You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पाकिस्तानात जाऊन मुस्लीम झालेल्या किरण बालाचा अमीना बीबीपर्यंतचा प्रवास...
- Author, शुमाईला जाफरी
- Role, बीबीसी प्रतिनिधी, इस्लामाबाद
बैसाखीचा सण साजरा करण्यासाठी पाकिस्तानमध्ये गेलेल्या शीख भाविकांबरोबर किरण बाला या सुद्धा पाकिस्तानात गेल्या. पाकिस्तानात गेल्यावर त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारला आणि तिथल्याच एका व्यक्तीशी निकाहसुद्धा केला.
गुरुवारी पाकिस्तानातल्या भारतीय अधिकाऱ्यांकडे सोपवलेल्या पत्रात किरणनं स्वतःला अमीना बीबी म्हटलं आहे. या पत्रात त्यांनी लिहिलंय, "या पत्रावर स्वाक्षरी केलेली व्यक्ती सद्य परिस्थितीत भारतात परतू शकत नाही. तिला जीवे मारण्याची धमकी दिली गेली आहे. त्यामुळे ती आपला व्हिसा वाढवण्याची विनंती करत आहे."
बीबीसीनं या महिलेशी पाकिस्तानात बातचीत केली आणि हे संपूर्ण प्रकरण समजून घेण्याचा प्रयत्न केला.
'मी आझमला दिड वर्षांपासून ओळखते'
बीबीसीशी बोलताना अमीना बीबीनं सांगितलं, "मी मोहम्मद आझमला गेल्या दिड वर्षांपासून ओळखते. आम्ही सोशल मीडियावर भेटलो. फोन नंबर एकमेकांना दिले आणि त्यानंतर आम्ही बोलायला लागलो. सहा-सात महिन्यांनंतर आम्ही लग्नाचा विचार करायला सुरुवात केली आणि मग मी पाकिस्तानी व्हिसा मिळवण्याचा प्रयत्न केले. पण काही कारणांमुळे मला व्हिसा मिळाला नाही."
पण मग भाविकांबरोबर तुम्ही पाकिस्तानात का गेलात या प्रश्नाचं उत्तर देताना अमीना सांगतात, "मला माहिती पडलं की अमृतसर ते पाकिस्तान असं काही शीख भाविक जाणार आहेत. मी यासाठी अर्ज दाखल केला आणि इथे आले. पहिल्यांदा मी पाकिस्तानमधल्या पंजा साहिबला गेले आणि त्यानंतर ननकाना साहिब. तिथून मी लाहौरला आले. लाहौरला मी आणि आझमनं लग्न केलं आणि मी मुस्लीम बनले."
पण तुम्ही दोघं भेटलात कसे? एकमेकांना ओळखलं कसं? एकमेकांना पाहिलं होतं की फोटो पाहून ओळखलं हे विचारल्यावर अमीना सांगतात, "मी रिक्षा करून एका पुलापर्यंत पोहोचले, जिथं आझम माझी वाट बघत होते. मी त्यांना सांगितलं होतं की मी तिथं येणार आहे."
लग्न कसं झालं?
"आम्ही IMO मेसेंजरवर बोलत होतो. त्यामुळे आम्ही एकमेकांना बघितलं होतं." तुम्हा दोघांचं लग्न नेमकं कसं झालं यावर अमीना सांगतात, "आम्ही पहिल्यांदा त्यांच्या घरी गेलो. त्यानंतर कोर्टात गेलो. त्यांनी सांगितलं की मुलीला मुसलमान व्हावं लागेल. त्यानंतर मी इस्लाम धर्म स्वीकारला आणि मग आमचा निकाह झाला. इंशाल्लाह शुक्रवारी आमच्या लग्नाचं रजिस्ट्रेशनही झालं."
भारतातील आपल्या कुटुंबाबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, "घरी आई आहे, वडील आहेत, भाऊ-बहीणही आहेत. याअगोदर माझं लग्न झालं होतं, पण माझ्या पतीचं निधन झालं. मला अमृतसरहून पाकिस्तानात यायचं होतं म्हणून मी माझ्या मावशीबरोबर राहत होते."
तुम्हाला मूलं-बाळं आहेत का, असं विचारल्यावर त्यांनी सांगितलं, "मी माझ्या आई-वडिलांबरोबर राहत होते. मला मूलं-बाळं नाहीत. मी माझ्या मावशीच्या मुलांना आपलं मानलं. माझ्याबद्दल खोटी माहिती पसरवली जात आहे जेणेकरून मी भारतात परत यावं. पण आता तसं होणं शक्य नाही."
तू जे केलं आहेस त्याची तुला शिक्षा जरूर मिळेल असं अमीनाला तिच्या आई-वडिलांनी सांगितलं आहे. याचदरम्यान अमीनाच्या व्हिसासंदर्भात पावलं उचलण्याचे आदेश लाहौर हायकोर्टानं पाकिस्तानच्या गृहमंत्रालयाला दिले आहेत. जर आपल्याला भारतात परत पाठवलं तर आपल्या जीवाला धोका आहे, असं अमीनाचं म्हणणं आहे.
भारतात काय प्रतिक्रिया?
होशियारपूरच्या किरण बाला 33 वर्षांच्या आहेत. पतीच्या मृत्यूनंतर, 2005 सालापासून त्या 8 वर्षांची मोठी मुलगी आणि दोन लहान मुलांसोबत सासरी राहत होत्या. 12 एप्रिल रोजी, त्या 1800 शीख भाविकांसह पाकिस्तानमध्ये गेल्या.
लाहौर गुरुद्वारा व्यवस्थापन समितीचे सचिव गोपाल सिंग चावला यांच्याशी बीबीसीचे अमृतसरमधले प्रतिनिधी रविंदर सिंग रॉबिन यांनी संपर्क साधला.
चावला म्हणाले की, "किरण त्या शीख यात्रेकरूंसोबत होत्या. पण सध्या त्यांचा काही ठावठिकाणा नाही. यासंदर्भातली तक्रार योग्य त्या अधिकाऱ्यांकडे नोंदवावी लागेल. आमची त्यात काही भूमिका नाही. त्यांनी इस्लामचा स्वीकार केला आहे, असं कळलं आहे. आमचा त्याला विरोध आहे."
किरण यांचे सासरे, तारसेम सिंग हे होशियापूरमधल्या एका गुरुद्वारात पुजारी (ग्रंथी) आहेत. ते म्हणाले की, "तीन दिवसांपूर्वी मी तिच्याशी बोललो. तेव्हा आपण परतणार नसल्याचं तिनं सांगितलं. सुरुवातीला मला ती थट्टा वाटली. पण आता तिनं लाहौरमध्ये धर्मांतर केल्याचं कळलं तेव्हा धक्काच बसला. तिनं परत यावं आणि मुलांचा सांभाळ करावा," असं तारसेम सिंह यांनी स्पष्ट केलं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)