You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
लग्न ब्राह्मण मुलीशी केलं म्हणून दलित पंचायत अधिकाऱ्याची हत्या? नेमकं प्रकरण काय?
- Author, राजेश कुमार आर्य
- Role, गोरखपूरहून, बीबीसी हिंदीसाठी
ब्राह्मण मुलीशी प्रेमविवाह करणाऱ्या दलित अनिश कुमार चौधरी यांची 24 जुलै रोजी हत्या करण्यात आली. यामागं अनिशच्या सासरच्या मंडळींचा हात असल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.
अनिश यांच्या पत्नी दिप्ती मिश्र यांचे कुटुंबीय या लग्नामुळं नाराज होते. मात्र दिप्ती यांच्या आईनं या हत्येशी त्यांच्या कुटुंबाचा संबंध नसल्याचं म्हटलं आहे.
अनिश यांच्या हत्येच्या प्रकरणात 17 जणांना आरोपी बनवण्यात आलं आहे. त्यापैकी चार जणांना स्थानिक पोलिसांनी अटक केली आहे.
अनिश आणि दिप्ती यांनी गोरखपूरच्या पंडित दिनदयाल उपाध्याय विद्यापीठातून एम. ए. पूर्ण केलं होतं. दोघांचे विषय वेगवेगळे होते. अनिश यांनी प्राचीन इतिहास तर दिप्ती यांनी समाजशास्त्रातून पदवी पूर्ण केली. कॅम्पस मुलाखतींमध्ये अनिश आणि दिप्ती यांची ग्राम पंचायत अधिकारी पदासाठी निवडही झाली होती.
नोकरी लागल्यानंतर अनिश यांच्याशी पहिली भेट 9 फेब्रुवारी 2017 रोजी गोरखपूरच्या विकास भवनमध्ये झाली होती, असं दिप्ती सांगतात. एकाच पदावर निवड झाल्यानंतर त्यांच्या भेटीगाठींना सुरुवात झाली होती. त्यात प्रशिक्षणादरम्यान त्यांच्यात जवळीक अधिक वाढली.
''या नात्याबद्दल समजताच माझे कुटुंबीय अनिशला वारंवार अपमानित करत होते. त्यानंतर आम्ही लग्नाचा निर्णय घेतला. एकदा माझं लग्न झालं तर कुटुंबीय दुसरीकडं कुठं माझं लग्न लावून देऊ शकणार नाहीत, असं मला वाटलं. त्यामुळं आम्ही लग्नाचा निर्णय घेतला,'' असं दिप्ती म्हणाल्या.
आमच्या मित्रांमध्ये सर्व जाती धर्माच्या मुला-मुलींचा समावेश आहे, त्यामुळं जात-पात मानत नसल्याचं दिप्ती म्हणाल्या.
आई वडिलांनी ऐकलं नाही
अनिश आणि दिप्तीनं कोर्टात विवाहाची नोंदणी केली होती. लग्नाच्या कागदपत्रांनुसार दोघांनी 12 मे 2019 रोजी गोरखपूरमध्ये लग्न केलं. त्यांच्या लग्नाला न्यायालयानं 9 डिसेंबर 2019 ला मान्यताही दिली.
''आम्ही दोघं प्रौढ होतो आणि नोकरीही करत होतो. त्यामुळं कुटुंबीय लग्नाला विरोध करणार नाही, असं आम्हाला वाटत होतं. त्यांनी विरोध केला तरी आम्ही त्यांची समजूत काढू असं आम्हाला वाटत होतं. मी माझ्या कुटुंबीयांना समजावण्याचा खूप प्रयत्नही केला, पण ते ऐकलेच नाही,'' असं दिप्ती म्हणाल्या.
''अनिशबरोबर लग्न झाल्याचं समजल्यानंतर कुटुंबीय मला मानसिक त्रास द्यायला लागले. कधी वडील आजारी पडायचे, तर कधी आई. वडील मला म्हणायचे मला हार्ट अटॅक येईल आणि मी मरून जाईल. मी ऐकलं नाही तर, कुटुंबीय अनिशला जीवे मारण्याची धमकी देत होते. अनिशच्या सुरक्षेसाठी मला अनेकदा कुटुंबीयांचं ऐकून ते म्हणतील तसं वागावं लागलं. मला कोणत्याही स्थितीत अनिशला वाचवायचं होतं,'' असं त्या म्हणाल्या.
गोरखपूर जिल्ह्याच्या गगहां परिसरातील देवकली धर्मसेन गावाचे नलिन कुमार मिश्र हे दिप्ती यांचे वडील आहेत. चार भावंडांमध्ये दिप्ती सर्वांत लहान आहेत. त्यांच्या दोन बहिणी आणि एका भावाचं लग्नंही झालेलं आहे. त्यांचे भाऊ उत्तर प्रदेश पोलिस दलात कार्यरत आहेत. ते सध्या श्रावस्ती जिल्ह्यात तैनात आहेत.
