You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'हिंदू धर्म नको, बौद्ध धर्म बरा' : उनातले दलित का सोडत आहेत धर्म?
- Author, रॉक्सी गागडेकर छारा
- Role, बीबीसी गुजराती
गुजरातमधल्या उना प्रकरणातील पीडितांनी हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्माचा स्वीकार करण्याचा निर्णय घेतला आहे. काय आहेत यामागची कारणं हे जाणून घेण्याचा केलेला प्रयत्न.
घराच्या गॅलरीत खुर्चीवर बसल्या बसल्या 55 वर्षीय बाळूभाऊ सरवैय्या आकाशाला नजर भिडवत खणखणीत आवाजात बोलतात- "19 तारखेला सगळ्या तसबिरी, देवदेवतांचे फोटो रावळ नदीत विसर्जित करू. दहा दिवसांनंतर आपण बुद्ध धर्म स्वीकारू. जिथे आपल्याला अपमानित करण्यात आलं, अमानुष मारहाण करण्यात आली, आपली धिंड काढण्यात आली अगदी तिथेच आपण बुद्ध धर्मात प्रवेश करू'.
ही घटना आहे 2016 वर्षातली. गुजरात राज्यातल्या गीर सोमनाथ जिल्ह्यातल्या उना गावात बाळूभाऊसरवैय्या यांच्यासह पाच दलितांना जबर मारहाण करण्यात आली. त्यांची गावात धिंड काढण्यात आली. आनंदीबेन पटेल, राहुल गांधी, मायावती यांच्यासह अनेक नेत्यांच्या उना भेटीनंतर हा व्हीडिओ देशभर व्हायरल झाला होता.
या दलित व्यक्तींनी गाईंची कत्तल केली असा आरोप गौरक्षकांनी केला आहे. मात्र आम्ही गाईंना मारलेले नाही तर मेलेल्या गायींचं चामडं कमावत होतो असं या लोकांचं म्हणणं होतं.
"देशातल्या दलित चळवळीची ज्या शहरातून मुहुर्तमेढ रोवण्यात आली त्याच ऐतिहासिक उना शहरात दलितांना अपमानित करण्यात यावं हे अत्यंत दुर्देवी आहे", असं वश्राम सरवैय्या यांनी सांगितलं. वश्राम आणि त्यांच्या तीन भावांना दोन वर्षांपूर्वी मारहाण करण्यात आली होती. त्या घटनेनंतर वश्राम यांनी उनाला भेट दिली तेव्हा बीबीसीने त्यांची तिथेच भेट घेतली. अख्ख्या देशाला ढवळून काढणाऱ्या उना घटनेतील चार पीडित अजूनही या धक्क्यातून सावरलेले नाहीत.
बाळूभाई आणि त्यांचे कुटुंबीय उना तालुक्यातील मोटा समाधीयाला गावात एका छोट्याशा खोपटीवजा घरात राहतात. त्यांच्या घरातल्या भिंतीवर हिंदू देवदेवतांच्या तसबिरी, मूर्ती पाहायला मिळतात. मात्र काही दिवसांपूर्वीच त्याच्या जोडीला आता डॉ. आंबेडकर आणि गौतम बुद्ध यांच्या मूर्ती विराजमान झाल्या आहेत.
अशोक सरवैया यांनी तो प्रसंग कथन केला. पीडितांपैकी अशोक वयाने सगळ्यात लहान आहेत. ते सांगतात, "मला आजही तो प्रसंग आठवला की अंगावर काटा उभा राहतो. ते पुन्हा येतील आणि आम्हाला झोडपून काढतील".
उना प्रकरणातील सगळे पीडित आजही नोकरीव्यवसायाविना आहेत. शेतात मजूर म्हणून काम करण्याचे त्राण त्यांच्या अंगात राहिलेलं नाही. अशोक यांनी सुरुवातीच्या धक्क्यातून सावरल्यानंतर शेतात मजूर म्हणून काम करण्याचा प्रयत्न केला. मात्र ते कष्ट झेपलं नसल्याचं त्यांच्या आईने सांगितलं. त्या म्हणाल्या, "तो रात्री अचानक झोपेतून जागा होत असे. अनेकदा त्याला झोपच लागत नसे. आजही मला त्याला एखाद्या लहान मुलासारखं सांभाळावं लागतं."
वडगामचे आमदार आणि दलित नेते जिग्नेश मेवाणी यांनी गुजरात विधानसभेत उना प्रकरणासंदर्भातील पीडितांना काय मदत मिळाली यासंदर्भातील प्रश्न उपस्थित केला. उना प्रकरणातील पीडितांना सरकारने अधिकृतपणे कुठल्याही मदतीची घोषणा केलेली नाही असं उत्तर त्यांना देण्यात आलं.
दोन वर्षांपूर्वी उनात घडलेल्या या घटनेनं देशव्यापी दलित चळवळीला गती मिळाली. उना पीडितांच्या पाठिंब्याकरता आयोजित केलेल्या रॅलीमुळे जिग्नेश मेवाणी हे नाव देशभर पोहोचलं. "उना घटनेमुळे दलितांना देशभरातून केवळ दलित नव्हे तर अन्य जातीपंथीयांकडून समर्थन मिळालं", असं दलित चळवळ कार्यकर्ते मार्टिन मकवाना यांनी सांगितलं. उनात घडलेल्या प्रसंगामुळे देशातली दलितांची अवस्था नक्की कशी आहे हे जनतेला समजलं असं त्यांनी पुढे सांगितलं.
बौद्ध धर्म का?
