You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना मुंबई : KEM च्या कोरोना योद्धा ज्यांनी स्वतः कोव्हिड-19वर मात केली
- Author, मयांक भागवत
- Role, बीबीसी मराठीसाठी मुंबईहून
"मला कोरोना वॉर्डमध्ये काम करताना, कोरोनाग्रस्तांवर उपचार करताना अजिबात भीती वाटत नाही. रुग्णांवर उपचार हे माझं कर्तव्य आहे, रुग्णांना माझी गरज आहे."
हे शब्द आहेत कोरोनावर डॉ. स्मृती वाजपेयी-तिवारी यांचे. डॉ. स्मृती या फक्त कोव्हिड योद्धा नाही तर कोरोनावर मात करून PPE किट नावाचं चिलखत घालून पुन्हा लढाईसाठी सज्ज झालेली एक रणरागिणी आहे. कारण मुंबईच्या किंग एडवर्ड मेमोरिअल (KEM) रुग्णालयातील कोव्हिड आयसीयूची जबाबदारी त्यांच्यावर आहे.
कोव्हिड-19 शी लढताना, जीवाची पर्वा न करता सामान्यांना जीवनदान देताना काही डॉक्टर्सना कोरोनाची लागण झाली. काही मरण पावले. मात्र तरीही, न घाबरता आपलं कर्तव्य बजावण्यासाठी हे योद्धे पुन्हा मैदानात उतरलेत. त्यातल्याच एक आहेत म्हणजे डॉ. स्मृती वाजपेयी.
1 जुलै हा दिवस भारतात 'डॉक्टर्स डे' म्हणून साजरा केला जातो. प्रसिद्ध डॉ. बी. सी. रॉय यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हा दिवस साजरा केला जातो.
डॉक्टरांचं समाजातील स्थान अढळ आहे. प्रत्येक जीव वाचवण्यासाठी त्यांची खटपट, अपार प्रयत्न, दिवसरात्र मेहनत आणि समाजासाठी त्यांनी दिलेलं योगदान, यांचा सन्मान करण्यासाठी 'डॉक्टर्स डे' साजरा केला जातो.
यंदाचा 'डॉक्टर्स डे' अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. भारतातील डॉक्टर्स गेल्या तीन महिन्यांपासून एका न दिसणाऱ्या शत्रूशी लढतायत. प्रत्येक जीव वाचवण्यासाठी शत्रूच्या गुहेत जावून त्याचा मुकाबला करतायत. कोरोना व्हायरस आणि सामान्यांमध्ये ढाल बनून हे डॉक्टर्स उभे आहेत.
डॉ. स्मृती म्हणतात, "कोरोनाने मला खूप काही शिकवलंय. हा आजार आपल्याला होणार नाही, याच्या भ्रमात कुणीच राहू नये. हा आजार कुणालाही होऊ शकतो. मी हा आजार एक डॉक्टर आणि कोरोनाबाधित रुग्ण म्हणून जवळून पाहिलाय, अनुभवलाय. कोव्हिडसोबत मी जगलेय आणि जगतेय."
KEM रुग्णालयातील संसर्गजन्य आजार या विभागात असोसिएट प्रोफेसर म्हणून काम करणाऱ्या डॉ. वाजपेयी मार्च महिन्यापासूनच कोव्हिड-19 ड्युटीवर आहेत.
डॉ. स्मृती म्हणतात, "कोरोनाग्रस्तांवर उपचार करताना एप्रिल महिन्याच्या शेवटी मला थोडा त्रास होऊ लागला. लक्षणं अत्यंत कमी प्रमाणात दिसून येत होती. तपासणी केली तर धक्काच बसला. माझी कोव्हिड-19 टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. सुरुवातीला काही तास विश्वासच बसत नव्हता. विश्वास कसा बसणार? मी डॉक्टर आहे. हे कसं शक्य आहे? इतकी काळजी घेऊनही असं व्हावं? मनात अनेक विचार आले. पण वेळ घालवून फायदा नव्हता. मला कोरोनाची लागण झाली आहे, हे मान्य करून पुढची पावलं उचलायची होती."
- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोनावरची लस बनवण्याचं काम कुठवर आलं? येत्या सप्टेंबरपर्यंत लस येणार?