एवढ्या मोठ्या कुटुंबात कोणीच दिप्ती यांना साथ दिली नाही का? असा प्रश्न उभा राहतो. तर त्याचं उत्तर नाही, असंच आहे. कुटुंबातील कोणीही त्यांना साथ दिली नाही.
अनिश विरोधात खटला
दिप्तीचे वडील नलिन हे अनेक वर्षे दुबईत काम करत होते. ऑगस्ट 2016 पासून ते गावाजवळच्या मझगावामध्ये रेडिमेड कपड्यांचं दुकान चालवतात. त्यांनी अनिशच्या विरोधात खटला दाखल केला होता. त्यात त्यांनी बलात्कारासारखे अनेक आरोप केले होते.
कुटुंबीयांच्या दबावामध्ये दिप्ती यांनीही अनिश यांच्या विरोधात साक्ष दिली. त्यांचे कुटुंबीय अनिश यांच्या हत्येची धमकी द्यायचे, त्यामुळं घाबरून त्यांनी कोर्टात अनिश यांच्या विरोधात साक्ष दिली.
"वडील, काका आणि चुलत भाऊ त्यांच्यावर पाळत ठेवायचे. ऑफिसला जातानाही ते सोबत जायचे. अनेकदा काका, वडील हे परवाना असलेली रायफल घेऊन माझ्याबरोबर यायचे,'' असं दिप्ती यांनी म्हटलं.
पण अनिश तुरुंगात जाण्याची शक्यता निर्माण झाली तेव्हा मात्र दिप्ती 20 फेब्रुवारीला त्यांच्याबरोबर राहण्यासाठी गेल्या. त्यानंतर त्यांच्या वडिलांनी अनिशवर दिप्ती यांच्या अपहरणाचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर दिप्ती यांनी सोशल मीडियावर एक व्हीडिओ शेअर केला होता. त्यात त्यांचं अपहरण झालं नसून, स्वतःच्या मर्जीनं अनिश यांच्याबरोबर राहत असल्याचं सांगितलं. तसंच त्या दोघांनी लग्न केल्याचंही, त्यांनी व्हीडिओत स्पष्ट केलं.
अनिशच्या कुटुंबीयांनी 28 मे रोजी गोरखपूरच्या महादेव झारखंडी मंदिरात दोघांचं लग्नही लावून दिलं होतं. त्याच दिवशी गोरखपूरच्या अवंतिका हॉटेलमध्ये रिसेप्शनही झालं. दोन्ही कार्यक्रमांमध्ये केवळ अनिशचे कुटुंबीय आणि त्यांचे नातेवाईकच सहभागी झाले होते.
त्यानंतर अनिश काहीसे निश्चिंत झाल्यासारखे वागत होते. त्यांना वाटायचं की, हा आपलाच भाग आहे. इथं आपल्याला काही धोका नाही. पण त्यांचा हा निष्काळजीपणाच महागात पडला, अशी खंत दिप्ती यांनी व्यक्त केली.
अनिशचं कुटुंब गोरखपूरच्या गोला परिसरातील उनौली दुबौली गावात राहतं. हे गाव प्रामुख्यानं दलित आणि मागासवर्गीयांची संख्या अधिक असलेलं गाव आहे. त्यामुळंच अनिशचे मोठे भाऊ अनिल चौधरी 10 वर्ष गावाचे प्रमुख (प्रधान) होते. विशेष म्हणजे तेव्हा ही जागा आरक्षितही नव्हती. 2015 मध्ये या जागेसाठी अनुसुचित जातीतील महिलेचं आरक्षण जाहीर झालं. त्यावेळी अनिल यांनी त्यांच्या पत्नी गीता देवीला निवडणुकीच्या मैदानात उतरवलं, तर त्याही विजयी झाल्या.
अनिश यांचं कुटुंब सधन आहे. त्यांचे वडील आणि काका बँकॉक आणि सिंगापूरसारख्या शहरात काम करायचे. पण अनीश सरकारी नोकरी करणारे असे कुटुंबातील पहिलेच सदस्य होते.
अनिल यांना या नात्याबाबत समजलं तेव्हा त्यांची प्रतिक्रिया काय होती, असं आम्ही विचारलं. त्यावर ते म्हणाले की, दिप्तीनं मला एक दिवस भेटायला बोलावलं होतं. त्यावेळी त्यांनी त्या कुटुंबीयांची समजूत काढतील, असं मला म्हणाल्या होत्या.