उना घटनेनंतर पीडित कुटुंबीय धर्मपरिवर्तनाच्या उंबरठ्यावर होते. हिंदू धर्म सोडण्याचं धैर्य आमच्यात नव्हतं असं बाळूभाईंनी सांगितलं. बाळूभाई हे वश्रम, रमेश आणि बेचार यांचे वडील. बाळूभाई या कटू आठवणींबद्दल सुरुवातीला बोलायला तयार नव्हते. वश्रम यांनी बौद्ध धर्मातल्या चांगल्या गोष्टींविषयी बोलायला सुरुवात केली. ते म्हणाले, "बौद्ध धर्म जागतिक धर्म आहे. उना प्रसंगानंतर हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्म स्वीकारण्यामागची कारणं लोक समजून घेतील. हिंदू धर्म आम्हाला प्रतिष्ठा आणि आदर देऊ शकला नाही".
उना प्रसंगात मारहाण झालेल्या आणि न्यायासाठी संघर्ष करणाऱ्या पीडितांनी बौद्ध धर्माचा स्वीकार करावा, असं आवाहन बाळूभाई आणि वश्रम यांनी केलं आहे. बरीच माणसं आमच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देतील याची खात्री आहे असं बाळूभाई सांगतात.
कट्टर हिंदू ते बौद्धधर्मीय
डॉ. आंबेडकरांनी योगदान दिलं नसतं तर देशातल्या दलितांना रस्त्यावरच्या कुत्र्यांप्रमाणे वागणूक मिळाली असती असं बाळूभाईंच्या पत्नी कुंवरबेन यांनी सांगितलं. काही दिवसांपूर्वीच त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला.
कुंवरबेन या हिंदूधर्माच्या कट्टर समर्थक होत्या. दासमा देवीच्या पूजनासाठी त्या दरवर्षी दहा दिवस उपवास करत असत. "ती आयुष्यभर हिंदू देवदेवतांची पूजा करतेय. उनामध्ये येणाऱ्या सत्संगाला ती नियमितपणे जात असत", असं बाळूभाई सांगतात.
मात्र कुंवरबेन आता हिंदू धर्मावर चिडल्या आहेत. "आमचं आयुष्य भिकाऱ्यांप्रमाणे आहे. आम्हाला मूलभूत हक्कांपासूनही वंचित ठेवण्यात आलं आहे. आम्हाला माणूस म्हणून वागणूक देऊ न शकणाऱ्या धर्माचं पालन मी का करावं?" असा सवाल कुंवरबेन यांनी केला. उना घटनेपूर्वीही वश्रम यांचा ओढा बौद्धधर्माकडे होता. आता त्यांच्या घरात गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तसबिरी दिसू लागल्या आहेत.
2011 जनगणनेनुसार, गुजरात राज्यात 30,483 बौद्धधर्मीय आहेत. उना घटनेनंतर गुजरात राज्यात बौद्ध धर्म स्वीकारण्यांची संख्या वाढू लागली आहे, असं बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. पी.जी. ज्योतीकर यांनी सांगितलं.
या संस्थेची स्थापना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केली होती. ज्योतीकर गुजरात विद्यापीठातील इतिहास विभागाचे प्रमुख आहेत. बौद्ध धर्म स्वीकारणाऱ्या पहिल्या मोजक्या मंडळींमध्ये त्यांचा समावेश होतो. "1960च्या दशकात डॉ. आंबेडकरांच्या पावलावर पाऊल ठेवत मी बौद्ध धर्म स्वीकारला", असं ज्योतीकर यांनी सांगितलं.
ते पुढे म्हणाले, "जनगणनेनंतर बौद्ध धर्माची लोकसंख्या दुपटीने वाढली आहे. आता राज्यात सुमारे 70,000 बौद्धधर्मीय असतील. यामागचं प्रमुख कारण म्हणजे आत्मसन्मान. शिक्षण घेतलेल्या दलित युवकांच्या महत्त्वाकांक्षा प्रबळ आहेत. त्याचवेळी प्रतिष्ठा मिळत नसल्यानं अनेक दलित युवक हिंदू धर्म सोडण्याच्या उंबरठ्यावर आहेत. दलित समाजातील व्यक्तींवर होणारे हल्ले हेही बौद्ध धर्म स्वीकारण्यामागचं मुख्य कारण आहे."
गाईवरचं प्रेम कमी होणार नाही-बाळूभाई
उना घटनेपूर्वीपासून बाळूभाईंकडे गीर गाय आहे हे खूपच कमी लोकांना ठाऊक आहे. तिचं नाव त्यांनी गौरी असं ठेवलं. उना घटनेपूर्वी त्यांनी गौरीच्या औषधांसाठी 6000 रुपये खर्च केले. गौरीविषयी बोलताना बाळूभाई सांगतात, "गौरी माझ्या भावाच्या घरी आहे. आता तिचं वासरूही आहे. धर्माचा आणि गाईच्या प्रेमाचा काही संबंध नाही. बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतरही गौरी माझ्याबरोबरच असेल. मी तिची सेवा करतच राहीन."
"कोणताही दलित गाईला त्रास देणार नाही. कातडं कमावण्यासाठी आजारी गाईलासुद्धा आम्ही कधीही हात लावलेला नाही. खूप पैशाचं आमिष असूनही आम्ही आजारी गायींनी हात लावला नाही.
उनाप्रकरणी 45 लोकांना अटक करण्यात आली आहे. यापैकी 11 जण तुरुंगात आहेत. बाकी सर्वजण जामिनावर बाहेर आहेत.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)