नरोडा पाटिया प्रकरण : नेमकं काय घडलं? कोण आहेत माया कोडनानी?

गुजरात हायकोर्टानं नरोडा पाटिया प्रकरणी माजी मंत्री माया कोडनानी यांना दोषमुक्त केलं, तर, बाबू बजरंगीची शिक्षा कायम ठेवली आहे.

गुजरातच्या तत्कालीन महिला व बालकल्याण मंत्री माया कोडनानी यांनी गाडीतून उतरून जमावाला भडकावलं असं सांगणारा कोणताही साक्षीदार पोलिसांनी सादर केला नसल्याचं कोर्टानं म्हटलं आहे.

माया यांच्यावर विलंबानं दाखल करण्यात आलेला गुन्हा आणि उशीरा सुरू करण्यात आलेली कारवाई हेही त्यांना दोषमुक्त करण्यामागचं एक कारण आहे. एसआयटीनं या प्रकरणाची चौकशी सुरू केल्यावर त्यांचा सहभाग लक्षात आला होता.

ज्या 11 लोकांनी साक्षी दिल्या होत्या, त्यांच्यावर विश्वास ठेवता येणार नाही, असं निकालात म्हटलं आहे. माया यांचे पीए कृपाल सिंह छाब्रा यांनाही दोषमुक्त करण्यात आलं आहे.

बजरंग दलाचे बाबू बजरंगी याला न्यायालयानं दिलासा दिलेला नाही. त्याला झालेली जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवण्यात आली आहे.

ऑगस्ट-2012 मध्ये बाबू बजरंगीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. या प्रकरणात एसआयटीच्या विशेष कोर्टानं माया कोडनानी आणि बाबू यांच्यासह 32 जणांना दोषी ठरवलं होतं. तसंच, माया यांना 28 वर्षांची तर, बाबू बजरंगीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती.

या प्रकरणात 62 आरोपी होते, त्यातील 29 जण पुराव्याअभावी सुटले आहेत. या निकालानंतर, पीडितांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तसंच, एसआयटीनंही निर्दोष लोकांविरुद्ध उच्च न्यायालयात याचिका केली होती.

काय घडलं होतं?

अहमदाबादच्या नरोडा पाटिया परिसरात झालेल्या दंगलीत 97 मुस्लिमांचा मृत्यू झाला होता. तर, हिंसाचारात 33 जण जखमी झाले.

फेब्रुवारी-2002 मध्ये गुजरातच्या गोध्राच्या दुर्घटनेनंतर दुसऱ्या दिवशी नारोडा पाटियात दंगल झाली. सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाचे न्यायाधीश नारोडा पाटिया परिसरातही पाहणीसाठी गेले होते.

या प्रकरणाच्या चौकशीत भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनाही बचाव पक्षाचे साक्षीदार म्हणून कोर्टात हजर राहावे लागले होते.

माया कोडानानी कोण आहेत?

माया कोडनानी जामिनावर होत्या. खालच्या न्यायालयानं त्यांना त्या दंगलीच्या 'मास्टरमाइंड' म्हटलं होतं.

गुजरात सरकारमध्ये मंत्री असणाऱ्या माया नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांच्या निकटवर्तीयांपैकी होत्या.

फाळणीपूर्वी माया याचा परिवार पाकिस्तानातल्या सिंधमध्ये वास्तव्यास होता. फाळणीनंतर त्याचं कुटुंब गुजरातमध्ये स्थायिक झालं. माया कोडनानी व्यवसायाने डॉक्टर आहेत. त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबधित आहेत.

नरोडामध्ये त्यांचं स्वतःचं रुग्णालय होतं. पुढे त्या स्थानिक राजकारणात सक्रिय झाला.

वक्तृत्वामुळे त्या अल्पावधीतच भारतीय जनता पार्टीत लोकप्रिय झाल्या. 1998मध्ये त्या नरोड्यातून पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आल्या.

2002 बरोबरच 2007मध्ये त्या निवडून आल्या. त्या काळात त्यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला.

2009 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या विशेष पथकानं त्यांना चौकशीसाठी बोलावलं होतं. त्यानंतर माया यांना अटक झाली आणि पदाचा राजीनामा द्यावा लागला.

29 ऑगस्ट 2012 रोजी नरोडा पाटिया दंगल प्रकरणात न्यायालयानं त्याला दोषी ठरवलं होतं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)