''मी अनेकदा दिप्ती यांच्या कुटुंबीयांना भेटलो होतो. या नात्याला त्यांनी मान्यता द्यावी यासाठी मी प्रयत्न करायचो. पण त्यांनी ऐकलं नाही. उलट माझ्या घरी येऊन मला धमकी देऊ लागले होते. त्यांच्या कुटुंबीयांनी 24 जुलैला माझ्या भावाची कुऱ्हाडीनं हत्या केली,'' असं अनिल म्हणाले.
अनिल यांनी सरकारकडं कुटुंबाला आणि दिप्तीला संरक्षण प्रदान करण्याची मागणी केली आहे. तसंच या प्रकरणी आरोपींवर कारवाई करावी आणि आर्थिक मदतीसह कुटुंबातील एका जणाला सरकारी नोकरी देण्याची मागणीही त्यांनी केली. त्यांच्या घरी मोठ्या प्रमाणावर सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत. पण इतर मागण्यांबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.
घटनेच्या दिवशी नेमकं काय झालं?
घटनेच्या दिवशी अनिश उरुवा ब्लॉकमध्येच तैनात असलेले त्यांचे काका आणि ग्राम विकास अधिकारी देवी दयाल यांच्याबरोबर काहीतरी कामासाठी निघाले होते. दोघे गोपालपूर बाजार परिसरातील पंकज ट्रेडर्स या हार्डवेअरच्या दुकानात कामाच्या निमित्तानं गेले होते. तिथून निघाल्यानंतर ही घटना घडली. त्यात देवी दयालही जखमी झाले. त्यांच्यावर गोरखपूरच्या बीआरडी मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहे. त्यांच्या छातीवर धारदार शस्त्रानं हल्ला केल्यानं ते जखमी झाले आहेत.
''दुकानातून निघाल्यानंतर अनिश फोनवर बोलत पुढे निघाले होते. त्यावेळी चेहरा झाकलेल्या चार जणांनी धारदार शस्त्रानं त्यांच्यावर हल्ला केला. मी वाचवण्यासाठी पळालो तर माझ्यावरही हल्ला केला. त्यात मी बेशुद्ध झालो. काही सेकंदांनी पुन्हा शुद्ध आली तर मी उभा राहिलो. तेव्हा हल्लेखोरांनी पुन्हा माझ्यावर हल्ला केला. तेव्हा काही लोक जमा झाले. त्यानंतर हल्लेखोर पळून गेले. त्याचं एक शस्त्र मात्रं तिथंच पडलं,'' असं देवी दयाल म्हणाले.
देवी दयाल यांनी हल्लेखोर कुठून आले आणि कुठं गेले हे पाहिलं नाही, असं सांगितलं. प्रकरण संवेदनशील असल्यानं मेडिकल कॉलेजमध्ये देवी दयाल यांना संरक्षण प्रदान करण्यात आलं आहे. पण त्यांचे कुटुंबीय यावर समाधानी नाहीत. कारण पोलिसांच्या जवानाकडं शस्त्र नाही, तसंच देवी दयाल यांना इतर रुग्णांच्या वॉर्डात ठेवण्यात आलं आहे.
देवी दयाल हे या घटनेतील एकमेव प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत. प्रशासनाच्या अशा भूमिकेमुळं त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ, शकतो असं त्यांच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे.
पुतण्याचा जीव वाचवता आलं नाही, याची खंत आयुष्यभर मनात राहील, असं देवी दयाल म्हणाले.
गोपलापूर बाजारात अनिशची हत्या झाली, तिथं लोकांकडे घटनेबाबत चौकशी केली, तर या घटनेचा एकही प्रत्यक्षदर्शी समोर आला नाही. यावर बोलायलाही कोणी तयार नव्हतं. पण अनिश यांचं रक्त ज्याठिकाणी सांडलं होतं, तिथं घटनेच्या पाच दिवसांनंतरही माश्या बसत होत्या.
पोलिस काय म्हणाले?
या प्रकरणी गोला पोलिसांनी अनिल चौधरी यांच्या तक्रारीवरून 17 जणांसह 4 अज्ञातांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. एफआयआरमध्ये आयपीसीच्या कलम 302, 307, 506 आणि 120-ब सह एससी-एसटी अॅक्टच्या कलम 3(2)(V) देखील लावण्यात आल्या आहेत.
एफआयआरमध्ये दिप्तीचे वडील नलिन मिश्र आणि भाऊ अभिनव मिश्र यांच्याबरोबरच मणिकांत, विनय मिश्र, उपेंद्र, अजय मिश्र, अनुपम मिश्र, प्रियंकर, अतुल्य, प्रियांशू, राजेश, राकेश, त्रियोगी नारायण, संजीव आणि चार अज्ञातांचा समावेश आहे.
