You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना व्हायरसनंतर प्लेग : चीनमध्ये ब्युबॉनिक प्लेग आढळला रुग्ण
जगभरात कोरोना व्हायरसचा संसर्ग एकदाचा कधी कमी होतो, अशी धाकधूक लागलेली असतानाच चीनमधून आणखी एक धोक्याची सूचना येत आहे.
चीनमधल्या इनर मंगोलिया या स्वायत्त प्रदेशात ब्युबॉनिक प्लेगचे (गाठीचा रोग किंवा प्लेग) रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिला आहे.
पहिला रुग्ण बायानूर शहरात शनिवारी आढळला, तेव्हा त्याला प्लेग झाल्याचा संशय होता. हा रुग्ण एक गुराखी असून त्याला उरद मिडर बॅनर भागातील एका रुग्णालयात क्वारंटाईन करण्यात आलं आहे. त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे.
दुसरा रुग्ण 15 वर्षांचा आहे, जो एकप्रकारच्या जंगली खारीची शिकार केलेल्या कुत्र्याच्या संपर्कात आला होता, असं ट्वीट ग्लोबल टाइम्सने केलंय.
मार्मट प्रजातीची ही खार प्लेगची प्रमुख बॅक्टेरिया वाहक म्हणून ओखळली जाते, आणि त्यामुळेच या प्राण्याची शिकार करणं बेकायदेशीर आहे.
बॅक्टेरियाच्या संसर्गामुळे होणारा प्लेग हा आजार तसा तर जीवघेणा ठरू शकतो, पण सामान्यरीत्या उपलब्ध औषधांनी त्यावर उपचार करता येतो.
या गुराख्याला हा रोग कसा झाला असावा, हे अजूनही स्पष्ट नाही. मात्र स्थानिक प्रशासनाने तिसऱ्या क्रमांकाचा अलर्ट जारी केला आहे. ज्यानुसार आता त्या भागातल्या लोकांना आता कुठल्याही प्राण्याची शिकार करण्यास किंवा त्यांचं मांस खाण्यास मनाई आहे. जर त्यांच्यात प्लेगची कुठलीही लक्षणं दिसली तर तातडीने प्रशासनाला सूचना देण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
ब्युबॉनिक प्लेग म्हणजे काय?
प्लेग हा मुळातच एक जीवघेणा रोग आहे. काही प्राण्यांच्या शरीरावर आढळणाऱ्या येरसिनिया पेस्टिस या बॅक्टेरियातून या रोगाची लागण होते.
त्याच प्लेगचा सर्वांत सामान्य प्रकार म्हणजे ब्युबॉनिक प्लेग.
ब्युबॉनिक प्लेग झालेल्या रुग्णांच्या शरीरावर मोठ्या गाठी तयार होतात. काखेत किंवा जांघेत या गाठींमुळे भयंकर वेदना होतात. यामुळे रुग्णाच्या शरीरावर काळे चट्टे तयार होतात, तसंच हाताचे-पायाचे बोटं काळे पडतात. त्यामुळे याला ब्लॅक डेथ सुद्धा म्हटलं जातं.
ब्युबॉनिक प्लेगमध्ये काय होतं?
एखाद्या व्यक्ती संसर्ग झाल्यापासून दोन ते सहा दिवसांनी आजारी पडू लागते. यामुळे सुरुवातीला शरीरावर लहान, सौम्य गाठी दिसू लागतात, पण कधीकधी त्यांचा आकार अंड्याएवढा मोठाही असू शकतो.
इतर काही लक्षणांमध्ये ताप, पडसं, डोकेदुखी, अंगदुखी आणि थकवा येणे, या गोष्टींचा समावेश आहे. तर कधी कधी फुप्फुसांवरही याचा परिणाम होतो, ज्यामुळे खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.
या बॅक्टेरियाने जर रक्तप्रवाहात प्रवेश केला तर मग त्यामुळे सेप्टीसेमिया किंवा सेपसिस होऊ शकतो. मग शरीराची प्रतिकार यंत्रणेवर ताण येऊन पेशींना इजा पोहोचू शकते, अवयव निकामी होऊ शकतात आणि रुग्णाचा मृत्यूही होऊ शकतो.
त्यामुळेच प्लेग हा इतिहातातील सर्वांत भीषण आजारांपैकी एक आहे. पण आता त्याच्यावर अँटिबायोटिक्समुळे उपचार करणं सहज शक्य आहे.
सुरुवातीला या रोगाचं निदान रक्त तपासणी आणि शरीरातील इतर नमुन्यांची चाचणी करून केलं जातं.
पण जर उपचार केले नाही तर सुमारे 30 ते 100 टक्के रुग्णांचा मृत्यू होऊ शकतो, असं जागतिक आरोग्य संघटना (WHO) सांगते.
- महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा - माझा जिल्हा कोणत्या झोनमध्ये? पाहा संपूर्ण महाराष्ट्राची यादी
- वाचा - कोरोना लॉकडाऊन : महाराष्ट्रात जुलै महिन्यात काय अनलॉक होणार?
- वाचा - कोरोना व्हायरसवरील लस बनवण्याचं काम कुठवर आलं?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा-कोरोनाचं संकट कधी जाणार?
ब्युबॉनिक प्लेग कसा होऊ शकतो?
ब्युबॉनिक प्लेगची लागण तीन प्रकारे होऊ शकते -
- संक्रमित किडे तुम्हाला चावल्याने
- संक्रमित उंदरांना किंवा इतर प्राण्यांना हात लावल्याने
- किंवा संक्रमित लोकांनी किंवा प्राण्यांच्या नाकातोंडातून निघालेल्या तुषारांनी तुमच्या शरीरात प्रवेश केला तर.
एखादी संक्रमित किडा किंवा उंदीर जर तुमच्या पाळीव प्राण्याने, कुत्र्या-मांजराने खालला, तर त्यामुळे त्यांनाही संसर्ग होऊ शकतो. तसंच जर शरीरावर एखादी जखम असेल, तर त्यातूनही संसर्गाची भीती जास्त असते.
जर कुणी प्लेगमुळे मरण पावलंय, तर त्या मृतदेहाच्या संपर्कात येणाऱ्या लोकांनाही संसर्ग होण्याची शक्यता असते.
प्लेगचा इतिहास
जगभरात 2010 ते 2015 या कालावधीत प्लेगचे 3,248 रुग्ण आढळले होते, तर एकूण 584 रुग्णांचा यामुळे मृत्यू झाला आहे.
मात्र इतिहासात डोकावून पाहिलं तर याच्या अनेक आणखी भयंकर साथी दिसतात. अगदी 14व्या शतकापासून तर 2017 पर्यंत, प्लेगची साथ जगभरात ठिकठिकाणी वेगवेगळ्या कालखंडांमध्ये पाहायला मिळाली आहे.
14व्या शतकात युरोप, आफ्रिका आणि आशियात प्लेगची भयंकर साथ आली होती. तेव्हा सुमारे 5 कोटी म्हणजेच तेव्हाच्या एकूण लोकसंख्येच्या एक तृतीयांश संख्या यावेळी मृत्यू पावली, असं अभ्यासक सांगतात.
त्यानंतर 1665 साली प्लेगने लंडनच्या 20 टक्के लोकसंख्येचा बळी घेतला होता. तर 19व्या शतकाच्या सुरुवातीला चीन तसंच भारतात सुमारे सव्वा कोटी लोकांचा प्लेगमुळे बळी गेला होता.
मुंबई, पुण्यात 1896 आणि 1897 साली प्लेगच्या साथीने थैमान घातलं होतं. एकतर लोकांना प्लेगविषयी फारशी माहिती नव्हती, त्यामुळे प्रचंड घबराटीचं वातावरण पसरलं. प्लेगवर औषधंही परिणामकारक नव्हती, त्यामुळे लोकांमध्ये याची दहशत होती.
2017 साली मादागास्करमध्ये 300 हून अधिक प्लेगचे रुग्ण आढळले होते, मात्र एका लॅन्सेट अभ्यासानुसार मृतांचा आकडा 30पेक्षाही कमी होता.
तर गेल्या वर्षी मंगोलियामध्ये दोन लोकांचा प्लेगने बळी घेतला होता. या दोघांनी मार्मटचं मांस खाल्ल्यामुळे त्यांना प्लेग झाला होता, असं लक्षात आलं होतं.
प्रत्येक वेळी या रोगाचा उद्रेक होऊन साथ येईलच, असं नाही.
"14व्या शतकाच्या तुलनेत आपल्याला प्लेग काय आहे, तो कसा पसरतो, हे आज नक्कीच चांगल्याने समजतं," स्टॅनफर्ड हेल्थ केअरच्या डॉ. शांती कपागोडा यांनी 'हेल्थलाईन'शी बोलताना सांगितलं. "त्यामुळे त्यापासून स्वतःचा बचाव कसा करायचा, हे आपल्याला माहितीय. आता आपल्याकडे प्लेगच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी अँटिबायोटिक्स उपलब्ध आहेत."
आजही अनेक देशांमध्ये थोड्याअधिक प्रमाणावर प्लेग आहेच. मात्र गेल्या काही शतकांच्या तुलनेत त्यामुळे होणारी हानी बरीच कमी झाली आहे.
हे नक्की वाचा
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)