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?
देशभरातील कोव्हिड-19 योद्ध्यांप्रमाणे डॉ. स्मृती कोरोनाशी लढत होत्या. स्वत: कोरोनाग्रस्त झाल्या. पण त्यांची खरी कसोटी पुढे होती. एका मोठ्या दिव्यातून त्यांना पार व्हायचं होतं, कारण फक्त डॉ. स्मृतीच नाही तर त्यांच्या कुटुंबातील 9 जणांना कोरोनाची लागण झाली होती.
तो दिवस आठवताना डॉ. स्मृती सांगतात, "मला कोरोनाची लागण झाली हे मी मान्य केलं. पण एका पाठोपाठ एक कुटुंबातील 9 लोकांना कोरोना झाल्याचं कळल्यानंतर पायाखालची जमीन सरकली. हे सर्व खूप भीतीदायक होतं. पती, 15 महिन्यांची दोन लहान मुलं, आई-वडील, सासू सर्वांना कोरोनाची लागण झाली होती.
"मनात विचारांचं काहूर माजलं. हे माझ्यामुळे झालंय. माझ्यामुळे कुटुंबीयांना कोरोना झाला. मनावर खूप दडपण आलं. घरी येऊन मी चूक केली? इतरांप्रमाणे होस्टेलमध्ये राहिले असते तर, कदाचित माझ्या कुटुंबाला हे सोसावं लागलं नसतं. पण डोळ्यांसमोर जे घडत होतं, ते अमान्य करण्याची ती वेळ नव्हती."
कोरोना व्हायरसचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांतील आकडेवारी-
डॉ. स्मृती यांना उपचारांसाठी मुंबईच्या सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र मुलं आणि आई-वडील घरीच होते.
"मी पाच दिवस रुग्णालयात होते, पण खूप बेचैन होते. आई माझ्या दोन जुळ्या मुलांची काळजी घेत होती. मला माझ्यापेक्षा जास्त काळजी घरच्यांची होती. डॉक्टर असल्याने स्वत:ची काळजी घेणं शक्य होतं. पण वृद्ध आई-वडील, सासू यांचं काय? मी आई आहे, या विचाराने रुग्णालयातून डिस्चार्ज घेतला आणि घरी क्वारन्टाईन झाले. सुदैवाने सर्वांना खूप सौम्य लक्षणं दिसून येत होती. त्यामुळे योग्य उपचारांनी सर्व बरे झाले," असं डॉ. स्मृती पुढे म्हणाल्या.
कोरोना हा शब्द सद्यस्थितीला सर्वांना नकोसा झालाय. हा शब्द कानावर पडला तरी लोक घाबरतात. डॉ. स्मृती म्हणतात, "मला कोरोना झाल्याचं ऐकताच वडिलांना अश्रू अनावर झाले. पतीने विचारलं, हे आपल्यासोबतच का झालं? माझ्याकडे याचं उत्तर नव्हतं. एक पत्नी, आई, डॉक्टर म्हणून कुटुंबीयांना धीर देण्याशिवाय त्यावेळी मी काहीच करू शकत नव्हते."
मे महिन्यात सुरू झालेली कोरोनाशी झुंज संपली आणि त्यानंतर क्वारन्टाईनचा काळ संपल्यानंतर डॉ. स्मृती 1 जूनपासून कामावर पुन्हा रुजू झाल्या. पुन्हा अंगावर चिलखत घालून नव्या उमेदीने कोव्हिड वॉर्ड, ICUमध्ये शिरल्या.
"कामावर न परतणं हा पर्याय नव्हताच. माझ्या कुटुंबीयांप्रमाणेच माझ्या रुग्णांनाही माझी गरज होती. सहकाऱ्यांवर पडणाऱ्या ताणाची मला जाणीव होती. डॉक्टर म्हणून रुग्णांची सेवा हे माझं कर्तव्य आहे. या आजाराने नकळतच मला खूप काही शिकवलं आहे. आजाराचा एक महिना माझ्या आयुष्यातील सर्वांत महत्त्वाचा काळ होता," असं डॉ. स्मृती म्हणतात.
