You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
हाथरस बलात्कार : या 6 प्रश्नांची उत्तरं मिळाली तर या प्रकरणाची तड लागू शकते
- Author, दिलनवाज पाशा
- Role, बीबीसी प्रतिनिधी, हाथरसमधून
उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये 14 सप्टेंबर रोजी अनुसूचित जातीमधील एका तरुणीवर झालेल्या कथित सामूहिक बलात्कार आणि हत्येचं प्रकरणाचा गुंता आता सुटत आहे. काही जण या पीडित कुटुंबाबाबतच प्रश्न उपस्थित करत आहेत, तर या प्रकरणावर राजकारणही होताना दिसत आहे.
या घटनेबाबत अनेक व्हीडिओ सोशल मीडियामध्ये आले आहेत. त्यावरून अनेक दावे केले जात आहेत. ज्या प्रश्नांची उत्तरं अजूनही मिळाली नाहीत ते प्रश्न येथे पाहू...
1. घटनेच्यावेळेस तरुणीचा लहान भाऊ कुठे होता?
मुख्य आरोपीचं नाव संदीप आहे आणि मृत तरुणीच्या छोट्या भावाचं नावही संदीप आहे. सोशल मीडिया आणि काही मुख्यधारेतील माध्यमांमध्ये मृत तरुणीचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. या घटनेनंतर तिचे कुटुंबीय पोलीस ठाण्यात पोहोचले तेव्हा हा व्हीडिओ रेकॉर्ड करण्यात आला होता.
या व्हीडिओत ती तरुणी म्हणते, 'संदीप ने मेरा गला दबा दिया. हाथों से गला दबाया. गला छोड़ा ना बा ने.'
तुझा गळा का दाबला असं विचारल्यावर 'मी जबरदस्ती करू दिली नाही म्हणून...' असं उत्तर ती या व्हीडिओत देते.
आता संदीप हे तिच्या लहान भावाचंही नाव असल्यामुळे त्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तर तिचा भाऊ संदीप याच्या मते तो घटनेच्यावेळेस नोएडामध्ये होता. नंतर दोन आठवडे तो बहिणीबरोबर हॉस्पिटलमध्ये राहिला आणि नंतर तिच्या मृतदेहाला गावात आणलं तेव्हाच तो गावात आला.
गावातले अनेक लोक व्हीडिओमध्ये ती ज्याचं नाव घेत आहे तो संदीप तिचाच भाऊ आहे. परंतु त्याला त्या दिवशी गावात पाहिलं का याबद्दल कोणीही सांगू शकत नाहीये. या प्रकरणात जो दुसरा संदीप आहे, त्याला पोलिसांनी अटक केली आहे.
2. पहिल्या एफआयआरमध्ये बलात्काराचं कलम का नाही?
तरुणीच्या मोठ्या भावानं पोलीस ठाण्यात दिलेल्या पहिल्या वर्दीमध्ये बलात्काराचा उल्लेख नाही. तर मुख्य आरोपी संदीपनं तिचा गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न केला असा आरोप नमूद केला आहे, त्याच आधारावर एफआयआर नोंदला गेला आहे.
तिच्या कुटुंबीयांनी तेव्हा बलात्काराची तक्रार का केली नाही, असा प्रश्न विचारला जात आहे.
बीबीसीने हाच प्रश्न तिच्या आईला विचारल्यावर त्या म्हणाल्या, "तेव्हा मुलगी शुद्धीत नव्हती. पूर्ण घटना सांगू शकत नव्हती. जेव्हा ती शुद्धीवर आली तेव्हा तिनं सर्व घटना सांगितली." त्यानंतर त्यांनी लोकलज्जेचं भयही होतं असं सांगितलं. मुलगी जेव्हा बाजरीच्या शेतात सापडली तेव्हा ती अर्धनग्न आणि बेशुद्ध होती असंही तिच्या आईनं आपल्या जबाबात सांगितलं आहे.
3. पोलिसांनी तात्काळ बलात्कार-चाचणी का केली नाही?
तपासामध्ये त्या मुलीने आपल्यावर ओढवलेला सर्व प्रसंग सांगितला आणि चार आरोपी यात सहभागी असल्याचं सांगूनही बलात्कार-चाचणीसाठी पहिल्यांदा 22 सप्टेंबर रोजी नमुने पाठवण्यात आले. हे नमुने आग्र्याच्या न्यायवैद्यक प्रयोगशाळेमध्ये 25 सप्टेंबर रोजी पोहोचले.
पीडित मुलगी जेव्हा पहिल्यांदा पोलीस ठाण्यात पोहोचली तेव्हा पोलिसांनी लैंगिक अत्याचार घटनेच्या दिशेने का तपास केला नाही?