या प्रकरणाचा तपास गोला येथील पोलिस अधिकारी (सीओ) अंजनी कुमार पांडेय करत आहेत.
''चार जणांना अटक करून तुरुंगात त्यांची रवानगी करण्यात आली आहे. इतरांनाही लवकरच अटक केली जाणार आहे,'' असं ते म्हणाले.
भाडोत्री हल्लेखोरांनी हा हल्ला केला असं वाटत नाही, तर ओळखीच्याच कोणीतरी हल्ला केला असण्याची शक्यता आहे, असं ते बीबीसीबरोबर बोलताना म्हणाले.
या प्रकरणी तपासात अजून तरी दुसरी कोणतीही बाजू समोर आली नसल्याचंही अंजनी कुमार पांडेय म्हणाले.
पोलिसांनी या प्रकरणी मणिकांत मिश्र (दिप्ती यांचे काका), विवेक तिवारी, अभिषेक तिवारी आणि सन्नी सिंह यांना अटक केली आहे.
दिप्तीच्या आईने फेटाळले आरोप
दरम्यान, दिप्ती यांच्या आई जानकी मिश्र यांनी प्रकरणाशी त्यांच्या कुटुंबीयांचा काहीही संबंध नसल्याचं म्हटलं आहे. त्यांच्या कुटुंबाला आणि नातेवाईकांना यात गोवलं जात असल्याचा आरोप त्यांनी केला. शनिवारी पतीला डब्यात भाजी-पोळी भरून दिली आणि ते दुकानात गेले होते, असं त्या म्हणाल्या. मात्र 12-1 वाजेनंतर अनिश यांच्या हत्येची माहिती मिळताच त्यांचे पती आणि इतर नातेवाईक अंडरग्राऊंड झाले होते.
या प्रकरणी आरोपींमध्ये समावेश करण्यात आलेले मणिकांत मिश्र पोलिसांसमोर हजर झाले आहेत, असं जानकी मिश्र म्हणाल्या. तसंच माझे पतीही गोरखपूरला पोलिसांसमोर हजर होण्यासाठीच गेले असून ते लवकरच पोलिसांसमोर हजर होतील, असंही त्या म्हणाल्या.
इतर नातेवाईक निर्दोष असल्याचं सिद्ध करण्यासाठी पोलिसांसमोर पुरावे सादर केले जातील, असं दिप्ती यांच्या आई म्हणाल्या.
''अशा मुलींना शिकवणं तर दूरच राहिलं, त्यांना जन्मही द्यायला नको. तिनं संपूर्ण कुटुंब आणि नातेवाईकांची इज्जत घालवली असून सर्वकाही उध्वस्त करून टाकलं,'' असं दिप्ती यांनी दलित मुलाशी लग्न केल्याप्रकरणी बोलताना त्यांच्या आईनं म्हटलं.
या संपूर्ण प्रकरणामध्ये जात हा सर्वात मोठा मुद्दा असल्याचं समोर येत आहे. ''हा भाग चिल्लूपार विधानसभा मतदारसंघात येतो. बसपाचे विनय शंकर तिवारी याठिकाणचे आमदार आहेत. सपा-भाजपच्या नेत्यांनी भेटी देत अनिशच्या हत्येवर शोक व्यक्त केला. पण दलितांचा पक्ष म्हटल्या जाणाऱ्या बसपचे आमदार अद्याप आले नाही,'' असं अनिशचे नातेवाईक रमाशंकर चौधरी म्हणाले.
अशा प्रकरणांमध्ये निर्णयापूर्वी एका मोठ्या कायदेशीर प्रक्रियेला सामोरं जावं लागतं. दिप्ती मिश्र सर्व आरोपींना आणि संपूर्ण कुटुंबाला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी करत आहेत. ''माझं संपूर्ण कुटुंब या ना त्या यात प्रकारे सहभागी आहेच. त्यामुळं सर्वांना फाशी व्हायला हवी. त्यासाठी सर्व स्तरांवर हा लढा लढण्याची माझी तयारी आहे,'' असं दिप्ती मिश्र म्हणाल्या.
पतीच्या हत्येनंतर दिप्ती या कायम अनिश यांचा एक फोटो सोबत ठेवून त्याकडं एकटक पाहत असतात. अनिश कुटुंब मागं सोडून गेले आहेत, ते कुटुंब आता माझी जबाबदारी आहे आणि त्यांची काळजी मी घेणार आहे असं त्या म्हणतात. दिप्ती या सध्या गर्भवती आहेत.
कायद्यानं जर अनिशच्या मारेकऱ्यांना शिक्षा दिली नाही किंवा कायद्यानं तसं करण्यात अपयश आलं तर मी स्वतः आरोपींना शिक्षा देईल, असं दिप्ती म्हणतात.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता. )