यांना राग येऊ नये म्हणून आम्ही तिला पाठवलं.

"पुन्हा तिला घेऊन येऊ असं वाटत होतं. पौर्णिमेच्या दिवशी तिला आणणार होतो. पण आधीच सर्वकाही संपलं, असं काजलचे वडील अरविंद कुमार म्हणाले.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)