या प्रश्नावर तेव्हाचे पोलीस अधीक्षक आणि आता निलंबित असलेले विक्रांत वीर सांगतात, "पीडित तरुणीच्या कुटुंबानं जी तक्रार केली होती त्याच्या आधारावर एफआयआर नोंदवला होता. जेव्हा ती शुद्धीवर आली तेव्हा 22 सप्टेंबर रोजी तिनं सामूहिक बलात्काराबद्दल सांगितलं आणि मग बलात्काराची कलमं जोडली गेली आणि आरोपींना तात्काळ अटक करण्यात आली."
पहिल्या तक्रारीनंतर पोलिसांनी कारवाई का केली नाही असं विचारल्यावर ते म्हणाले, पोलिसांनी योग्यपद्धतीने काम केलं आहे. पुरावे गोळा करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले आहेत.
जेव्हा पीडित तरुणी पोलीस ठाण्यात पोहोचली तेव्हा तिची स्थिती वाईट होती. तिनं आपल्या जबाबात जबरदस्ती झाल्याचंही सांगितलं. तरीही उत्तर प्रदेश पोलिसांनी या प्रकरणाला लैंगिक अत्याचाराच्या दृष्टीने का पाहिलं नाही याचं उत्तर पोलिसांना द्यावं लागणार आहे.
4. पोलिसांनी कुटुंबीयांना वैद्यकीय अहवाल आणि पोस्टमार्टम अहवाल का नाही दिला?
पीडित तरुणीच्या कुटुंबीयांनी आपल्याला पोलिसांनी वैद्यकीय आणि पोस्टमार्टम अहवाल दिला नाही असा आरोप केला आहे. बीबीसीनं याबाबत तत्कालीन एसपी विक्रांत वीर यांना विचारल्यावर त्यांनी याचा अहवाल अजूनही गोपनीय असल्याचं सांगितलं आणि त्याला तपासात समाविष्ट केल्याचं सांगितलं.
सर्व वैद्यकीय कागदपत्रं आणि पोस्टमार्टम अहवाल पीडित कुटुंबाला मिळाली पाहिजेत हा त्यांचा अधिकार आहे. मात्र पोलिसांनी कुटुंबीयांकडे ते अहवाल का दिले नाहीत याचं उत्तर दिलेलं नाही.
याच वैद्यकीय अहवालाचा आधार घेऊन न्यायवैद्यक पुराव्यांनुसार बलात्कार झाल्याचं स्पष्ट होत नाही असं पोलिसांनी सांगितलं आहे.
अर्थात या अहवालात जबरदस्तीने पेनिट्रेशन करण्याचा प्रयत्न झाल्याचा उल्लेख आहे. पोलिसांनी या मुद्द्याला आपल्या जबाबात समाविष्ट केलं नाही. बीबीसीनं एसपी वीर यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले, "सर्व घटनाक्रम कसा आहे हे या तपासाच्या या टप्प्यावर सांगता येणार नाही. अजून तपास सुरू आहे."
5. पीडित तरुणीचं शव रात्री का जाळलं गेलं?
तिचा मृतदेह कुजत चालला होता आणि प्रकरण संवेदनशील असल्यामुळे वातावरण बिघडण्याची भीती होती असं पोलीस आणि प्रशासनाचं म्हणणं आहे.
तर पोलीस या प्रकरणात सारवासारव करत होते आणि गडबडीने प्रेत नष्ट करून टाकण्याचा हा प्रयत्न त्याचाच भाग असू शकतो, असा कुटुंबीयांचा आरोप आहे.
पीडितेच्या वहिनीनेही बीबीसीशी बोलताना पोलिसांनी मृतदेह जाळून पुरावे नष्ट केल्याचा आरोप केला होता. अंत्यसंस्कारानंतर आता पुन्हा कोणत्याही वैद्यकीय चाचणीच्या शक्यता मावळल्या आहेत.
6. त्या दिवशी रामू कुठे होता?
रामू नावाचा आरोपी घटनेच्यावेळी डेअरीमध्ये ड्युटीवर होता असं त्याच्या कुटुंबीयांनी आणि ठाकूर -सवर्णांनी सांगितलं आहे. याचं सीसीटीव्ही चित्रिकरणही उपलब्ध असेल असं सांगितलं जातं. पण कोणत्याही प्रकारचं चित्रीकरण ते सादर करू शकत नाहीत.
अटकेबाबत विचारल्यावर एसपी म्हणाले आता पीडितेच्या जबाबावर आधारित अटकेची कारवाई झाली आहे. तांत्रिक आणि न्यायवैद्यक पुरावे गोळा केले जात आहेत. निरपराधांना शिक्षा होणार नाही.
तर रामूला फाशीपेक्षा दुसरी कोणतीही शिक्षा होऊ नये असं तिचे कुटुंबीय म्हणत आहेत. रामू ज्या डेअरीमध्ये काम करायचा तिच्या मालकानं तो निर्दोष असल्याचं सांगितलं मात्र कोणतंही सीसीटीव्ही फुटेज दिलेलं नाही.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)