You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'पैशाच्या बदल्यात हिंदुत्वाच्या बातम्या छापू'
- Author, प्रियंका दुबे
- Role, बीबीसी हिंदी प्रतिनिधी
पैशांच्या बदल्यात काही प्रसारमाध्यमांनी हिंदुत्वाचा प्रचार केल्याचा खळबळजनक खुलासा कोब्रापोस्ट या शोधपत्रकारिता संकेतस्थळाने केला आहे. 17 प्रसारमाध्यम संस्थांनी सॉफ्ट हिंदुत्वाच्या प्रसारासाठी पैसे घेतल्याचं या स्टिंगद्वारे उघड झालं आहे.
राजधानी दिल्लीत कोब्रापोस्टचे संपादक अनिरुद्ध बहल यांनी पत्रकार परिषदेत 'ऑपरेशन 136' च्या चित्रफिती सादर केल्या. 'वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स' अर्थात प्रसारमाध्यम अभिव्यक्ती स्वातंत्र्य जागतिक निर्देशांकात भारताचा क्रमांक 136 आहे. त्याचा संदर्भ म्हणून या स्टिंग ऑपरेशनचं नाव 136 देण्यात आलं आहे.
कोब्रापोस्टच्या स्टिंग योजनेनुसार 'श्रीमद्भगवदगीता प्रचार समिती'चे प्रतिनिधी असल्याचं सांगत काही पत्रकार 17 विविध प्रसारमाध्यम संघटनातील वरिष्ठ पत्रकार आणि प्रमुख विपणन अधिकाऱ्यांना भेटले. हिंदुत्व विचारसरणी धार्जिण्या बातम्या प्रसिद्ध करण्यासाठी प्रचंड पैसे आणि सातत्याने जाहिराती देण्याचं आमीष या पत्रकारांनी दाखवलं.
प्रसारमाध्यम संस्थांच्या प्रमुखांनी हिंदुत्व विचारसरणीला पाठिंबा देणाऱ्या एकांगी स्वरुपाच्या बातम्या, लेख छापण्याचं तोंडी मान्य केलं. 2019 निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते राहुल गांधी, मायावती, अखिलेश यादव यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे अरुण जेटली, मनोज सिन्हा, जयंत सिन्हा, वरुण गांधी आणि मनेका गांधी यांच्याविरोधातील मजकूर छापण्याची तयारी त्यांनी दर्शवली.
कोब्रापोस्टनं 7 वृत्तवाहिनी, 6 वर्तमानपत्रं, 3 संकेतस्थळं आणि एक वृत्तसंस्था यांच्याशी संपर्क साधला. पुढच्या वर्षी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर धार्मिक व्याख्यानं, हिंदू नेत्यांची भाषणं तसंच विरोधी पक्षनेत्यांच्या कार्यक्रमाचं वृत्तांकन करायला या प्रसारमाध्यम प्रमुखांनी मान्यता दिली.
कोब्रापोस्टने आरोप केलेल्या 17 कथित कंपन्यांपैकी इंडिया टीव्हीच्या सेल्स विभागाचे अध्यक्ष सुदिप्तो चौधरी यांच्याशी बीबीसीने संपर्क साधला.
ते म्हणतात, 'ऑपरेशन 136ने केलेल्या दाव्यापैकी कोणतीही गोष्ट आम्ही मान्य केलेली नाही. कुठलीही गोष्ट आम्ही प्रसारित केलेली नाही. कोब्रापोस्टने सादर केलेल्या फुटेजमध्ये बदल करण्यात आले आहेत."
"आचार्य छत्रपाल अटल यांनी मांडलेला जाहिरातीरूपी बातमीचा प्रस्ताव माझ्या सहकाऱ्याने मान्य केल्याचं व्हीडिओत दाखवण्यात आलं आहे. मात्र संदर्भ तोडून हे संभाषण दाखवण्यात आलं. खळबळ उडवून देण्यासाठी व्हीडिओचा थोडा भाग प्रसारित करण्यात आला. मात्र हे पूर्ण सत्य नाही. इंडिया टीव्हीतर्फे कोब्रापोस्टविरोधात कायदेशीर पाऊल उचलण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत".
दैनिक जागरणचे मुख्य संपादक आणि जागरण प्रकाशन लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय गुप्ता यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत कोब्रापोस्टचे दावे खोडून काढले.
या स्टिंग ऑपरेशनच्या विश्वासार्हतेबद्दल मला शंका आहे. स्टिंग ऑपरेशनमध्ये दैनिक जागरणच्या बिहार आणि ओडिशा क्षेत्राचे सेल्स मॅनेजर संजय प्रताप सिंग यांचं म्हणणंही गुप्ता यांनी नाकारलं. सिंग यांना काहीही सांगण्याचा अधिकार नाही कारण तो त्यांच्या कामाचा भाग नाही. व्हीडिओची शहानिशा केल्यानंतर सिंग यांच्याविरोधात कारवाई करण्यात येईल असं गुप्ता यांनी सांगितलं.
'गोदी मोडिया' अर्थात मोदीप्रणित सरकारला अनुकूल बातम्या प्रसारित करणारी प्रसारमाध्यमं ही संकल्पना लोकप्रिय झाली आहे. सत्ताधाऱ्यांची बाजू लावून धरत असल्याचा आरोप भारतातील प्रसारमाध्यमांवर होतो आहे. सरकारला अनुकूल बातम्याच प्रसिद्ध होत असल्याचा आरोप माध्यमांवर होतो आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)