कोरोना या आजाराबाबत लोकांमध्ये खूप भीती निर्माण झालीये. याबाबत बोलताना डॉ. स्मृती म्हणतात, "हा आजार इतर आजारांसारखा नाही. आजारपणात रुग्णांची काळजी घेण्यासाठी घरचे असतात. मात्र कोरोनाने सर्व चित्र बदललं आहे. रुग्ण कुटुंबापासून दूर असतात. त्यामुळे रुग्णांमध्ये एकटेपणाची भावना निर्माण होते. रुग्णालयात ते एकटे पडतात. नातेवाईक दिसत नाहीत, बोलणं होत नाही. नातेवाईकांनाही काय करावं हे कळत नाही.
"हा एकटेपणा मी अनुभवलाय. कोरोनाग्रस्त रुग्ण म्हणून मी जगलेय आणि डॉक्टर म्हणून जगतेय. मी दोन्ही दिवस पाहिले आणि अनुभवले आहेत. कोरोनाने या कठीण काळात माणूस म्हणून जगायला शिकवलं आहे. डॉक्टर रुग्ण आणि कुटुंबीय यांच्यातील एकमेव दुवा आहे. हा दुवा नसेल तर रुग्ण एकटे पडतील," असं डॉ. वाजपेयी म्हणतात.
ICUला रुग्णांच्या आयुष्यातील शेवटचा टप्पा म्हटलं तरी अयोग्य ठरणार नाही. काही रुग्ण कोरोनावर मात करून कुटुंबाकडे परततात. तर काहींची जीवनयात्रा इथे संपते.
डॉ. स्मृती सांगतात, "रुग्ण म्हणजे डॉक्टरचं दुसरं कुटुंबच. पण कोरोना ICU किंवा वॉर्डमध्ये काम करताना हृदय, भावना मागे ठेवून काम करावं लागतं. वॉर्डमध्ये भावनांना थारा नाही. इथे काही रुग्ण बरे होतात, तर काहींचा जीवनप्रवास संपतो. डॉक्टर प्रत्येकाला जीवाची पर्वा न करता वाचवण्याचा प्रयत्न करतो."
1 जुलै हा डॉक्टरांचा सन्मान करण्याचा करण्याचा दिवस. एक डॉक्टर म्हणून डॉक्टरांवर होणाऱ्या आरोपांबाबत तुमचं मत काय? या प्रश्नावर बोलताना त्या म्हणतात, "डॉक्टर मुद्दाम लोकांचा जीव धोक्यात आणत नाहीत. लोकांचे प्राण वाचावेत यासाठी प्रयत्न करतात. मात्र लोक विसरतात डॉक्टरही सामान्य व्यक्तीच आहेत. लोकांच्या डॉक्टरांकडून खूप अपेक्षा असतात. पण डॉक्टरांना लोकांकडून काय मिळतं? लोक डॉक्टरांशी खूप कठोर वागू लागलेत याचं वाईट वाटतं."
"आठ-दहा तास पीपीई किटमध्ये राहणं सोप नाही. अन्न, पाण्याशिवाय काम करावं लागतं. ज्युनिअर डॉक्टरांसाठी हा काळ फार महत्त्वाचा आहे. मी त्यांना नेहमी सांगते, स्वत:वर विश्वास ठेवा."
आपल्या कुटुंबीयांबाबत त्या सांगतात, "मी घरीच राहते मुलांसोबत, कुटुंबासोबत. मुलांशिवाय तुम्ही राहू शकत नाही. मुलांना सोडून दूर राहणं मला पटत नाही. मुलांनाही आई-वडिलांची गरज असते. त्यांच्या मनातही भीती असते. त्यांना फक्त सांगता येत नाही. त्यामुळे मुलांपासून दूर राहणं योग्य नाही. हो, एक मात्र खरं - योग्य काळजी घेतली पाहिजे."
"माझ्या कुटुंबाने मला दिलेली साथ, त्यांचा पाठिंबा, माझ्यावरचा विश्वास यामुळे हे सर्व शक्य झालं. माझ्या कुटुंबाने मला कधीच थांबवलं नाही, त्यामुळेच मी पुन्हा नव्या उमेदीने कोरोनावॉर्डमध्ये परतले आहे."
हेही नक्की वाचा
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)